Sunday, January 29, 2012

डोळ्यांनी पाहीन रूप तुझे...

सार्वजनिक माघी गणेशोत्सवाला अटकाव करणारा आदेश ठाणे महापालिकेचे आयुक्त ए. आर. राजीव यांनी काढला आहे (हे ए. आर. राजीव आहेत की ए. आर. ‘रहमान’?). त्यांच्या या फतव्याच्या विरोधात काही धर्मप्रेमी नागरिक आणि उत्सवप्रेमी संस्थांनी न्यायालयात दाद मागितली आहे. यात ‘थर्ड पार्टी’ म्हणून समस्त ठाणेकरांच्या वतीने न्यायालयाला हे निवेदन...

न्यायमूर्ती महोदय,
 
ठाण्यातील माघी गणेशोत्सवाच्या वाटेतील सर्व अडथळे दूर करून आपण हा सण साजरा करण्याची सत्वर परवानगी द्यावी, अशी विनम्र मागणी करण्यासाठी आम्ही हे निवेदन देत आहोत. (न्यायालय आहे म्हणून विनम्र व्हावं लागतंय. उगाच न्यायालयाचा अवमान झाला तर तुरुंगवासाची नस्ती आफत ओढवायची.)
 
न्यायमूर्ती महोदय, आमच्या रूढी, परंपरा, रीती-रिवाज, श्रेष्ठ संस्कृतीचा अभिमान आमच्या नसानसांत भरून वाहतो आहे. त्या नतद्रष्ट इंग्रजांनी कायदा करून रद्द केली म्हणून नाहीतर आम्ही सतीप्रथासुद्धा अभिमानानं पाळली असती. पण, प्रश्न तो नाही. निवडणुकारूपी लोकशाहीच्या परमकर्तव्यासाठी (जे बजावण्याच्या दिवशी आम्ही मित्राच्या कर्जतच्या फार्महाऊसवर सहकुटुंब पिकनिक करतो) आम्ही आमच्या रूढी-परंपरा बाजूला ठेवायलाही तयार झालो असतो, पण, आमच्या काही प्रॅक्टिकल अडचणी आहेत. त्यांचा विचार सन्माननीय न्यायालयाने करावा, अशी आमची विनंती आहे.
 
आम्हाला आमच्या शहरात शांततेची बिल्कुल सवय राहिलेली नाही. धर्मवीरांच्या काळापासून बंटी और बबलूच्या सध्याच्या काळापर्यंत आमच्या शहराचे इतके प्रचंड प्रमाणात उत्सवीकरण झाले आहे की शहरात कसलाही उत्सव नसला, तर आम्हाला कसेसेच वाटते. आपण कमलहासन यांचा पुष्पकहा मूकचित्रपट पाहिला आहे का? त्यातील आमच्यासारख्याच वस्तीत राहणारा नायकाला (ठाणेकरच असणार तो, शंकाच नाही) जेव्हा एका पंचतारांकित हॉटेलच्या शांत रूममध्ये झोप लागत नाही, तेव्हा तो आपल्या वस्तीतली रात्रीची गजबज रेकॉर्ड करून आणतो आणि ती कॅसेट लावून सुखाने झोपी जातो. आम्हीही उत्सवविहीन दिवसांमध्ये असेच रात्र रात्र तळमळतो आणि शेवटी ढोल-ताशे-नगारे-नाशिक ढोलीबाजा-बँजो-डीजे रिमिक्स यांचं रेकॉर्डिग करून ते कानाशी लावून ठेवून गाढ झोपतो.
 
उत्सवांची सवय आमच्या कानांनाच लागलेली नाही, तर आमच्या सगळय़ा व्यक्तिमत्वामध्ये ते भिनलेले आहेत. शहरात रस्ते मोकळे आहेत, चौकांमध्ये मंडपांचे अडथळे नाहीत, गल्लीबोळांमध्ये वाहनं किंवा माणसं विनाअडथळा शिरू शकत आहेत, नजर फेकू तिकडे थेट आरपार पोहोचते आहे, कानेकोपरे होर्डिग-बॅनरनी बरबटलेले नाहीत, हे दृश्य पाहून आमच्या जिवाला किती यातना होत असतील, याचा सहृदयतेने विचार करा न्यायमूर्ती महोदय. नाझी फौजांच्या बाँबवर्षावानंतर बेचिराख झालेल्या लंडन शहराकडे पाहून अस्सल लंडनवासीयाला जे वाटलं असेल, ते असं ओकंबोकं ठाणे शहर पाहून वाटतं आम्हा ठाणेकरांना. उत्सवरूपी सौभाग्य हिरावून घेतलेल्या पांढ-या फटफटीत कपाळासारखं उद्ध्वस्त आणि अमंगळ वाटतं या सुनसान शहराकडे पाहून.
 आमच्या या भावनांचं सोडा. तुम्ही हल्ली कुणाच्या भावनांची काही कदरच ठेवत नाही. उलट भावना घरी ठेवून बाहेर पडत जा, असं दटावता. आमच्यासारख्या भावनाप्रधानांसाठी हे म्हणजे कातडे घरी ठेवून निव्वळ हाडांनिशी बाहेर पडण्यासारखं आहे. पण, भावना सोडल्या तरी सवयींचं काय करायचं? अहो, न्यायमूर्ती महोदय, आमच्या पावलांना आणि वाहनांनाही आपसूक वेडीवाकडी वळणं घेत थबकत थबकत, दबकत दबकत प्रवास करण्याची इतकी सवय झाली आहे की मरीन ड्राइव्हवरही पावलं आणि एक्स्प्रेस वेवरही वाहनं तशीच नागमोडी चालतात आमची. बारा महिने तेरा काळ आम्ही उत्सवभारल्या वातावरणात राहतो. गणपतीचा मंडप उठला की लगेच देवीचा लागतो, मग दत्तगुरू, साईबाबा, जगद्गुरू, श्रीकृष्णावतार वगैरेंच्या उत्सवांनी शहराचाच नव्हे, तर मनाचाही आसमंत एकदम भरून गेलेला असतो. आपल्याच न्यायालयात एक याचिका करून आम्ही शहरात कायमस्वरूपी मंडपांची मागणी करणार आहोत. दर उत्सवाला नसती झगझग नको. एकदम मोकळे रस्ते आणि मंडपमुक्त चौक पाहिले की चुकून आपण परदेशातच आलो आहोत की काय, अशी शंका येते आम्हाला. या मंडपाला वळसा घालून, त्या कमानीच्या खालून, अमक्या होर्डिगाजवळच्या गल्लीतली लाइटच्या माळांनी सजवलेली डावीकडून तिसरी इमारत, असा पत्ता सांगतो आम्ही. मंडप, कमानी, होर्डिगं तुम्ही काढून टाकलीत तर आमचं घर आम्हालाही सापडायचं नाही. हसण्यावारी घेऊ नका. धिस इज व्हेरी सिरियस मॅटर! आमचे घंटाळीचे बापूकाका नेने- एक दिवस घरातून खाली उतरले आणि गल्लीबाहेर आले तेव्हा एकदम मोकळा चौक पाहून ब्लडप्रेशर वाढलं त्यांचं आणि एकदम भक्कन सूर्यप्रकाश शिरला त्यांच्या डोळय़ात तर चक्कर येऊन जागीच कोसळले ते. अशा वयोवृद्ध ठाणेकरांच्या प्रकृतीचा तरी विचार तुम्ही यासंदर्भात निर्णय देताना केला पाहिजे.
आणखी एकच गोष्ट सांगून तुमची रजा घेतो.
 
