Saturday, October 12, 2019

बाबी, बेबी आणि टीबी!


“बाबी, बाबी, बाबी... आता तुला पुरता धक्क्याला लावतो बघ हा टीबी!,” असं खुनशीपणे बोलून टीबीने डार्टबोर्डावर सप्पकन् बाण फेकून मारला, तो बरोब्बर लक्ष्याच्या जागी लावलेल्या फोटोतल्या बाबी नाईकाच्या नाकावर जाऊन बसला आणि नेम पक्का लागल्याच्या आनंदात टीबी गडगडाटी हसू लागला...
“अरे बापरे, टीबी, हे रे काय?” टीबीच्या गिरगावातल्या त्या पेइंग गेस्टच्या दीड खणी खोलीच्या दारातून आत आलेला संभू सोनगिरे चमकून विचारता झाला. त्याला धक्का बसणं स्वाभाविक होतं. तुकाराम बालाजी ऊर्फ टीबी टिंगरे आणि जयवंत ऊर्फ बाबी नाईक हे ऑफिसातले एकाच टेबलावर बसणारे सूर्य-चंद्र. टीबी भयंकर ऊग्रजहाल स्वभावाचा आणि बाबी अगदी चंद्रासारखा शीतल, बोलायला, वागायला सौम्य, सर्वांच्या मदतीला तत्पर, कोणाच्या अध्यात ना मध्यात... म्हणजे टीबीच्या भाषेत ‘बुळचट आणि बावळट.’ योगायोगाने जेपी साहेबांनी टीबी आणि बाबी या दोघांनाही एकाच सेक्शनला टाकलं होतं. बाबीच्या उमद्या आणि गोड स्वभावाने टीबीसारख्या खरखरीत माणसाच्याही थोड्या कडा घासल्या होत्या. बाबीचा द्वेष करावा, असं त्याच्यात काही नव्हतंच, तर टीबी तरी काय करणार!
असं असताना टीबीने बाबीचा फोटो लावून त्यावर नेम धरून बाण मारण्याइतकं काय घडलं असावं, असा प्रश्न संभू सोनगिरेला पडणं स्वाभाविक होतं. तो या दोघांचा मित्र आणि सहकारी. या प्रश्नाच्या उत्तराचा थोडासा उलगडा त्याला आणखी अर्ध्या तासाने झाला…
…‘न्यू डिलाइट’ बारमध्ये कॅप्टन मॉर्गन रमचे दोन पेग पोटात गेल्यावर धुराची वलयं सोडत टीबी म्हणाला, “संभ्या, तुझ्या त्या बाबीला सांग, बेबीच्या जवळपास फिरकलास ना, तग गाठ टीबीशी आहे म्हणावं.”
ओहोहो, असा प्रकार आहे तर!
आता संभ्याच्या डोक्यात प्रकाश पडला आणि हा प्रकाश आधीच आपल्या डोक्यात का पडला नाही, म्हणून त्याने एक टप्पूच मारून घेतला डोक्यात. बेबी म्हणजे बेबी बिवलकर. तिला ऑफिसात सगळे तिच्यामागे बेबी डॉलच म्हणायचे आणि तेही तिला माहिती होतंच. ही साहेबांची सेक्रेटरी. दिसायला छान, नीटस राहणीची, अतिशय चुरचुरीत. तीही बाबीप्रमाणेच मदतीला तत्पर असायची. ऑफिसातल्या बहुतेक तरुण पोरांच्या मनात बेबीच्या नावापुढे आपलं आडनाव लागावं, अशी इच्छा जागायची- “तिने तिचंच आडनाव लावायचं ठरवलं तरी आपली काही हरकत नाही बरं का; हवंतर मी माझं आडनाव बदलून जगू जमदग्नी बिवलकर करून घेतो,” असं एचआरचा जेजे नेहमी म्हणायचा दोन पेग पोटात गेल्यावर.
ही सर्वच अविवाहित पोरांच्या मनात भरणारी बेबी टीबीच्या मनात भरली, याचं संभ्याला आश्चर्य वाटत नव्हतं. त्याचं स्वत:चं लग्न झालं नसतं, तर त्यालाही बायको असावी तर बेबीसारखी, असंच वाटलं असतं, हे त्याला माहिती होतं. टीबी छान पाच फूट आठ इंचाचा छान तब्येतीचा दांडजवान गडी. गिरगावात खोली असल्यामुळे चर्नी रोड स्टेशन क्रॉस करून रोज हँगिंग गार्डनपर्यंत जॉगिंग करणारा. घरची परिस्थिती बरी होती. पनवेलला चांगला ब्लॉक घेण्याच्या तयारीत होता. तिशीच्या अंगणात पोहोचला होता. “अब लाइफ मे सेटल होने को मांगताय” अशी भावना त्याच्या मनात बळावू लागली होती. तशात साहेबांनी बाबी आणि टीबीचा सेक्शन त्यांच्या केबिनलगतच आणला होता. समोर सतत बेबी दिसणार, सतत तिच्यापाशी घुटमळायला मिळणार, तिच्याशी बोलायला मिळणार म्हणून टीबी खूष झाला होता. “लेका, बेबीच्या इतक्या जवळ गेलास, आता तर ती तुझीच झाली, चांदी आहे लेका तुझी,” असं सांगून त्याला घोड्यावर बसवून सगळ्यांनी पार्टीही उकळली होती त्याच्याकडून.
आपल्या सेक्शनमध्ये बाबीही आहे आणि तो आपला प्रतिस्पर्धी बनू शकतो, हा विचार कधी शिवलाही नव्हता टीबीच्या मनाला. बाबी साडेपाच फुटाचा, थोडासा गब्बू शरीरयष्टीचा, डोळ्यांवर चष्मा, नव्या फॅशनचा स्पर्शही न झालेलं टिपिकल बोअरिंग ऑफिसवेअर वापरणारा, ‘बुळचट आणि बावळट’ इसम होता टीबीसाठी. सहकारी म्हणून चांगला होता इतकंच. पण, दोघांचा सेक्शन साहेबासमोर गेल्यापासून टीबीच्या लक्षात आलं की बेबी त्याच्याशी अगदी सौजन्याने आणि छान बोलते, मित्रासारख्या गप्पा मारते, पण, बाबीशी तिचा संवाद काही वेगळा आहे... हे असलं काहीतरी जाणवायला, दिसायला माणूस प्रेमात पडलेला असावा लागतो. जिच्यावर प्रेम आहे तिचा सतत विचार केला की तिच्या विभ्रमांचा अर्थ तिच्याही आधी प्रेम करणाऱ्याला समजू लागतो. टीबीचा हा सिक्स्थ सेन्स जागा झाला होता आणि त्याने आता डिवचून त्याच्या अहंकारालाही जागं केलं होतं. बाबी आणि बेबी यांची जवळीक जर अशीच वाढत गेली, तर आपला पत्ता कट् होईल, अशी भीती त्याला वाटू लागली होती. पण, बाबीशी उघडपणे पंगा घेता येत नव्हता. बाबी त्याच्या वाटणीचं काम तर करायचाच, शिवाय टीबीचे सिगरेट ब्रेक, त्याचं संध्याकाळी लवकर कल्टी मारून सिनेमाला किंवा बारमध्ये जाऊन बसणं सोपं व्हावं म्हणून त्याच्याही वाटणीचं काम करायचा. तेही आनंदाने, विनातक्रार. टीबीने बाबीशी भांडण्याचा प्रयत्न करून पाहिला. त्याला डिवचून पाहिलं. बेबीवरून छेडलं. पण, बाबी कशानेही संतापायचा नाही. उलट टीबीचीच समजूत घालायचा. तुझा राग शांत झाला की बोलू, असं सांगून हवा काढायचा.
“तुला सांगतो, एक नंबर ड्रामेबाज आहे तुझा दोस्त,” आता टीबीच्या पोटातला तिसरा पेग बोलू लागला होता, “हा त्याचा मुखवटा आहे मुखवटा. बेबीसारख्या अश्राप पोरींना फसवून आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी लावलेला. पण, बेटा बाबी, हा तुझा बाप टीबी जिवंत असेपर्यंत तू बेबीला टचपण करू शकणार नाहीस, हे लक्षात ठेव...”
…संभू दीड पेगच्या संयमी जागरुकतेने टीबीच्या मनातली मळमळ समजून घेत होता...
आता टीबीचा चौथा पेग बोलू लागला, “साल्या कोकण्या, सगळ्यांचा जीव कुठल्या ना कुठल्या पोपटात असतोच. तुझाही जीव कुठेतरी असेलच. तेवढी एक कळ मला सापडू दे. मग तुला असा नाचवेन की तुझं खरं रूप बाहेर येईल आणि माझ्या बेबीच्या डोक्यात प्रकाश पडेल.”
हे बोलत असताना त्याचं लक्ष बारच्या गल्ल्यावर बसलेल्या अण्णाच्या डोक्याच्या वर एका देव्हाऱ्यात विराजमान गणपतीबाप्पांकडे गेलं आणि त्याचे डोळे विस्फारले, चेहऱ्यावर प्रचंड आनंद झळकू लागला, बारमध्ये बेबीच आली की काय, असं वाटून संभूने चरकून मागे पाहिलं, त्याला काहीच कळेना, इकडे टीबीने उठून जागच्या जागेवरच गावठी डान्सच केला हातात ग्लास घेऊन आणि बसल्यावर अतिशय प्रसन्न आवाजात त्याने वेटरला हाक मारली, “राजू, दोनों का ऑर्डर रिपीट और एक तंदूरी चिकन लाना बटर मार के.”
