Sunday, October 30, 2011

निरर्थक, मंगलमय शुभेच्छा

हार्दिक शुभेच्छा..


मन:पूर्वक शुभेच्छा..
 
मनापासून शुभेच्छा..
 
तेजोमय शुभेच्छा..
 
मंगलमय शुभेच्छा..
  
लक्ष्मीपूजनानंतरची सकाळ फटफटल्यावर धुरकट आसमंतातून सर्वदूर पसरलेला फटाक्यांच्या जळकट अवशेषांचा खच दिसावा, तसा आसपास शुभेच्छांचा खच पडलाय.. मोबाइलवर, एसेमेसमधून, भेटवस्तूंवरच्या मजकुरातून, ग्रीटिंगांतून. कोणा एकासाठी नाही, तर सगळ्यांकडून सगळ्यांसाठी.. कुठे शब्द वेगळे, साधनं वेगळी, व्यक्त होण्याची माध्यमं वेगळी. भले सणाचं रिच्युअल म्हणून नाकं मुरडली तरी माणसं एकमेकांना मन:पूर्वक, हार्दिक वगैरे शुभेच्छा देतायत ही अतीव आनंदाची गोष्ट म्हणायला हवी.
 
काय शुभेच्छा देतात लोक एकमेकांना?
 त्या दिवसापासून सुरू होणारं पुढील वर्ष आनंदाचं, सुख-समाधानाचं, आयुरारोग्यसंपन्न भरभराटीचं जावो, अशी मंगलमय कामना करतात लोक एकमेकांसाठी. किती सुंदर गोष्ट. एकमेकांचे पाय ओढण्याच्या, स्वत:पुरतं पाहण्याच्या आजच्या काळात (असा काळ कोणत्या काळात ‘आज’चा नव्हता, हा संशोधनाचा विषय ठरेल म्हणा, पण तरीही) माणसं एकमेकांच्या भल्याची कामना करतात, ही किती मौलिक गोष्ट आहे. शिवाय या शुभेच्छा देताना माणसं एकमेकांचं वय, व्यवसाय, आर्थिक स्तर, सामाजिक स्तर, जात, उपजात, लिंग इतकंच काय धर्म देखील पाहात नाहीत, हे धर्मजातपंथांनी बुजबुजलेल्या भारतवर्षात एक मोठंच आश्चर्य. समोर येणारा ओळखीचा-निमओळखीचा-बिनओळखीचा असला तरी त्याला पाहताच ओठावर हास्य फुलतं, हात आपोआप हस्तांदोलनासाठी किंवा आपल्या ओंजळीत समोरच्याचे हात घेण्यासाठी पुढे होतात आणि हसूभरल्या विस्फारित तोंडातून साखरपाकात घोळल्यासारखे शब्द उमटतात, ‘हॅपी दिवाली.. शुभ दीपावली.. दीपावलीच्या शुभेच्छा.’ यात बदल फक्त सणाच्या नावाचा. सण बदलला की ‘हॅपी’च्या पुढचं सणाचं नाव बदलतं, पण, मायना आणि भावना त्याच राहतात.. हितचिंतनाच्या, शुभचिंतनाच्या.
मग प्रश्न असा पडतो की आपण सगळे एकमेकांचे ओळखीचे-निमओळखीचे-बिनओळखीचे भरघोस शुभचिंतक आहोत, तर मग एक समाज म्हणून आपला उत्कर्ष का बुवा असा रडत खडत चाललाय? तो एकदिलानं, एकमुखानं का नाही होत झरझर? आता राष्ट्रीय किंवा राज्यीय किंवा भाषक अस्मितेच्या आधारे ‘पाऊल पडते पुढे’चं सरकारी अनुबोधपटातलं प्रगतीचं गाणं गाऊ नका. ते गाणं सुमारे 60 वर्ष गातायत सगळे आणि पाऊल जिथल्या तिथेच घोळतंय. सरकारी आकडेवारीतल्या विकासाच्या दराबिराकडे लक्ष वेधू नका किंवा डिफेन्सिव्हवर जाऊन एकदम जागतिक मंदीचं कारणही सांगू नका. कारण, आपल्या देशाच्या विकासाचा उधळलेला वारू जेव्हा 2000 साली महासत्ता बनण्याच्या दिशेनं बेफाम दौडत होता, तेव्हा तरी परस्परांच्या सगळय़ा शुभचिंतकांचा समान विकास कुठे होत होता? समृद्धीची ओंगळ बेटं वाढली किंवा अब्जाधीशांची संख्या वाढली म्हणजे सगळय़ा समाजाचा उत्कर्ष झाला, असं होत नाही.
 
