Thursday, May 11, 2023

जग कायमचं बदलणारं दशक!

आमच्या काळात असं नव्हतंआमचा काळ सुवर्णकाळ होता…” पृथ्वीवर जन्मलेल्या प्रत्येक माणसाने आयुष्यात कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर हे वाक्य उच्चारलेलं असतंचखरंतर हेही त्याचं विनयपूर्ण विधानच असतंत्याला खरं असं म्हणायचं असतं कीतो काळहा अखिल मानवजातीचाच सुवर्णकाळ होतात्यानंतर सगळ्या गोष्टींचा अध:पात झाला आहे

हासुवर्णकाळकाळ पुण्यासारख्या शहरांचा अपवाद वगळता बाकीच्या ठिकाणी बहुतेक वेळा संबंधित व्यक्तीच्या तारूण्याचा काळ असतो- पुण्याची गोष्ट वेगळी, तिथे चौथीतला मुलगाही उसासा टाकूनआमच्या काळात पूर्वप्राथमिक शिक्षणपद्धतीचा इतका ऱ्हास झाला नव्हता…’ असं आपल्या केजीमधल्या भावंडाला सांगू शकतो


प्रत्येकाच्याच
आयुष्यात तारुण्याचा जोश असतो, मनात उमेद असते, अंगात रग असते, तेव्हा सगळं जग वेगळंच भासत असतंतेव्हा आपण म्हातारे तर सोडाच, मध्यमवयीन होणार आहोत, हेही माहिती नसतं आणि मृत्यूची तर कल्पनाही मनाला स्पर्श करत नसतेमनातल्या मनात सगळेच अजरामर असतातहा काळ सरतो, काळानुसार जग बदलतं, तेव्हा आपण ज्या काळात तरूण होतो, तो आपला सुवर्णकाळ होता (आणि त्यातला बराच आपण वाया घालवला) हे आपल्या लक्षात येतंमात्र, प्रत्येकाच्या विश्वाचा आकार त्याच्या मेंदूएवढाच असल्याने जो आपला व्यक्तिगत सुवर्णकाळ तोच आपल्या क्षेत्राचा आणि जगाचाही सुवर्णकाळ होता, असं वाटणं स्वाभाविकच आहे


या
सुवर्णकाळाच्या स्मरणरंजनात रमणाऱ्यांचं कालमापन सत्तरचं दशक, ऐंशीचं दशक, नव्वदचं दशक असं चालतंयातल्या नव्वदच्या दशकाची हळहळी, हुळहुळी कौतुकं अलीकडे सगळ्यात जास्त ऐकायला येतातत्याचं एक कारण स्पष्टच आहेहे दशक समजुतीच्या वयापासून तारुण्यापर्यंत पाहिलेली मंडळी ३४ ते ५४ या वयोगटात आहेतनव्वदच्या दशकात जन्मलेली मुलं ही तांत्रिकदृष्ट्या त्या दशकातली मुलं मानली जात असली तरी ३४ ते ५४ वयोगटातली माणसं ही खरी नाइन्टीजची पिढी आहेसमाजात व्यक्त होण्याच्या सगळ्या साधनांमध्ये यांची भरमार आहेयांच्या अलीकडच्या पिढ्यांकडे व्यक्त होण्यासाठी मोजकीच साधनं होती आणि प्रत्येकाने व्यक्त झालंच पाहिजे, असं काही बंधन त्यांच्यावर नव्हतंसोशल मीडियाच्या स्फोटामुळे (आपल्या व्याख्येनुसार) ९०च्या दशकात गणल्या जाणाऱ्या प्रत्येकाला (गरज आणि योग्यता असो वा नसो) अभिव्यक्तीचं साधन गवसलेलं आहे आणि सोशल मीडियावर ही मंडळी ९०चं दशक कसं बहारदार दशक होतं हे सगळ्यात जास्त ओरडून सांगत असतातत्यांच्या आधीच्या पिढ्यांनाही सोशल मीडियाचा ॲक्सेस आहेच, पण ते यांच्याइतके टेकसॅव्ही नाहीत, नाइन्टीजनंतरच्या पिढ्या टेकसॅव्ही आहेत, पण त्या सध्या त्यांच्या सुवर्णकाळातच जगत असल्याने त्यांना नाइन्टीजच्या काय कोणत्याच दशकांच्या कौतुकांची गरज नाही

पण, नाइन्टीजचा बोलबाला होण्याचं हे एकच कारण नाहीअनेक विश्लेषक, समाजशास्त्रज्ञ, विचारवंत यांच्या मते जगाचा आणि मानवजातीचा इतिहास बदलणारं दशक म्हणून १९९०चं दशक ओळखलं जायला हवं१९९०च्या दशकाला ग्रेटेस्ट डिकेड घोषित करणाऱ्या किमान दोन महत्त्वाच्या डॉक्युमेंटरी सिरीज आज उपलब्ध आहेतहे दशक मानवी इतिहासाला निर्णायक वळण देणाऱ्या दशकांपैकी एक आहे, असं मानणारे सगळेच काही त्या दशकांचं प्रॉडक्ट नाहीततरीही ते असं मानतायत, ते का?


मुळात
मानवजातीने नव्वदच्या दशकात असं वळणबिळण घेतलंय याला काही अर्थ आहे का?


आपण
साधं दिव्याचं उदाहरण घेऊ. दिवा म्हणजे रात्रीच्या अंधारात प्रकाश पाडण्याची व्यवस्था मानवाने अग्नीशक्ती ताब्यात घेतली तेव्हापासून मानवजातीबरोबर आहेपणती, कंदील, मशाल, अशा नाना रूपांमध्ये दिवा माणसांची सोबत करत आला आहे अंधारातविजेचे दिवे निर्माण झाले, तेव्हा एक चमत्कार झालातेल, काडेपेटी, कापड, काजळी वगैरे सगळ्या झंझटी मिटून बटण दाबले की प्रकाश झगझगला अशी व्यवस्था झालीपण, ते इतिहासाचं थेट विभाजन करणारं संशोधन आहे का? ज्या दशकात पहिला विजेचा दिवा पेटला, त्या दशकानंतरचं जग त्याआधीच्या जगापेक्षा सर्वस्वी वेगळं झालं का?