समोरच्या गणपतीबाप्पांना हात जोडून नमस्कार करून ‘बाप्पा मोरया’ असं म्हणून टीबी उत्साहाने बोलू लागला, “बाप्पांनी डोळेच उघडले यार माझे.”
“अरे वा, म्हणजे तू बाबीसाठी बेबी सोडणार?” संभ्याने चावी मारली.
“अबे हट्, बेबी मेरी है और मेरीही रहेगी.”
“मग बाप्पांनी काय शिकवण दिली तुला?”
“अरे माठा, गणपती. त्या कोकण्याचा जीव कशात आहे, ते मला समजलं. गणपती, भावा, गणपती!”
*****
“मला माहिती नव्हतं, तुमच्या घरीही गणपती असतो ते,” साहेब म्हणाले.
“माहिती कसं असेल? आमच्या घरी गणपती नसतोच. ते प्रस्थ कोकणात जास्त. आमच्याकडे घाटावर सार्वजनिक गणपती जास्त,” टीबी उत्तरला.
“घरी गणपती नसताना तुम्ही गणपतीची रजा मागताय...”
“गणपतीची रजा घ्यायला घरी गणपती बसला पाहिजे, असा काही रूल तर नाहीये ना साहेब?”
टीबीने साहेबाला निरुत्तर केलं.
तो केबिनमधून बाहेर पडल्यानंतर काही मिनिटांतच ही धक्कादायक बातमी सगळ्या ऑफिसात पसरली. टीबीने गणेशोत्सवाच्या काळातच रजा मागितल्यामुळे बाबीची रजा धोक्यात आली होती. बाबीच्या ऑफिसातल्या १० वर्षांच्या कारकीर्दीत आजवर असं कधी घडलं नव्हतं. टीबीने ओळखलं होतं ते बरोबरच होतं. गणपतीत बाबी १० दिवसांची रजा घेणार, गावी जाणार, गणपती, गौरी करून, भरपूर प्रसाद घेऊन, कोकणी मेवा घेऊन परतणार, हे त्या ऑफिसात १० वर्षं विनाखंड आणि विनातक्रार सुरू होतं. म्हणजे, “बाबीलाच का दर गणपतीला १२ दिवसांची रजा,” असा प्रश्न टीबीप्रमाणेच अनेकांना पडायचा. पण, बाबी फक्त होळी आणि गणपतीलाच रजा घेतो. बाकी सगळे दिवस कामावर असतो. ऑफिसची सगळी कामं नीट करतो, सगळ्यांना मदत करतो, इतरांच्या रजांच्या वेळेला डबल ड्यूटी करायलाही कधी ना म्हणत नाही, हे माहिती असल्यामुळे आजवर कधी कोणी त्या रजेच्या आड आलं नव्हतं. तो बाबीचा हक्कच आहे, असं जणू सगळ्यांनी मनोमन मान्य केलं होतं. टीबीने नेमका या गृहितकालाच सुरुंग लावला होता. दोघे एकाच सेक्शनमध्ये होते. त्यांचं काम, अनेकांनी तशी तयारी दर्शवूनही, दुसऱ्या कुणाला देण्यासारखं नव्हतं. कंपनीत कामाचा लोड होता. टीबीची रजा नाकारली तर तो ऐनवेळी दांडी मारून आणखी पंचाईत करील, याची साहेबांना कल्पना होती. बाबीला रजा नाकारण्याची ते कल्पनाही करू शकत नव्हते. पण, त्यापलीकडे काही पर्याय नव्हता.
अपेक्षेप्रमाणे टीबीला अनेकांनी सांगून पाहिलं, पण टीबी बधेना. बाबीने तर त्याच्या हातापाया पडून सांगितलं, “तुकारामदादा (त्याच्या नावाने हाक मारणारा बहुदा जगात बाबी एकटाच असावा, बाकी सगळे टीबीच म्हणत), आईबाबा थकलेत. गावच्या घरी गणपतीची सगळी तयारी, अगदी घर उघडल्यावर झाडलोटीपासून सगळं मला करायला लागतं. देवाच्या प्रसादाचा थोडा स्वयंपाक आई करते तेवढीच. बाकी एक गावची काकू आणि मी, आम्हा दोघांचीच जबाबदारी आहे. तुम्हा सगळ्या मंडळींनी सहकार्य केलं, म्हणून मी गणपती बसवू शकतो घरी. तू नंतर केव्हाही रजा घे. मी डबल ड्यूटी करीन, ओटीही क्लेम नाही करणार. पण, गणपतीत थोडं सांभाळून घ्या देवा.”
टीबी तुटकपणे म्हणाला, “अरे आम्ही इतकी वर्षं करतो ना अॅडजस्ट. आता तू कर की एक वर्ष.”
“बरा धडा शिकवलात त्या बाब्याला. साधेपणाचं नाटक करत असतो, पण आतून पक्का डँबिस आहे,” असं सांगणारा जगू जमदग्नी सोडला (त्याची अकाउंट्समधली लाखोंचा फटका देऊ शकणारी चूक बाबीने साहेबांच्या निदर्शनाला आणून दिली होती, म्हणून त्याचा याच्यावर खार. शिवाय, बेबीचं आडनाव नाईक बनतंय की काय, या धास्तीची जोड होतीच), तर बाकी कोणालाही टीबीच्या रजेचं प्रकरण पटलेलं नव्हतं. त्यात टीबी मध्यस्थीला आलेल्या कोणालाही सांगायचा, “हे पाहा, हक्काची रजा मागतोय. मी तंगड्या पसरून बसेन नाहीतर झोपेन सगळे दिवस? ते विचारण्याचा तुम्हाला हक्क काय?”
****
“मला तुमची अडचण समजू शकते नाईक, पण नियमानुसार टिंगरेंना रजा मागण्याचा हक्क आहे आणि एकाच विभागातून दोन अर्ज आल्यानंतर मला काहीतरी मार्ग काढावाच लागणार. तुम्ही दोघांनीही १२ दिवसांच्या रजेचा अर्ज दिलेला आहे. एवढी रजा मी मंजूर करूच शकणार नाही दोघांना. सहा दिवसांची रजा मिळेल प्रत्येकाला.”
टीबी म्हणाला, “त्याला १२ दिवस देत होतात ना? मलाही १२ दिवस पाहिजे.”
“टिंगरे, तेव्हा त्यांच्या सेक्शनमधून त्यांचाच अर्ज यायचा आणि बाकीचे सहकारी काम खोळंबणार नाही, याची हमी द्यायचे. आत्ताही इतर सेक्शन्समध्ये पूर्ण दिवसांची रजा दिलीच आहे ना मी. तुमच्याकडे तिसरा माणूस नाही. तुम्हीच एकमेकांशी सहकार्य करावं लागणार.”
पाणावल्या डोळ्यांनी बाबी म्हणाला, “माझी एकच रिक्वेस्ट आहे. गणपती बसवण्याची तयारी करायला सुरुवातीचे दिवस मला रजा द्या. सहा दिवसांनी मी परत येतो.”
हे साहेबांनी तात्काळ मंजूर केलं आणि त्याला टीबीचीही काही हरकत असायचं कारण नव्हतं. त्याला निव्वळ सुडासाठीच तर रजा हवी होती!
टीबीचा हा बाण मात्र अचूक लागला. दरवर्षीची एक शिस्त बसलेल्या बाबीला अनपेक्षितपणे रजा कमी करावी लागल्याचा धक्का मोठा होता. त्याला गावी कराव्या लागणाऱ्या अॅडजस्टमेंटही खूप होत्या. सगळ्यांकडेच गणपती असल्यामुळे ऐनवेळी मदत तरी कोण आणि कशी करणार? त्याने बाबी मेटाकुटीला आला. शिवाय अनपेक्षित ठिकाणी घाव बसल्याने तो सैरभैर झाला. त्याच्या कामावर त्याचा परिणाम दिसायला लागला. दोनतीन वेळा साहेबांनी समजून घेतलं, पण एकदा केबिनीत बोलावून त्यांनी त्याला झापला, हे सगळ्या ऑफिसने पाहिलं. सगळ्यांशी प्रेमाने वागणारा, मदत करणारा बाबी एकदम तुटक वागायला लागला. बाकी सगळे सोडा, एकदा तर तो बेबीवरही क्षुल्लक कारणावरून डाफरला. तेव्हा तिनेही त्याला दोन वाक्यं सुनावली आणि शेजारीच बसलेल्या टीबीने तिला समजावलं. तिचा राग शांत करण्यासाठी तिला कॅन्टीनला कॉफी प्यायला नेलं आणि त्या संध्याकाळी त्याने संभ्याला नेहमीच्या ब्लेंडर्स प्राइड रिझर्व्हच्या ऐवजी टीचर्स पाजली, “स्कॉच पी लेका आज तू. आता बाबी आउट. टीबीकी एन्ट्री हो गयी,” हे बोलून त्याने ‘तूने मारी एन्ट्री और दिल में बजी घंटी यार टुन टुन टुन’ हे गाणं भसाड्या आवाजात म्हणत जागेवर बसल्याबसल्या नाचही केला.
दुसऱ्या दिवशीपासून बाबीवर रुसलेली बेबी त्याच्याशी बोलेनाशी झाली. त्याच्या टेबलवर येऊन ती टीबीशी बोलू लागली. पण, बाबी जणू कोषातच गेला होता. त्याला बेबीच दिसेनाशी झाली होती, तर तिची टीबीशी वाढत चाललेली जवळीक कुठून दिसणार? टीबी आताशा वेळ साधून बेबीबरोबर स्टेशनलाही एकत्र जायला लागला होता. त्याच्या सावळ्या चेहऱ्यावर आता एक वेगळंच तेज चमकू लागलं होतं आणि मुळातच थोडा भरल्या अंगाचा बाबी आता विसविशीत दिसायला लागला होता.
