Thursday, February 10, 2011

तीन तासांचे मालक!

सिनेमा थिएटरात किंवा मल्टिप्लेक्सात कोणी जावं?
 
हा काय प्रश्न झाला?- कोणीही जावं..
 
..ज्याला तीन तास एसीमध्ये गारेगार झोप काढायची असेल, त्याने जावं.
 
ज्याला छावीबरोबर तीन तास ‘अंधेरे मे चंमतग’ करायची असेल, त्याने जावं.
 
ज्याला एकटय़ाने थिएटरात जाऊन शेजारच्या खुर्चीत कोण येईल, याचा जुगार खेळायचाय आणि त्याआधारे अंधारात खुर्चीच्या हातावर ठेवलेल्या आपल्या कोपराची ‘कक्षा’ ठरवायचीये, त्याने जावं.
 
आपल्याकडे गरजेपेक्षा जास्त पैसे आहेत आणि ते आता संपवलेच पाहिजेत अशी खर्चेच्छा बळावल्यामुळे ज्याला 20 रुपयांना पाणी, 25 रुपयांना सामोसा आणि 30 रुपयांना कोल्ड्रिंक प्यायचे असेल, त्याने जावं.
 
आपल्या शरीरात रक्त खूप झाले आहे आणि ते योग्य पातळीवर आणण्यात परिसरातले डास कमी पडताहेत, तेव्हा आता ढेकणांना एक चान्स देऊन पाहायला हरकत नाही, असं ज्याला वाटत असेल, त्याने जावं.. चकचकीत मल्टिप्लेक्समध्ये ढेकूण असत नाहीत, अशी समजूत करून घेऊ नका. काही मल्टिप्लेक्सेसमध्ये तर काही वेगळ्या, खास ढेकूणयुक्त खुर्च्या बसवण्यात आल्या आहेत. त्यांचा वेगळा चार्ज लावत नाहीत, हेच नशीब. (संदर्भ : मध्यंतरी मुंबईतल्या एका मल्टिप्लेक्समध्ये ढेकूण चावल्याची तक्रार एका ग्राहकाने केली , तेव्हा थिएटरच्या मॅनेजरने ‘इतर कुणी तशी तक्रार केली नाही, तेव्हा ती एकच खुर्ची असेल कदाचित ढेकणांची’ असं स्पष्टीकरण दिलं होतं.)
 
थोडक्यात काय, तर ज्याला सिरीयसली सिनेमा बघायचा आहे, असा माणूस सोडून बाकी कोणीही थिएटरात जावं. कारण, त्याच्या ‘मनोरंजना’ची सगळी व्यवस्था तिथे आहे.
 
गंमत आहे ना! जी इमारत, यंत्रणा, व्यवस्था केवळ सिनेमा पाहण्यासाठीच करण्यात आली आहे, तिथे सिनेमा पाहणं सोडून इतर काहीही करता येतं.. सिनेमा नीट पाहता मात्र येत नाही.
 
का?
 
कारण ज्यांना सिनेमा पाहण्यात रस असतो, अशी माणसं थिएटरात येत नाहीत; आलीच तरी त्यांचं प्रमाण फार कमी असतं. थिएटरातल्या अराजकी ‘प्रजासत्ताका’त ते आदिवासींसारखे बावळट आणि अल्पसंख्य ठरतात.
 
गंमत म्हणजे थिएटरमध्ये आलेल्या प्रत्येकाला, आपण सिनेमा पाहायलाच आलो आहोत, असं वाटत असतं आणि नंतर त्यांना विचाराल की, बाबा रे, आत तीन तास बसून तू काय केलंस?- तर त्यांचं उत्तर ‘सिनेमा पाहिला’ असंच असेल.
 
म्हणजे तेही त्यांच्या पद्धतीनं सिनेमा पाहातच असतात.
 