आमच्या ठाण्याचे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी.. त्यांच्या आठवणीनं डोळय़ांत सतत पाणी येतं. स्वत:च्या लग्नाच्या जोडीदाराची, पोटच्या पोराची किंवा आईबापाची छबीसुद्धा आम्ही कधी इतक्या वेळा आणि इतक्या ठिकाणी- जळीस्थळीकाष्ठीपाषाणी पाहात नसू आम्ही, इतकी त्यांची हसरी छबी सतत नजरेसमोर असते आमच्या. आमच्या हृदयांतच वसलेले असतात म्हणा ना ते! तुमच्या आचारसंहितेने त्यांचे चेहरेच आमच्या नजरेसमोरून हटवून टाकले. विरहानं प्रेम वाढतं म्हणतात. या लोकनेत्यांच्या विरहानं आम्ही व्याकूळ झालो आहोत. कधी एकदा ते हात उंचावलेले, तडफदारपणे चाललेले, मांजरीसारख्या फिस्कारल्या हास्याचे, मस्तवाल रेडय़ासारखे टणक आणि निगरगट्ट रूप डोळाभरून पाहतो, असे झाले आहे आम्हाला.
 इतकी भक्ती तर आमची (आणि त्यांचीही) साक्षात श्रीगणेशावरसुद्धा नाही. ती पाहून तो माघी गणेश पावो ना पावो, तुमचे हृदय मात्र द्रवावे, हीच अपेक्षा.
आपला,
 ठों. बा. ठाणेकर

-अनंत फंदी  


(प्रहार, २९ जानेवारी, २०१२)

अखेर रश्दीच जिंकले...

स्थळ : भारत
 
कुणीएक लेखक- ज्याने कधीकाळी लिहिलेल्या एका पुस्तकाने एका विशिष्ट धर्माच्या भावना दुखावल्या होत्या आणि त्या धर्माचे सौभाग्य मिरवणा-या देशांआधी या सेक्युलर देशाने त्या पुस्तकावर बंदी घालण्याचे पाक काम केले होते- तो लेखक एका साहित्यिक महोत्सवात येत आहे म्हटल्यावर त्या धर्माच्या कडव्या अनुयायांना अचानक जाग आली आणि त्यांनी त्याच्या येण्याला विरोध दर्शवला, त्याच्या पुस्तकातले उतारे वाचण्याला विरोध दर्शवला, त्याच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे व्हर्च्युअल उपस्थितीलाही विरोध दर्शवला.
 
भारतीय प्रजासत्ताकातील सरकारी यंत्रणेने आणि सरकारचे गुलाम असलेल्या पोलिस आदी यंत्रणांनी या धर्माध टोळक्याच्या सुरात सूर मिसळून कायदा आणि सुव्यवस्थेचा नेहमीचा बागुलबुवा उभा केला. त्या लेखकाच्या उपस्थितीला प्रतिबंध करून आपल्या देशाने वैचारिक उदारतेच्या आणि प्रगल्भ सुसंस्कृततेच्या कितीही बाता मारल्या तरी आपली मूळ सामुदायिक प्रकृती ही तालिबानांच्या आणि दडपशाहीवादी चिन्यांच्या अधिक जवळची आहे, हे सप्रमाण दाखवून दिले.
 
स्थळ : अमेरिका
 
एका ‘टॉक शो’च्या विश्वविख्यात यजमानाने त्याच्या विनोदी सादरीकरणामध्ये पार्श्वभूमीला सुवर्णमंदिर दाखवले. सुवर्णजडित सुवर्णमंदिर हे अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या एका उमेदवाराचे सुटीतील निवासस्थान आहे, असा त्याच्या विनोदाचा मथितार्थ होता. त्यावर अमेरिकेतील शीख समुदायाने आवाज उठवण्याच्या आधी भारतातील संघटनांना कंठ फुटला. त्यांनी इथल्या इथे निषेध नोंदवला आणि केंद्र सरकारने त्या ‘टॉक शो होस्ट’च्या विरोधात अधिकृतपणे तक्रार नोंदवण्याच्या हालचाली सुरू केल्या. विदेशस्थ भारतीय व्यवहार खाते सांभाळणारे केंद्रीय मंत्री वायलर रवी यांनी केवळ भारतातील मंत्रीच करू धजेल, असे बेजबाबदार विधान केले. ते म्हणाले की आपण हा कार्यक्रम पाहिलेला नाही, पण त्यात शीख समुदायाच्या भावना दुखावणारे काही आहे, असे मला शीख समुदायाकडूनच कळले. मी या वांशिक वर्चस्ववादी खोडसाळ कृत्याचा निषेध करतो.
 
आपण ज्याचा निषेध करतो आहोत, ज्याला प्राणपणाने विरोध करतो आहोत, ते आपण किमान वाचले-पाहिलेले असले पाहिजे, असे- अन्य कोणाही भारतीयाप्रमाणे- रवी यांनाही आवश्यक आणि महत्त्वाचे वाटले नाही.
 
या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या गृहखात्याच्या प्रवक्त्या व्हिक्टोरिया न्यूलँड यांची प्रतिक्रिया पाहण्याजोगी आहे. त्यांनी आधी हे स्पष्ट केले की अमेरिकेची राज्यघटना ही उच्चारस्वातंत्र्याचा पराकोटीचा पुरस्कार करत असल्यामुळे जे लेनो यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही. जे लेनो यांची टिप्पणी ही सुवर्णमंदिराची नव्हे, तर अध्यक्षीय उमेदवार रॉम्नी यांची थट्टा करणारे होते. अमेरिकेतील शीख समुदायाचे त्या देशाच्या भरभराटीत मोठे योगदान आहे. शीख धर्माबद्दल अमेरिकेला आदर आहे. विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांनीच गुरू नानक यांची जयंती व्हाइट हाऊसमध्ये सर्वप्रथम साजरी केली आहे.
 
ज्यांना जे लेनो यांचे व्यक्तिस्वातंत्र्य मान्य नाही, उच्चारस्वातंत्र्य मान्य नाही, त्यांना कोर्टात त्यांच्याविरुद्ध दावा करण्याचा अधिकारही आहे. तो रणदीप ढिल्लाँ या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकाने बजावला आहे. त्याने कॅलिफोर्नियाच्या कोर्टात जे लेनोविरुद्ध खटला दाखल केला आहे. या खटल्याचा निकाल लागेल आणि त्यातून जे लेनोवर कारवाई होईल किंवा होणारही नाही. त्याविरुद्धची दाद त्यावरच्या कोर्टात मागितली जाईल आणि कायद्याच्या चौकटीत या प्रकरणाचा जो काही व्हायचा तो अंत होईल.
 
आश्चर्याची गोष्ट म्हणजे जे लेनोच्या टिपणीवर भारतात जेवढा आणि जसा गदारोळ झाला, तसा आणि तेवढा अमेरिकेत झालेला नाही. तिथल्या शीख समुदायाने कृपाण नाचवत रस्ते अडवले नाहीत किंवा कोणत्याही प्रकारचा कायदेभंग केला नाही. त्यांचा निषेध कायद्याच्या चौकटीतच सुरू आहे.
कल्पना करा, अमेरिकेत घडलेला प्रकार- कोणत्याही धर्माच्या पवित्र प्रतीकाबाबत किंवा धर्मस्थळाबाबत भारतात घडला असता तर?
 
तर काय घडले असते याची आता कल्पना करायला नको- ते सलमान रश्दी यांच्यासंदर्भात घडलेल्या प्रकाराने सुस्पष्ट झाले आहे. केंद्रातील याआधीचे भारतीय जनता पक्षप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार अधिक धर्मसंवेदनशील होते, असे वरपांगी वाटू शकते. काँग्रेसला मोठी सेक्युलर परंपरा आहे. तो पक्ष देशात सत्तेवर असताना आणि पक्षांतर्गत भागधेयाचा भाग म्हणून तसेच धोरण म्हणून अल्पसंख्याकांना विशेष स्थान देतो, त्यांच्या मनात विश्वास निर्माण करतो. त्यामुळेच त्याच्यावर अल्पसंख्याकांच्या अनुनयाचा ठपका ठेवून भाजपप्रणीत आघाडी ठिकठिकाणी सत्तेची मधुर फळे चाखू शकली. महात्मा गांधीजींना अभिप्रेत असलेली लोकशाहीच आपण राबवत आहोत, असा या पक्षाचा टेंभा असतो. बहुमताची लोकशाही गांधीजींना अभिप्रेत नव्हती. बहुमताने अल्पमताचा आदर करावा आणि अल्पमतातील व्यक्तींनाही सोबत घेऊन, त्यांच्या आकांक्षांचा योग्य सन्मान राखत राज्य करावे, अशी त्यांच्या कल्पनेतील लोकशाही राज्यव्यवस्था होती. काँग्रेसने ही लोकशाही फक्त धार्मिक अल्पसंख्याकांच्या संदर्भातच राबवली आहे. हे निव्वळ मतपेटीचे राजकारण आहे. ते शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या बहुसंख्याकवादी ऊग्र धर्माधतेपेक्षा फारसे वेगळे नाही.
  