अखेर गणेश चतुर्थीच्या आदला दिवस उजाडला. बाबीला संध्याकाळीच गाडीने गावाकडे निघायचं होतं. बरोब्बर सहा वाजता आपलं काम संपवून तो बाहेर निघाला, तेव्हा सगळेच सहकारी निघण्याच्या तयारीत होते. अख्ख्या ऑफिससमोर टीबी बाबीला म्हणाला, “ऑल दि बेस्ट बाबी, आज १३ तारीख, तू १९ला परत येशील ना कामावर? मी तुझ्या स्वागताला, प्रसाद खायला आणि कोकणचा खाऊ खायला येणार आहे. सुट्टी असली म्हणून काय झालं? मला कुठे कुठल्या गणपतीला जायचंय. तुझा गणपती, तोच आमचा गणपती,” या विनोदावर कोणी हसलं नाही आणि संभा किंवा जेजेनेही टाळीसाठी पुढे केलेल्या हातावर टाळी दिली नाही, हे समजण्याच्या स्थितीत टीबी नव्हता. “लिफ्ट येणार नाही बहुतेक, मी चालतच जातो,” असं म्हणून बाबी झर्रकन् निघून गेला.
****
१३ तारखेपासून १९ तारखेपर्यंत लोकांच्या घरी गणपती होता, टीबीकडे मात्र दिवाळी होती. आता रोज तो आणि बेबी समोरासमोर होते. शेजारी बाबी नव्हता. बेबीचा चेहरा जरा उतरलेला होता. त्यामुळे आधीच तिच्याशी बोलताना मृदूकोमल लागणारा टीबीचा सूर आणखी समजूतदार आणि प्रेमळ झाला होता. तिच्या उदास मनाचं रंजन करण्यासाठी तो नाना प्रकारचे फंडे वापरत होता. तिच्यापाशी जाऊन जोक करत होता, तिच्या आवडीचं चॉकलेट आणून देत होता, स्टेशनची सोबत तर सुरूच होती. आता १९ तारखेच्या संध्याकाळीच तिच्या लाडक्या रणबीरचा नवाकोरा सिनेमा तिला दाखवायचा, असा पण त्याने केला होता. गणपतीहून परतलेल्या बाबीचा पुरता बाप्पा मोरया करायचाच, हे त्याने ठरवलंच होतं. त्यामुळे १९ तारखेला बाबीच्या स्वागतासाठी तो नऊच्या ऑफिससाठी दामू शिपायाबरोबर, ऑफिस झाडण्याच्या वेळेलाच येऊन उभा राहिला होता. पावणेनऊपर्यंत एकेक सहकारी येत गेला. बॅग टाकून प्रत्येकजण नकळतच बाबीच्या स्वागतासाठी येऊन उभा राहिला. बाबी वेळेचा पक्का. आठ अठ्ठावन्नला तो ऑफिसात शिरला नाही, असं कधी झालं नव्हतं. आठ सत्तावन्नला टीबी सज्ज झाला. छप्पन्नला आलेली बेबीही चटकन् फ्रेश होऊन येऊन उत्कंठेने दाराकडे पाहात होती. सगळ्या ऑफिसचं लक्ष दारावर लागलं होतं... ५९ झाले, बाबीचा पत्ता नव्हता.
नऊ वाजले, तरी बाबी आला नाही.
आता त्याला फोन करावा काय, असा विचार टीबीच्या मनात येत असतानाच घाईघाईने खुद्द जेपी साहेबच दारातून आत आले. कानाला मोबाइल लावला होता. चेहरा गंभीर. त्यांनी हाताने खूण करून टीबी आणि बेबी या दोघांनाही आत बोलावलं.
फोन ठेवल्यावर साहेबांनी “डॅमिट,” असं म्हणून डाव्या हातावर उजवी मूठ आपटली- ते महेश कोठारेचे फॅन होते- आणि ते संतापून म्हणाले, “साल्या कोकण्या, मला बनवतोस काय? मीही काही कच्च्या गुरूचा चेला नाही. बेबी, मेलवर बाबीचा अर्ज आणि मेडिकल सर्टिफिकेट आलंय. त्याचे प्रिंटआउट काढून आण.”
साहेबांचा चेहराच असा लालबुंद झाला होता की काय झालं हे विचारण्याचं टीबीला धैर्य होईना. तो अर्ज आणि सर्टिफिकेट पाहिल्यावर टीबीकडे सरकवत साहेब म्हणाले, “टिंगरे, पाहा तुमच्या दोस्ताचे प्रताप. मी याला एक जबाबदार सहकारी समजत होतो. साधाभोळा समजत होतो. पण, हा कसा बदमाश इसम निघाला पाहा.” टुंग टुंग असा मेसेज वाजला, तेव्हा त्यांनी व्हॉट्सअॅप उघडलं, त्यावरचा फोटोही त्यांनी बेबी आणि टीबी यांच्यापुढे नाचवला.
त्या सगळ्या नाट्याचा मथितार्थ अगदी सोपा होता. बाबीने सकाळीच साहेबांकडे रजा-विस्ताराचा अर्ज पाठवला होता. त्याची लीव्ह आता सिक लीव्हमध्ये कन्वर्ट होणार होती. रात्रीच्या वेळी घराबाहेर कुठूनतरी कुठेतरी चालत जाताना तो पडला होता आणि त्याचा पाय मुरगळला होता. फ्रॅक्चर होतं. पायाला प्लॅस्टर घातलं होतं. त्याचा फोटो, डॉक्टरचं सर्टिफिकेट आणि रजाविस्ताराचा अर्ज त्याने तिकडून पाठवून दिला होता. त्याचं घर डोंगरावर असल्याने तिथे रेंजचा मोठा इश्यू होता. त्याला बाहेर पडून ऑफिसला किंवा साहेबांना फोन करणं शक्यच नव्हतं. थोडक्यात, बाबीने रजा वाढवून स्वत:ला आउट ऑफ कव्हरेज करून घेतलं होतं. शिवाय रजेसाठीची आवश्यक कागदोपत्री पूर्तताही केली होती.
बाबी असा गेम पलटवेल, याची कल्पनाच नसल्याने विस्फारल्या डोळ्यांनी ते सर्टिफिकेट वगैरे पाहत बसलेल्या टीबीवर साहेबांनी आणखी एक बाँब टाकला! ते म्हणाले, “टिंगरे, बाबीच्या स्वागतासाठी का होईना, तुम्ही आलात ही माझ्यासाठी फार मोलाची मदत झाली आहे. साक्षात् बाप्पाच धावले आहेत असं समजा ना माझ्या मदतीला. आता आलाच आहात तर प्लीज कामाला लागा. तो हरामखोर परत आला की मी तुम्हाला १२च्या जागी २४ रजा मंजूर करेन. फक्त यावेळी मला सांभाळून घ्या. ही घ्या टी अँड जीची फाइल आणि कामाला लागा, प्लीज.”
“पण, साहेब, म्हणजे मी तर रजेवरच आहे... त्याने बदमाशी केली म्हणून मला का शिक्षा?...” टीबीने क्षीण विरोध नोंदवण्याचा प्रयत्न केला.
“शिक्षा नाही हो टिंगरे, ही ऑपॉर्च्युनिटी समजा. आज तुम्ही आहात, बेबी आहे, तुमच्यासारख्या सहकाऱ्यांच्या भरवशावर मी हा गाडा खेचतो आहे. शिवाय बाबीला कल्पना नाही की त्याची गाठ माझ्याशी आहे. बेबी, तू एक काम करायचंस. आज दुपारीच थेट बाबीच्या गावाला जायचंस. गाडीची व्यवस्था मी केली आहे. ऑफिसात कुणालाही कळता कामा नये. माझ्यासाठी भरवशाचे तुम्ही दोघेच आहात. त्याच्या घरी पोहोचायचं. तब्येत पाहायला पाठवलंय म्हणून सांगायचं आणि त्याला रेड हँड पकडायचं... खरंतर याला रेड फुट म्हणायला हवं,” साहेबांनी त्यातल्या त्यात एक विनोद केला आणि “निघण्याआधी मला भेट. बाकी इन्स्ट्रक्शन देतो सविस्तर,” असं बेबीला सांगून बाहेर पाठवलं. ती गेल्यावर ते टीबीला म्हणाले, “आपण त्या कोकण्याला चांगला धडा शिकवू मिस्टर टिंगरे. बरं झालं तुम्ही रजा मागितली. त्यामुळेच त्याचं हे रूप सगळ्यांसमोर आलं. माझेही डोळे उघडले.”
तो बाहेर पडला आणि साहेबांनी मोबाइल उचलला... त्यांनी फिरवलेला नंबर बाबीचा होता...
****
पुढे काय घडलं हे तुम्ही चुकूनही टीबीला विचारू नका.
तो काहीतरी अंगावर फेकून मारेल.
टीबी इथे बाबीला साहेब धडा शिकवतायत, म्हणून त्यांना फुल सपोर्ट करत काम करत राहिला. बेबीबरोबर पाहायचा सिनेमा त्याला संभूबरोबर पाहावा लागला आणि नंतर ओल्ड माँक गोल्डच्या खंब्यात दु:ख बुडवावं लागलं. साहेबांनी दिल्या वचनाला जागून पितृपक्षात त्याला मोठी रजा सँक्शन केली म्हणा. पण तिचा त्याला काहीच उपयोग नव्हता.