नाही
.


त्याआधीही
दिवा होताच. रात्र होतीच. दिव्याचा प्रकार बदलला. उजेडाची ताकद वाढली. संकल्पना बदललेली नाही.


आता
१९९०च्या दशकाकडे येऊ या.


या
दशकाला सगळ्यात आधी कम्प्यूटर युग म्हटलं गेलं, नंतर ते विद्युतवेगाने इंटरनेट युग, माहिती विस्फोटाचं दशक, मोबाइलचं दशक, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग असं बरंच काही बनत बदलत गेलंया दहा वर्षांमध्ये जे बदल घडले त्यांची गती अविश्वसनीय होती


संगीताचं
उदाहरण घेऊ या.


संगीत
सगळ्यात आधी ग्रामोफोन रेकॉर्डच्या स्वरूपात रेकॉर्ड होऊ लागलं. टेलिव्हिजनच्या, सिनेमाच्या तंत्रज्ञानात मॅग्नेटिक स्पूलचा वापर होत असे. त्या अवाढव्य स्पूलचं रूपांतर छोट्याशा काँपॅक्ट कॅसेटमध्ये होण्यासाठी कितीतरी दशकं जायला लागली. १९९०च्या दशकाच्या प्रारंभी संगीतक्षेत्रावर कॅसेटचं राज्य होतं. गुलशन कुमार नावाचा दिल्लीत फळांचा ज्यूस विकणारा माणूस स्वस्त कॅसेटच्या माध्यमातून भारताचा कॅसेट किंग बनला होता या काळात. पण, याच दशकात कॅसेटची जागा सीडीने घेतली, कॅसेट प्लेयर बंद करून उत्पादक सीडी प्लेयर बनवू लागले, तोवर सीडीही इतिहासजमा झाली आणि गाणी फाइल्सवर साठवता येऊ लागलीजगभरातल्या हजारो कोटींच्या संगीत उद्योगाचं एकत्रित बंबाळं वाजलंसंगीत विकत घेण्याची सवयच संपलीआज आपण गाणी कशी ऐकतो? कोणत्याही सिनेमाची ना कॅसेट बाळगावी लागत, ना सीडी, ना पेनड्राइव्हआता मोबाइलवरून स्पॉटिफाय, अमेझॉन प्राइम, गाना अशा ॲप्सवर जाऊन हवं ते गाणं शून्य मिनिटात ऐकायला सुरुवात करा, अशी व्यवस्था झाली


आता दिव्याचं उदाहरण उद्धृत करून कोणी म्हणेल की तिथे जसा दिवा होता, तसं इथे संगीत आहे, ते ऐकण्याची क्रिया आहे, तिच्यात नवीन सुविधा निर्माण झाली, एवढंच ना! तेव्हा वॉकमन होता, आता मोबाइल आहे, इतकाच काय तो फरक?


एवढाच
फरक नाहीगाण्यांची साठवण, त्यासाठी लागणारं तंत्रज्ञान, साधनं, व्यापली जाणारी जागा आणि आर्थिक व्यवहार यांच्यात झालेला फरक विस्मयचकित करणारा आहेकेवळ संगीतच नव्हे, तर माहिती, ज्ञान, मनोरंजन या सगळ्यांची साठवण कुठेतरी एकाच ठिकाणी आहे आणि जगाच्या पाठीवर इंटरनेट कनेक्शन आणि डिव्हाइस हातात असलेला कोणताही माणूस रिअल टाइममध्ये म्हणजे एका क्लिकसरशी तात्काळ ते पाहू, वाचू, ऐकू शकतो, ही ती क्रांती आहेतिची कल्पना १९९०च्या दशकाच्या आधी विज्ञान काल्पनिका लिहिणाऱ्यांनी केली असेल, वैज्ञानिकांनी ते स्वप्नही पाहिलं असेलपण, ते अशक्यप्राय स्वप्न १९९०च्या दशकात पूर्ण झालेलं आहे


त्याआधी
त्यासारखं काहीही नव्हतं


त्यानंतरचं
सगळं जग त्या आधारावर उभं राहणार आहे


मोबाइलचंच
उदाहरण घ्याटेलिफोनचा शोध लागला तेव्हा संपर्कक्रांती झाली, दूरचे लोक जवळ आले, खंड जोडले गेले, जगाचं वैश्विक खेड्यात रूपांतर करणारा तो शोध ठरला, हे खरंच आहेमोबाइल हा पण त्याच टेलिफोनचा वायरलेस आविष्कार आहे, असं वरवर पाहता वाटतंपण, आपला स्मार्टफोन फक्त तेवढाच आहे का? लँडलाइन फोनच्या डिव्हाइसवर काही नंबर सेव्ह करता येणं, व्हॉइस मेसेज ठेवता येणं, हेच फार भारी शोध वाटत होते एकेकाळीपण, तारेशी जखडलेला फोन मुक्त होईल आणि तो एकाच वेळी कॅमेरा, पेजर, व्हिडिओ प्लेयर, वॉकमन, पीसी, कॅलेंडर, घड्याळ, गेमिंग कन्सोल वगैरेंचं सामूहिक हत्याकांड घडवून आणेल, याची कल्पना कोणीच केली नसेल१९८०च्या दशकात जेम्स बाँडची जी गॅजेट्स पडद्यावर पाहिली ती सगळी आपल्या हातात एकत्र आली, असा अद्भुत प्रकार या दोन्ही दशकांमध्ये जगलेल्यांनी पाहिलेला आहे