खरेतर धार्मिक कर्मकांडांनी पछाडलेल्या कोणत्याही देशात खऱ्या अर्थाने अल्पसंख्य असतात ते धर्मप्रामाण्य नाकारणारे विवेकवादी. माणसाचा सगळा विकास चिकित्सेतून झाला आहे त्यामुळे चिकित्साच नाकारणाऱ्या श्रद्धेचे प्रामाण्य स्वीकारणार नाही, अशी त्यांची भूमिका असते. तिचा भावनिक अवगाहन आणि शाब्दिक मायाजालापलीकडे कोणत्याही मार्गाने बौद्धिक प्रतिवाद करता येत नाही म्हटल्यावर धर्मवादी बहुसंख्याक- धर्म भ्रष्ट किंवा नष्ट होण्याच्या चिरस्थायी भीतीतून- विवेकवाद्यांवर शक्य त्या सर्व वैध-अवैध, प्रसंगी हिंसक मार्गानी हल्ले चढवत असतात. अशावेळी अल्पसंख्याकांचे कैवारी म्हणवून घेणारे काँग्रेसचे सरकारही प्रत्यक्षात धार्मिक अल्पसंख्याकांचीच कड घेते. त्यांची मतपेटीच्या दृष्टीने आवश्यक बहुसंख्या आहे की नाही, याची खात्री करून घेण्याचीही गरज सरकारला भासत नाही. कारण, श्रद्धा सांभाळण्याच्या बाबतीत बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक हे जवळपास एकत्रच असतात. म्हणूनच रश्दी यांच्या विचारस्वातंत्र्याची जोरकस पाठराखण, बहुसंख्य हिंदूंना प्रभावित करण्याची व्यूहात्मक रचना म्हणूनही कोणताही हिंदुत्ववादी पक्ष करत नाही. त्याने भूतकाळात अशाच प्रकारे कोणाच्या ना कोणाच्या विचारस्वातंत्र्याची गळचेपी केलेली असते आणि भविष्यातही ती करण्याचा परवाना कोण गमावणार? 
रश्दींच्या ‘उपस्थिती’ला विरोध दर्शवणारे आणि त्यांना गैरहजर राहायला भाग पाडणारे सगळेच जण एक विसरतात की अशा प्रत्येक रश्दीचे नेमके काय करायचे, हा प्रश्न सर्व धर्माधांना विचाराच्याच पातळीवर उतरून सोडवावा लागणार आहे. कारण, अविचाराने फक्त असले बीभत्स आणि तात्कालिक विजय मिळतात. रश्दींच्या शारीरिक उपस्थितीच्या पलीकडे त्यांचे अस्तित्व आहे, त्यांच्या पुस्तकांच्या रूपाने ते कायम उरणार आहे आणि श्रद्धावंतांना कायम आव्हान देत उभे ठाकणार आहे. हे अस्तित्व किती ताकदवान असते, याची कल्पना धर्मवेडय़ांना आता तरी आली आहे का?
 
जयपूरच्या साहित्य महोत्सवात रश्दी केवळ शरीराने उपस्थित नव्हते, त्या महोत्सवावर सर्वात मोठी छाप आणि प्रभाव तेथे उपस्थित असलेल्या साहित्यिकांचा नव्हता, रश्दींचा होता.
 हा रश्दींच्या विरोधकांचा सर्वात मोठा पराभव होता.


(व्यंगचित्र : मंजुल, डीएनए यांच्या सौजन्याने)
(प्रहार, २८ जानेवारी, २०१२) 

Monday, January 23, 2012

नॉट ओके.. नेक्स्ट!

गजराचं घडय़ाळ पाचव्यांदा केकाटलं तेव्हा राजसाहेबांनी पांघरुणातून डोकंही बाहेर न काढता हातानं चाचपून त्याचा कर्कश्श आवाज बंद केला आणि अंदाजानंच ते खिडकीच्या बाहेर भिरकावून दिलं.. ‘खळ्ळ खटय़ॅक’ असा घडय़ाळ फुटल्याचा आवाज आला नाही, तेव्हाच त्यांच्या लक्षात आलं की खिडकीबाहेर उभ्या असलेल्या स्वीय सहायकानं ते झेललं आहे, याचा अर्थ, आता जागं व्हावंच लागेल. ‘च्यामारी या घडय़ाळाच्या, तिकडे प्रचारात पण नडतंय आणि इकडे झोपेचंही खोबरं करतंय..’ तोंडातल्या तोंडात पुटपुटत नाईलाजानं अंथरुणाबाहेर पडून आळसटून हात ताणत त्यांनी खिडकीबाहेर नजर टाकली आणि त्यांची झोपच उडाली. बंगल्याबाहेरच्या रस्त्यावर या टोकापासून त्या टोकापर्यंत हातात फायली घेतलेल्या माणसांची ही गर्दी जमली होती.
 
‘‘अरे हा काय प्रकार काय आहे?’’ साहेबांनी पीएला विचारलं.
 
‘‘हे सगळे प्रोडय़ुसर आहेत हिंदी मालिकांचे. मराठी मालिकांचे उद्या येतील. हिंदी सिनेमाच्या निर्मात्यांना परवाची वेळ दिलीये आणि त्याच संध्याकाळी मराठी सिनेमाच्या निर्मात्यांना.’’
 
‘‘सगळय़ांना एकत्र बोलावलं असतंस तर शिवाजी पार्कावर सभाच लावली असती. कशाला आलेत हे सगळे परप्रांतीय, उपरे डोमकावळे?’’
 
‘‘तुम्हाला स्क्रिप्ट वाचून दाखवायला.’’
 
‘‘इकडे या’’, साहेबांनी पीएला जवळ बोलावलं, ‘‘चालून दाखवा. पुढे या.’’ त्याचे डोळे निरखले, थोडंसं पुढे झुकून वासाचा अदमास घेतला, ‘‘सकाळी चहाऐवजी नवटाक, पावशेर मारून आलात की काय आज? मी काय टीव्ही चॅनेल काढतोय की काय एखादं नवीन की ‘मातोश्री पिक्चर्स’ असं बॅनर काढतोय? एवढय़ा सगळय़ांची स्क्रिप्ट्स ऐकत बसलो, तर पक्ष कोण माझा काका चालवणार?’’ चटकन जीभ चावल्यामुळे राजसाहेबांची सरबत्ती थांबली, तसा पीए मवाळ स्वरात म्हणाला, ‘‘पण साहेब, तुमच्या परमिशनशिवाय त्यांचं कामच पुढे चालणार नाही.’’
 
‘‘कशाची परमिशन?’’
 
‘‘यांच्या पटकथेत मराठी माणसांच्या व्यक्तिरेखा आहेत, त्या योग्य प्रकारे चितारल्या आहेत की नाहीत, हे तुम्ही पाहून ओके केल्याशिवाय कोणता शहाणा निर्माता मालिकेचं किंवा सिनेमाचं शूटिंग करेल. मुंबईत राहायचंय त्याला, काम करायचंय..’’ पीए अभिमानानं म्हणाला.
 