तिकडे बाबीच्या गावी त्याचा पर्दाफाश करायला गेलेल्या बेबीने तिकडून साहेबांना कळवलं की बाबीचा पाय खरोखरच प्लॅस्टरमध्ये आहे, तो खरोखरच घसरून पडला होता आणि सगळी कामं त्याच्या म्हाताऱ्या आईवर येऊन पडली आहेत. त्यामुळे आता पाच दिवस तीच त्यांना मदत करायला थांबणार आहे. त्या काळात बेबीचे आईवडील बाबीची तब्येत पाहायला गावी जाऊन भेटून आले.
बाबीची रजा ऑफिशियली एक्स्टेंड झाली. १२ दिवसांऐवजी २५ दिवस टीबीला मान मोडून दोन जणांचं काम करावं लागलं. बाबीच्या गावी रेंज नसल्याने बेबीशी त्याचा संपर्क तुटला... तशीही ती आता रेंजबाहेर गेली, हे त्याच्या लक्षात आलं आणि न्यू डिलाइट बारवाल्याचा धंदा वाढला.
अखेर एक दिवस पाय बरा झालेला बाबी, बरोब्बर आठ अठ्ठावन्नच्या ठोक्याला बेबीच्या खांद्यावर हात ठेवून थोडासा लंगडत ऑफिसात आला आणि आपल्या टेबलावर जाऊन टीबीला म्हणाला, थँक यू टीबी, थँक यू सो मच!
काळाठिक्कर पडलेल्या टीबीने विचारलं, “मला थँक यू कशाबद्दल म्हणतोयस?”
“अरे, तू रजा मागितलीस तेव्हा मला वाटत होतं की गणपतीबाप्पा कोपला माझ्यावर. खरंतर तुझ्यामुळे गणपतीबाप्पा पावलाच मला.”
“कसं काय?” कोरड्या तोंडाने टीबीने विचारलं.
“अरे, तू रजा मागितल्यामुळे नेमका परतीच्या दिवशी तिकडे माझा पाय मोडलाय, याबद्दल साहेबांना संशय आला नसता. त्यांनी बेबीला पाठवलं नसतं. आम्हाला एकमेकांबद्दलच्या भावना कधी कळल्या नसत्या. बेबीचे आईबाबा आले नसते आणि पुढची बोलणी कधी झालीच नसती.”
यावर बेबी झक्क् लाजली.
“म्हणजे?”
“म्हणजे आमच्या लग्नाच्या पत्रिकेवर लिहिणार आहे, टीबी टिंगरे प्रसन्न!”
****
तिकडे साहेबांच्या केबिनमध्ये संभा सोनगिरे त्यांना सांगत होता, “तसा चांगला माणूस आहे तुका. पण, प्रेमात पागल होऊन बसला आणि सुडाने पेटला तिथे घोटाळा झाला. साहेब, तुम्ही नेमकी काय जादूची कांडी फिरवलीत?”
“सोनगिरे, कर्ताकरविता तो बाप्पा असतो. बाबी खरोखरच पडला आणि त्याचा पाय मोडला ही सगळी बाप्पाची करणी. पण, तोपर्यंत मला टीबी नेमकं काय करतोय, हे समजलं होतं. बाबी मोडक्या पायाने ऑफिसात आठ अठ्ठावन्नच्या ठोक्याला आलाच असता, हे मला माहिती होतं. मी त्याला माझ्या मित्राकडे पाठवलं. ऑर्थोपेडिक सर्जनकडे. मित्राला फोन केला. त्याने त्याला अडकवून ठेवलं. तिथून पुढचं तुम्हाला माहितीच आहे. बेबीलाही मी मुद्दाम पाठवलं. ती पोरगी गोड आहे. जोडा अगदी शोभणारा आहे. गावच्या गार हवेत, हिरव्यागार वातावरणात दोन्हीकडची फुलं उमलून हिंदी सिनेमातल्यासारखी एकमेकांना टक्कर देणार, याची मला कल्पना होतीच. शिवाय मी बेबीच्या आईबाबांनाही फोन करून सांगितलं, जाऊन जरा भावी जावयाची तब्येत पाहून या, घर-गाव-माणसं पाहून या. बिच्चारा टीबी, तो एक गोष्ट विसरला...”
“कोणती साहेब?”
“बाबीला माझ्यासमोर साला कोकण्या म्हणताना त्याच्या हे लक्षात आलं नाही की मीही जेपी साहेब आहे, म्हणजे जयंत परब आहे. आमच्या कोकणात सगळेच बाबी नसतात, काही फुरशी आणि नानेट्टीही असतात, याचा अंदाज नाही आला बिचाऱ्याला. आपल्याला डंख कुठून बसलाय, हे कळणारही नाही त्याला आयुष्यभर.”
****
त्या संध्याकाळी संभू ओल्ड माँक रिझर्व्हचा खंबा घेऊन टीबीच्या रूमवर पोहोचला, तेव्हा रूम स्वच्छ होती, डार्टबोर्ड निघालेला होता. क्षणभर संभूच्या हातातल्या बाटलीकडे पाहून टीबी म्हणाला, “ती ठेव तुझ्याकडेच. आज आपण पणशीकरांकडे मस्त मसाला दूध पिऊ या आणि साहित्य संघात झकास नाटक पाहायला जाऊ या. संध्याकाळी क्षुधाशांतीला जेऊ या. आता आपल्यासाठी हाच खरा न्यू डिलाइट!”
कितीतरी दिवसांनी टीबी स्वच्छ मोकळा हसला.


Friday, October 11, 2019

रेड होप डायमंडचं रहस्य


हाSS हूSS हाSS हूSS हाSS हू...
बनेश धापा टाकत जंगलातून वेडावाकडा धावत होता...
त्याच्यामागे ते भयंकर मोठं, केसाळ, विक्राळ अस्वल वेगाने धावत होतं... क्षणाक्षणाला दोघांमधलं अंतर कमी होत होतं... कोणत्याही क्षणी ते जीव खाऊन धावणाऱ्या बन्याला गाठेल, अशी शक्यता होती... अस्वलाच्या शरीराचा भयावह दुर्गंध बन्याला जाणवू लागला होता... धावून धावून त्याची छाती फुलली होती... पायांमधली ताकद संपत आली होती...
अस्वलाचा तीक्ष्ण नख्यांचा केसाळ पंजा बन्याच्या खांद्यावर पडला... असह्य वेदनांचा लोळ त्याच्या मेंदूपर्यंत उसळला... तेवढ्यात अचानक उडी मारून बिकामामा समोर आला... त्याने एका जाडजूड काठीचा एक तडाखा अस्वलाच्या तोंडावर हाणला... त्याची बनेशच्या खांद्यावरची पकड ढिली झाली... ते विव्हळत मागे कोसळलं... बिकामामाने बन्याला थांबवून त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि तो त्याच खांद्याला धरून त्याला हलवू लागला... “आई गं, दुखतोय ना रे तो खांदा बिकामामा, अस्वलाने पंजा रोवला होता तिथे,”  बन्या विव्हळला...
तरीही बिकामामा थांबला नाहीच... त्याने बन्याला खांद्याला धरून हलवणं सुरूच ठेवलं...
... “बन्या, ऊठ. ही स्वप्नं पाहायची वेळ नाहीये, केस आलीये आपल्याकडे.”
“केस!” पांघरूण भिरकावून बन्या ताडकन् उठून बसला बिछान्यात.
**********************
त्यानंतर १५व्या मिनिटाला बन्या बिकामामाबरोबर उबरमध्ये होता आणि ती भाड्याने घेतलेली कार मलबार हिलच्या दिशेने चालली होती...
**********************
बन्या ऊर्फ बनेश बेणारे एट्थ स्टँडर्डमध्ये होता. बिपीन कारखानीस हा त्याचा मामा. पंचविशीतल्या बिपीनला त्याचे मित्र नाव-आडनावाचा शॉर्टफॉर्म करून बिका म्हणायचे, ते ऐकून बन्याने त्याला बिकामामा म्हणायला सुरुवात केली होती. त्यानेच आपल्या भाच्याचं नामकरण केलं होतं. या मामाभाच्यांची नावं ऐकून तुम्हाला काही आठवलं का? तुम्हाला बिपीन फारसा आठवणार नाही कदाचित, पण बनेश नक्कीच आठवला असणार... बनेश फेणे, फुरसुंगीचा सुपुत्र, साहित्यिक भा. रा. भागवतांचा मानसपुत्र. त्याचं बनेश हे नाव त्या काळातही अतिशय हट के होतं आणि आताही हे नाव सहज ऐकायला येत नाही. बिपीन आणि बनेश ही दोन्ही भागवतांकडूनच आलेली नावं होती. बिकाच्या वडिलांनी त्याचं नाव भा. रा. भागवतांच्याच बिपीन बुकलवार या मानसपुत्रावरून ठेवलेलं होतं. भागवतांचा बुकलवार विशीतला तरुण होता आणि खूप पुस्तकं वाचायचा, म्हणून पुस्तकप्रेमी अर्थात बुकलव्हर या अर्थानेच बुकलवार बनला होता. तो विजू आणि मोना या बालदुकलीच्या मदतीने अनेक रहस्यं शोधून काढायचा. बिकाने आपल्या भाच्याचं नाव भागवतांच्याच फास्टर फेणेवरून ठेवलेलं होतं आणि गंमत म्हणजे, हा बन्याही त्या बन्यासारखाच तसाच शिडशिडीत, झिपरा आणि तुडतुड्या होता. नावाची कथा कळल्यावर त्याने दोन झिपऱ्या पुढे ओढून फाफेप्रमाणे ‘ट्टॉक’ असा आवाज काढण्याचा प्रयत्न करून पाहिला होता. पण, ते काही जमलं नाही.
