साहित्यिक नेहमीप्रमाणे जागा झाला...
नेहमीप्रमाणेच तो विचार करू लागला...
असामान्य माणसांप्रमाणे त्याला विचारांचे इंद्रिय बंद करण्याचं वरदान लाभलेलं नव्हतं. काही काळ ऑन-ऑफ करण्याची कलाही अवगत नव्हती. त्यामुळे तो सतत विचार करत असे आणि त्यात त्याचा फार वेळ वाया जात असे.
त्याचे असामान्य मित्र त्याला सांगत असत, या वेळात तीन स्त्रोत्रं पाठ झाली असती, दोन गायींना घास भरवून झाला असता, एखाद्या बुवाबापूमहाराजाचे पाय धुवून ते चरणतीर्थ पिऊन घेता आलं असतं, एखाद्या माँला कडेवर घेता आलं असतं किंवा तिच्या कडेवर बसता आलं असतं... किमानपक्षी दोन व्हॉट्सॅप मेसेज वाचून २७ ग्रूप्सवर फॉरवर्ड तरी करताच आले असते... पण, या अभाग्याचा वेळ विचार करण्यातच जायचा.
अशाने लोक तुला विचारवंत समजतील आणि गोळीबिळी घालतील एक दिवस, असं त्याचा जिगरी दोस्त काळजीने सांगायचा. त्यालाही ते पटायचं. पण, विचार करण्यापासून तो स्वत:ला रोखू शकायचा नाही.आजही तेच होत होतं.
त्याच्या मनात विचार आला की आपण प्रसिद्ध का नाही? लोकप्रिय का नाही?तसा तो लेखक-कवी म्हणून नावाजलेला होता. त्याच्या नावावर दहा पुस्तकं होती. साहित्यिक वर्तुळात उठबस होती. त्याची काही पुस्तकं अन्य भाषांमध्ये अनुवादित झाली होती, परदेशांमध्येही त्याच्या लेखनाचे अनुवाद झाले होते. साहित्यक्षेत्रातले काही पुरस्कार त्याच्या नावावर होते. त्याचं नाव त्याच्या क्षेत्रात आदराने घेतलं जात होतं. पण, हे क्षुद्र लोकांचं क्षुद्र क्षेत्र. पौराणिक पोथ्या, देवांच्या आरत्या, स्तोत्रे, चालीसे-पन्नासे, सिनेमागीतांच्या चालीतील भक्तिगीते, भाकडकथा आणि गोड गोड गोष्टी यांसारख्या अभिजात साहित्याची उंची-खोली गाठणारं आपल्या हातून काही लिहून होत नाही, होणार नाही, याची खंत त्याला नेहमीच टोचत असायची.
आपण वाचनबिचन करणाऱ्या एका किरकोळ वर्तुळात ख्यातीप्राप्त आहोत, याला काय किंमत आहे? व्हॉट्सअॅपवर विनोद रचणारे, तयार पोस्टी फॉरवर्ड करणारे, वारानुसार देवादिकांची चित्रं पाठवणारे, विमानापासून अणुबाँबपर्यंत प्रत्येक गोष्ट आपल्याच देशात सर्वात आधी शोधली गेली, हे कुठेही सप्रमाण सिद्ध करून दाखवणारे, शाईफेकीत आंतरराष्ट्रीय सन्मान पटकावलेले असामान्य लोक आपल्याला ओळखतही नाहीत, त्यांना आपण माहितीही नाही, हे त्याला खटकत होतं.