आता हा अर्थकारणाचा फारच अवघड आणि क्लिष्ट विषय सुरू करून त्या निबीड अरण्यात वाट हरवण्याआधीच आपण परत फिरूयात आणि मूळ प्रश्न थोडय़ा वेगळ्या पद्धतीनं पाहूयात.. तो अधिक थेटपणे विचारूयात.
 आपण वेळोवेळी तोंडभरून एकमेकांना वर्षातून इतक्या वेळा एकमेकांना एवढय़ा शुभेच्छा देतो खऱ्या, पण, आपण खरोखरच एकमेकांचे शुभचिंतक आहोत का?
हा काय प्रश्न झाला? एकमेकांविषयी प्रेम, आस्था, जिव्हाळा, स्नेहभाव असल्याखेरीज का लोक एकमेकांना एक पैसा ते एक रुपया एसेमेस या दरानं पदरमोड करून शुभेच्छा देतात?
 करेक्टाय. तुमचं म्हणणं एकदम करेक्टाय.
पण, मग आपण एकमेकांना शुभेच्छा देतो त्या एकदम जबाबदारीविहीनच नसतात का? म्हणजे, पुढचं वर्ष तुम्हाला भरभराटीचं जावो. ते तुमचं तुमचं तुमच्या मेहनतीनं किंवा इकडेतिकडे हात मारून जावो, त्यात आपला संबंध काय नाय.
तुम्हाला आनंद लाभो, सुख लाभो, समाधान लाभो, शांती लाभो.. ती तुमची तुम्हाला तुमच्या कर्मानं लाभो, आमचा संबंध शुभेच्छा देण्यापलीकडे काय नाय.तुम्ही म्हणाल, कमाल झाली. शुभेच्छा म्हणजे फक्त भावना. ती चांगली असली म्हणजे झालं.
पण, मग आम्ही म्हणू कृतीविना भावना म्हणजे वाळूतलं निसर्गक्रियाकर्म.. ना फेस ना पाणी. मी तुमच्यासाठी काहीच करणार नाही, तुमचं तुमचं भलं होवो, ही शुभेच्छा म्हणजे अंधश्रद्धाच झाली.
मग काय करायचं?
आपण दुस-याला सुखी, समाधानी, आनंदी, शांत, समृद्ध वगैरे करण्यात काही मदत करू शकत असलो, तर ती केली पाहिजे. त्यासाठी आपल्याला आधी
आपल्याबरोबरच इतरांचा विचार करता आला पाहिजे. सगळय़ांचा उत्कर्ष एकमेकांना बरोबर घेऊनच होऊ शकतो, हे आपल्याला मान्य आहे का?
कठीण आहे. इथे प्रत्येकाला स्वत:च्या सुखाची गॅरंटी देता येत नाही, तिथे दुस-याच्या समाधानाचा हवाला कोण देणार?
मग उगाच बडबोल्या ऐसपैस शुभेच्छा कशाला द्यायच्या? आपण प्रॅक्टिकल शुभेच्छा देऊयात एकमेकांना.
म्हणजे असं की सकाळी स्टेशन गाठण्यासाठी रिक्षा पकडल्यावर रिक्षावाल्यानं प्रवाशांना शुभेच्छा द्याव्यात, तुमचा प्रवास सुखाचा होवो. आता यात रिक्षा वायुवेगानं न चालवण्याची, खड्डय़ात न घालण्याची, मीटर फास्ट ठेवून प्रवाशांना न गंडवण्याची जबाबदारी रिक्षावाल्याला पार पाडावी लागणार.
ट्रेनमध्ये प्रवाशांनी एकमेकांना शुभेच्छा द्याव्यात की तुमचा प्रवास सुखाचा, शांत होवो. मग मोबाइलवर कर्कश्श गाणी न लावण्याची, छप्परफाडू आवाजात फोनवर किंवा मित्रांशी गप्पा न छाटण्याची, पत्ते न खेळण्याची, भजनं गाऊन डबा डोक्यावर न घेण्याची जबाबदारी एकमेकांवर येईल.
स्टेशनांवर गाडी थांबेल तेव्हा फलाटावरच्या आणि ट्रेनमधल्या प्रवाशांनी एकमेकांना शुभेच्छा द्याव्यात. म्हणजे चढता-उतरताना धक्के लागून जीव जाण्यापर्यंतचे प्रकार, भांडणं, मारामाऱ्या टळतील.
राजकीय पुढा-यांनी जनतेला शुभेच्छा द्यायच्या की तुमचं शहर सुंदर स्वच्छ राहो. म्हणजे गल्लोगल्ली, रस्त्यारस्त्यावर, हरएक चौकात गलिच्छ, बीभत्स, ओंगळ, किळसवाणी होर्डिग न लावण्याची जबाबदारी त्यांच्यावर येईल.
 
शहरातल्या सगळ्या लोकांनी एकमेकांना शुभेच्छा द्यायच्या की कोणताही रोग न होता तुमचं संपूर्ण आयुष्य तुम्हाला ठणठणीत जगता यावं. म्हणजे मग जागोजाग थुंकून, बेडके टाकून रोगाणूंचा फैलाव न करण्याची जबाबदारी सर्वावर येईल.जमेल का अशा सार्थ शुभेच्छा द्यायला?
 अवघड आहे ना? त्यापेक्षा आपण नेहमीसारख्या निर्थक, मंगलमय शुभेच्छाच दिलेल्या ब-या.. ..बिलेटेड हॅपी दिवाळी!!!
 

Sunday, October 23, 2011

बाळ इंदर यास,

ज्येष्ठ विधिज्ञ आणि ‘टीम अण्णा’चे सदस्य प्रशांत भूषण यांनी काश्मीरमध्ये सार्वमत घेण्याचा पुरस्कार केला आणि त्यांना श्रीराम सेना नावाच्या कट्टर हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिका-यांनी मारहाण केली. मारहाणीची चित्तथरारक दृश्यं वृत्तवाहिन्यांवर दिवसभर दाखवली गेल्यानं त्यांत ठळकपणे झळकलेला इंदर वर्मा हा मारहाणप्रमुख कट्टर हिंसावाद्यांचा हीरोच बनून गेला. त्याच्या पत्रपेटीवर आम्ही खास लक्ष ठेवलं होतं. त्याला आलेली ही निवडक पत्रं..
बाळ इंदर यास,
 
त्या वाकडतोंडय़ा गांधीच्या टीममधल्या पिरपिर पोपटाला ठोकल्याबद्दल तुझं त्रिवार अभिनंदन आणि तुला लाख लाख धन्यवाद.
 
मुळात कोणी कोणाला ठोकलं की आम्हाला भयंकर आनंद होतो. आमचा स्वभावच हातात रिमोट कंट्रोल घेऊन टीव्हीवर गेम खेळणा-या पंधरा वर्षाच्या पोरासारखा आहे. कॉलेजकुमार नातू आता जाहीरपणे शीला, जलेबीबाइं यांना नाचवायच्या वयाचा झालाय, पण, आम्ही मात्र याच्याकडून त्याला परस्पर कानफटवून आनंदानं टाळय़ा पिटण्याच्या गेममध्ये रमतो.. बीअरतोअसं म्हणणार होतो, पण, टीव्हीवरचा तुझा आवेश पाहता आणि तुझ्या संघटनेचा पूर्वेतिहास पाहता तुला विनोद कितपत कळेल, याची शंका आहे. असो.
 
तर मुळात कोणीही कोणालाही चोपत असला की ते पाहायला आम्हाला जाम आवडतं. त्यात चोपला जाणारा कोणी पाकडा-वाकडा-भय्युडा-बांगडा असला की आमच्या आनंदाला उकळय़ाच फुटतात. कोण तो प्रशांत भूषण! (दचकू नकोस. तो कोण आहे ते आम्हाला व्यवस्थित ठाऊक आहे. आम्ही कोणाचाही कचरा करायचा असला की असं बोलतो. कोण तो बराक ओबामा असंही आम्ही म्हणू शकतो. काय फरक पडतो? तुझ्या भाषेत सांगायचं तर की फर्क पैंदा? आपण त्याला ओळखतो की न ओळखतो यानं त्याचं काहीच वाकडं होत नाही आणि आमच्या सैनिकांना आपले साहेब कुणालाही ललकारू शकतात, काय टेरर आहे त्यांची, असं वाटतं. असो.)
 