बिकाला वडिलांच्या ‘संस्कारां’मुळे लहानपणापासूनच रहस्यकथा वाचायची सवय लागली. आर्थर कॉनन डॉयलचा शेरलॉक होम्स, अॅगाथा ख्रिस्तीचा अर्क्यूल प्वॉरो, त्यांचीच मिस मार्पल, बाबुराव अर्नाळकरांचा झुंजार, काळा पहाड, गुरुनाथ नाईकांचे कॅप्टन दीप वगैरे नायकांच्या साहसकथा त्याने झपाटल्यासारख्या वाचून काढल्या होत्या. त्याचबरोबर तो गुगलच्या साह्याने फोरेन्सिक्सचा अभ्यास करायचा, जगभरातल्या गाजलेल्या रहस्यमय प्रकरणांचा उलगडा कसा केला गेला, हे वाचून काढायचा, टीव्हीवरच्या गुन्हेगारी मालिका पाहायचा, रहस्यमय सिनेमे पाहायचा आणि गुन्हेशोधाच्या सगळ्या शाखांमधलं त्याचं सतत वाचन सुरू असायचं. म्हणूनच सोळाव्या वर्षापासून त्याच्या डोळ्यांवर चष्मा चढलेला होता. वाचनाचं बाळकडू त्याने आपल्या लाडक्या भाच्याला, बन्यालाही पाजलं होतं.
कुरळ्या केसांचा, पाच फूट नऊ इंच उंचीचा, माफक व्यायामाने सुदृढ बनवलेल्या देहयष्टीचा सावळा-स्मार्ट बिकामामा हा असाही बन्याचा हिरो होताच. आपला मामा शेरलॉक होम्ससारखा हौशी का होईना डिटेक्टिव्ह आहे आणि मुंबईचे फेमस इन्स्पेक्टर प्रधान त्याला कन्सल्ट करतात, याचं त्याला जाम कौतुक. प्रधानकाका म्हणजे इन्स्पेक्टर प्रधान हे खरंतर बिपीनच्या मित्राचे काका. बिपीनशी झालेल्या पहिल्याच भेटीत ते बिपीनच्या चौफेर माहितीने आणि विश्लेषणशक्तीने चकित झाले होते. त्यांच्या पुतण्यासोबत बिका त्यांना पोलिस स्टेशनात भेटला, तेव्हा त्यांच्यासमोर काही लोकांनी बेदम चोपून एका पाकीटमाराला आणलं होतं. तो मार खाऊन सुजलेला पोरगा निर्दोष असल्याचं रडून भेकून सांगत होता. बिकाने त्याच्याकडे पाहून पाहून काहीएक अंदाज लावला आणि त्याला पकडून आणणाऱ्या टोळक्यातल्या एकाचं बखोट धरून त्याला प्रधानांसमोर आणून उभा केला. त्याच्या खिशांमधून पाच आयकार्ड, तीन रिकामी पाकिटं आणि तीन फोन काढून दाखवले, तेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं की पाकीटमार गँगचा सदस्य खरंतर तो होता आणि त्यांनी या कॉलेजात शिकणाऱ्या मुलावर बालंट आणलं होतं. ती गँग पकडली गेली आणि या मुलाची सगळी करियर बरबाद होण्यापासून वाचली, तेव्हा प्रधानकाका इंप्रेस झाले. सगळ्यांचं लक्ष पकडून आणलेल्या माणसाकडे असताना बिपीनने मात्र खऱ्या पाकीटमाराची मागे कुणाबरोबर तरी सुरू असलेली नजरानजर अचूक हेरली होती.
तेव्हापासून प्रधानकाकांना एखाद्या गुंतागुंतीच्या केसच्या सोडवणुकीत अडकायला झालं की ते सरळ बिपीनला फोन लावायचे.
**********************
 “प्रधानकाकांचा फोन होता. श्रीमंत नानासाहेब सरंजाम्यांच्या बंगल्यावर बोलावलंय... माहितीयेत का तुला? कोल्हापूरजवळच्या बागल नावाच्या संस्थानाचे संस्थानिक आहेत म्हणे. त्यांचा मौल्यवान हिरा हरवलाय...” बिकामामाने बन्याला माहिती दिली. बिकामामाबरोबर अशाच एखाद्या रोमांचक केसच्या तपासात सहभागी होता येईल, अशा कल्पनेने बन्या उन्हाळ्याच्या सुटीत बिकामामाच्या ब्रह्मचाऱ्याच्या मठीत (बिकामामा नेहमी ‘अविवाहिताच्या मठीत’ म्हणा, असं म्हणायचा) म्हणजे बॅचलर पॉडवर राहायला आला होता. गिरगावात मुगभाटात नाना चाळीशेजारच्या स्वस्तिक बिल्डिंगमध्ये दुसऱ्या मजल्यावर ९ नंबरचं दोन खोल्यांचं घर बिकामामाने मित्राच्या मामाकडून भाड्याने घेतलं होतं. त्याच्याच शब्दांत सांगायचं तर ‘फावल्या वेळात’ तो सॉफ्टवेअर इंजीनियरिंग करायचा. बन्याच्या दुर्दैवाने संपूर्ण सुटीत असलं काहीच रोमांचक, थ्रिलिंग घडलेलं नव्हतं. बिकामामाने चौपाटी, गेटवे, अशी स्थळं त्याला फिरवून आणली होती, इराण्याच्या हॉटेलातला पानी कम चहा पाजला होता, खिमा पॅटिस खायला घातले होते, घरी पारशी अकुरी, सुरती घोटाळा असे अंड्याचे पदार्थ करून खायला घातले होते. ताजमहाल हॉटेलमागे बडे मियाँचे कबाब आणि मार्टिनकडची रसरशीत सॉसेजेस एवढ्यातच सुटीचं सार्थक मानावं लागलं होतं. रोमांचाची हौस त्याला रोज स्वप्नांतच पूर्ण करावी लागत होती. उद्याच तो मुंबईहून पुण्याला परतणार होता. पहाटेचं इंद्रायणीचं तिकीट होतं आणि एका विलक्षण योगायोगाने आता रात्री साडे बारा वाजता तो मामाबरोबर मलबार हिलची चढण चढत होता...
आज बिकामामाचा काही खास मूड नाहीये, हे बन्याच्या लक्षात आलं होतं. कारण, बिकामामाचे डोळे कोणत्याही केसबद्दल बोलताना लकलकायला लागायचे. आज मात्र त्याच्या डोळ्यांत ते तेज नव्हतं. उलट चेहऱ्यावर राग दिसत होता. रात्रीच्या वेळी कोणी जागं केलं म्हणून राग येणाऱ्यांपैकी तो नव्हता, त्याची एक शिफ्ट नाइट शिफ्ट असायची. मॉर्निंगला असला तरी मध्यरात्रीपर्यंत त्याचं वाचनच सुरू असायचं. त्यात बुद्धीला चालना देणारं रहस्यमय प्रकरण समोर आलं की त्याच्यात वाघ संचारायचा, उत्साहाला उधाण यायचं. आज मात्र तो भलताच गप्प होता. बन्याने विचारलं तेव्हा तुटकपणे म्हणाला, “मला हिरे अजिबात आवडत नाहीत. तू ब्लड डायमंड्स पाहिलायस की नाही? हिरे कुठून कसे खणून काढतात आणि या चकचकीत दगडांसाठी माणसांच्या जिवाशी कसे खेळ केले जातात, ते दाखवलंय या सिनेमात,” बिकामामा पेपरमिंटचं एक च्युइंगम बन्याच्या हातावर ठेवून स्वत:ही एक चघळत बोलू लागला, “दगड रे साधा दगड आहे हा. सगळे म्हणतात तो किती कठीण आहे, हिरा है सदा के लिए. अरे, हिरा ओव्हनमध्ये ७०० अंशांवर तापवून बघा. जागेवर कार्बन डाय ऑक्साइड बनून हवेत विरघळून जातो, राखही मागे उरत नाही.”
“अरे पण मामा, तो दुर्मीळ आहे ना कितीतरी,” बन्याने विचारलं.
“छ्या, ते तर मोठं रॅकेट आहे रॅकेट. आज जगात प्रचंड प्रमाणावर हिरे आहेत. ते सगळे एकदम बाजारात आले, तर हिऱ्याचं मोल काचेच्या खड्याइतकंही राहणार नाही.”, आता बिकामामाचे डोळे आता हिऱ्यासारखेच लकाकू लागले. बन्याने विचारलं, “मग ते का नाही येत बाजारात?” बिकामामा म्हणाला, “कारण, हिऱ्यांचा सगळा व्यापार डी बीअर्स या एकाच कंपनीच्या हातात एकवटलाय आणि ती बाजारात कमीत कमी हिरे आणून त्यांची किंमत पडू देत नाही. कधीतरी या डी बीअर्सच्या खजिन्यावर छापा मारून तो मोकळा केला पाहिजे. खूप ताप वाचतील जगातले”, बिकामामामध्ये आता डी बीयर्सवर स्वत:च छापा मारण्याचा उत्साह दिसायला लागला. ‘बेनझीरने (बिकामामाची गर्लफ्रेंड) त्याच्याकडे हिरा मागितलाय की काय एंगेजमेंटसाठी,’ असा एक वाह्यात प्रश्न बन्याच्या डोक्यात तरळला. पण, मामा भडकेल म्हणून स्वत:शीच खट्याळ हसून त्याने तो सोडून दिला आणि मामाला विचारलं, “इथे कोणता हिरा हरवलाय?”