‘‘शिंची कटकट’’, कपाळावर हात मारून घेत राजसाहेब म्हणाले, ‘‘आम्हालाही ना एकेक सॉलिडच आयडिया सुचतात. एक काम करा. सगळय़ांना बसवा. एकेकाला पुढे आणा. मराठी माणसाचं कॅरेक्टर काय आहे, ते एका ओळीत सांगायचं म्हणावं. ओके-नॉट ओके टिपून घ्या नीट.’’
 ...............
‘‘साहेब, माझ्या स्क्रिप्टमध्ये मोलकरीण आहे गंगू नावाची.’’
 
‘‘चालणार नाही.’’
 
‘‘आम्ही तिला कांजीवरम सिल्कच्या साडय़ा देणार आहोत नेसायला. प्रत्येक सीनमध्ये नवी.’’
 
‘‘जमणार नाही. शेवटी मोलकरीणच दाखवणार ना तुम्ही तिला?’’
 
‘‘पण, साहेब, ती स्कोडा गाडीतून कामावर येते, असं दाखवणार आहोत.’’
 
‘‘साहेब, हा फारच रिअ‍ॅलिस्टिक टच आहे..’’ पीएनं मध्ये तोंड घातलं, ‘‘हल्ली मोलकरणींचे कामाचे रेट इतके वाढलेत की ती कारमधून येते याचं प्रेक्षकांना आश्चर्यही वाटणार नाही.’’
 
‘‘तुला बोलायला सांगितलं होतं?’’ साहेबांनी फिस्कारून विचारलं आणि स्क्रिप्ट भिरकावून दिलं, ‘‘नेक्स्ट!’’
 
‘‘साहेब, माझ्या स्क्रिप्टमध्ये रामा गडी आहे..’’
 
‘‘का? कृपा गडी असला तर स्वच्छ भांडी घासणार नाही का?’’
 
‘‘पण, साहेब मी त्याला फुल पँट घालणार आहे. मालकाच्या बंगल्याशेजारी त्याचा पण छोटा बंगला असतो, अशी आयडिया आहे आमची.’’
 
हेही स्क्रिप्ट भिरकावलं गेलं.. कुठे माळी, कुठे प्लंबर, इथपासून कुठे हवालदार, कुठे भ्रष्ट इन्स्पेक्टर, कुठे लाचखोर पुढारी, माफिया डॉन, लबाड बिल्डर (‘ही तर द्विरुक्ती झाली’- स्वत: बिल्डर असलेल्या साहेबांची मार्मिक टिपणी).. वेगवेगळय़ा स्क्रिप्ट्समध्ये वेगवेगळय़ा लेखकांनी मराठी माणसाला असे सगळे रोल दिले होते.. राजसाहेब एकेकावर काट मारत चालले होते. ‘नॉट ओके’ची यादी 1772वर पोहोचली, तेव्हा वडापावची गाडीवाला, डबेवाला, भोरचा कुल्फीवाला आणि मासळी बाजारातल्या कोळणी एवढेच काय ते मराठी माणसांचे रोल ओके झाले होते. हा आकडा 1123 होता तेव्हापासून पीए काहीतरी बोलू पाहात होता, त्याला ती संधी 1772नंतर मिळाली, ‘‘उचकटा, उचकटा, तुमचं तोंड उचकटा.’’
 
‘‘नाही म्हणजे सहज आपली एक शंका आली म्हणून बोलतो.’’
 
‘‘फुटेज खाऊ नका. लीड रोल माझा आहे. फटाफट बोला.’’
 
‘‘साहेब आतापर्यंत आपण इतक्या मालिका-सिनेमांमधले मराठी माणसांचे रोल कट केलेत. या सगळय़ा भूमिका आता इतर प्रांतीयांच्या नावांनी झळकतील.’’
 
‘‘मग, बरोबरच आहे. सगळी हलकी कामं करायची का मराठी माणसांनी?’’
 ‘‘त्यामुळेच साहेब थोडी पंचाईत होणार आहे. म्हणजे असं की ही सगळी कथानकं घडतात मुंबईत. त्यात मुख्य व्यक्तिरेखा आधीपासूनच परप्रांतीय आहेत. आता फुटकळ रोलमधली मराठी माणसंही तुम्ही कटाप केलीत. त्यामुळे मुंबईत सगळी कामं परप्रांतीयच करतात, असा प्रेक्षकांचा समज नाही का होणार?’’
‘‘मारी टोपी,’’ विचारात पडलेल्या साहेबांनी पीएच्या पाठीवर थोपटलं, ‘‘भेजा आहे बरं का तुला? आता आणखी एक फतवा जारी करा. मुंबईत मालिका-सिनेमा बनवायचा असेल, तर सगळय़ा प्रमुख व्यक्तिरेखा मराठीच असल्या पाहिजेत.’’
 
ट्रिंग ट्रिंग.. ट्रिंग ट्रिंग..
 फोन वाजला. आत जाऊन पीएने घेतला. दोन मिनिटांनी बाहेर येऊन म्हणाला, ‘‘साहेब, हॉलिवुडवरून फोन होता एका प्रोडय़ुसरचा. त्यांनी विचारलंय, ग्वाटेमालामध्ये शूटिंग सुरू असलेल्या आमच्या पुढच्या सिनेमात एकही मराठी व्यक्तिरेखा नाही. तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना?’’

-अनंत फंदी 

(प्रहार, २२ जानेवारी, २०११) 

Saturday, January 21, 2012

करकोचा जातो जिवानिशी

आज मी अप्रतिम चविष्ट करकोचा खाल्ला,’ असं कोणी अट्टल मांसाहारी माणूसही दुस-याला चवीचवीनं सांगताना दिसणार नाही..
 
..जगाच्या पाठीवर करकोचा कदाचित चीनमध्ये खाल्ला जात असेल. चिनी मंडळी शब्दश: सर्वाहारी असल्यामुळे दोन पायांवर माणूस, पाण्यात होडय़ा आणि आकाशात विमानं सोडल्यास जमिनीवर चालणारं, पाण्यात बुडणारं आणि आकाशात उडणारं सगळं काही त्यांना उदरभरणासाठी चालतं. तिथल्या जंगलांमध्येही प्राणी-पक्षी फारसे दिसत नाहीत आणि जे दिसतात ते माणूस दिसताच धूम पळतात म्हणे. वाघ जीव खाऊन पळतोय आणि माणूस त्याचा पाठलाग करतोय, असं दृष्यही तिकडच्या जंगलात दिसत असेल- खासकरून वाघाच्या वर्षात.
 
भारतात मात्र फार फार तर ईशान्य भारताचा अपवाद वगळता इतरत्र कुठे करकोचा खाल्ला जात असेल, असं वाटत नाही. त्यात गुजरातसारख्या विशुद्ध शाकाहारी प्रांतात तर कोंबडी-इमू यांच्यासारख्या, इतरत्र खाण्यासाठीच पाळल्या जाणा-या पक्ष्यांचा जीव घेणारे नोनवेजनराधमही संख्येने कमी असतील; तिथे करकोच्याची शिकार करण्याच्या फंदात कोण पडणार? तरीही गुजरातच्या भावनगरमध्ये गेल्या आठवडय़ात एक-दोन नव्हे, तब्बल वीस करकोचे मारले गेले; तेही साधेसुधे करकोचे नव्हेत, तर पेंटेड स्टॉर्क किंवा मराठीत चित्रबलाक या नावानं ओळखले जाणारे दुर्मीळ करकोचे. संरक्षित पक्ष्यांमध्ये स्थान असलेल्या या पक्ष्यांचा अपमृत्यू भावनगरमधल्या पक्षीमित्रांच्या असा काही जिव्हारी लागला की त्यांनी शहरातून या पक्ष्यांची अंत्ययात्राच काढली..
 
..त्या दोन दिवसांत त्या परिसरात अशाच प्रकारे अपमृत्यूची नोंद झालेल्या इतर प्रजातींच्या 14 पक्ष्यांच्या नशिबात अशा अंत्ययात्रेचा योग नव्हता. ते चित्रबलाकांइतके दुर्मीळ आणि संरक्षित नसणार. रोजच्या उठण्या-बसण्यातल्या चिमण्या-कावळे-कबुतरांची तर कुणी गणतीही केली नसेल. शेकडो पक्ष्यांसाठी काळदिवस ठरलेले ते दोन दिवस म्हणजे 14 आणि 15 जानेवारी. म्हणजेच गुजरातेत पतंगबाजीसाठी प्रसिद्ध असलेला उत्तरायणाचा सण.
 