तर तो प्रशांत भूषण म्हणतो काश्मिरात सार्वमत घ्यायला हरकत काय! अरे, काश्मीर काय तुझ्या बापाचा आहे काय? (असे रागाने डोळे वटारून पाहू नकोस.. तुझ्याम्हणजे त्याच्यारे बाबा!) खरं सांगू का काश्मिरशी तुझ्याप्रमाणेच आमचाही काहीएक थेट संबंध नाही. पण, आमच्या महाराष्ट्रात काही खास प्रजातींमध्ये अशी पद्धत आहे की आपला कशाशीही संबंध असो-नसो; आपण त्याबद्दल बिनधास्त बोलायचं. तिथल्या परिस्थितीची गुंतागुंत समजून न घेता शाळकरी पोराच्या आकलनानं बोलायचं. आमचा फाळणीशी काहीही संबंध आला नाही. तरीही त्याबद्दल आमची स्ट्राँग मतं असतात. काश्मीरमध्ये आम्ही (म्हणजे मी नव्हे, मराठी माणसं- मी कुठेच जात नाही. आदेश देण्यातून, फर्मानं सोडण्यातून, विचारांचं सोनं वाटण्यातून, टिंगलटवाळी करण्यातून फुरसतच मिळत नाही रे!) राजाराणी ट्रॅव्हलबरोबर शांततेच्या काळात फिरायला जातो फक्त. पण, तेवढय़ावर आम्हाला काश्मीरच्या समस्येवर काहीही बोलायचा हक्क आहे.
 
मी तर काश्मीर जास्तकरून सिनेमातच पाहिलाय- आमच्या शम्मी, राजेंद्रकुमार, देव आनंद यांच्या सिनेमांत. पण, म्हणून काय झालं. काश्मिरी जनतेचं मत काहीही असो, काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहणार, हेच आमचं ठाम मत आहे आणि आम्ही म्हणू ती पूर्व-पश्चिम-उत्तर-दक्षिण हे तर सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट आहे. त्यामुळे प्रशांत भूषणचं आमच्या मताविरुद्ध वटवट करणारं थोबाड तू फोडलंस, याचा मला फार फार आनंद झाला.
 
तुझ्या श्रीराम सेनेचं नाव लगेच ब्रेक झालं म्हणून- नाहीतर मी ठोकून देणार होतो बिनधास्त की हा माझ्याच सेनेचा आहे आणि त्याचा मला अभिमान आहे.
 
अभिमान कशाचाही बाळगता येतो आणि त्यासाठी कसलाही विचार करायची गरज नसते, या मताचा कोणताही सैनिकहा आपलाच सैनिक मानणारा,
 
तुझाच,
 
हिंहृस
 
इन शॉर्ट हिंस्त्रसम्राट
-----------------------------------------------------------------
अप्रिय इंदर यास,
 
निषेध निषेध, त्रिवार निषेध!
 
तू प्रशांत भूषण यांना केलेल्या मारहाणीचा त्रिवार निषेध.
 
गैरसमज नको. प्रशांत भूषण यांना- काही वेगळय़ा कारणांसाठी- चोपायलाच हवं होतं असं माझं स्पष्ट मत आहे. माझं स्पष्ट मत हे माझ्या पक्षाचं अस्पष्ट आणि अनधिकृत मत असतं, हे आतापर्यंत स्पष्ट झालेलं आहेच. मात्र, तू ती मारहाण केल्यामुळे तुला आमच्या पक्षानेच सुपारी दिली होती, असा सर्वाचा ग्रह झाला होता. (आमच्या पक्षाचा तू सक्रिय कार्यकर्ता असूच शकत नाहीस, हे तर आपोआपच स्पष्ट आहे. कारण, आमच्या पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता बनण्यासाठी अंतर्बाह्य निष्क्रिय असणं हेच प्रमुख क्वालिफिकेशन आहे.) तर हा गैरसमज निर्माण करणारं कृत्य केल्याबद्दल तुझा निषेध.
 
मात्र, याच कृत्याबद्दल तुझं अभिनंदन.
 
कारण, तू केलेल्या मारहाणीची दृश्यं ज्यांनी पाहिली असतील, त्यांना हे कळलं असेल की प्रशांत भूषण हे बेगडी गांधीवादी आहेत. ज्याला साधे फटकेसुद्धा शांतपणे खाऊन घेता येत नाहीत, जो प्रतिकार करतो, एवढंच नव्हे, तर हल्लेखोर एकटा सापडल्यावर त्याला चोप चोप चोपतो, तो कसला गांधीवादी.
फार लागलं नाही ना रे तुला! कडक हाड आहे त्या प्रशांत भूषणचं.
 
तुझा,
 
दिग्गीराजा
-------------------------------------------------------------------------------
बाळ इंदर,
 
तुझा निषेध.
 
तू केलेलं कृत्य आपल्या संघटनेच्या तत्त्वात बसत नाही.
 
गांधीजी हे आपले प्रात:स्मरणीय पुढारी आहेत आणि त्यांच्या अहिंसेवर आपल्या संघटनेचा ठाम विश्वास आहे.
 
असे असताना तू एक हिंसक हल्ला चढवून संघटनेच्या नावाला काळिमा फासण्याचं कृत्य केलं आहेस, त्याची आम्हाला शरम वाटते.
 
तुझा नसलेला,
 
रास्वसं
 
(अतिशय बारीक अक्षरांतली तळटीप : संघटनेच्या पद्धतीप्रमाणे सगळा मजकूर उलट अर्थाने वाचावा.)
 
------------------------------------------------------------------
मा. इंदर वर्मा यांस,
 
टीव्हीवर आपले फायटिंग सीन पाहिले.
 
माँ कसमक्या स्टाइल है आपकी.
 
आमच्या संघटनेतर्फे तुम्हाला मानद सदस्यत्व देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आपला होकार कळवल्यास समारंभाची तारीख ठरवता येईल.
 