म्हणजे कसा? तर इतर महत्त्वाच्या कामांमधून वेळ काढून.. घरोघरच्या बायका भात टाकता टाकता, भाजीला फोडणी देता देता जशा टीव्हीवरच्या मालिका पाहात असतात, तसा.
 
थिएटरमध्ये अशी काय महत्त्वाची कामं असतात?
 
खूप असतात.
 
सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे कोंडाळं करून एकमेकांमध्ये खूप गप्पा मारायच्या असतात.
 
गप्पा इतरत्र मारता येत नाहीत का?
 येतात की!- आणि इथे गप्पा छाटणारे जिथे तिथे गप्पा छाटतच असतात. पण, थिएटरमध्ये कशी छान शांतता असते, त्यामुळे एकमेकांचं बोलणं खूप स्पष्ट ऐकू येतं- शिवाय चेकाळून मोठय़ाने बोललं वा खिंकाळून हसलं की एकदम स्टीरिओफोनिक आवाज घुमतो ना थिएटरभर. तो ज्याम आवडतो ऐकायला.
कॉलेजमधल्या मित्रमैत्रिणींमध्ये सगळ्यात छान गप्पा थिएटरातच होतात. इंटरव्हलपर्यंत तर कुणी कुणाच्या शेजारी बसायचं यावरूनच धमाल चालते. प्रत्येक बदलत्या जागेवर ग्रुपमधल्या प्रत्येकाची एक कमेंट/ एक खिंकाळी मस्ट असते.
 
यांच्यात कोणाही ‘योग्य व्यक्ती’च्या शेजारी कधीच बसायला न मिळणारी एक ‘सिटिंग कॉमेडियन्स’ची जमात असते. (स्टँड अप कॉमेडियन कसे उभे राहून विनोद करतात, तसे हे खुर्चीत बसून विनोद करतात.) ग्रुपमधल्या प्रत्येका/कीवर कमेंट करणे आणि इतर कुणी हसण्याआधी आपणच त्यावर खो खो हसणे, हे त्यांचं काम. ग्रुपमधली गि-हाइकं संपली की हा कॉमेडियन पडद्यावर सुरू असलेल्या प्रसंगांवर टिपणी करून ‘आडय़न्सला हशिवन्या’चा प्रयत्न करतो. दुर्दैवाने हा ‘प्रसिद्धीपराड्.मुख'(कलावंत कायम अंधारातच राहात असल्याने इतर प्रेक्षकांना त्याचा योग्य तो ‘आदर-सत्कार’ करता येत नाही.)
 
गप्पा मारण्याची काही माणसांची हौस इतकी प्रबळ असते की ते थिएटरमध्ये एकटेच आले तरी त्यातून मार्ग काढतात. ते थेट पडद्यावरच्या पात्रांशीच जाहीर संवाद साधतात.. म्हणजे पडद्यावर कोणी झोपलेलं असेल, तर ‘ए ऊठ, साडेबारा वाजले’ असं बोलायचं. पडद्यावर कोणी कुणाला पकडलं असेल, तर ‘ए सोड सोड सोड’ असं ओरडायचं आणि कोणी कुणाला तसंच ‘सोडलं’ असेल, तर ‘पकड पकड’ म्हणून ओरडायचं. ही मंडळी सलमान खान, सनी देओल वगैरे मंडळींना मारामारीच्या प्रसंगात ‘मार साले को, पटक हरामी को, फोडून टाक त्याचा थोबडा’ वगैरे इन्स्ट्रक्शन देतात आणि हे हीरो त्याबरहुकूम खलनायकांची पिटाई करतात, असा अनुभव आहे.
 