१९९०च्या
दशकाने नेमकं काय बदललं, याचं एकत्रित, वास्तविक दर्शन घडवणारी एक समग्र घटना म्हणून अमेरिकेत बिल क्लिंटन यांच्या मोनिका ल्युईन्स्की प्रकरणाचं उदाहरण दिलं जातं


अमेरिकेचे
अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी मोनिका ल्युईन्स्की या व्हाइट हाऊसमधील तरूण इंटर्न मुलीशी चोरटे लैंगिक संबंध ठेवले ते १९९५ ते १९९७ या काळात. ड्रज रिपोर्ट नावाचा एक तोवर प्रसिद्ध नसलेला ब्लॉग नसता, तर हे प्रकरण उजेडातच आलं नसतं. कारण तेव्हाची पारंपरिक माध्यमं म्हणजे केबल टीव्हीवरची न्यूज चॅनेल्स आणि वर्तमानपत्रं, नियतकालिकं (चॅनेल्सनी तोवर विक्राळ स्वरूप धारण केलं नव्हतं). वर्तमानपत्रांकडे कोणतीही वादग्रस्त बातमी छापण्याआधी बऱ्याच चाळण्या लागायच्या. कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची कोणाचीही तयारी नसायची. मीडिया हाऊसेसचे वकील या बाबतीत अंतिम निर्णय घ्यायचे. वर्तमानपत्राच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असायचा. ही सगळी बंधनं त्याच दशकात जन्माला आलेल्या इंटरनेटवरच्या ब्लॉगिंगला नव्हती. जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात बसून ब्लॉगर त्याच्या मनाला येईल ते लिहू शकत असे. ड्रज रिपोर्ट या ब्लॉगवर या प्रकरणाचा पहिल्यांदा उल्लेख झालातेव्हाच्या मर्यादित स्वरूपातलं इंटरनेट या अफेयरच्या चविष्ट चघळचर्चांनी भरून गेलंमग २४ तास बातम्यांचं जाळं पसरायला उत्सुक असलेल्या न्यूज चॅनेल्सनी ती बातमी उचलून धरली, मग पारंपरिक माध्यमंही त्यात उतरलीक्लिंटन यांनी असं काही झालंच नाही, असं सांगून कानावर हात ठेवले (त्यांच्यावर महाभियोग चालला तो शपथेवर खोटं बोलल्याबद्दल) आणि १९९०च्याच दशकात उदयाला आलेल्या डीएनए सँपलिंगच्या तंत्रामुळे एका निळ्या कपड्यावरच्या डीएनए पुराव्यातून अध्यक्ष खोटं बोलतायत हे सिद्ध झालंकुजबुजीला सुरुवात झाल्यापासून ११ महिन्यांमध्ये क्लिंटन यांचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त होऊन गेलं


हे १९९०च्या दशकात घडलं नसतं, आधीच्या दशकात घडलं असतं तर कधी उघडकीलाही आलं नसतं आणि तडीला तर निश्चित गेलं नसतं


सगळ्यात मजेची गोष्ट म्हणजे बिल क्लिंटन हे अध्यक्षपदापर्यंत पोहोचण्यातही ९०च्या दशकातच प्रचलित झालेल्या एका तंत्रज्ञानाचा मोठा वाटा होताव्हिडिओ चित्रिकरण करणारा घरगुती वापराचा साधा कॅमेरा हे ते तंत्रज्ञानक्लिंटन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरलेले असताना १९९१ साली रॉडनी किंग या कृष्णवर्णीय वाहनचालकाला लॉस एंजेलिसच्या गोऱ्या पोलिसांनी अमानुष मारहाण केली, तेव्हा ती जॉर्ज हॉलिडे या माणसाने आपल्या बाल्कनीतून अशाच व्हिडिओ कॅमेऱ्याद्वारे चित्रित केलीहे कॅमेरे नुकतेच सुटसुटीत झाले होतेत्या चित्रणाने पोलिसांविरोधात सज्जड पुरावा उभा केला आणि तरीही या पोलिसांची मुक्तता झाली तेव्हा लॉस एंजेलिसमध्ये दंगल उसळलीतेव्हा अध्यक्षपदाच्या शर्यतीत पिछाडीवर असलेल्या बिल क्लिंटन यांनी आर्सेनियो हॉल या कृष्णवर्णीय अभिनेत्याच्या टीव्ही शोमध्ये जाऊन टिपिकल राजकीय भाषणबाजी करता लोकांच्या हृदयाला हात घालेल असं भाषण केलं आणि सॅक्सोफोनवर एल्व्हिस प्रिस्लेचं गाणं वाजवून संवेदनाशील, कूल उमेदवार अशी आपली इमेज उभी केलीत्या दिवशी सगळी निवडणूक फिरली आणि तरुणाईमध्ये निर्माण झालेली त्यांची अफाट लोकप्रियता त्यांना अध्यक्षपदापर्यंत घेऊन गेलीत्याच तंत्रज्ञानाने त्यांना पायउतारही केलं, हा काव्यात्म न्याय म्हणायला हवा


१९९०च्या
दशकात जग कायमचं बदलून टाकणाऱ्या तंत्रज्ञानातल्या सगळ्यात मोठ्या बदलांची ढोबळ जंत्री पाहिली तरी जो विस्तारेल तो दशकभर मिटायचा नाही


१९९०पर्यंत
इंटरनेट अस्तित्त्वात आलं होतं, पण ते मर्यादित स्वरूपात उपलब्ध होतंवर्ल्ड वाइड वेब अर्थात डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू हे प्रकरण अवतरलं १९९० सालात आणि त्याने सगळ्या जगाला व्यापून उरणाऱ्या जाळ्याचं विणकाम सुरू केलं