**********************
“ही गोष्ट आहे रेड होपची”, प्रधानकाका सांगायला लागले. समुद्रकिनाऱ्यालगतच असलेल्या ‘जलमहाल’ या आलिशान बंगल्याच्या दाराशी त्यांनी बिका आणि बन्या यांना रिसीव्ह केलं होतं आणि त्यांना घेऊन ते एका सुंदर प्रकाशमान वाटेने राजमहालासारख्याच दिसणाऱ्या त्या बंगल्याकडे निघाले होते. “रेड होप? पण होप डायमंड तर ब्लू आहे. निळा हिरा”, बिकामामाने आणखी एक चिकलेट तोंडात टाकलं. ‘ब्लू डायमंड, आमच्या पुण्यात फाइव्ह स्टार हॉटेल आहे, या नावाचं,’ बन्या उत्साहाने म्हणाला. इन्स्पेक्टर प्रधान हसून म्हणाले, “अरे वा, मामासारखाच हुशार आहेस तू. हिरा प्रेशियस असतोच, पण, ज्याच्यात कोणत्याही रंगाची छटा असते, तो हिरा प्राइसलेस असतो, अनमोल.’
‘हा रंग अशुद्धीतून येतो. माणसांना अशुद्धीची फार आवड,’ बिकामामा खवचटपणे म्हणाला.
 “ही हेट्स डायमंड्स”, बन्याने डोळे मिचकावून खुसफुसत प्रधानकाकांना सांगितलं.
ते म्हणाले, “मग त्याचा हिऱ्यांचा अभ्यास अगदी पक्का असणार. तुला होप डायमंडची कहाणी माहितीच आहे ना बिका?”
“येस ऑफकोर्स. होप डायमंड १६४२ साली भारतात सापडला होता. तेव्हा तो १३२ कॅरटचा होता. हिऱ्याचं वजन कॅरटमध्ये मोजतात बरं बन्या! फ्रेंच राज्यक्रांतीच्या सगळ्या गोंधळात तो चोरीला गेला आणि जवळपास दोनशे वर्षं गायब राहिला. १८३०ला हेन्री होप नावाच्या एका हिरेव्यापाऱ्याकडे ४५.५२ कॅरटचा निळा हिरा विक्रीला आला. हा त्या मूळ डायमंडचाच भाग आहे, असं मानलं जातं. होपवरून त्याचं नाव होप डायमंड पडलं. त्याची आजची किंमत २५ कोटी डॉलर आहे, म्हणजे जवळपास १८३१ कोटी रुपये आहे. राइट?”
“अॅब्सोल्यूटली.” प्रधानकाका कौतुकाने म्हणाले. ते पुढे काही बोलणार इतक्यात बिका म्हणाला, “इफ आय अॅम नॉट राँग, त्याच सुमाराला कदाचित त्याच खाणीतून लालसर छटेचा हिराही बाहेर आला होता, पण तो योग्य मालकापर्यंत पोहोचायच्या आतच पळवला गेला असणार. तो इकडून तिकडून फिरत फिरत, बहुधा नानासाहेबांच्या आजोबांच्या वगैरे काळात बागल संस्थानात आला असणार. तो आणणाऱ्याला कदाचित त्याची किंमतही माहिती नसेल. हा हिरा होप डायमंडपेक्षाही आकाराने मोठा असणार. तोच नानासाहेब सरंजाम्यांकडून हरवला आहे, नेमका लंडनच्या प्रदर्शनात जाण्याआधी. अॅम आय राइट काका?”
“अमेझिंग,” प्रधानकाका बिकामामाच्या पाठीवर थाप मारून म्हणाले, तेव्हा बन्याही मामाकडे कौतुकाने पाहात होता, “ठगांकडून आला होता तो सरंजाम्यांकडे. तो मी तुला बोलावून चूक केलेली नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं.”
बिका म्हणाला, “आय अॅम शुअर की आज पहाटे हा हिरा लंडनला घेऊन जाण्यासाठी एक खास चार्टर्ड फ्लाइट आतापासूनच तयार असेल मुंबईच्या विमानतळावर. या प्रदर्शनात रेड होप हा शो स्टॉपर ठरणार तर.”
आता इन्स्पेक्टर प्रधानांच्या चेहऱ्यावर भलताच अचंबा दिसत होता. ते म्हणाले, “तू हेही गेस केलंस? कसं?”
बिका म्हणाला, “लंडनच्या एक्झिबिशनमध्ये डी बीअर्सचा नेहमीचा कचरा आहे सगळा. तेच ते बोअरिंग हिरे. ज्याअर्थी तिथे या हिऱ्याचा उल्लेखही नाही, त्याअर्थी तो शो स्टॉपर ठरणार, हे उघड आहे.”
बन्याच्या चेहऱ्यावरचा गोंधळ पाहून तो म्हणाला, “बन्या, फॅशनच्या जगातली कल्पना आहे ही. रॅम्पवर एखाद्या डिझायनरचे कपडे परिधान करून मॉडेल्स वॉक करतात, त्याचे फोटो तू पाहिले असतीलच ना! की डायरेक्ट एफटीव्ही? त्या वॉकमध्ये अचानक एखादी सेलिब्रिटी अवतरते आणि रॅम्पवॉक करते, सगळा फोकस तिच्यावरच जातो, तिला शो स्टॉपर म्हणतात.”
आपला मामा कित्ती हुशार आहे, हे पाहून बन्या खूष झाला. आपली भाकड गेलेली सुटी आजच्या एकाच दिवसात वसूल होणार आहे, याची त्याला कल्पना आली.
“पण काका, इतका भारी हिरा चोरीला गेला कसा?”
********************************
“आय अॅम शुअर मिस्टर प्रधान, तुमचा चमत्कारांवर विश्वास नसणार, बिपीन कारखानीसांचाही नसणार आणि माझाही नाही. पण, रक्तमण्याच्या तिजोरीची चावी माझ्यापाशी असताना आणि मी टक्क जागा असताना तो चोरीला गेला आहे. कॅन यू बिलीव्ह धिस?” नानासाहेब सरंजामे सांगत होते. त्यांच्या दिवाणखान्याच्या भव्य दालनात ते एका उंच खुर्चीवर बसले होते. समोर ही तिकडी बसली होती. आजकालच्या काळात हिस्टरी बुक्समधल्या संस्थानिकांसारखे कपडे खरोखर कोणी घालत असेल, यावर एरवी बन्याचा विश्वास बसला नसता. तो या जलमहाल नावाच्या, समुद्रासमोर असलेल्या महालात आल्यापासून बावरूनच गेला होता. त्याने सिनेमातच पाहिले होते, असे भव्य दिवाणखाने, झुंबरं, अदबीने ये-जा करणारे नोकर, संगमरवरी मूर्ती, मंद प्रकाशयोजना, श्रीमंती थाट हे सगळं पाहून त्याला आपण चुकून मागच्या काळातच आलो आहोत असं वाटत होतं. त्यात पांढऱ्या गलमिशांचे, तेजस्वी चेहऱ्याचे सत्तरीच्या घरातले श्रीमंत सरंजामे पाहिल्यावर तर त्याने स्वत:ला चिमटाच घेतला होता.
“हिरा गायब झाल्याचं कधी लक्षात आलं?” इन्स्पेक्टर प्रधानांनी विचारलं.
“साधारण तासाभरापूर्वी.”
“त्याआधी तो शेवटचा कधी पाहिला होता तुम्ही?”
“रात्री आठ वाजता. मी माझ्या हातांनी तो पुन्हा तिजोरीत ठेवला. साठेआठला भोजन केलं. नऊ वाजता हरीरामने डोक्याला तेल लावून मर्दन केलं. (“म्हणजे मालिश, हेड मसाज,” बिकामामाने बन्याला सांगितलं.) त्यानंतर दहा वाजता मी पुन्हा तिजोरी उघडली, तेव्हा रक्तमणी तिथे नव्हता. या सर्व काळात तिजोरीची चावी माझ्याकडेच होती. ही जर्मन बनावटीची तिजोरी आहे. तिची डुप्लिकेट चावी बनवणं अशक्य आहे.”
“ओह, ब्लू होपप्रमाणे रेड होपही शापित आहे वाटतं...” बिकामामाच्या कपाळावर आठ्यांचं जाळं चढलं होतं.
“म्हणजे?” प्रधानकाकांनी विचारलं.
“मी सांगतो,” नानासाहेब सरंजामे हातातल्या काठीची मूठ कुरवाळत बोलू लागले, “ब्लू होप हिरा धारण करणाऱ्याला लाभत नाही, त्याचा सत्यानाश होतो, अशी मान्यता आहे. तसा इतिहासही आहे. कारखानीस म्हणतात ते खरं आहे. रेड होपलाही असाच शाप आहे. हा हिरा ब्रिटिश राणीला नजर करून तिची मर्जी संपादन करण्याचा विचार माझ्या आजोबांनी, मुधोजीराजेंनी केला होता. तो प्रत्यक्षात येण्याच्या आत त्यांचा खून झाला. घराण्यातल्या वारसाहक्काच्या लढाईची ती परिणती होती. माझ्या वडिलांनी, श्रीमंत श्रीधरराव सरंजाम्यांनी हा हिरा जागतिक बाजारात आणून त्याच्या विक्रीतून मोठी इंडस्ट्री उभी करायचं ठरवलं होतं. त्यांचाही आकस्मिक मृत्यू झाला. तेव्हापासून हा हिरा म्हणजे आमचा रक्तमणी अपशकुनी म्हणून कोंदणात धूळ खात पडलेला होता. आता आम्ही तो वर्ल्ड डायमंड फोरमच्या प्रदर्शनात तो मांडणार होतो आणि नंतर लिलावात काढून टाकणार होतो. तर आता तोच गायब झाला.”
“तुमचा कुणावर संशय? प्रधानकाका, हा हरीराम, इतर सेवकांपैकी कोणाला बोलतं केलंत तुम्ही?”