कळावे,
 
आपल्या फायटिंग स्टाइलवर फिदा,
 
बॉलिवुड फाइटमास्टर असोसिएशन
--------------------------------------------------------------------------------
आदरणीय इंदर वर्मासाहेब,
 
लहान तोंडी मोठा घास घेत असल्याबद्दल क्षमस्व.
 
टीव्हीवर आपली मारामारीची दृष्ये बघितली. आपण प्रशांत भूषण यांना पायाने तुडवत असल्याचे दृश्य तर वारंवार रिवाइंड करून बघितले. आमच्या धंद्यात तुमच्यासारखं कौशल्य असलेला कारागीर वर्षानुवर्षात एखादाच तयार होतो. तुमच्याकडे उपजतच ते कौशल्य आहे, यात आम्हाला तरी शंका नाही.
 आमच्या भट्टीवर रोज सकाळी पावाची कणीक तुडवायला यावे, अशी आग्रहाची आणि नम्र विनंती. योग्य मेहनताना दिला जाईल, याची खात्री बाळगा.
आपले नम्र,
 इंदूर बेकरी ओनर्स असोसिएशन


(चित्र : प्रदीप म्हापसेकर) 


(प्रहार, २३ ऑक्टोबर, २०११)

Tuesday, October 18, 2011

लम्हें नही तोडा करते

जगजितचं बोट नेमकं कधी हातात आलं, ते सांगणं कठीण आहे..
 
एक नक्की की ते ज्या वयात हातात आलं असावं, ते वय खरं तर कोणतंही वडीलधारं बोट सोडण्याचं होतं..
 
लहानपणापासून हातात दिली गेलेली, विश्वासानं धरलेली बोटं सोडून देऊन धावण्याची ऊर्मी आतून धडका देण्याचं वय.. त्यात बोटंच नव्हेत, तर हातही झिडकारले जात होते.. शिंगं फुटत होती.. तीच अक्कल आल्याची खूण वाटत होती..
 
हाडं मजबूत होण्याचा, स्नायूंना पीळ बसण्याचा, मिसरुडांच्या मिश्या बनण्याचा, सगळे वडीलधारे शत्रू वाटण्याचा तो ऊग्र, खरखरीत, रगेल, आक्रमक काळ.. अभ्यास, एकाग्रता, सखोलता तद्दन बोअरिंग वाटण्याचा, उथळ खळखळाटी ‘झंकार बीट्स’वर झुलण्याचा काळ.. अशात जगजितच्या घनगंभीर, खर्जदार आवाजावर स्वार होऊन गजलेसारखी खानदानी, संथ लयीची चीज आत कधी आणि कशी वस्तीला आली, हे आश्चर्यच. ही बया (कोणत्याही बयेसारखी) समजायला कठीण, संपूर्ण अवधान मागणारी आणि घटकेघटकेला कौतुकाची दाद चाहणारी.
 
खरं तर याचं एवढंही आश्चर्य वाटायला नको.. कारण, त्या वयाचं काटेरी आवरण जरा नखलून पाहिलं तर आत सगळी कोवळी तगमग.. जराजराशा विफलतेनं आत काहीतरी कायमचं तुटून गेल्यासारखं वाटण्याचा, मैत्रीच्या-नात्यांच्या आणाभाकांचा, नाजुक नात्यांच्या ओल्या शपथांचा, उमाळय़ा-उसाश्यांचा, उशीत तोंड दाबून रडण्याचा आणि वर्षातून किमान चारआठदा तरी संपूर्णपणे उद्ध्वस्त वगैरे होऊन जाण्याचाही हाच तर काळ होता..अशा काळात

दिल ही तो है न संगोखिश्त
दर्द से भर न आए क्यूं
रोएंगे हम हजार बार

कोई हमें सताए क्यूं
 
असं विचारणारा जगजित हमसफर न बनता तरच नवल.. जगजितचा खर्ज आणि जगजितची तर्ज यांच्या काँबिनेशनची एक गंमत होती.. त्याची गज़्‍ाल वडीलकीचा बडेजाव न मिरवता आश्वस्त करायची आणि गळ्यात न पडता दोस्तीचा आधारही द्यायची.. एखाद्या मित्रानं नुसतं शेजारी बसून राहावं आणि त्याच्याशी काही न बोलतासुद्धा छान वाटावं तसा..
इक शाम की दहलीज पर
बैठे रहे वो देर तक
आँखोसे की बाते बहुत
हमने कहा कुछ भी नही
 
जगजितला त्या वयातल्या सगळ्या तगमगी कशा कोण जाणे, पण ठाऊक होत्या..
सोचा नहीं अच्छा बुरा
देखा सुना कुछ भी नही
मांगा खुदा से रात दिन
तेरे सिवा कुछ भी नही
 
अशी हुळहुळी गुप्त जागाही त्याला माहिती आणि
जब कभी तेरा नाम लेते है
दिल से हम इंतकाम लेते है
मेरी बरबादीयोंके अफसाने
मेरे यारों के नाम लेते है
 
ही विस्कटलेल्या नात्यांची पुस्तकांच्या पानांत दडवलेली हिरव्या पानांची जाळीही त्याच्या हाती बरोब्बर लागायची.
ऐ खुदा रेत के सेहरा को
समंदर कर दे
या छलकती हुई आंखों को भी
पत्थर कर दे
 
अशी भयावह असोशीही तो परफेक्ट पकडायचा.
गम्म बढे आते है क़ातिल की निगाहों की तरह
तुम छुपा लो मुझे ऐ दोस्त गुनाहों की तरह
 
ही कातर हुरहूरही त्याला ठाऊक असायची.
दैरोहरममे चैन जो मिलता
क्यूं जाते मैखाने लोग
 
असा त्या वयाला साजेसा उद्धट सवाल तो आपल्यावतीनं करून टाकायचा. जोडीला गालिब असला की विचारूच नका..
ग़ालिब छुटी शराब, पर अब भी कभी कभी
पीता हूं रोजे अब्र, शबे माहताब में
 
इथे मनातलं आकाश अर्धा वेळ ढगाळलेलं आणि अर्धा वेळ चांदण्यात न्हाऊन निघालेलं.. म्हणजे रोजचीच ‘सोय’ करून टाकली की!
सरकती जाए है रुख से नकाब
आहिस्ता आहिस्ता
 
किंवा
हँस के बोला करो बुलाया करो
आप का घर है आया जाया करो
 
अशी खटय़ाळ छेडछाड अवचितच कधी व्हायची.
 