१९९१
साली लिनक्स ही फ्री ऑपरेटिंग सिस्टम आलीआज सगळ्यांच्या कम्प्यूटरमध्ये मायक्रोसॉफ्टच्या विंडोजचा वापर केलेला असतोते विकत घ्यायचं लायसन्स्ड सॉफ्टवेअर आहेलिनक्स हा फुकट आणि वापरकर्त्यांनी विकसित करण्याचा प्लॅटफॉर्म आहेतो असा लायसन्स फ्री असल्यामुळे कल्पक लोकांच्या सहभागाने प्रचंड वेगाने विस्तारला आणि आज आपल्या स्मार्ट बल्ब्जपासून टीव्ही, फोन, मोटारींपर्यंत सगळीकडे ही सिस्टम वापरली जाते


डिसेंबर, १९९२ रोजी इंजीनियर नील पॅपवर्थ याने रिचर्ड जार्विस या सहकाऱ्याला व्होडाफोनच्या हँडसेटवर मेसेज पाठवला, मेरी ख्रिस्मस. हा जगातला पहिला एसेमेस. अवघ्या ३० वर्षांपूर्वी पाठवला गेलेला. त्या वर्षात एकट्या अमेरिकेत . अब्ज एसेमेस पाठवले गेले होतेआज एसेमेस इतिहासजमा झाले आहेत जवळपासत्यांचा वापर आपल्याकडे तरी लोन देण्याच्या नावाखाली गंडा घालणाऱ्या टोळ्या आणि इतर स्पॅमरच अधिक करत असले तरी आजच्या जगाचं स्पंदन बनलेल्या व्हॉट्सअप आणि फेसबुकसारख्या सोशल मीडियाचा जन्म एसेमेसच्या माध्यमातूनच झाला होतानंतरच्या दशकात जन्माला आलेल्या अनेक बालकांच्या जन्माला कारक ठरलेल्या प्रेमाची देवाणघेवाणही याच एसेमेसेसमधून झाली होती, हे विसरता कामा नये


१९९३पर्यंत
मुख्यत: मजकूर पाठवणाऱ्या इंटरनेटवरून प्रतिमा म्हणजे इमेजेसची देवाणघेवाण शक्य करणारा मोझेक ब्राऊझर त्या वर्षात आला आणि त्यातून पुढे वेबकॅमपर्यंत मजल गेलीत्यानंतर नॅपस्टरने संगीताचं फाइल्समध्ये रूपांतर करून गाण्यांची परस्पर, फुकट देवाणघेवाण शक्य केलीत्याने संगीताच्या उद्योगाचा चेहरा कायमचा बदललानॅपस्टरवर खटले भरले गेले, ती साइट बंद पाडली गेलीपण, त्याने संगीत मोफत डाऊनलोड केलं जाणं बंद पडलं नाही आणि फिजिकली कॅसेट, सीडी वगैरे विकण्यापेक्षा स्पॉटिफाय वगैरे ॲप्सवरून संगीत विकायचं आणि वर्गणीच्या स्वरूपात मोबदला मिळवायचा, हा व्यवसायाचा नवा फंडा संगीतक्षेत्राला शेवटी आत्मसात करावाच लागलाकॉपीराइटच्या सगळ्या कल्पना उलट्यापालट्या झाल्या त्या याच काळाततंत्रज्ञान थांबणार नाही, तुम्हाला तुमचा कंटेंट विकण्यासाठी तंत्रज्ञानाधारित मार्ग शोधावा लागणार हा धडा सगळ्याच कंटेंट क्रिएटर्सना मिळाला ९०च्या दशकात.


१९९४
हे साल आणखी एक क्रांती घेऊन आलंॲमेझॉनची स्थापना झालीहवी ती पुस्तकं घरपोच मागवा, इतक्या साध्या कल्पनेतून सुरू झालेल्या ॲमेझॉनने लवकरच सुईपासून हत्तीपर्यंत काय हवं ते ऑनलाइन मागवा, घरातून बाहेर पडू नका, कम्प्यूटरसमोरून हलूच नका, अशी व्यवस्था केलीरिटेल विक्रीच्या सगळ्या कल्पना मोडून तोडून टाकल्यास्वत:चं (निदान तेव्हा तरी) एकही फिजिकल उत्पादन नसलेल्या कंपनीचा मालक जगातला सर्वात श्रीमंत माणूस बनलासर्वच्या सर्व होम डिलिव्हरी प्लॅटफॉर्म्सची ही सुरुवात होतीआपल्या मालकीची एकही टॅक्सी नसलेली उबर आणि एकही हॉटेल मालकीचं नसलेली ओयो यांच्यासारख्या संपूर्णपणे सेवाआधारित कंपन्यांची संकल्पनात्मक पायाभरणीही यातूनच झाली आहेॲमेझॉननेच अलेक्साच्या माध्यमातून गृहोपयोगी एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) घराघरात आणला. आता कोचावर रेलून बसायचं आणि अलेक्सा दिवे लाव, दिवे मालव, टीव्ही ऑन कर, अमुक गाणं लाव, त्या अमक्याला फोन लाव, असल्या सूचना देण्याची आणि त्याबरहुकूम कामं करून घ्यायची सोय झालीअलेक्सा, पाणी आणून दे, फ्रीजमधलं नको, माठातलं चालेल आणि अलेक्सा जरा पाय चेपून दे, एवढंच सांगायचं बाकी राहिलंय आता