काही ‘संवादी’ मंडळी थिएटरमध्ये येतात तीच मुळी निवांतपणे शांत वातावरणात महत्त्वाचे काही फोन करून घ्यायला. पडद्यावर काहीही सुरू असो वा नसो- हे लोक कानाला फोन लावून मोठमोठय़ा आवाजात पलीकडच्या पार्टीशी बोलत असतात. पलीकडची पार्टीही यांच्यासारखीच ‘विशालकंठी’- त्यात थिएटरात शांतता, त्यामुळे दोन्ही बाजूचा संवाद सगळ्या थिएटरला व्यवस्थित ऐकू जातो. या परोपकारी मंडळींना आपल्या संवादांप्रमाणेच आपले भयकारी रिंगटोनही सर्वाना व्यवस्थित ऐकवण्याचा छंद असतो.
 याशिवाय गाण्यांवर उठून नाचणारे, हिरो-हिरोइन पडद्यावर आल्यानंतर शिटय़ा मारणारे, रडक्या लहान मुलांना घेऊन थिएटरात येणारे, पुढच्या खुर्चीवर पाय ठेवणारे, खाकरणारे, पिंकणारे, थुंकणारे, मच्यॅक मच्यॅक खाणारे या सगळ्या प्रकारचे लोक ही सगळी महत्त्वाची कामं करता करता अधूनमधून सिनेमा पाहात असतात..
..त्यात ज्याला थिएटरात येऊन फक्त सिनेमाच बघायचाय असा अडाणी माणूस सिनेमा कसा पाहू शकेल?
  25-35 रुपये तिकीटवालं, दुर्गँधीयुक्त, मोडक्या खुर्च्यांचं, डबडा सिंगल स्क्रीन थिएटर असो की 250-350 रुपये तिकीटांचं, झुळझुळीत, सुळसुळीत गर्दीचं, सुगंधी, गुबगुबीत खुर्च्यांचं मल्टिप्लेक्स- सगळीकडे सिनेमा पाहायच्या निमित्तानं येणा-या 90 टक्के माणसांना सिनेमा पाहायचा नसतोच.. आपण सिनेमा पाहायला आलोय, या महान ऐतिहासिक घटनेचं सेलिब्रेशन करण्यासाठी हे ‘मायबाप’ प्रेक्षक गोळा झालेले असतात.. सिनेमा पाहताना  बाकी सगळी व्यवधानं मनातून बाजूला सारून पडद्यावरच्या द्विमित जगात प्रवेशलं पाहिजे, दिग्दर्शकानं पडद्यावर लिहिलेलं जिवंत पुस्तक कॅमे-याच्या नजरेनं वाचलं पाहिजे, हे इथे कधीच कुणी कुणाला शिकवलेलं नाही.. आपणहून शिकायची सवय असती तर सार्वजनिक ठिकाणी मोबाइलचा आवाज बंद केला पाहिजे, यासारखी बेसिक गोष्ट तरी लोक शिकले असतेच ना!
ही केवळ माध्यमनिरक्षरता नाही, ‘प्रजासत्ताकी’ मग्रुरी आहे.
 
आपण थिएटरचं तिकीट काढलं म्हणजे बादशहाच झालो, तीन तास मालक झालो थिएटरचे, खुर्चीचे, एसीचे, पडद्याचे, दिग्दर्शकाचे, नटाचे, नटीचे- आता आपल्या इच्छेनुसार सगळं भोगून घ्यायचं, बिनधास्त ओरबाडायचं. आपल्यासारखेच इतरही तिकीट काढून आलेत, याचं भान हवं कशाला? त्यांनी त्यांच्या पद्धतीनं एन्जॉय करावं, आम्ही आमच्या पद्धतीनं पैसावसूल करणार, अशी ही कमालीची अप्पलपोटी ‘रसिकता’ आहे..
 ..जिथे जिथे आपण पैसे ‘फेकतो’, त्या प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी आपण असेच वागतो- बसमध्ये, ट्रेनमध्ये, हॉटेलात, रस्त्यावर.. मग थिएटरांचा अपवाद कशाला?
म्हणूनच थिएटरमध्ये, मल्टिप्लेक्समध्ये कोणीही जावं..
 
फक्त, ज्याला फक्त सिनेमा पाहायचाय, तो सोडून.


(चित्र : प्रदीप म्हापसेकर) 
(30/1/11)

No comments:

Post a Comment