या गृहस्थांचा मेन बिझनेस आतल्या गाठींचा गुंता उकलण्याचा किंवा खरं तर आणखी गाठी मारून ठेवण्याचा. तो कधी बेसावध गाठून फरपटत खेचून न्यायचा आणि थेट आरशासमोर उभं करायचा..
मेरी जिंदगी किसी और की
मेरे नाम का कोई और है
मेरा अक्स है सरे आइना
पसे आइना कोई और है
 
घ्या, म्हणजे आरशासमोर आहे तेच आपलं प्रतिबिंब आहे आणि आरशात आहे तो दुसराच कुणीतरी, मग ‘आपण’ कोण?.. ही पंचाईत परवडली, असं विश्वरूपदर्शनही तो घडवायचा..
न था कुछ तो खुदा था
कुछ न होता तो खुदा होता
डुबोया मुझ को होने ने
न होता मै तो क्या होता?
 
स्वत:च स्वत:ला अंतर्बाह्य सोलवटून काढण्याच्या काळातली आपल्या अस्तित्वाचीच ही क्रूर झाडाझडती! हाच जगजितचा डाव होता तर!
 
गजल मुळात गजालीसारखी गप्पिष्ट. यारदोस्तांची मैफल जमवणारी. प्रत्येक शेराला वाहवाहीची धमाल उडवून देणारी. स्वघोषित अभिजनांनी तिचं अपहरण करून तिला सारंगीच्या सुरात पिळवटून ‘शास्त्रीय’ गायनाच्या वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं होतं.. जगजितनं गिटारबिटारच्या साथीनं झुलवत तिला आधी घराघरात नेलं आणि मग चक्क कॉलेजकट्टय़ावर आणलं.. नाक्यावर टाइमपास करत बसलेल्या पोरांना कतील शिफाई, कफील अजहर, बशीर बद्र यांच्या सोप्या सोप्या शब्दांत गुंतवत नंतर थेट गमलिबचा ‘दीवान’च आणून आदळला समोर आणि म्हणाला, ‘‘मोठं तर व्हावंच लागणाराय तुम्हाला दोस्तहो! पुढे काय काय वाढून ठेवलंय ते समजून तरी घ्या.’’  मग काय
बाजीचा-ए-अतफाल है
दुनिया मेरे आगे
होता है शबोरोज
तमाशा मेरे आगे
 
मध्ये शोधा ‘बाजीचा ए अतफाल’ म्हणजे बालोद्यान. ‘शबोरोज’ म्हणजे रात्रंदिवस.
गमे हस्ती का असद किस से हो
जुज-मर्ग इलाज
शमा हर रंग मे जलती है
सहर होने तक
 
जगण्याच्या आजारावर मर्ग म्हणजे मृत्यूशिवाय इलाज कोण करणार? सकाळ झाली की मेणबत्तीलाही विझायचंच असतं (आणि सकाळपर्यंत जळायचंच असतं.)
सब कहाँ कुछ लाला ओ गुल मे
नुमाया हो गयी
खाक मे क्या सूरते होगी
जो पिनहा हो गयी
 
ही तर जणू ज्ञानेश्वरीतली कूट ओवी.. अभ्यासक अजून अर्थ लावतायत.. त्याच पापुद्रे उलगडतायत..
मोठं होण्यातल्या असह्य कळांवर फुंकर मारत तगमग थोडीशी सुस केली जगजितनं आणि बोट धरून पुढच्या टप्प्यावर कधी आणून सोडलं, ते कळलंच नाही..
यथावकाश नौका स्थिरावली.. 
वादळ संपलंय की नौकेचा नांगर तळात रुतून बसल्यामुळे ती हलत नाहीये, हे कळू नये आणि समजून घेण्याची गरज वाटू नये, अशी स्थिरावली.. आजूबाजूचं पाणी डचमळतंय म्हणजे प्रवास चालू असावा, असं वाटवणारं शेवाळी स्थैर्य आलं.. जगजितलाही ते आलं की काय?.. नंतर त्याच्या आवाजात ‘हे राम’ची एकसुरी भजनी आवर्तनंच ऐकू येऊ लागली.. हरे राम!
 
साहजिकच जगजितचं बोट सुटून गेलं हातातून..
 
निदान परवा-परवापर्यंत तरी तसं वाटत होतं..
 
पण परवा जेव्हा त्यानं खरोखरचं ‘राम’ म्हटलं, तेव्हा घशात आवंढा आणणारा साक्षात्कार झाला..अजूनही नौका डळमळते तेव्हा
अपनी मर्जी से कहाँ अपने सफर के हम है
रुख हवाओं का जिधर का है उधर के हम है 
अशी ‘हवेच्या प्रवासा’ निघालेल्या सुकल्या पानाशी नातं जोडून देणारी कोण गुणगुणतं कानात?
 
बोट कधी सुटलंच नव्हतं की काय जगजित?.. ते हातात इतक्या विश्वासानं विसावलं होतं की आता बहुतेक अभिन्नच होऊन बसलंय..
हाथ छूटे भी तो रिश्ते नहीं छोडा करते
वक्त की शाख से लम्हें नहीं तोडा करते     

 

Thursday, October 13, 2011

मो.वन, बा.वन आणि रा.वन!

सन : 3011
हजार वर्षानंतरचा काळ असल्यामुळे आता सगळंच बदललं आहे. जुन्या काळातल्या मोरूचं नाव झालंय मो.वनआणि त्याच्या बापाचं नाव झालंय बा.वन’.
हा बा.वनपृथ्वीवरच्या गॅलक्सी अपार्टमेंटच्या 737 व्या मजल्यावरच्या त्याच्या घराच्या खिडकीतून पॉवरफुल टेलिस्कोपच्या साह्याने चंद्रावरच्या मूनशाइन अपार्टमेंटच्या 1541 व्या मजल्यावर राहणा-या एका रोबोसुंदरीचा बॅटरी बदलण्याचा कार्यक्रम मिटक्या मारत न्याहाळत असतानाच चिरंजीव मोरू ऊर्फ मो.वनयाचं त्या स्थळी सूक्ष्मरूपात आगमन झालं. बिंदुरूपातला मो.वनहवेत गर्र्र फिरता फिरता मनुष्यरूपात आला, तरी बा.वनचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. मनोबलाचा वापर करून मो.वननं तात्काळ बा.वनला फिंगर मेसेज पाठवला. बा.वनच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटात सूक्ष्म सुई टोचल्यासारखी कळ गेली, त्यानं बोट उचलून पाहिलं, त्यावर प्रकाशमान लेझर-अक्षरांत संदेश झळकला, ‘‘मी आलोय बा.वन. पक्षीनिरीक्षणथांबवा जरा.’’
 