१९९६
साली पायलट हँडहेल्ड फोन आले, १९९८ला गुगलची स्थापना झालीगुगलने कुठे कुठे केवढ्या प्रमाणात शिरकाव केलाय ते सांगण्याची गरजच नाही, निव्वळ त्यांचं सर्च इंजिन नसतं, तरी प्रस्तुत लेख लिहिण्यासाठी लायब्रऱ्या फिरणे, कात्रणं चाळणे, त्यातून टिपणं काढणे, संगती लावणे आणि मग लेख लिहिणे ही सगळी प्रक्रिया होण्यासाठी सगळी कामं सोडून कमीत कमी एखादा महिना मेहनत घ्यायला लागली असतीत्यातही आता मिळाले ते सगळे संदर्भ मिळाले असतेच, याची खात्री नाहीहा लेख सगळी व्यवधानं सांभाळून काही तासांमध्ये लिहिता येणं शक्य झालं आहे, कारण गुगलवरून सर्च करून जवळपास तीसेक हजार शब्दांचे संदर्भ काही मिनिटांत शोधता आले आहेतहे लेखन तसं फारच जुजबी स्वरूपाचं आहेज्यांनी पायाभूत संशोधन केलं, त्या जुन्या संशोधकांचा वेगवेगळे ग्रंथ शोधण्याचा, त्यांच्यासाठी गावोगाव फिरण्याचा, परदेशांतून ग्रंथ, तपशील, नक्कलप्रती मागवण्याचा आणि ते सगळं पाहून टिपणं काढण्याचा वेळ गुगलच्या काळात किती कमी झाला असता आणि ते आपल्या हयातीत किती मोठं संशोधन करू शकले असते, याची कल्पना कोणालाही करता येईल


ती
आज करता येईल१९९०च्या आधी ती शक्य नव्हती


एकीकडे
हे तंत्रज्ञान बदलत असताना जगात बाकी काहीच बदलत नव्हतं का?


जागतिक
राजकारणाच्या संदर्भात नोव्हेंबर १९८९ ते ११ सप्टेंबर २००१ असं नाइन्टीजचं दशक आहेरशियाचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी ग्लासनोस्त आणि पेरेस्त्रोइका या संकल्पनांमधून सोविएत रशियातला पोलादी पडदा हटवला, अमेरिकेबरोबरच्या शीतयुद्धाची समाप्ती केली. त्यातून सोविएत रशियातून फुटून अनेक देश स्वतंत्र झालेकम्युनिस्ट राजवट असलेल्या गरीब, पिचलेल्या पूर्व जर्मनीने नोव्हेंबर १९८९ला आपल्या नागरिकांना भांडवलशाही संपन्नता असलेल्या पश्चिम जर्मनीत जाण्याची मुभा जाहीर केली आणि त्याची परिणती बर्लिनमध्ये उभी असलेली, दोन जर्मनी विभागणारी बर्लिनची भिंत कोसळण्यात झाली१९९०चं दशक हे अमेरिकेचं जगावर निर्विवाद वर्चस्व असण्याचं दशक ठरलंअमेरिकेची सुबत्ता या काळात वाढली आणि जगात एकच अजिंक्य महासत्ता आहे, ती म्हणजे अमेरिका असा दंभ तयार झालाया दशकाच्या अखेरच्या टप्प्यात हा दंभ फोडण्याची तयारी सुरू झाली होती आणि २००१ सालात नाइन इलेव्हनच्या दहशतवादी हल्ल्याच्या माध्यमातून अमेरिकाही किती व्हल्नरेबल आहे, हे जगासमोर उघड झालंग्लोबल वॉर ऑन टेररिझम या नावाखाली इस्लामी देशांच्या विरोधात जग एकवटण्याचा तो प्रारंभ होतावड्याचं तेल वांग्यावर काढणाऱ्या अमेरिकेने इराकला अकारण लक्ष्य केलंइराकने कुवेतवर आक्रमण केलं तेव्हा बगदाद आणि कुवेतच्या सीमेवर जगातलं सगळ्यात पहिलं टेलिव्हाइज्ड युद्ध झालंआपल्या घरात टीव्हीसमोर पॉपकॉर्न खात बसायचं आणि व्हिडिओ गेम किंवा सिनेमा पाहिल्यासारखा २४ तास अखंड चाललेला भयावह विध्वंस चवीचवीने पाहायचा, ही चटक प्रेक्षकांना तेव्हा लागली आणि न्यूज चॅनेल्सना तुफान धंदा मिळवण्याची युक्ती गवसलीयुद्धाविषयीची माहिती कोणी द्यायची याचे सगळे प्रोटोकॉल तेव्हा धुळीला मिळालेकारण, सीएनएनचे रिपोर्टर अमेरिकन जनरल्सपेक्षा जास्त माहिती चटकदार पद्धतीने देत होतेआपलं वय काय, आपली अक्कल किती, आपल्याला माहिती किती, समोरचा कोण आहे याचा कशाचाही विचार करता, ‘नेशन वाँट्स टु नो,’ असं पेन्सिल नाचवत कोणालाही विचारण्याचा उद्धटपणा वृत्तनिवेदक नावाच्या एरवी रंगहीन, चवहीन, गंधहीन असलेल्या इसमामध्ये निर्माण होण्याची ही सुरुवात होतीबातम्यांच्या नावाखाली एका विचारसरणीच्या सोयीचा कचरा रेटून लोकांच्या गळी उतरवण्याचीही ती सुरुवात होतीयातूनच प्रत्येक फुटकळ घडामोडीचा इव्हेंट बनवून त्यात मिरवण्याची सवय राजकारण्यांना भविष्यात लागणार होती