आता लेखन-वाचन-अभ्यासासारख्या फुटकळ गोष्टींमध्ये रमलेल्या आपल्यासारख्या माणसाची ओळख करून घेण्याकरता या असामान्य लोकांनी भजन-कीर्तन-विकासकार्य वगैरे सोडून फुटकळ वाचनात वेळ घालवावा आणि त्यांच्या उच्च विचारसरणीच्या संपूर्णपणे विरोधात असलेल्या आपल्या कल्पना समजून घेऊन त्या सहन कराव्यात, अशी गावंढळ अपेक्षा तो स्वप्नातही बाळगू शकत नव्हता. या असामान्यांमध्ये लोकप्रिय होण्यासाठी आवश्यक असलेली शिवराळ आणि अस्मिताबाज भाषणबाजी करण्याची, आपला धर्म, आपली जात, आपली भाषा, आपली गल्ली हीच जगात सर्वश्रेष्ठ आहे, हे पटवून देण्याची किंवा कोणालाही त्यां च्यात ढकलून त्याचा हुकमी द्वेष करण्याची अफाट क्षमता त्याच्या अंगात नव्हती. आपली जीवनपद्धती, संस्कृती, विचारसरणी दुसऱ्यावर बिनदिक्कत लादण्याइतकी प्रगल्भता तर त्याच्यात येण्याची सुतराम शक्यता नव्हती.
तेवढं ते विचार करण्याचं इंद्रिय त्याला बंद करता आलं असतं, तर बरं झालं असतं. उगाच नसत्या गोष्टींच्या चिकित्सा करत राहण्यात त्याचा वेळ वाया गेला नसता. कोणताही टिळेधारी माणूस जो जगण्याचा, मरण्याचा, हगण्याचा, मुतण्याचा अर्थ सांगेल, तो निमूटपणे स्वीकारण्याची असामान्यता त्याच्या अंगी बाणली असती. पण, ते होणं शक्य नव्हतं.
काय केलं तर प्रसिद्ध होता येईल, कशी लोकप्रियता मिळवता येईल, या प्रश्नाने तो भेलकांडून गेलेला असताना त्याच्या लक्षात आलं की त्याच्या कपाळावर एक काळा चट्टा उमटला आहे... छोटा, पण चकचकीत काळा... शाईच्या डागासारखा.
अरे बापरे, तो घाबरला आणि भागवत डॉक्टरांच्या दवाखान्याच्या दिशेने निघाला. शुद्ध देशी औषधं देणारे हे शुभ्र मिशीवाले डॉक्टर सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर होते. कोणाला काय झालंय, कोणाला कसलं दुखणं आहे, हे तर कोणीही डॉक्टर सांगतो. हे डॉक्टर काका तर सगळ्या देशाची दुखणीही एका फटक्यात ओळखून त्यांच्यावर इलाज सांगण्यात पटाईत होते. खुद्द पंतप्रधानही अधूनमधून त्यांच्या दवाखान्यात येऊन डोस घेऊन जातात, असं त्यांचा कंपाउंडर सांगायचा. भागवत काकांकडे गर्दी खूप असली तरी ज्याचं दुखणं विकोपाला गेलेलं आहे आणि रोग असाध्य आहे, असा रोगी ते त्यांच्या अंत:चक्षूंनी आपोआप ओळखून त्याला आधी उपचारासाठी घ्यायचे, अशी त्यांची ख्याती होती.आताही त्यांच्या दवाखान्यात तौबा गर्दी होती. पण, त्यांनी त्यांच्या असिस्टंटांना बोलावून त्याच्या दिशेने बोट दाखवलंच. साहित्यिकाच्या दोन्ही खाकांमध्ये दोन दोन बलिष्ठ हात शिरले आणि त्याचं मुटकुळं उचलून डॉक्टरकाकांसमोर आणून टाकलं गेलं...
भरघोस मिशीवरून बोट फिरवत त्यांनी नजरेनेच विचारलं, काय झालंय? दुखणं कायंय?साहित्यिकाने कपाळाकडे बोट दाखवलं, तेव्हा आधीच्या चट्ट्याशेजारी दुसरा चट्टा उमटला होता... तसाच... छोटा, पण चकचकीत... काळ्या शाईच्या डागासारखा.
मिशीवाल्या काकांनी निराशेने मान हलवली आणि ते म्हणाले, अरे गधड्या, तुझं काही खरं नाही. तुला फेक्युलॅरिझम नावाचा रोग झालेला आहे. त्याच्यावर माझ्याकडे काहीइलाज नाही.