बा.वनचपापून दुर्बिणीपासून दूर होत म्हणाला, ‘‘अरे, आता म्हाता-या माणसाला काहीतरी विरंगुळा हवाच ना. कालच्या दस-याला 311  वर्ष पूर्ण केली. आता पन्नास-साठ वर्षाचंच आयुष्य उरलं.’’
 
‘‘चांगला विरंगुळा आहे,’’ डोळे मिचकावत मो.वनम्हणाला, ‘‘इकडे जेमतेम पंचाहत्तरीत पोहोचलेले नवतरुण अभ्यास करून डोळे फोडून घेतायत आणि म्हातारे रोबोसुंदरींचं निरीक्षण करतायत..’’
 
‘‘एवढा कसला रे अभ्यास चालवलायस?’’
 
‘‘हजार वर्षापूर्वीच्या परंपरा, या विषयावर एक छोटंसं प्रेझेन्टेशन करतोय. म्हटलं जिथे कुठे अडेल तिथे तुमची मदत घ्यावी. तुम्ही या विषयातले मास्टर. तो दसरा की काय म्हणालात तोही तुम्हाला ठाऊक आहे..’’
 
बा.वनजरासा फुशारला. पोरानं बापाचं कौतुक करण्याचा दुर्मीळ प्रसंग होता, ‘‘बोल बेटा, बोल. काय मदत पाहिजे तुला?’’
 
‘‘मी ही त्यावेळच्या वर्तमानपत्रांच्या डिजिटल आवृत्त्यांची काही क्लिपिंग आणलीयेत. त्यातले काही संदर्भ कळत नाहीत. ते जरा मला एक्स्प्लेन करा,’’ बोलता बोलता मो.वनने बोट भिंतीवर रोखलं. त्यातून निघालेल्या प्रकाशझोतातून भिंतीवर चित्रं उमटू लागली, ‘‘त्या काळात नवरात्र, दसरा असा एक सण जोशात साजरा व्हायचा म्हणे!’’
 
‘‘हं. विजयादशमी म्हणायचे त्याला. एकेकाळी सुष्टांचा दुष्टांवर विजय म्हणून साजरा केला जायचा हा सण. पण, नंतरच्या संशोधनातून असं निष्पन्न व्हायला लागलं की हा संघर्ष दोन संस्कृतींमधला होता. बाहेरून आलेल्या संस्कृतीचा त्यात विजय झाला, त्यामुळे इतिहास त्यांच्या बाजूने लिहिला गेला. कृषीसंस्कृती विरुद्ध नागर संस्कृती, कष्ट करणारे विरुद्ध यज्ञ करणारे, मातृसत्ताक विरुद्ध पितृसत्ताक, असे अनेक पैलू पुढे आले आणि मग हे सगळे सणवार मागे पडत गेले.’’
 
बापाच्या या बोजड भाषणानं गांजलेला मो.वनभिंतीकडे लक्ष वेधून म्हणाला, ‘‘पण बा.वन’, तुम्ही सांगताय त्या सगळ्या संशोधनाचा या फोटोंशी काहीच संबंध दिसत नाही. इथे तर माणसं गोल फिरून नाच करताना दिसतायत, वेगवेगळ्या रंगांचा तो साडी नावाचा कपडा गुंडाळलेल्या आनंदी बायका दिसतायत..’’
 क्लिपिंगवरची तारीख पाहून सुस्कारा सोडत बा.वनम्हणाला, ‘‘अरे, हा काळच ऱ्हासकाळ म्हणून ओळखला जातो. यात वेगळं काय होणार होतं? ‘खाओ, पिओ, मजा करोआणि मी माझाही या काळातली जीवनसूत्रं होती. तुला आष्टद्धr(155)र्य वाटेल, पण आवाज हे या काळातलं, या प्रांतातलं शक्तिमापनाचं एकक होतं.’’
‘‘म्हणजे?’’
‘‘म्हणजे ज्याचा आवाज मोठा, तो शक्तिमान. लोकांनी धर्म, पंथ, जात अशा अनेक कल्पना निर्माण करून त्यांचे गट बनवले होते. ज्याचा आवाज मोठा, तो गट मोठा. मग, साध्या साध्या कार्यक्रमांसाठीही माणसं आवाज मोठा करण्याची साधनं आणायची. मध्यभागी काहीतरी बसवून भोवतीनं नाचायची.. त्याचेच हे फोटो.’’‘‘आर यू शुअर बा.वनकी तुमचा काही गोंधळ होत नाहीये? तुम्ही त्या काळाबद्दलच बोलताय? कारण, तुम्ही सांगताय ते सगळं प्रागैतिहासिक काळाला आणि आदिमानवाला लागू होतं.’’
‘‘अरे बाबा, हेही कपडे घातलेले आदिमानवच होते. फरक एवढाच की आदिमानव जंगली प्राण्यांना घाबरून आवाज करायचा आणि या काळातली माणसं एकमेकांना घाबरवण्यासाठी आवाज करायची.’’
 ‘‘हं, या क्लिपिंगमध्ये काहीतरी आवाजवरून तंबीवगैरे लिहिलंय. हा प्रचंड गर्दीचाही फोटो सुमारे 40 वर्षाच्या काळात दरवर्षी दिसतो. हा काय प्रकार आहे?’’
 
‘‘हा घसरा मेळावाहोता त्या काळातला. एक माणूस वर्षातून एकदा या ठिकाणी यायचा आणि याच्यावर घसर, त्याच्यावर घसर अशी घसरगुंडी खेळायचा. ते पाहायला हे लोक जमा व्हायचे.’’
 