प्रधानकाका काही बोलण्याच्या आधीच नानासाहेब म्हणाले, “हा हिरा माझ्या नोकरचाकरांपैकी कोणीही, हरीरामनेही चोरला असण्याची शक्यताच नाही. त्यांना त्याचं मोल माहिती नाही आणि ते सगळे पिढ्यान्पिढ्यांचे इमानी सेवक आहेत आमच्या खानदानाचे. असला विचार त्यांच्या डोक्यातही येणार नाही.”
अचानक बिकामामा त्यांचं वाक्य तोडून म्हणाला, “तुमच्या हातातली काठी मिळेल मला पाहायला.”
“हो हो, का नाही? हा आमच्या संस्थानाचा एक प्रकारचा राजदंडच होता म्हणा ना. माझ्या आजोबांच्या काळापासून आहे ती आमच्या घराण्यात.” नानासाहेब सांगू लागले.
बिका ती काठी बारकाईने पाहात होता. तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत होता. राजदंडासारखाच आकार असलेल्या त्या तुळतुळीत काळ्या काठीच्या डोक्यावर एक चकचकीत गोळा बसवलेला होता. “रॉयल केन्स, ओह... बेल्जियम... युरोपातल्या सगळ्या राजघराण्यांसाठीचे दंड यांच्याकडेच बनायचे,” असं पुटपुटता पुटपुटता त्याने एकदम एका खटक्याने काठीचा गोळा बाजूला केला. त्याच्या आत एक पोकळी होती. ती रिकामी होती.
“यू आर ब्रिलियंट मिस्टर कारखानीस,” असं म्हणत एक सुटाबुटातले पंचेचाळिशीचे उंचेपुरे गृहस्थ पुढे आले. त्यांच्याकडे पाहिल्यावर कोणीही हे ओळखलं असतं की ते नानासाहेब सरंजाम्यांचे चिरंजीव आणि सरंजामे ग्रूप ऑफ इंडस्ट्रीजचे मॅनेजिंग डिरेक्टर विक्रांत सरंजामे आहेत. हिंदी सिनेमातल्या एखाद्या जुन्या काळातल्या देखण्या अभिनेत्यांसारखी पर्सनॅलिटी लाभलेल्या हसतमुख चेहऱ्याच्या विक्रांत सरंजाम्यांनी सांगितलं, “माझ्या पणजोबांनी हा दंड बेल्जियममधूनच बनवून घेतला होता आणि त्यात हा चोरकप्पा आहे. तो माहितगारांनाच सापडतो. तुमचा अभ्यास दांडगा आहे.” मग प्रधानांकडे वळून ते म्हणाले, “तपास कुठवर आला इन्स्पेक्टर? आपल्यापाशी फार वेळ नाही. दोन तासांमध्ये हिरा एअरपोर्टला पोहोचला नाही, तर सगळंच अवघड होऊन बसेल. फार शरमेची गोष्ट असेल ती.”
“रेड होप इन्शुअर्ड आहे?” बिकाने त्याच्या खास तुटक शैलीत मध्येच विचारलं.
“नव्हता आधी. या प्रदर्शनात जाण्यासाठी आम्ही विमा उतरवला ब्लड डायमंडचा.” विक्रांत सरंजामे म्हणाले.
“ब्लड डायमंड?” बिकाने चमकून विचारलं.
विक्रांत हसून म्हणाले, “डोन्ट गेट राँग आयडियाज. पपा त्याला रक्तमणी म्हणतात. मला ते ओल्ड फॅशन्ड वाटतं. असाही त्याचा रंग लाल आहे. रक्तासारखा लाल. त्यामुळे मी त्याला ब्लड डायमंड म्हणतो.”
“इन्शुरन्स हिंदुस्तान कंपनीचा आहे? ओह... आय सी.”
हिंदुस्तान कंपनीच्या सीईओंच्या हरवलेल्या मुलीला शोधण्यात बिकाने मोठी भूमिका बजावली होती. तेव्हापासून त्यांचा बिकावर गाढ विश्वास बसला होता. इतक्या हाय प्रोफाइल केसमध्ये आपण कसे आलो, या प्रश्नाचं उत्तर बिकाला मिळालं. त्याच्या कपाळावरच्या आठ्या आणखी गडद झाल्या.
“आम्हाला या प्रकरणाची वाच्यता नको आहे आणि त्यातून येणारी कुप्रसिद्धीही नको आहे, म्हणून इन्स्पेक्टर प्रधानांच्या आणि इन्शुरन्स कंपनीच्या सूचनेनुसार तुम्हाला बोलावलं,” नानासाहेब सरंजामे सांगत होते. “मिस्टर कारखानीस, रक्तमणी इथून बाहेर गेलेला नाही, हे मी खात्रीने सांगू शकतो. इथला बंदोबस्त भेदताच येणार नाही कुणाला. तसा प्रयत्नही झालेला नाही. शिवाय तुम्ही आमचा राजदंडही तपासून पाहिलेला आहे. म्हणजे आम्ही विम्याच्या पैशांसाठी काही जादूचे प्रयोग करत नाही आहोत, याची तुम्हाला कल्पना आलीच असेल.”
नानासाहेबांचा टोला मनावर न घेता ती काठी त्यांना परत करत बिका म्हणाला, “मला तुमची बेडरूम आणि तिजोरी पाहायची आहे. विक्रांतसाहेबही त्याच मजल्यावर राहतात ना?”
“हो आणि रात्री मी शेजारच्याच बेडरूममध्ये होतो. पपांना हिप्नोटाइझ करून त्यांच्याकडून चावी काढून ब्लड डायमंड काढून घेण्याचा पूर्ण चान्स मला होता. पण, तो लपवायला माझ्याकडे जागा नाही मिस्टर कारखानीस. जे काही तपासण्यासारखं होतं, ते इन्स्पेक्टर प्रधानांनी तपासून झालेलं आहे,” विक्रांत सरंजामे हसून म्हणाले, पण, बिकाने नानासाहेबांवर संशय घेतलेला त्यांना फारसं आवडलेलं नाही, हे स्पष्ट होतं. त्यांनी थकलेल्या नानासाहेबांना आधार देऊन उभं केलं आणि म्हणाले “पपा, आज तुमचं सगळं शेड्यूल कोलमडलंय. आता उद्या पहाटे क्लबला गेला नाहीत, तरी चालेल. थकलाहात तुम्ही खूप.”
“नो वे. आकाश कोसळलं तरी व्यायाम चुकवायचा नाही.”
“या वयात इतकं हट्टी असणं बरं नाही पपा.” वर पोहोचल्यावर विक्रांत म्हणाले, “इफ यू डोन्ट माइंड, मी आल्यापासून याच कपड्यांमध्ये आहे. शॉवर घेऊन फ्रेश होऊन चेंज करतो आणि तुमच्या स्वागताला सज्ज राहतो माझ्या बेडरूममध्ये.”
नानासाहेबांची बेडरूम आणि ती मुलायम बेडशीटची मऊमऊ गादी पाहिल्यावर बन्याचे डोळेच मिटायला लागले. बिकामामाने त्याला सर्वांच्या नकळत एक चिमटा काढून जागं केलं आणि तो त्या बेडरूममध्ये फिरायला लागला. “मसाज किती वाजता घेतलात तुम्ही नानासाहेब”, त्याने विचारलं. ते उत्तरले, “नऊ वाजता. नऊ पाचला हरीराम मसाज करून गेला. त्याच्या त्या मर्दनाने डोकं हलकं झालं होतं. कष्टानेच मी डोळे उघडले आणि पुस्तक घेऊन वाचत बसलो.” 
“वेळ तुम्ही समोरच्या घड्याळात पाहिली की...”,
“हो हो, अर्थातच. मी जुन्या जमान्यातला माणूस आहे. नवी साधनं वापरत नाही,” नानासाहेब हसण्याचा प्रयत्न करत म्हणाले. त्यांच्या चेहऱ्यावर आता तणाव आणि थकवा, दोन्ही दिसत होतं.
बिका म्हणाला, “आम्ही विक्रांतसाहेबांच्या बेडरूमला एक भेट देऊन खाली जातो. तुम्ही विश्रांती करा. तुम्ही माझ्यावर खूप विश्वास ठेवून मला बोलावलंय. पण, तुम्ही जे सांगताय त्यावरून तरी मला ही केस माझ्या आकलनापलीकडची वाटते आहे. तुमचा हिरा अदृश्य झाला की काय, असंच वाटायला लागलंय मला. विक्रांतसाहेबांना भेटून मीही निघेन. इन्स्पेक्टरसाहेबांनीही बंदोबस्त ठेवण्याची गरज आहे, असं मला वाटत नाही. माझ्या मते, हिरा प्रधानसाहेब येण्याच्या आधीच इथून गायब झालेला आहे. कसा, ते सांगणं कठीण आहे. पण, आज इथे भुई धोपटण्यात काहीच अर्थ नाही, एवढं खरं.”
बिकामामाचं हे बोलणं ऐकून बन्याचा पुरता हिरमोड झाला होता. आतापर्यंत हिरो वाटत असलेला मामा त्याला झिरो वाटायला लागला. “अर्थात तुमचं फारसं नुकसान होणार नाही,” बिका चष्म्याशी चाळा करत म्हणाला, “इन्शुरन्समधून तुमचं नुकसान भरून मिळेल.”
“प्रश्न पैशांचा नाही, इभ्रतीचा आहे मिस्टर कारखानीस, फक्त आमच्याच नाही, देशाच्या इभ्रतीचा.”, नानासाहेबांच्या बोलण्यात विषादयुक्त धार होती, “कोहिनूर गमावलेल्या या देशाकडे त्याच वकुबाचा एक हिरा आहे, हे दाखवण्याची संधी होती ती मिस्टर कारखानीस. त्या धुळीला मिळाल्याचं दु:ख तुम्हाला कळणार नाही. एनीवे, गुडनाइट जंटलमेन.”