तो म्हणाला, अरेच्चा, ही एक गडबडच झाली. माझ्या आईवडिलांनी मला टिळा लावून लावून माझं विचार करण्याचं इंद्रिय बंद करण्याचा प्रयत्न केला होता. पण, तो यशस्वी झाला नाही. ते बंद करणारा कोणी डॉक्टर सापडत नाही. त्यात ही नवी भानगड उपटली. आता हाही असाध्य रोग. मी औषधोपचारांमध्येच वेळ घालवला, तर लोकप्रिय कसा होणार? मला प्रसिद्धी कशी लाभणार?
काका हसले, छद्मीपणा आणि मिष्कीलपणा यांचा मिलाफ असलेलं हास्य करून म्हणाले, तो मार्ग मात्र तुला आपोआप गवसेल.
दु:खात तेवढंच सुख म्हणून तो घरी आला आणि त्याची नजर पुरस्कारावर गेली...अचानक त्याच्या लक्षात आलं की या पुरस्कारांनीच घात केलाय त्याचा... त्यांनीच त्याची असामान्य होण्याची वाट रोखली आहे...
आता काय करावं, आता काय करावं?
रागाने वेडीपिशी झालेली त्याची नजर एका वर्तमानपत्रावर पडली आणि मिशीवाल्या काकांची भविष्यवाणी त्याच्या डोक्यात चमकली........
....दुसऱ्या दिवशी सगळ्या प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये बातमी झळकली,... डेंग्यूच्या डासांच्या अळ्या मारून टाकण्याच्या पालिका कर्मचाऱ्यांच्या अघोरी कृत्याचा निषेध म्हणून प्रख्यात साहित्यिकाने त्याचा पुरस्कार परत केला आहे ...
त्याच्यासारखेच सगळे साहित्यिक असामान्य लोकांमध्ये लोकप्रिय होण्यासाठी तरसत होतेच. त्यांनाही ही आयडिया आवडली. सगळ्यांनी आपले पुरस्कार परत करण्याचा सपाटा सुरू केला.
असामान्य लोकांकडून लागलीच विचारणा होऊ लागल्या, दु:शासनाने द्रौपदीच्या वस्त्राला हात घातला होता, तेव्हा कुठे गेला होता तुमचा स्वाभिमान? रावणाने सीतेचं अपहरण केलं, तेव्हा तुम्ही कोणत्या बिळात दडून बसला होतात? गांधीजी पंचावन्न कोटींच्या नोटा मोजत होते आणि जिनांबरोबर कोणत्या स्विस बँकेत अकाउंट उघडायचं त्याची चर्चा करत होते, तेव्हा काय तुमची दातखीळ बसली होती का? अहो, मी तेव्हा जन्मलो नव्हतो, तेवढंच एक चुकलं, असं सांगण्याचा प्रयत्न धुडकावून असामान्यांकडून जेव्हा, पिसवांनी तुमचं काय घोडं मारलंय, निषेधच करायचा तर डेंग्युच्या डासांच्या हत्येचा करा, अशी संतप्त विचारणा झाली तेव्हा त्याच्या लक्षात आलं की काहीही झालं तरी काहीही न वाचणाऱ्या लोकांमध्ये आपण बहुधा प्रसिद्ध झालो आहोत...
त्यावर शिक्कामोर्तब व्हायला फार वेळ लागला नाही...त्याने मान वर केली,
समोर आरसा होता... त्यात प्रतिबिंब होतं...
कपाळावरचे ते डाग आता चेहराभर पसरून एका मोठ्या, काळ्या शाईच्या डागात रूपांतरित झाले होते...
लोकप्रिय होणं आपल्याला बापाजन्मात शक्य नव्हतंच,
आपण किमान प्रसिद्ध तरी झालोच, या भावनेने शुभ्र दात त्यात चमकत होते...