‘‘एवढे लोक घसरगुंडी पाहायला गोळा व्हायचे? त्यांना दुसरी कामं नव्हती का?’’
 
‘‘होती ना. दम देणे. खंडण्या गोळा करणे. कामगारांना देशोधडीला लावणे. बिल्डरांसाठी जागा खाली करून देणे. परधर्माच्या, परप्रांतीयांच्या नावाने बोंबा ठोकणे. विरोधी मताच्या माणसाला काळं फासणे. अरेरावी करणे. मारामा-या करणे. अशी बरीच कामं असायची. पण, मनोरंजनाचं साधन हे एकच होतं.’’
 
‘‘अहो, पण त्या काळात सिनेमा, टीव्ही, इंटरनेट वगैरे सगळी प्राथमिक साधनं विकसित झाली होती ना मनोरंजनाची?’’
 ‘‘पण, या मनोरंजनाची सर दुस-या कशाला नव्हती. नकला, द्वयर्थी संवाद, हशा-टाळ्यांची एकदम बहार. गंमत म्हणजे, चाळीस वर्षापेक्षा अधिक काळ एकच भाषण फिरवून फिरवून केलं गेलं. दरवर्षी तेच मुद्दे. तीच भीती घालायची. इतरांच्या मागे जाल, तर नामर्द आणि आमच्या मागे याल तरच मर्द, अशी सोपी मांडणी.’’
‘‘आणि हे ऐकायला लोक गोळा व्हायचे?’’
 
‘‘नुसते गोळा व्हायचे नाहीत, तर त्याला विचारांचं सोनंवगैरेही म्हणायचे. ज्वलंत विचार तिथून घेऊन जायचे म्हणे!’’
 ‘‘का बुवा? त्यांना स्वत:चा विचार स्वत: करता येत नव्हता का?’’
‘‘अरे, माणसं विचार करत असती, तर -हासकाळ आला असता का?’’
 ‘‘अच्छा, मग पुढे काय झालं?’’
‘‘काय होणार? लोक सदासर्वकाळ आदिमानव बनून नाही राहू शकत. हळूहळू समाज बदलतो. सुधारतो. तसा हाही सुधारला. माणसं स्वत:चा स्वत: विचार करू लागली. घसरा मेळावाच्या जागी फोटो प्रदर्शनआणि शाळकरी स्नेहसंमेलनसुरू झाल्यानंतर गर्दीही हटली आणि आवाजही घटला.’’
 
‘‘ओह ग्रेट! थँक्स डॅड फॉर युअर हेल्प,’’ प्रेझेंटेशन आटोपतं घेत मो.वनम्हणाला आणि एकदम त्याला काहीतरी आठवलं, ‘‘अँड डॅड गेस व्हॉट, जुन्या काळातल्या दस-याची माहिती वाचून मी तुमच्यासाठी सोनं आणलंय.’’ हातातलं पान त्यानं बा.वनच्या हातावर ठेवलं.
 ‘‘अरे गधडय़ा, हे तुळशीचं पान आहे..’’
‘‘आय नो. पण, ते मधु आपटय़ाच्या गार्डनमधलं आहे. त्या मजकुरात लिहिलं होतं आपटय़ाच्या झाडाचं पान आणा म्हणून, खास जाऊन आणलं.’’ हसून हसून पुरेवाट झालेला बा.वनम्हणाला, ‘‘विचारांचं सोनं लुटण्याचा अभ्यास करणारा शोभतोस बेटा आता!!’’

(चित्र : प्रदीप म्हापसेकर)


(प्रहार, ९ ऑक्टोबर, २०११)

Sunday, October 2, 2011

वय इथले उलटत नाही

समजा, एखादा मध्यमवयाचा माणूस एखाददिवशी शाळेचा गणवेश घालून, आईकडून चप्पट भांग पाडून घेऊन, पाटीदप्तर घेऊन शाळेतल्या बाकावर जाऊन बसला, तर ते बरं दिसेल का?
 
किंवा त्याहीपुढे जाऊन एखाद्यानं शाळकरी वयातच असं ठरवलं की, कितीही वय झालं तरी शाळेतून बाहेर पडायचंच नाही आणि मग तो मध्यमवयातही उपरोल्लेखित वेषभूषा करून रोज शाळेत जाऊन बालवाडीतल्या बाकावर जाऊन बसू लागला, तर त्याला आपण कौतुकानं चिरशिशुम्हणू काय?
 
मग 88व्या वर्षी, वय झाकण्याचे केविलवाणे आणि भेसूर उपद्व्याप करून आपल्याला न जमणारी आणि न शोभणारी कामं वयाला न शोभणा-या उत्साहात (कोणत्याही वयात उत्साह चांगलाच पण त्याचा उल्हासझाला, तर तो शोभेनासा होतो) करणा-या माणसाला चिरतरुणका म्हणायचं?.. खासकरून त्याचं सध्याचं रूप आणि वर्तन हे चिरकरुणया विशेषणाला अधिक शोभत असताना?
 
कधीकाळी त्याच्यासारखाच कोंबडा काढून त्याच्यासारखीच अर्धांगवात झाल्यासारखे हात लोंबवण्याची अदाआत्मसात केलेल्या मंडळींना आणि या अदेवर मनोमन फिदा झालेल्या मंडळींना त्याच्यासारखी वयाबरोबर न वाढण्याची मुभा मिळालेली नसते. त्यांना टकलं पडतात, नाही पडली तर केस पिकतात, दात पडतात, चेहरे सुरकुततात, हात-पाय थकतात, डोळे-कान निकामी होत जातात. अशावेळी, त्यांच्या तारुण्याचा तो सुगंधी, सुमधुर काळच जणू एखाद्या कुपीत बंद केल्यासारखा या चिरतरुण वृद्धाच्या तारुण्यात बंदिस्त होऊन जातो. पडद्यावर 88 वर्षाचा तो जेव्हा स्वत:च्या एकेकाळच्या तरुण राजबिंडय़ा रूपाची भ्रष्ट नक्कल करत असतो, तेव्हा यांना आताचा तो दिसत नसतोच; त्यांना जुनाच तो दिसत असतो आणि नकळत समोर बसलेले तेही आताचे ते उरत नाहीत, तेव्हाचे ते होऊन जातात.. म्हणजे परस्परसंमतीने हा गंडवागंडवीचा खेळ चालतो. या खेळाकडे बाहेरून पाहणा-याच्या मनात आधी हसू आणि नंतर करुणा दाटते.
 