देशभर मकर संक्रांतीचा सण वेगवेगळय़ा नावांनी, वेगवेगळय़ा प्रकारांनी साजरा होतो. गुजरातमध्ये तो उत्तरायण या नावाने साजरा होतो. वेगवेगळय़ा आकार-प्रकारांचे, रंगांचे, मांजांचे पतंग उडवणे ही हा सण साजरा करण्याची पद्धत. गुजरातचं अधिकृत पर्यटन आकर्षण असलेल्या या सणाला संपूर्ण गुजरातभर मैदानांत, मोकळय़ा जागांत आणि घरांच्या सज्जांवर गर्दी करून पतंग उडवण्याचा कार्यक्रम दिवसभर सुरू असतो. अहमदाबाद ही गुजरातमधल्या पतंगबाजीची राजधानी मानली जाते. या उत्सवात स्त्री-पुरुष आबालवृद्ध उत्साहाने सामील होतात.
 
शुद्ध शाकाहारी आणि अहिंसेचा पुजारी असलेल्या गुजरातमध्ये जागोजाग पक्ष्यांच्या रक्ताचा सडा पडतो, तो याच दोन दिवसांत. पतंगांच्या दो-यांमध्ये अडकून, भेलकांडून, हेलपाटून, हेलकावे खाऊन, खाली पडून किंवा धारदार मांजाने अवयव कापले जाऊन पक्षी जखमी होतात, जबर जखमी होतात, काही मरण पावतात. गेली काही वर्षे तर या खेळात माणसाचा गळा कापण्याचीही ताकद असलेल्या चिनी मांजाचं आगमन झालं आहे. भावनगरच्या चित्रबलाकांची कत्तल या चिनी मांजानेच घडवली होती. हे फक्त गुजरातमध्येच घडत नाही. देशात अनेक ठिकाणी घडतं. कारण, पतंगबाजीचं लोण देशभर पसरलं आहे. गुजराती समाज काही फक्त गुजरातपुरता मर्यादित नाही. व्यापारी बाण्यामुळे हा समाज देशविदेशांत पसरला आहे. त्याच्या उत्सवप्रियतेची लागण गुजराती वस्त्या असलेल्या अन्य राज्यांमध्येही होते. मुंबईत स्थानिक अस्मितेचे भोंडले किती होतात आणि हिंदुबंधुत्वाचा गरबा किती खेळला जातो, हे पाहिलं तर या सार्वत्रिक गुजरातीकरणाची कल्पना येईल. त्यामुळे संक्रांतीच्या सुमुहूर्तावर पतंगांची लढाई देशात ठिकठिकाणी होते आणि या सर्व ठिकाणी कमी अधिक संख्येने पक्षीही जखमी होतात-मरतात.
 
पतंगबाजीचा हा खेळही गमतीचा. ज्याने त्याने आपापला पतंग उडवायचा ठरवला, तर यासारखा आनंदाचा खेळ नाही. स्वच्छ निरभ्र आकाशात, शांत-शीतल वातावरणात पतंग आकाशात मुक्त विहरण्यासाठी सोडायचा. दुरून पाहणा-याला वाटावं की किती स्वच्छंदपणे बागडतोय आकाशात पतंग; पण, प्रत्यक्षात त्याची अदृश्य दोरी कुणाच्या तरी हातात असतेच, असे तत्वचिंतनात्मक विचार करावेत. एवढय़ा मोठय़ा आकाशात जगातल्या सगळय़ा माणसांना सुखनैव पतंग उडवता येतील, एवढी जागा आहे. पण, माणसं कोणताही खेळ स्पर्धेविना खेळू शकत नाहीत. त्यामुळे, पतंग उडवण्याच्या खेळाची पतंगबाजीहोते. आपला पतंग हवेत छान उडावा, एवढंच पुरेसं नाही; दुस-या कुणाचा पतंग आकाशात असताच कामा नये. आला तर त्याची कन्नी कापून त्याला जमिनीवर लोळवायचा. आकाशात एकच पतंग असला पाहिजे आणि तो आपलाच असला पाहिजे, अशी तीव्र स्पर्धा. त्यातून मांजे धारदार होत जातात आणि ते आकाशावर ज्यांचा पहिला अधिकार, त्या पक्ष्यांच्या जिवावर बेततात.
 
उत्तरायणात आकाशात ही घमासान लढाई सुरू असते, तेव्हा जमिनीवर वेगळीच इंटरेस्टिंग लढाई सुरू असते. आकाशातल्या पतंगांच्या लढाईप्रमाणेच ही लढाईही अहिंसेच्या पुजा-यांमधली असल्यामुळे त्यात प्रत्यक्ष हिंसा घडत नाही. उलट हिंस्त्र मांजाने जखमी केलेल्या पक्ष्यांची सेवाशुश्रुषाच केली जाते. ठिकठिकाणची जैन मंडळं- हीसुद्धा गुजरातीबहुल भागातच जास्त असतात- उत्तरायणाच्या आधीपासूनच पतंगबाजीच्या विरोधात लोकजागृती सुरू करतात. ठिकठिकाणी फलक लागतात, शाळकरी मुलांच्या प्रभातफे-या निघतात- यातील किती मुलं स्वत: पतंग उडवत नाहीत, हे तपासलं पाहिजे- हॅंडबिलं वाटली जातात आणि प्रत्यक्ष संक्रांतीला जखमी पशुपक्ष्यांवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी स्टॉलही लावले जातात.
 
एरवी एकमेकांच्या सोबतीने राहणारे हे दोन समाज. उभयतांचा शाकाहाराग्रह म्हणजेच पर्यायाने अहिंसाग्रह इतका पराकोटीचा की आपल्या इमारतीत आपल्या नव्हे, शेजारच्या घरात अंडंही शिजलेलं त्यांना चालत नाही. आपल्या नव्या इमारतीबाहेरचा परंपरागत कोळीवाडाही असह्य दुर्गंधीमुळे नकोसा होतो. सजीवाची हत्या करण्याचं घोर पातक करणा-या आणि त्याचं मांस चवीचवीनं भक्षण करणा-या नराधमांना आपल्या सोसायटीत थाराही द्यायचा नाही, असा यांचा संयुक्त बाणा असतो. असे वर्षभर एकमेकांच्या सोबतीनेच राहणारे हे दोन समाज एकमेकांच्या समोर उभे ठाकतात ते फक्त हे दोनच दिवस. एकमेकांमध्ये कुठेही हिंसा घडणार नाही, थेट संघर्ष होणार नाही, अशा बेतानं. पाण्यावर काठी मारल्यानंतर क्षणभर विभागणीची रेषा दिसावी, तितक्याच सौम्य अहिंसक पद्धतीनं.
साहजिक आहे. काही दुर्मीळ आणि संरक्षित करकोचांपेक्षा अधिक महत्वाचा असतो, तो दोन समाजांमधला निरंतर बंधुभाव, निखळ स्नेहभाव..
 ..खेळाच्या गंमतीत काही करकोचे मरतही असतील, पण, ते काही खाण्यासाठी मारलेजात नाहीत, म्हणजे ती काही हिंसा नाही.

Monday, January 16, 2012

मॅरेथॉन अनछापणेबल!

या या पोटावळे पत्रकार, या’’ साहेबांनी कार्यकारी संपादकांचं दिलखुलास स्वागत केलं, ‘‘काय पेड न्यूजसाठी आलात वाटतं? 
साहेब चष्मा न लावताच बसलेत की काय, का. सं. च्या मनात शंका आली.
 
