Sunday, January 8, 2012

हातात हात, जिवात जीव

या या या,’’ बाळकाकांनी तोंडभरून स्वागत केलं. 
‘‘कशी काय तब्येत?’’ शरदकाकांनी चपला काढता काढता विचारलं.
 
‘‘तब्येतीला काय धाड भरलीये? तुमच्याशी भेट व्हावी म्हणून..’’ बाळकाकांनी डोळे मिचकावले.
 
‘‘घ्या. म्हणजे भेटायचंय तुम्हाला, काम तुमचं आणि यायचं आम्हीच.’’
 
‘‘काय करणार? आमची बाणेदार इमेज आडवी येते. आम्ही उठून कुणाच्या दारात जात नाही.’’
 
‘‘हं.. खरं आहे,’’ सुस्कारा सोडून लोडाला टेकत शरदकाका म्हणाले, ‘‘आमच्या घरी कांदे चिरायलाही खंजीर वापरतात अशी आमचीही इमेज आहेच ना?’’
 
‘‘म्हणजे काय? तुम्ही तर दाढी करायलाही वस्तरा वापरत नाही, खंजीरच वापरता अशी माझीसुद्धा समजूत होती!’’ बाळकाकांनी टाळीसाठी हात पुढे केला.
 
टाळी देऊन शरदकाका म्हणाले, ‘‘बोला, काय काम काढलंत?’’
 
‘‘काम म्हणजे.. नेहमीचंच.. जरा लेकराला सांभाळून घ्या,’’ बाळकाकांच्या धारदार वाणीलाही जरा मृदुता आली होती.
 
‘‘सांभाळून घेतोच आहोत की.. तुमच्यासारखेच नकलांचे आणि शाब्दिक कोटय़ांचे झकास फड रंगवतोय गडी.’’
 
‘‘त्याचं नाव काढू नका हो.. आम्ही त्याच्याबद्दल बोलत नाही आहोत,’’ बाळकाका कडाडले, दोन क्षणांत पुन्हा मृदू झाले आणि म्हणाले, ‘‘मी आमच्या वेडय़ाबागडय़ा लेकराबद्दल बोलत होतो.’’
 
‘‘त्याचं काय? त्याला तुम्हीच दिलीय की मुंबईची जहागिरी? आम्ही कुठे त्याच्या आड येतो?’’ शरदकाका साळसूदपणे म्हणाले.
 
‘‘ते बरोबर आहे. पण आता तुम्ही हातात हात मिळवायला निघालायत अशी चर्चा आहे.’’
 
‘‘अहो, हातात हात तर केव्हापासून अडकलाय आमचा. आता गुंफलायअसं म्हणावं लागतं लोकलाजेखातर. आणि खरं सांगायचा तर आमच्या घडय़ाळाला चावी द्यायलाही हातच हवा. घडय़ाळाशिवाय हाताला शोभा नाही तसा हाताशिवाय घडय़ाळालाही वाली नाही. तुम्ही एवढे हातमिळवणीबद्दल का भावुक होताय? कधीकाळी याच हाताने तुमच्या धनुष्याला बाण लावलाय, प्रत्यंचा खेचलीये..’’
 
‘‘नका नका त्या दिवसांच्या आठवणी काढू..’’ बाळकाकांनी चष्म्याची काच पुसली आणि त्या मिषाने डोळेही टिपले, ‘‘तेव्हा त्यात तुमचाही हात होता म्हणून आम्ही आमची आयुधं विश्वासानं सोपवली. आता आम्हाला चांगलाच हात दाखवून निघालेले तिकडच्या छावणीत आहेत. आमचं लेकरू तर अजूनही त्या आठवणीनं ओय ओयम्हणून ओरडत गाल चोळत दचकून उठतं रात्रीबेरात्री.’’
 
‘‘मग आता काय म्हणणं आहे तुमचं?’’
 
‘‘काय असणार? लेकराला सांभाळून घ्या. फोटो काढून आणि पुस्तकं फुकट वाटून का पोटं भरणार आहेत? हल्ली तर मोबाइलवर पोरंटोरंही फोटो काढतात खटाखट.
हेलिकॉप्टरची फेरीही इतकी स्वस्त झालीये की लोक एका दिवसात शिर्डीला जाऊन येतात फुरफुरत. जरा नातू हाताशी येईपर्यंत सांभाळून घ्या.’’
 
‘‘काय म्हणालात, नातू हाताशीयेईपर्यंत?..’’
 
‘‘काय शरदबाबू, इथे चाललंय काय आणि तुम्हाला विनोद सुचतायत. तिकडे त्या झेरॉक्स कॉपीनं झोप उडवलीये पार लेकराची, त्यात टग्या दादाची भर.
 
‘‘अहो, पण मग लाडक्या लेकरालाही सांगा की जरा समजावून. उगाच ह्याला त्याला डिवचत असतो. आमचं ठीक आहे. पण, टग्या दादाचं काम वेगळं आहे. एक घाव दोन तुकडे.’’
 
‘‘ते बरोबर आहे तुमचं. आता आमच्या घराण्यातल्या कोणाच्याहीसमोर माइकचं बोंडूक आलं की आम्हाला किती चेव चढतो, हे तुम्हाला ठाऊक आहेच. तशी थोडी जीभ घसरली असेल म्हणून डोक्यात राख घालून घेऊन थेट हातात हात घालायला निघणं काही बरोबर नाही.’’
 
शरदकाका गालातल्या गालात हसून म्हणाले, ‘‘इतकी वर्ष राजकारण खेळलात पण अभ्यासू वृत्ती नसल्यामुळे खोलात उतरला नाहीत. अहो, हातात हात काय फक्त प्रेमानंच घेतला जातो का? हात पिरगाळायचा, मुरगाळायचा असला तरी तो आधी हातात घ्यावा लागतो. कधी फटका वर्मी बसू नये, म्हणून हात हातात घ्यावा लागतो.’’
 
आता बाळकाकांच्या चेह-यावर सुटका झाल्याची भावना उमटली. ‘‘आता जरा माझ्या जिवात जीव आला. तुम्हाला इतकी वर्ष मी ओळखतोय पण तरीही काहीतरी नवं कळतंच प्रत्येक भेटीत.’’
 ‘‘तुमचं सोडा, आमची हीपण हेच म्हणते,’’ असं म्हणताना शरदकाकांनी खो खो हसता हसता आपलेही हात सहजगता हातात घेतले आहेत, हे बाळकाकांच्या लक्षातही आलं नाही.

-अनंत फंदी

(प्रहार, ८ जानेवारी, २०१२)

No comments:

Post a Comment