कुणी सत्तरीतही चिरतरुण गायिका आपल्या म्हाता-या, बोजड, थरथरत्या आवाजात चाळीस वर्षापूर्वीची फडकती, नशिली गाणी आळवण्याचं बेसूर धाडस करते. त्याचे शब्द मध्येमध्ये विसरते. त्या गाण्यांच्या जोडीला तिनं घर कसं सोडलं, धाकटय़ा भावाला कसं सांभाळलं, दीदी हेच तिचंही श्रद्धास्थान कसं आहे, याची सातशे सत्त्याहत्तर वेळा वाजलेली टेप असते, पाचशे पंच्याहत्तर वेळा करून झालेल्या त्याच त्याच नकला असतात. गंमत म्हणजे काहीजणांसाठी हा भयंकर उद्वेगजनक प्रकार असतो, तर बहुतेकांसाठी मात्र डोळय़ांत-कानामनांत साठवून ठेवावा, असा अनुपम सोहळा. तिचं गाणं अजूनही भक्तिभावानं (असल्या आचरट धाडसासाठी भक्ती किंवा श्रद्धाच हवी) ऐकणा-यांची श्रवणयंत्रं सगळी थरथर गाळून स्वत:च सूर लावून घेऊन गाणी ऐकवतात की काय?.. की यांच्याही मनात ती साठच्या दशकातली चरचरीततबकडीच वाजत असते, वर्षानुवर्ष कानांत घोळलेलं ते रेकॉर्डेड गाणंच त्यातून ऐकू येत असतं आणि समोर तीच थोर गायिका जणू आपल्याच जुन्या गाण्याला लिपसिंक करताना दिसत असते.. धन्य ते गायनी कळा, असं यालाच म्हणतात की काय?
 
एका निडर विदुषीला जराजर्जर अवस्थेत एका कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून ऐकण्याचा दुर्दैवी प्रसंग ओढवला होता. बाईंच्या जिभेच्या आणि बुद्धीच्या धारेने अवघडातला अवघड विषयही गाभ्यापर्यंत सोलला जायचा, सोपा व्हायचा, असा त्यांचा लौकिक. त्या दिवशीच्या भाषणात मात्र त्यांना आपल्याला इथं का बोलावलंय,’ हेही ठाऊक नसल्याचं किंवा ते त्यांच्या लक्षात न राहिल्याचं दिसत होतं. त्या अर्धा तास बोलल्या. मागच्या वाक्याची पुढच्या वाक्याशी काहीही संगती नाही, असं. सुन्न झालेलं सभागृह केवळ बाईंवरच्या प्रेमापोटी ती विस्कळीत भरकटलेली बडबड ऐकत होतं. संयोजकांनी बाईंना अशा अवस्थेत का आणलं, का त्यांचं हसू केलं, असा संताप व्यक्त होत होता. पण, अतिशय प्रॅक्टिकल आणि परखड म्हणून ओळखल्या जाणा-या बाई तरी का आल्या, बोलायला का उभ्या राहिल्या, हे प्रश्न आजतागायत अनुत्तरितच आहेत.
 तारुण्यात संगीत नाटय़रसिकांच्या मनांवर अधिराज्य गाजवलेल्या एखाद्या गंधर्वाच्या पन्नाशीत बोजड, स्थूल झालेल्या देहावर तारुण्याचे साज चढवून सुकुमार तरुणीच्या रूपात उभे केल्यानंतर ते ध्यान पाहणा-या (की साहणा-या) आणि ऐकणा-या रसिकांना समोर नेमकं काय दिसत असतं? काय ऐकू येत असतं?
वय नाकारतात तेव्हा माणसं काय नाकारतात? आपण मृत्यू नावाच्या शाश्वत सत्याच्या अधिक जवळ जात चाललो आहोत, या भयंकर वास्तवापासून पळ काढण्यासाठी माणसांची ही वय नाकारण्याची धडपड सुरू असते की काय? जिकडे पाहावं तिकडे अशा कलपलेपित उसन्या आणि खोटय़ा तारुण्याचं करुण दर्शन घडवणा-या माणसांचा बुजबुजाट दिसतो. कर्तृत्वाच्या शिखरावरून योग्य वेळी हसतमुखानं, उमद्या मनानं पायउतार होणा-यांची संख्या एका हाताच्या बोटावर मोजता येईल. शिखरावर पोहोचताच तिथे लगेच तंबू ठोकून कडेला कुंपण घालणा-यांची संख्या जास्त. शिखरही न गाठता, मनातल्या मनात ते सर करून (मनातल्या मनात) तिथेच मुक्काम ठोकलेल्या मनोरुग्णांची संख्या सर्वाधिक.
 
ही एखाद्या क्षेत्रात किमान काही कर्तृत्व गाजवलेल्या नामवंतांची स्थिती असेल, तर सामान्य माणसांचं काय?
 
वानप्रस्थासारखी सुंदर आणि प्रगल्भ कल्पना जन्माला घालणा-या देशात संध्येच्या हृदयाला भिववणा-या छायाच का असतात? हळुहळू मावळणारा, शांतवत नेणारा संधिप्रकाश का नसतो? वार्धक्य इतकं करुण कधी आणि का झालं की ते स्वीकारण्याची हिंमतच होऊ नये?
 माणसं जेव्हा डोळे मिटून मनाच्या पडद्यावर सिनेमा पाहतात, गाणं ऐकतात, आठवणी उजळवतात, तोवर सगळं ठीक. पण, डोळे उघडे असतानाही जेव्हा माणसं मनाच्या पडद्यावरच गतकाळ जगू पाहतात, बंदिस्त कुप्यांच्या आणि चरचरीत तबकडय़ांच्या आधारानं दिवस ढकलू पाहतात, तेव्हा समजायला हवं की त्यांच्या उघडय़ा डोळय़ांसमोरच्या चित्रात काहीतरी बिघाड आहे.. खूप मोठा बिघाड आहे.

(चित्र : प्रदीप म्हापसेकर)

(प्रहार, २ ऑक्टोबर, २०११)