‘‘साहेब, मी आलोय.. मॅरेथॉन मुलाखत घ्यायला..’’ का.सं.ना आवाजातली एरवीची गुर्मी लपवून मवाळ स्वर लावताना त्रास होत होता.
 
‘‘पाहिलं हो मी तुम्हाला. डोळे फुटलेले नाहीत माझे.. आई जगदंबेच्या कृपेने अजून सगळं लख्ख दिसतं!’’ हे एक बरं आहे इथे. जे काही घडतं ते आई जगदंबेच्या कृपेनं, का.सं.च्या मनात विचार आला, म्हणूनच गाव तिथं क्लास काढलेल्या सरांनी रोजनिशी प्रकाशित केली. तेव्हा तिच्यात आई जगदंबेच्या कृपेनं सकाळी जाग आली आणि शि.से.प्रं.च्या कृपेनं दात घासले, असं स्तवन होतं. (त्यात चुकीचं काही नव्हतं म्हणा, शिसेप्रंची अवकृपा झाली असती तर घासायला दात शिल्लक राहिले असते का?)
 
का.सं.च्या मनात हे विचारचक्र सुरू असताना तिकडे साहेब आणखी फॉर्मात येत होते, ‘‘आई भवानीच्या कृपेनं उद्या नजर कमी झाली, तर माझ्या एकेका सैनिकाचे दोन डोळे (चष्मेवाला असेल, तर चार,’ का.सं.ची जोड) असे लाखो डोळे मला दृष्टी देतील. मी त्यांच्या डोळ्यांनी जग बघेन.’’ (‘त्यांच्या हातांनी शत्रूला कानफटवेन, त्यांच्या पायांनी तुडवेन. सगळं काही त्यांच्यानं करवून घेईन. आम्ही आपले नामानिराळे.ही का.सं.ची मनातल्या मनात जोड.)
 आता न राहवून का.सं. पुढे झाले आणि म्हणाले, ‘‘साहेब, आपण तीर्थावर नाहीत, घरातल्या सोफ्यावर आहात. समोर विशाल जनसागर नाही. तेव्हा भाषण आवरा.’’
‘‘अरे गधडय़ा, मी मुलाखत देण्यासाठी माझे विचार तापवतोय. गायक कसं गाणं सुरू करण्याआधी आवाज तापवतात तसं.’’
 
त्या मानानं बरीच मवाळ उपमा सुचली साहेबांना, का.सं.च्या मनात विचार आला आणि ते म्हणाले, ‘‘छान छान. ते मघाचं पोटावळे पत्रकार, पेड न्यूज वगैरेही विचार तापवण्यातलंच होतं का?’’
 
‘‘छे छे, ते सगळं खरं होतं,’’ साहेब गर्जले, ‘‘आम्ही सगळ्याच पत्रकारांना पोटावळे मानतो. तुम्ही तर पगारी कार्यकारी संपादकाबरोबर पगारी नेतेसुद्धा होऊन बसलायत आमच्या पक्षाचे.’’
 आई जगदंबेच्या कृपेनं,’ का.सं. मनातल्या मनात पुटपुटले आणि प्रत्यक्षात मात्र आपले आशीर्वाद आहेत, साहेब’, असं साहेबांच्या कानात गुणगुणले.
‘‘कसले बोडक्याचे आशीर्वाद? मजबुरी आहे मजबुरी. सगळे कार्यकारी कामाचे असते, तर तुमच्यासारख्यांना नेते बनवण्याची वेळ आली असती का आमच्यावर?’’ आता मनातल्या मनात पुटपुटण्याची पाळी साहेबांची होती. प्रत्यक्षात ते म्हणाले, ‘‘एवढं करूनही तुम्ही पेपर चालवण्यासाठीही मलाच कामाला लावता. घ्या चार हप्त्यांत मॅरेथॉन मुलाखत. तुम्ही खूष नि ती चॅनेलची डबडी खूष. आजचा सवाल आजचा सवाल म्हणून हात हलवत, घसा खरवडून नाचायला, रेकायला मिळणार म्हणून सगळी वटवागळं खूष.’’
 
‘‘पण, साहेब, तुमची मुलाखत असतेच तशी दमदार.’’
 
‘‘हो, अरे पण असा दम तुमच्यात कधी येणार? अजून टणक असलो तरी वय झालंय माझं! रिटायर होऊद्यात की मला सुखानं. गलितगात्र झालो, हॉस्पिटलात गेलो, व्हीलचेअरवर बसलो, तरी मलाच नाचवताय जिथंतिथं. तो कार्यकारी अध्यक्ष नेमलायत ना, तो काय करतो?’’
 
‘‘फोटो काढतो.. छान काढतो.. आय मीन काढतात.. आणि साहेब, तुम्हीच नेमलंयत त्यांना.’’
 
इथं साहेब कपाळाला हात लावून काहीतरी अगम्य असं तोंडातल्या तोंडात पुटपुटतात. ते गम्य असतं तरी आपल्या पेपरातसुद्धा छापण्यायोग्य भाषेतलं नसणार याची का.सं.ला खात्री असल्यानं ते टिपून घेण्याच्या फंदात पडत नाहीत. ‘‘करूयात ना मुलाखतीला सुरुवात? हवा कशी आहे?’’
 
‘‘थंडगार आहे. येत्या निवडणुकांची ही शिरशिरी आहे. हवा आहे आणि तिच्यात श्वासोच्छ्वास करता येतोय, हेच पुष्कळ असं म्हणायची पाळी येणार आहे.’’
 
का.सं. वासतात.
 
‘‘तुमची तब्येत कशी आहे?’’
 
‘‘मस्त. ठणठणीत. तुमच्यासारखे आणि तुमच्या त्या कार्याध्यक्षासारखे ऐदी सोदे पोसायचे म्हणजे मला झक मारत ठणठणीत राहावंच लागणार.’’
 
‘‘आगामी निवडणुकांबद्दल काय वाटतं?’’
 
‘‘वाट लागणार. पुरती वाट लागणार. लोकांना किती काळ उल्लू बनवणार? किती दिवस बोलबच्चन देणार? काहीतरी कामं नकोत का करून दाखवायला? इथं जो तो नुसता खा खा खातोय? आता पुढची पाच र्वष हवाबाण हरडे खाऊन हवाबाण सोडत फिरा म्हणावं.’’
 
‘‘अहो साहेब, हे काय बोलताय तुम्ही?’’
 
‘‘मुलाखत घेतोयस ना माझी?’’
 
‘‘ही मुलाखत छापायची?’’
 ‘‘काय डोस्कं आउट झालंय का काय तुझं?’’ साहेब  पुन्हा अगम्य-पण गम्य असतं तरी अनछापणेबलअसं काहीतरी पुटपुटतात, ‘‘अरे, आतापर्यंत हज्जार वेळा मुलाखती दिल्यात तुला. त्यांच्या फायली उघड आणि चार भाग तयार कर. याची हजामत, त्याची भलामण, आई भवानी, आई जगदंबा, मराठी माणूस, सुंता, दंगलीत आम्हीच वाचवलं, आता सत्ता गेली तर मुंबई महाराष्ट्रातून तुटली म्हणून समजा, बाकी याला टपल्या, त्याला टिचक्या, थोडे डबल मीनिंग विनोद असा सगळा मालमसाला टाकून करून टाक हवे तेवढे भाग. आणि आता भाग भाग भाग डी. के. बोस, भाग!

-अनंत फंदी 

(चित्र : प्रदीप म्हापसेकर)

(प्रहार, १५ जानेवारी, २०१२)

Friday, January 13, 2012

कर्नाटकातले ‘तमस’नाटय़

भीष्म साहनींच्या ‘तमस’वर आधारित मालिका दूरदर्शनवर प्रसारित झाली त्या काळात फार मोठा गदारोळ झाला होता. विविध राजकीय, धार्मिक संघटनांनी तिला तीव्र विरोध दर्शवला होता. खटलेबाजी झाली होती. भारत-पाकिस्तान फाळणीवर आधारित ‘तमस’मध्ये धार्मिक भावना भडकावण्याचे भयंकर राजकारण कसे चालते, याचे विदारक दर्शन होते. त्यामुळे हाच मुख्य धंदा असलेल्या राजकीय-धार्मिक संघटनांचे पित्त खवळले होते. ‘तमस’मध्ये दाखविलेले चित्र अतिरंजित आणि कपोलकल्पित आहे, असा त्यांचा दावा होता. आपल्या धर्माचे लोक असा खोटेपणा करूच शकणार नाहीत, हे विपर्यस्त चित्रण आहे, असे धर्ममरतड उच्चरवाने सांगत होते.
 