भारतात
१९९०च्या दशकाच्या आगेमागे पंतप्रधान राजीव गांधी यांनी देशाला संगणक क्रांतीचा भाग बनवले आणि त्या क्रांतीच्या बळावर रोजी रोटी कमावणाऱ्या कृतघ्नांना नंतरच्या काळातकाँग्रेसने ७० वर्षांत काय केलेअसा उर्मट सवाल जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून करता येईल, अशी व्यवस्था करून ठेवली. राजीव गांधी यांच्या निर्घृण हत्येपासून सुरू झालेलं दशक टीव्हीवरच्या बालिश रामायणातून चेतवलेल्या भावनांमधून घडून आलेलं बाबरी मशिदीचं पतन, देशव्यापी दंगली, गोध्राचे हत्याकांड, गुजरातचा नरसंहार या मार्गांनी हिंदू अस्मिता चेतवून उजव्या विचारांच्या भारतीय जनता पक्षाला देशाच्या सत्तेपर्यंत घेऊन जाण्याचा प्रवास करणारं ठरलंआजच्या विद्वेष, विखार, धार्मिक अस्मिताबाजी आणि धादांत खोटेपणावर आधारलेल्या, ‘जास्तीची मेजॉरिटीया शाळकरी तत्त्वाकडे जाऊन लोकशाहीच्या, संविधानाच्या पद्धतशीर ठिकऱ्या उडवत निघालेल्या तथाकथितनव्या भारताची पायाभरणी तिथे झालीनंतरच्या दशकांत जगभरातले विज्ञानाधारित बदल आत्मसात करून व्हाइट कॉलर्ड आयटी मजूर म्हणून का होईना, जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये पोहोचलेल्या भारतीय तरुणाईने तिथे स्वदेशी संस्कारांच्या नावाखाली हाच थिल्लर एकारलेपणा नेला. पुस्तकी शिक्षण आणि तांत्रिक प्रगतीने वैचारिक पुढारलेपणा येत नाही, याचं दर्शन हे सर्व जातश्रेणींमधलेचिन्मय-तन्मयआजही रोज घडवत असतात.


जागतिकीकरण आणि उदारीकरणाचं दशक म्हणूनही नव्वदच्या दशकाचं जागतिक महत्त्व फार मोठं आहेया दशकापर्यंत कम्युनिस्ट असलेल्या अनेक देशांनी भांडवलशाही अर्थव्यवस्था थोडाफार फरक करून स्वीकारलीत्यामुळे सगळ्या जगावर कामगारांची, कष्टकऱ्यांची सत्ता प्रस्थापित करण्याचा कार्यक्रम पुढील सूचना मिळेपर्यंत (म्हणजे कायमचाच) स्थगित झालाकामगार संघटना संपुष्टात आल्यात्यांचं वर्चस्व संपलंखुल्या व्यापाराचा स्वीकार सगळ्यांनी केल्यामुळे चीन आणि भारत यांचं बाजारपेठ म्हणून आणि उत्पादक देश म्हणून महत्त्व वाढलंखुलेकरणाच्या धोरणाची परिणती म्हणून १९९०च्या आधी कधीही नव्हते इतके जगातले व्यवहार आज एकमेकांमध्ये गुंतले गेले आहेतएक फुलपाखरू पंख हलवतं आणि हजारो किलोमीटर दूरवर वादळ घोंघावू लागतं, ही कल्पना अर्थव्यवस्थेच्या संदर्भात जागतिकीकरणाने वास्तवाच्या पातळीवर आणली१९३०च्या दशकातल्या अमेरिकेतल्या मंदीचे जगावर झालेले परिणाम आणि २००८च्या सबप्राइम घोटाळ्यानंतर कोसळलेल्या अमेरिकन अर्थव्यवस्थेचे परिणाम यांच्यात प्रचंड मोठा फरक आहेआज रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध होतं तेव्हा युरोपला खनिज तेलाच्या पुरवठ्याअभावी हिवाळा कुडकुडून काढावा लागेल की काय अशी भीती वाटते आणि युक्रेनचा गहू बाजारात येणार नसेल तर आपल्या मालाला किती उठाव मिळेल म्हणून इतर देशांमधले गहू उत्पादक आनंदून जातात.


सामाजिक
रचनेतही नाइन्टीजमधल्या तंत्रज्ञानाच्या क्रांतीने अपरिवर्तनीय म्हणावेत असे बदल घडवून आणले आहेत.


एक
उदाहरण पाहासमलैंगिक संबंधांना मान्यता देण्यापर्यंत आज आपल्या देशाचीही मजल गेली आहेअमेरिकेला स्त्रीचा गर्भपाताचा हक्क मानणं जड जातं, आपण ते सहजगत्या करून दाखवलं आहेसमलैंगिकता हा काही आजार नाही, विकृती नाही, तिचा मोकळेपणाने स्वीकार करा, असा संदेश देणारे सिनेमे उत्तर प्रदेश वगैरे मागास विचारांच्या राज्यांच्या पार्श्वभूमीवर घडवले जातात आणि त्यांना उत्तम प्रतिसाद मिळतोमुख्य प्रवाहातली नायिका सेक्स चेंज केलेल्या म्हणजे मुलाची मुलगी झालेल्या व्यक्तीची व्यक्तिरेखा साकारते आणि तिच्या प्रेमप्रकरणाची कथा कमर्शियल सिनेमा म्हणून यशस्वी होतेहे सगळं किती सहज घडल्यासारखं वाटतंपण, अवघ्या २४ वर्षांपूर्वीपर्यंत अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशातही समलिंगींकडे अत्यंत तुच्छतेच्या नजरेने पाहिलं जायचंवायोमिंग युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी असलेल्या मॅथ्यू शेपर्ड या समलिंगी तरुणाला १९९८ साली काही विकृत तरुणांनी भयंकर मारहाण केली आणि जिवंत जाळलंत्याला कुंपणावर लटकवलं गेलंतेव्हा नव्यानेच सर्वांकडे पोहोचत असलेल्या इंटरनेटवर याची फार मोठी बातमी झाली आणि समलिंगींचा उद्रेक झालातोवर जगभरातले समलिंगी युवक-युवती समाजापुढे आपली लैंगिकता स्वीकारायला घाबरायचेआपल्यासारखे बरेच लोक आहेत, हे इंटरनेटच्या ताकदीमुळे त्यांना कळलंते एकवटलेमॅथ्यूला आदरांजली वाहण्यासाठी पहिल्यांदा मेणबत्ती मोर्चा ही कल्पना राबवली गेलीजगभरात हे मोर्चे निघालेसमलिंगींमध्ये अत्याचारांच्या विरोधात दाद मागण्याची हिंमत आली आणि एकट्या अमेरिकेत १००० गुन्हे नोंदवले गेलेएलजीबीटी चळवळ त्यातून उभी राहिलीब्लॅक लाइव्ह्ज मॅटर, मी टू यांच्यापासून इराणमधल्या हिजाबसक्तीविरोधातल्या केस कापायच्या आंदोलनासारख्या समाजाला हादरे देणाऱ्या आयडेंटिटी पॉलिटिक्सच्या चळवळी एलजीबीटींच्या चळवळीतूनच जन्माला आल्या आहेतडिप्रेशन, अँझायटी, ऑटिझम हे आजार आहेत, यांच्यावर उपचार केले पाहिजेत इथपासून ते शारीरिक, मानसिक, लैंगिक अत्याचारांबद्दल मोकळेपणाने बोललं पाहिजे, हे भान इंटरनेटने दिलेल्या समदु:खींच्या सोबतीच्या खात्रीने आलेलं आहे


