अण्णा हजारे यांच्या आंदोलनाबद्दल अनेक मतमतांतरं आहेत..
आपण म्हणू तेच मान्य करा, नाहीतर प्राणांतिक उपोषण करतो, हा त्यांचा खाक्या अनेकांना मान्य नाही.
त्यांचा जनलोकपाल हा कल्याणकारी हुकूमशाहीचाच आविष्कार असल्यामुळे लोकप्रतिनिधित्व आणि संसदीय लोकशाही प्रमाण मानणा-यांना तो मान्य नाही.
अण्णा हजारे यांच्या आसपास गोळा झालेल्या गणंगांचा नैतिक श्रेष्ठत्वाचा दर्प तर अण्णांच्या चाहत्यांना आणि समर्थकांनाही मान्य नाही.
एक गोष्ट मात्र सर्वाना मान्य आहे.
भ्रष्टाचार हा या देशासमोरचा सर्वात मोठा प्रश्न आणि या देशातल्या सामान्यजनांच्या विकासामधला सर्वात मोठा अडथळा आहे, हे अण्णांनी देशाच्या अजेंडय़ावर आणलं. फार मागे नाही, फक्त सहा महिने मागे जाऊन पाहा. त्या काळात भ्रष्टाचार या विषयावर सामान्य माणसांमध्ये कधी साधी चर्चाही होत नव्हती. तो आपल्या जगण्याचा एक भाग आहे, म्हणून स्वीकारला गेला होता. भ्रष्टाचार हाच शिष्टाचार आहे, असंच लोक मानत होते.
लोकांच्या मनात भ्रष्टाचाराविरुद्ध खूप खदखद होती आणि ती अण्णांच्या आंदोलनाने बाहेर पडली, म्हणावं, तर या खदखदीचं कोणतंही चिन्ह या देशात आधी कसं दिसलं नाही? स्वातंत्र्योत्तर दोन-तीन दशकांमध्ये भ्रष्टाचारी नेते, लाचखोर अधिकारी यांच्याविषयी समाजात चीड होती. प्रामाणिकपणा, सचोटी या गुणांचं मोल होतं. लाचखोर माणसाविषयी समाजात उघड-छुपी घृणा होती. आणीबाणीनंतरच्या काळात मात्र हळूहळू भ्रष्टाचारी माणसं सुस्थापित होत गेली आणि समाजमान्य झाली. एखाद्या नेत्याचे अनुयायी ‘एका टर्ममध्ये सायबानं 15 पेटय़ा छापल्या’ असं कौतुकानं सांगून त्या पेटीतला एखादा खोका आपल्या वाटय़ाला कसा येईल, याचं जुगाड जमवू लागले. अशा नेत्यांबद्दल समाजात अतिव आकर्षण असतं आणि त्याच्या आशीर्वादानं आपल्यालाही अशाच प्रकारे पेटय़ा कमावण्याचा मार्ग सापडावा, अशी लोकांची प्रामाणिक इच्छा असते. नव-या मुलाला सरकारी नोकरी आहे आणि वरकमाईची संधी असलेलं पोस्टिंग आहे, हे वरपिते अभिमानानं सांगू लागले.
कोणत्याही सरकारी कार्यालयात रांग न लावता कामं करून देणा-या ‘एजंटां’चा राबता याच काळात उघडपणे होऊ लागला. ही सगळी इथली ‘सिस्टम’ आहे, ती पाळावीच लागते, कसंही करून काम होणं महत्त्वाचं असं सगळा देश मानू लागला. एखादा नेता-अधिकारी भ्रष्ट आहे, यापेक्षा तो किती कार्यक्षम आहे, हे अधिक महत्त्वाचं मानलं जाऊ लागलं. ही सिस्टम बनू देणा-या, तिचा विनातक्रार भाग बनणा-या, तिचे निर्लज्ज लाभार्थी बनून तिला पोसणा-या सगळ्या माणसांना अचानक भ्रष्टाचार वाईट आहे, याचा शोध कसा लागला, हाच एक संशोधनाचा विषय आहे.
उदाहरणार्थ, दिल्लीतल्या व्यापा-यांनी अण्णांच्या समर्थनार्थ बंद पाळला..
बरोबर आहे. या व्यापा-यांना भ्रष्टाचाराचा फार त्रास होतो. जकात चुकवताना, ऑक्ट्रॉय बुडवताना पैसे चारावे लागतात, वेगवेगळ्या टॅक्सेसचा ससेमिरा चतुराईनं टाळताना अधिका-यांचे हात ओले करावे लागतात. कोणताही कायदेशीर कर भरण्यापेक्षा तो चुकवण्याकडेच त्यांचा कल असल्यानं या ‘सविनय कायदेभंगां’कडे कानाडोळा व्हावा, यासाठी त्यांना जागोजाग पैसे मोजावे लागतात. ते मग शेतक-यांना नाडून आणि गि-हाईकांना लुबाडून उभे करावे लागतात. यात शेवटी नुकसान आम जनतेचंच होतं. त्यामुळे त्यांनाही भ्रष्टाचारविरोधी लढाईत सामील व्हावंसं वाटतं. सगळे कर रद्द करावेत आणि व्यापा-यांना हवा तेवढा नफा कमावू द्यावा, असा त्यांच्या मनातल्या भ्रष्टाचारविरोधी लढय़ाचा ‘अर्थ’ आहे.