‘तमस’ किती खरी होती आणि धर्मभावना चेतवण्याचे राजकारण किती किळसवाण्या स्तराला जाऊ शकते, याचे दर्शन सध्या कर्नाटकामध्ये घडते आहे. तेथे भारतीय जनता पक्षाची राजवट आहे. या पक्षाची राजवट म्हणजे ‘मिनी हिंदुराष्ट्र’ आणि ‘डुप्लिकेट रामराज्य’ मानण्याची तथाकथित विचारवंतांमध्येही फॅशन आली आहे. काँग्रेसचलित राज्यांपेक्षा भाजपशासित राज्यांनी विकासाच्या बाबतीत आघाडी घेतली आहे, हे मान्यच करायला हवे, असा त्यांचा सूर असतो. या राज्यांमध्ये जगण्याच्या अन्य संदर्भात काय घडते आहे, हे जणू पाहण्याची गरजच नाही. तिकडे मध्य प्रदेशात सगळय़ा राज्यातल्या विद्यार्थ्यांना एकसमयावच्छेदेकरून सूर्यनमस्कार घालायला लावून गिनीज बुकात जाण्याचे उपद्व्याप सुरू आहेत. इकडे कर्नाटकात भीष्म साहनींनाही सुचला नसता असा चित्तथरारक प्लॉट रचून पाकिस्तानी ध्वज फडकावण्याची कारस्थानं सुरू आहेत.
 
ही घटना शिंदगीची. एक जानेवारी रोजीची नववर्षाची पहिली पहाट तिथे उजाडली तीच तहसीलदार कार्यालयासमोर पाकिस्तानचा चाँदतारा फडकावत. आदल्या दिवशी सगळे नववर्षस्वागताच्या नशेत तर्र असताना समाजकंटकांनी हे ध्वजारोहण उरकून घेतले होते. झाले, नववर्षाचा पहिला दिवस तणाव घेऊन आला. कर्नाटकात भोचक ‘सनातन’गिरी करणा-या ‘पिंक पँटीज’फेम श्रीराम सेने नामक प्रखर हिंदुत्ववादी संघटनेच्या हातात आयते कोलितच मिळाले. या सेनेचा स्थानिक पदाधिकारी राकेश मठ याने लगेच तहसीलदार कार्यालयासमोर निषेध सभा घेतली. ‘देशद्रोही, गद्दार, पाकधार्जिण्या, मस्तवाल मुस्लिमां’नीच हे नीच कृत्य केले आहे, असा निकाल त्याने दिला आणि मग रीतसर रस्ते रोखून, राज्य परिवहन मंडळाच्या बसगाडय़ांवर दगडफेक करून पुढील दंगलकार्याचा शुभारंभ करण्यात आला.
 
त्यांच्या दुर्दैवाने भाजपचे सरकार असतानाही स्थानिक पोलिसांनी मात्र या विध्वंसनाटय़ाचे मूक प्रेक्षक होणं टाळलं आणि तातडीने कायदा-सुव्यवस्था स्थिती सुरळीत केली. मोर्चे, सभा, निषेधपर कार्यक्रम आणि धरणे आंदोलने वगैरे नाटकांवर बंदी घातली आणि खास पथक नेमून या घटनेचा सखोल तपास सुरू केला. या तपासात उघड झालेली माहिती धक्कादायक होती. ज्या राकेश मठ याने पाकिस्तानी ध्वजारोहणाच्या निषेधाचे आकांडतांडव सुरू केले होते, तो आणि त्याचे धर्माध साथीदार यांनीच पाकिस्तानी ध्वज फडकावण्याचे थोर कार्य केले होते. आपणच पाकिस्तानी ध्वज फडकवायचा, त्याचा आळ मुस्लिमांवर ढकलायचा आणि दंगल भडकवायची, असा या मर्कटसेनेचा डाव होता. तो त्यातून दंगल घडून आली की तिचा राजकीय वापर करून घ्यायचा, अशी ही योजना होती.
 
ती पोलिसांनी उधळली आणि दंगलीचे थंड डोक्याने पूर्वनियोजन करणाऱ्या सातजणांना ताब्यात घेतलं. यानंतर घडलेलं नाटय़ आणखी रोमहर्षक आहे. प्रखर हिंदवी बाण्याच्या या सैनिकांनी आपण केलेल्या दुष्कृत्याची जबाबदारी खरंतर ताठ मानेनं आणि अभिमानानं घ्यायला हवी होती. त्यांच्यासाठी ते महान धर्मकार्य होतं. पण, प्रत्यक्षात त्यांचं कट्टर हिंदुत्वाचं अवसान पोलिसी खाक्या अनुभवताच गळून पडलं आणि ‘ते आम्ही नव्हेतच’ असा टाहो त्यांनी फोडला. श्रीराम सेनेच्या विजापूर जिल्हा शाखेनं पत्रकार परिषद घेऊन हा कट राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं रचल्याचा आरोप केला. राज्यात सरकार भाजपचं. रा. स्व. संघ ही भाजपची मातृसंघटना. त्या संघटनेवर कारवाई करणं पोलिसांना शक्य नव्हतं म्हणून त्यांनी आपल्या निरपराध कार्यकर्त्यांना त्यात गोवलं, असा दावा या पत्रकार परिषदेत करण्यात आला. पुराव्यादाखल काही फोटोही वाटण्यात आले. संघाचा ‘स’सुद्धा तपासात उघड होता कामा नये, असा दबाव पोलिसांवर होता, असं श्रीराम सेनेचं म्हणणं आहे.
 
पोलिस मात्र वेगळीच कथा सांगतायत. जिल्ह्यातलं धार्मिक वातावरण ढवळून निघावं, कलुषित व्हावं आणि त्यातून धर्माच्या आधारावर मतदारांचं धृवीकरण करता यावं यासाठी स्थानिक आमदारानंच हा कट रचला होता, असा पोलिसांचा दावा आहे. हा आमदार भाजपचा आहे, हे सांगायला नकोच. भाजप-संघ-श्रीराम सेने या सगळय़ांमधलं जैविक नातं पाहता, हे सगळं कारस्थान एकदिलानं, संगनमतानं पार पाडलं गेलं असणार, याबद्दलही शंका नाही.
 
आपल्याच धर्माची विटंबना करून चिथावणी देणारे पुढारी, शहरात दंगल पेटवून तिचा राजकीय उपयोग करून घेणारे लोकप्रतिनिधी, धर्म आणि श्रद्धांचे बाजार मांडणा-या संघटना घेट्टो मानसिकता रुजवतात, मुरवतात. त्यातून आपल्या परिसराचं आणि पर्यावरणाचं एकरेषीय आणि एकमितीय सोपं आकलन करून घेण्याची घातक सवय लागते आणि हळुहळू आपल्या भावना-श्रद्धा फिल्मी आणि सदादुख-या हुळहुळय़ा होत जातात. मग कोणाही फुटकळ पुढा-यानं अवमान, अवमान म्हणून कांगावा करून अन्य समाजाकडे बोट दाखवलं की मागचापुढचा विचार न करता सामान्य माणूस वेडापिसा होऊन आपल्यासारख्याच दुस-या सामान्य माणसावर तुटून पडतो. ओळखदेख नसताना, त्याचा अपराध ठाऊक नसताना थेट त्याचा कोथळा काढण्याइतका किंवा उभा जाळण्याइतका नृशंस बनून जातो. हा सगळा बनावच होता, हे समजल्यानंतर पश्चात्तापदग्ध होऊन उपयोग काय? हा खेळ कधीतरी थांबायला हवा.
 