१९९०च्या दशकात घडून आलेली ही तंत्रज्ञानाची क्रांती विस्मयकारक आहे
नाइन्टीजच्या उत्तरार्धापासून पुढच्या टप्प्यात जन्मलेला मुलांना आज ज्या अनेक गोष्टी सर्वसामान्य आयुष्याचा भाग वाटतात, त्या त्यांच्या आईवडिलांच्या पिढीच्या आयुष्यात एका टप्प्यापर्यंत प्युअर फँटसी होत्या, काही तर फँटसीतही सुचू नयेत इतक्या फँटास्टिक होत्या आणि त्या त्यांच्याच आयुष्यकाळात प्रत्यक्षात आल्याहा केवढा मोठा चमत्कार आहे याची ना त्या मुलांना कल्पना आहे, ना त्यांच्या आईवडिलांनाद मोस्ट एक्सायटिंग पीरियड टु बी अलाइव्ह इन असं अनेकांना अनेक कालखंडांबद्दल वाटतंपण, १९८० नंतरची ही पन्नासेक वर्षं ही माइंडबॉगलिंग म्हणतात तशी आहेतआधीच्या जगाच्या वेगाने विचार कराल तर अनेक शतकांमध्ये जे बदल घडून यायचे ते बदल या काळात हयात असलेल्या माणसांनी एका आयुष्यकाळात पाहिलेले आहेतत्यातले सगळ्यात जास्त एकट्या ९०च्या दशकात घडून आले आहेतएवढे बदल पाहण्याचं भाग्य आधीच्या टप्प्यांमधल्या शतायुषी किंवा त्याहून जगलेल्या माणसांनाही लाभलं नव्हतं


जगात असंख्य समाजसुधारक
, विचारवंतांनी समाजात सुधारणा करण्याचे प्रयत्न केले, त्यासाठी वैचारिक मांडणी केली; पण, त्यांना जे जमलं नाही, ते विज्ञानाच्या, तंत्रज्ञानाच्या आणि जगण्याच्या रेट्याने घडवून आणलं आहेभारतातल्या कृत्रिम जातभिंतींचेच उदाहरण पाहाजातिभेदांच्या पगड्यापायी मुंबईमध्ये एकेकाळी जातनिहाय खानावळी होत्या, पण लोकलमध्ये जातनिहाय बैठकव्यवस्था नव्हती. तिथे शेजारी बसलेल्याची जात विचारण्याचीही सोय नव्हती. अस्पृश्यता काही प्रमाणात मोडली ती तिथे. जातनिहाय खानावळी लुप्त झाल्या. अठरापगड जातीजमातींच्या संमिश्र वस्त्या तयार झाल्या तेव्हा आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांचा मार्ग आपोआप खुला झालाहे पुस्तकांतून, प्रवचनांतून, भाषणांतून झालं नसतंजगण्यातून घडून आलंनाइन्टीजमध्ये क्रांती घडवून आणणाऱ्या तंत्रज्ञानांनीही मानवजातीपुढे असंख्य शक्यता खुल्या केल्या आहेततंत्रज्ञान तेवढंच करू शकतंत्याचा वापर काय करायचा हे मात्र (अजून काही काळ तरी) माणूसच ठरवणार आहेअणुशक्ती खुली झाली तेव्हा अणुबाँब बनवायचे की आण्विक वीज निर्माण करायची, हा पर्याय होतामाणसाने पृथ्वीचा ७२ वेळा सर्वनाश घडवून आणतील एवढी अण्वस्त्रं बनवून त्याची बुद्धी कोणत्या दिशेला चालते ते दाखवून दिलं आहे