मध्यंतरी एक दिवस मुंबईतल्या लोकलगाडय़ांच्या शेफारलेल्या आणि स्टंटबाज मोटरमन मंडळींनी ‘मी अण्णा हजारे आहे’ असं लिहिलेल्या टोप्या घालून रेल्वे प्रशासनाविरुद्ध एक छोटंसं बंड करून दाखवलं. या दिखाऊगिरीमुळे सामान्य प्रवाशांच्या मनात आपल्याविषयी प्रेमभाव नाही, तरी किमान आत्मीयता निर्माण होईल, अशी त्यांची अपेक्षा असावी. एक अपघात घडवून हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात घालणा-या आपल्या एका व्यवसायबंधूचं निलंबन टाळण्यासाठी हे महानुभाव आंदोलन करणार आणि वर अण्णा हजारेंच्या आंदोलनाला पाठिंबा देणार!!! आपली व्यावसायिक जबाबदारी प्रामाणिकपणे पार न पाडणं हेही भ्रष्ट वर्तन आहे, हेच या मंडळींना मान्य नाही- मग सार्वजनिक सेवेत असणा-यांनी जो अंगी बाणवलाच पाहिजे, त्या सेवाभावाचं तर नावच नको.
वांद्रय़ातून जुहूला लाखभर लोकांचा मोर्चा निघाला. त्यानं आसमंत कसा थरारून गेला आणि जुन्या पिढीला कसे स्वातंत्र्यलढय़ाच्या आठवणींचे कढ येऊन राहिले होते, याची वर्णनं मेणबत्तीबाज वर्तमानपत्रांनी स-फोटो छापली. या मोर्चात सहभागी व्हायला निघालेले तरुण लोकलमध्ये बिनधास्तपणे फर्स्ट क्लासच्या डब्यांमध्ये चढले. डोक्यावर ‘अण्णा हजारे टोपी’, हातात ध्वज आणि ओठांवर भ्रष्टाचारविरोधाच्या घोषणा असताना सहप्रवासी हटकणार नाहीत वा टीसी पकडणार नाही, याची त्यांना खात्री होती. रीतसर तिकीट-पास काढून त्या वर्गानं प्रवास करणा-यांची आपण गैरसोय करतो आहोत आणि हा एक प्रकारचा भ्रष्ट व्यवहार आहे, हे त्यांच्या गावीही नव्हतं.
शतकी परंपरा असलेल्या एका महान वर्तमानपत्राने अण्णांच्या लढय़ाला वाहून घेतलंय. या ‘अण्णा टाइम्स’मध्ये आंदोलनांच्या बातम्यांबरोबरच संपादकांनी संसदेला पाजलेले अकलेचे डोसही असतात. ‘झटपट भ्रष्टाचारनिर्मूलनाचे दहा सोपे उपाय’ यांचे संपादक ‘बद्धकोष्ठ टाळण्याचे दहा मार्ग’ सांगावेत, तसे पहिल्या पानावरून सांगत असतात. ही मंडळी ‘खासगी करारा’च्या अवगुंठनातून लाखो रुपयांच्या जाहिराती बातम्या म्हणून छापत असतात. यांच्या अशा जाहिरातदारांविषयी कोणतीही वादग्रस्त बातमी अधिकृतपणे दाबली जाते. यांनी आणि अशा अनेक वर्तमानपत्रांनी समाजप्रबोधनपर उपक्रम चालवत असल्याच्या नावाखाली सरकारकडून मोक्याच्या ठिकाणांवरचे भूखंड नाममात्र भाडय़ाने किंवा सवलतीच्या दरांत विकत घेतले आहेत आणि तिथे सगळे व्यावसायिक उपक्रम चालवून हजारो कोटी रुपये कमावले जातात. वर हे सरकारला भ्रष्टाचारविरोधाचे डोस पाजतात. भाबडे वाचक पेपर पेटवायच्या ऐवजी मेणबत्ती पेटवतात.
ही सगळी उदाहरणं काय सांगतात?
भ्रष्टाचाराविरोधात अण्णांच्या नेतृत्वाखाली आरपारची लढाई वगैरे करायला उतरलेल्या मंडळींच्या मते भ्रष्टाचार फक्त पैसे खाणं.
‘भ्रष्ट आचरण’ हे इतकं छोटं आहे?
त्यातही सर्वात मोठा रोष आहे तो सर्वपक्षीय राजकारणी मंडळींनी केलेल्या हजारो कोटींच्या लाचखोरीवर. काहींचं भ्रष्टाचाराचं वर्तुळ यापेक्षा थोडं मोठं. त्यात- त्यांच्या जवळचं कुणी सरकारी नोकर नसल्यामुळे असेल कदाचित- सरकारी नोकरशाहीचाही समावेश होतो. बाकी सगळे जणू स्वच्छच. जे स्वच्छ नाहीत, ते नाईलाजानं अस्वच्छ आहेत आणि समाजातला वरिष्ठ वर्ग कधी भ्रष्टाचार थांबवतोय याची चातकासारखी वाट पाहतायत. एकदा वरच्यांचं खाणं थांबलं, त्यांना जरब बसली की हेही भ्रष्टाचाराच्या नावानं आंघोळ करून संपूर्ण स्वच्छ व्हायला मोकळे.
सगळ्या व्याख्या इतक्या सोप्या आणि कृती इतक्या ढोबळ असल्या की लढेही प्रतीकात्मक आणि सोपे-सोपेच होतात.. अशा सोप्या लढय़ांमधून ना क्रांती घडते ना उत्क्रांती..
सध्याच्या या भ्रष्टाचारविरोधी लढय़ातल्या एकाही ठिकाणी, एकाही माणसानं, समूहानं ‘आजपासून मी लाच देणार-घेणार नाही, भ्रष्ट वर्तन करणार नाही आणि खपवून घेणार नाही’, अशी साधीशी प्रतिज्ञा केल्याचं ऐकलंयत तुम्ही?
तसं झालं असतं तर ती ख-या अर्थानं एका क्रांतीची नांदी ठरली असती.(चित्र : प्रदीप म्हापसेकर)
(प्रहार, २८ ऑगस्ट, २०११)