या सगळय़ा कथा-कादंब-या-चित्रपटांमधल्या अतिशयोक्त व्यक्तिरेखा वाटतात. पण, त्या प्रत्यक्षात कशा अवतरतात आणि आपल्या आसपास कशा साळसूदपणे वावरतात, याचं शहारा आणणारं दर्शन शिंदगीवासीयांना झालं असेल. धर्म आणि कर्म यांची किती गल्लत करायची आणि साप साप म्हणून भुई धोपटणा-या पुढा-यांच्या किती मागे जायचं, याचा धडा विजापूरचे मतदार आता शिकले असतील, अशी आशा करायला हरकत नाही.
 श्रीराम सेनेच्या गणंगांना विजापूर जिल्हा कारागृहातल्या कैद्यांनीच हा धडा शिकवला. राकेश मठ आणि त्याच्या सहा साथीदारांनी देशद्रोही कारवाया केल्या म्हणून या तुरुंगातल्या काही कैद्यांनीच या सातजणांना बेदम चोपून काढलं. शेवटची बातमी हाती आली तेव्हा या सातजणांची रवानगी बळ्ळारीच्या कारागृहात करण्यात आली होती.

(चित्र : प्रदीप म्हापसेकर)
(ताजा कलम, प्रहार, १३ जानेवारी, २०१२)

Sunday, January 8, 2012

हातात हात, जिवात जीव

या या या,’’ बाळकाकांनी तोंडभरून स्वागत केलं. 
‘‘कशी काय तब्येत?’’ शरदकाकांनी चपला काढता काढता विचारलं.
 
‘‘तब्येतीला काय धाड भरलीये? तुमच्याशी भेट व्हावी म्हणून..’’ बाळकाकांनी डोळे मिचकावले.
 
‘‘घ्या. म्हणजे भेटायचंय तुम्हाला, काम तुमचं आणि यायचं आम्हीच.’’
 
‘‘काय करणार? आमची बाणेदार इमेज आडवी येते. आम्ही उठून कुणाच्या दारात जात नाही.’’
 
‘‘हं.. खरं आहे,’’ सुस्कारा सोडून लोडाला टेकत शरदकाका म्हणाले, ‘‘आमच्या घरी कांदे चिरायलाही खंजीर वापरतात अशी आमचीही इमेज आहेच ना?’’
 
‘‘म्हणजे काय? तुम्ही तर दाढी करायलाही वस्तरा वापरत नाही, खंजीरच वापरता अशी माझीसुद्धा समजूत होती!’’ बाळकाकांनी टाळीसाठी हात पुढे केला.
 
टाळी देऊन शरदकाका म्हणाले, ‘‘बोला, काय काम काढलंत?’’
 
‘‘काम म्हणजे.. नेहमीचंच.. जरा लेकराला सांभाळून घ्या,’’ बाळकाकांच्या धारदार वाणीलाही जरा मृदुता आली होती.
 
‘‘सांभाळून घेतोच आहोत की.. तुमच्यासारखेच नकलांचे आणि शाब्दिक कोटय़ांचे झकास फड रंगवतोय गडी.’’
 
‘‘त्याचं नाव काढू नका हो.. आम्ही त्याच्याबद्दल बोलत नाही आहोत,’’ बाळकाका कडाडले, दोन क्षणांत पुन्हा मृदू झाले आणि म्हणाले, ‘‘मी आमच्या वेडय़ाबागडय़ा लेकराबद्दल बोलत होतो.’’
 
‘‘त्याचं काय? त्याला तुम्हीच दिलीय की मुंबईची जहागिरी? आम्ही कुठे त्याच्या आड येतो?’’ शरदकाका साळसूदपणे म्हणाले.
 
‘‘ते बरोबर आहे. पण आता तुम्ही हातात हात मिळवायला निघालायत अशी चर्चा आहे.’’
 
‘‘अहो, हातात हात तर केव्हापासून अडकलाय आमचा. आता गुंफलायअसं म्हणावं लागतं लोकलाजेखातर. आणि खरं सांगायचा तर आमच्या घडय़ाळाला चावी द्यायलाही हातच हवा. घडय़ाळाशिवाय हाताला शोभा नाही तसा हाताशिवाय घडय़ाळालाही वाली नाही. तुम्ही एवढे हातमिळवणीबद्दल का भावुक होताय? कधीकाळी याच हाताने तुमच्या धनुष्याला बाण लावलाय, प्रत्यंचा खेचलीये..’’
 
‘‘नका नका त्या दिवसांच्या आठवणी काढू..’’ बाळकाकांनी चष्म्याची काच पुसली आणि त्या मिषाने डोळेही टिपले, ‘‘तेव्हा त्यात तुमचाही हात होता म्हणून आम्ही आमची आयुधं विश्वासानं सोपवली. आता आम्हाला चांगलाच हात दाखवून निघालेले तिकडच्या छावणीत आहेत. आमचं लेकरू तर अजूनही त्या आठवणीनं ओय ओयम्हणून ओरडत गाल चोळत दचकून उठतं रात्रीबेरात्री.’’
 
‘‘मग आता काय म्हणणं आहे तुमचं?’’
 
‘‘काय असणार? लेकराला सांभाळून घ्या. फोटो काढून आणि पुस्तकं फुकट वाटून का पोटं भरणार आहेत? हल्ली तर मोबाइलवर पोरंटोरंही फोटो काढतात खटाखट.
हेलिकॉप्टरची फेरीही इतकी स्वस्त झालीये की लोक एका दिवसात शिर्डीला जाऊन येतात फुरफुरत. जरा नातू हाताशी येईपर्यंत सांभाळून घ्या.’’
 
‘‘काय म्हणालात, नातू हाताशीयेईपर्यंत?..’’
 
‘‘काय शरदबाबू, इथे चाललंय काय आणि तुम्हाला विनोद सुचतायत. तिकडे त्या झेरॉक्स कॉपीनं झोप उडवलीये पार लेकराची, त्यात टग्या दादाची भर.
 
‘‘अहो, पण मग लाडक्या लेकरालाही सांगा की जरा समजावून. उगाच ह्याला त्याला डिवचत असतो. आमचं ठीक आहे. पण, टग्या दादाचं काम वेगळं आहे. एक घाव दोन तुकडे.’’
 
‘‘ते बरोबर आहे तुमचं. आता आमच्या घराण्यातल्या कोणाच्याहीसमोर माइकचं बोंडूक आलं की आम्हाला किती चेव चढतो, हे तुम्हाला ठाऊक आहेच. तशी थोडी जीभ घसरली असेल म्हणून डोक्यात राख घालून घेऊन थेट हातात हात घालायला निघणं काही बरोबर नाही.’’
 
शरदकाका गालातल्या गालात हसून म्हणाले, ‘‘इतकी वर्ष राजकारण खेळलात पण अभ्यासू वृत्ती नसल्यामुळे खोलात उतरला नाहीत. अहो, हातात हात काय फक्त प्रेमानंच घेतला जातो का? हात पिरगाळायचा, मुरगाळायचा असला तरी तो आधी हातात घ्यावा लागतो. कधी फटका वर्मी बसू नये, म्हणून हात हातात घ्यावा लागतो.’’
 
आता बाळकाकांच्या चेह-यावर सुटका झाल्याची भावना उमटली. ‘‘आता जरा माझ्या जिवात जीव आला. तुम्हाला इतकी वर्ष मी ओळखतोय पण तरीही काहीतरी नवं कळतंच प्रत्येक भेटीत.’’
 ‘‘तुमचं सोडा, आमची हीपण हेच म्हणते,’’ असं म्हणताना शरदकाकांनी खो खो हसता हसता आपलेही हात सहजगता हातात घेतले आहेत, हे बाळकाकांच्या लक्षातही आलं नाही.

-अनंत फंदी

(प्रहार, ८ जानेवारी, २०१२)