सामान्यांसाठी मुक्तीचं आणि समाजातल्या सगळ्या स्तरांना जोडणारं साधन म्हणून सोशल मीडियाकडे लोक फार आशेने पाहात होते
प्रत्यक्षात या माध्यमाने समाजात प्रचंड दुफळ्या घडवून आणल्याकुटुंबांमधले सदस्य राजकीय विचारसरणींमध्ये विभागले गेलेमोजक्या माणसांना, मोजक्या माध्यमांमध्ये अभिव्यक्तीची सोय होती, तोवर मानवजातीची झाकली मूठ सव्वा लाखाची होतीहातात डिव्हाइस असलेला कोणीही कोणालाही टॅगून काहीही लिहू शकतो, कोणाशीही कोणत्याही भाषेत बोलू शकतो, अशी व्यवस्था झाल्यावर सगळ्यांनाचव्यक्त होण्याची उबळ आली आणि मानव समुदायात शुद्ध मठ्ठ आणि उथळ माणसांचं प्रमाण किती मोठं आहे, ते एकदम उघड्यावर आलंमध्यममार्ग, सामोपचार, निकोप चर्चा, वादविवाद, संवाद वगैरे सगळं निकालात निघालंउजवे अधिक उजवे झाले, डावे अधिक डावे झाले, आस्तिक कट्टर आस्तिक झाले, नास्तिक कट्टर नास्तिक झाले आणि सगळे एकमेकांची अक्कल काढू लागलेट्रोलिंग या फौजदारी गुन्हेपात्र गोष्टीला देशातल्या सर्वोच्च पदांनी प्रतिष्ठा दिली आणि उदारमतवाद, सर्वसमावेशकता या शिव्या आहेत, अशी समजूत करून घेतलेल्या कट्टरांचा हैदोस सुरू झालाज्या तंत्रज्ञानांनी सर्वसामान्य माणसाला मुक्त करायला हवं होतं, त्याचे व्यवहार मुक्त करायला हवे होते, ती तंत्रज्ञानं राजसत्तांनी हुशारीने मास सर्व्हिलन्सची साधनं बनवून टाकली. आज आपल्या देशात ज्याच्याकडे (जे फारशा कशासाठीही सक्तीचं नाही, असं सरकार मानभावीपणाने सांगतं ते) आधार कार्ड नाही, त्याला जीवनव्यवहार अशक्यप्राय होईल अशी परिस्थिती निर्माण होत चालली आहेनाइन्टीजच्या क्रांतीने आपल्या हातात दिलेले असंख्य डिव्हाइस आणखी छोटे होऊन वेअरेबल होत चालले आहेत, लवकरच ते चिप्सच्या स्वरूपात आपल्या शरीराशी जोडले जातीलएकीकडे आपल्याला लवकरच हार्ट अटॅक येण्यासारखी परिस्थिती तयार झाली आहे, हे या डिव्हाइसेसमुळे आधीच कळण्याची सोय त्यातून होईल, काही तात्काळ उपचार होतील आणि सर्व संबंधित यंत्रणांना, आप्तेष्टांना कळवलं जाईल. पण, त्याचबरोबर आपण ज्यांचेगिऱ्हाईकआहात, अशा असंख्यदुकानांना ही माहितीही त्याचवेळी विकली जाणार आहे. आपण आज मोबाइलच्या आसपास असताना जे शब्द एकमेकांत उच्चारतो त्याच्याशी संबंधित जाहिराती काही क्षणांत सगळ्या डिव्हाइसेसवर दिसू लागतात. आपल्या व्यक्तिमत्त्वाचे आपल्यालाही माहिती नसलेले हजारो टचपॉइंट्स डेटा गोळा करणाऱ्या तथाकथित मोफतसेवांकडे जमा झालेला आहे, आपणच त्यांचं उत्पादन आहोतआपल्यावर २४ तास पाळत आहेज्या दिवशी सगळी डिव्हाइसेस शरीराच्या आत शिरतील तेव्हा काय होईल?…


आपल्या हातातल्या डिव्हाइसवर कोणत्या स्पीडने काय येणार
, तुम्ही काय पाहणार, काय खाणार, काय पिणार, कोणत्या नेत्याला मत देणार, या सगळ्यावर नियंत्रण प्रस्थापित करून आपला मेंदूच कसा हायजॅक केला जातो, याचं भयकारी दर्शन आजच घडतं आहेमेंदूत बसवली जाणारी चिप तर माणूस म्हणून असलेल्या वैविध्यपूर्ण ओळखींचा अंतच घडवून आणेल आणि सगळ्या जगाचं रूपांतर एखाद्या डिस्टोपियन सायन्स फिक्शनमध्ये होईल, अशी भीती आहे


ज्या
देशांमध्ये तंत्रज्ञान विकसित झालं तिथेही तंत्रज्ञान विकासाची गती समाजबदलाच्या गतीच्या कैकपट अधिक असल्याने अनेक उलथापालथी घडून येत आहेतआपण तर आयत्या तंत्रज्ञानाचे निव्वळ वापरकर्तेगेल्या शतकापासून आपण फक्त आयत्या सोयीसुविधा वापरतो आहोतआपण काही शोधलेलं नाही, तशी वृत्तीच इथे विकसित झालेली नाहीइथली समाजगती बदलण्याचा वेग तर आता शून्यावर येऊन तो रिव्हर्स गियरमध्ये काल्पनिक रामायण-महाभारत काळाकडे नेण्यासाठी तंत्रज्ञानाचा सफाईने वापर केला जातो आहेआपण नेमके कुठे असू?


९०च्या
दशकात निर्माण झालेलं तंत्रज्ञान माणसाची झेप अवकाशापर्यंत नेऊन बसवू शकतं किंवा ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज आणि मानवी निर्बुद्धतेचा सतत वाढत चाललेला परीघ यांच्या संयुक्त परिणामातून माणूस पुन्हा या झाडावरून त्या झाडावर उड्या मारणारा एक दुबळा प्राणी बनून राहू शकतो उरल्यासुरल्या जीवसृष्टीतहे सगळं फार दूरवरचं भविष्य नाहीपुढच्या ५० वर्षांत आपणच आपला फैसला करायला सज्ज झालो आहोतआपणच निर्माण केलेल्या सगळ्या अफाट शक्यता मातीत मिळवण्याच्या दिशेने पावलं उचलतो आहोत


१९९०च्या दशकाच्या आधीचे बदल हे कधी बैलगाडीच्या गतीचे होते, कधी सायकलच्या गतीचे होते, कधी मोटारीच्या गतीचे होतेऔद्योगिक क्रांतीनंतर या बदलांनी धावपट्टीवरच्या विमानाचा वेग पकडलापण, १९९०च्या दशकात या विमानाने धावपट्टी सोडून आकाशात झेप घेतली आहेआता चाकं जमीन सोडून विमानाच्या पोटात आली आहेतमानवाची सामूहिक प्रज्ञा आणि शहाणीव यांनी हे विमान वेळेवर गाठलं असेल, अशी आशा आहेनाहीतर आपणच उभारलेले संस्कृतीचे, प्रगतीचे ट्विन टॉवर याच विमानाच्या धडकेने जमीनदोस्त होतील, यात शंका नाही
.