हिऱ्याचा शोधच लागणार नाही, हे बिकाने अशा घाईने जाहीर केल्यामुळे हबकलेल्या प्रधानांनी त्याच्या मागोमाग विक्रांत सरंजामेंच्या बेडरूमकडे धाव घेतली. मखमली, सोनेरी रोब घातलेले विक्रांत सरंजामे नक्षीच्या टेबलावर उंची मद्याचा चषक भरून त्यांची वाट पाहात होते. त्यांच्या दुसऱ्या हातात राजदंड होता. तो पाहिल्यावर बिकाच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं आणि ते टिपून विक्रांत सरंजामे हसत म्हणाले, “वुड यू केअर टु जॉइन जंटलमेन... ओ नो, यू आर ऑन ड्यूटी. मिस्टर कारखानीस, असे चक्रावू नका. ही माझी काठी आहे. आमच्या घराण्यात श्रीमंत आणि युवराज यांच्यासाठी हे दोन दंड बनवण्यात आलेले आहेत. सेम टु सेम आणि त्या दंडाप्रमाणेच याची मूठही मोकळीच आहे बरं का!”, विक्रांत सरंजामेंनी त्यांच्याकडच्या राजदंडाची मूठ उघडली होती. ती रिकामी होती आणि ते मिष्कील हसत होते. “नाइस पीस,”, बिकामामाने काठी हातात घेतली. पण आता त्याने ती काही फार तपासली नाही. त्याचा या तपासातला रसच उडाल्यासारखं झालं होतं. तपास काही पुढे जाणं शक्य नाही, आम्ही इथेच थांबतो आहोत, उद्या सकाळी शांत डोक्याने पुढचं काय ते पाहू या, असं इन्स्पेक्टर प्रधानांनी विक्रांतना सांगितलं. “म्हणजे, मिस्टर कारखानीस, तुम्हीही हार मानलीत? मिस्टर मस्करेन्हास हॅड हाय होप्स फ्रॉम यू. मला म्हणाले होते की बिका इज ब्रिलियंट. ऑफ कोर्स आमच्या ब्लड डायमंडची केस फारच विचित्र होऊन बसली आहे, यात शंका नाही. एनीवे. उद्या सकाळी भेटू या.”
************************
इन्स्पेक्टर प्रधानांची गाडी बाहेर पडत होती, तेव्हा तिकडे बंगला शांत होता, दिवे मालवले जात होते, मात्र इकडे बन्या भलताच हिरमुसला होता. तोंड पाडून तो बिकामामाच्या शेजारी अर्धवट झोपेत पेंगत बसला होता. आपल्या लाडक्या मामाची पहिली केस आपण पाहिली, तीही अपयशी, या कल्पनेनेच तो कमालीचा खट्टू झाला होता. त्याच्या डोळ्यांवर पेंग येत होती... अस्वलाने बिकामामाला फटका मारलाय आणि तो निश्चेष्ट पडलाय, असलं काहीतरी चित्र त्याच्या डोळ्यांसमोर तरळायला लागलं... तो मलूल होऊन मामाच्या कुशीत शिरला...
************************
पहाटे पाच वाजता जलमहालाच्या पोर्चमधून निळी कॅडिलॅक झोकात निघाली. बरोब्बर साडे पाचच्या ठोक्याला ती रॉयल बॉम्बे क्लबच्या दारातून आत शिरली. दरवानाने श्रीमंत नानासाहेब सरंजाम्यांना सलाम ठोकला. ते गाडी व्हॅलेकडे सोपवून एका हातात एक छोटीशी बॅग घेऊन दुसऱ्या हातात लगबगीने आत शिरले. तसेच प्रशस्त हॉलच्या पलीकडच्या दाराने ते प्रसाधनगृहाकडे चालू लागले. दारात पोहोचण्याआधीच त्यांच्या पायात कुणीतरी लुडबुडलं. अरेच्चा, हा मुलगा इथे कसा, हा विचार बन्याला पाहून त्यांच्या मनात आला आणि त्याच्या “गुडमॉर्निंग आजोबा”ला ते उत्तर देणार तोच समोर पाहून ते थबकले. प्रसाधनगृहाकडे जाणाऱ्या पॅसेजच्या दारात इन्स्पेक्टर प्रधान आणि बिपीन कारखानीस उभे होते. त्यांनी झटकन् मागे नजर टाकली. मुख्य दारापाशीही भक्कम अंगकाठीची दोन माणसं उभी होती. खांदे उडवून ते पलीकडच्या एका सोफ्याकडे गेले आणि त्यावर तोल गेल्यासारखे बसले.
“तुम्हीच हा सगळा खेळ रचला होतात ना नानासाहेब?” प्रधानांनी मान खाली घालून बसलेल्या करड्या आवाजात विचारलं.
“नानासाहेब नाहीत, हे विक्रांत काका आहेत,” बन्या उत्तेजित स्वरात म्हणाला, “त्यांच्या तोंडाला त्या काल रात्रीच्या ड्रिंकचा वास येतोय अजून.”
प्रधानांनी चमकून बिकाकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर मिष्कील हसू होतं. त्याने पुढे होऊन नानासाहेब ऊर्फ विक्रांत सरंजामेंच्या हातातली काठी काढून घेतली. तिची मूठ त्याने उघडली आणि तिच्यातून गुलाबीसर प्रभा फाकवणारा छोट्या पेरूच्या आकाराचा रेड होप त्याच्या तळहातावर विसावला.
**************************
“विक्रांतसाहेब बिटकॉइनच्या व्यवहारात गुंतलेले आहेत, कर्जात बुडालेले आहेत, याची तुम्हाला कल्पनाही येऊ दिली नव्हती त्यांनी,” आपल्या मुलाच्या प्रतापाच्या धक्क्याने हादरलेल्या आणि त्यानेच दिलेल्या गुंगीच्या औषधाच्या प्रभावातून अजून पुरत्या बाहेर न आलेल्या नानासाहेबांना बिका सांगत होता. काल मी तुमची काठी चेक केली, तेव्हा त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांच्याकडेही तसाच राजदंड आहे, हे आपल्या बोलण्यातून मला कळणार आणि मी तोही तपासणार, याची त्यांना कल्पना आली. म्हणूनच त्यांनी वर पोहोचल्यावर काठ्यांची अदलाबदल करून मला पुन्हा तुमचीच काठी दाखवली. तिच्यावर मी तुमच्या नकळत एक छोटीशी खूण केली आहे, हे त्यांना माहिती नव्हतं. हिरा लपवलेला दंड नेमका कुठे आहे, इथे आहे की बाहेर पाठवण्यात आला आहे, हे माहिती नसल्याने मी तपासच बंद करण्याचा डाव खेळलो आणि विक्रांतसाहेब त्यात अलगद अडकले. आम्ही महालावर नजर ठेवून असूच, हे त्यांना माहिती होतं. ते बाहेर पडलेले दिसले असते, तर पकडले गेले असते. म्हणूनच त्यांनी सकाळी तुम्ही क्लबात जाणार आहातच, असं तुमच्या तोंडून आमच्या उपस्थितीत वदवून घेतलं होतं. तुमचा पाठलाग आम्ही करणार नाही आणि केला तरी तुम्ही क्लबात गेल्यावर तो थांबेल, अशी त्यांची कल्पना होती. ते आत टॉयलेटमध्ये जाऊन सगळा गेट अप काढून मागच्या दाराने बाहेर पडून दुसऱ्या गाडीतून निघून जाणार होते. रेड होप मग समुद्रमार्गाने पाकिस्तानात आणि रस्तेमार्गाने अफगाणिस्तानमार्गे पुढे निघून जाणार होता.”
“पण काही हजार कोटी रुपयांचा व्यवहार गुप्तपणे कसा करता आला असता विक्रांतसाहेबांना?” इन्स्पेक्टर प्रधानांनी विचारलं.
“काका, पनामामधल्या, मॉरिशसमधल्या, आफ्रिकेतल्या काही कंपन्यांनी सरंजामे ग्रूप ऑफ इंडस्ट्रीजमध्ये भरभरून गुंतवणूक केली असती. शिवाय इन्शुरन्स कंपनीकडून भरपाई मिळाली असतीच.”
“पण मला अजूनही एका गोष्टीचा उलगडा झालेला नाही. तिजोरीच्या चाव्या सर्व वेळ माझ्याकडे असताना त्याने हिरा काढला कधी?”
“हरीरामने तुम्हाला मालिश केल्यानंतर. हरीरामने तुम्हाला मालिश केलं त्या तेलात विक्रांतसाहेबांनी अगदी हलका डोस मिसळला होता गुंगीच्या औषधाचा. म्हणूनच तिथे आमचा बन्याही झोपाळला आणि ढेपाळला. तुम्ही हलक्या गुंगीत असणार हे माहिती असल्यामुळे विक्रांतसाहेब आत आले, त्यांनी तुमच्या नाकासमोर थोडा तीव्र डोस धरला. तुम्ही झोपलात, त्यांनी चावी घेऊन हिरा काढला. चावी तुमच्याकडे होती तशी ठेवली आणि घड्याळाचे काटे नऊवर आणून ते दार आपटून बाहेर पडले.”
“दार आपटून? का?”
“त्या आवाजाने तुम्ही हलक्या गुंगीतून जागे झालात. समोर नऊ वाजलेले दिसले. तुम्ही दाराचा आवाज विसरला होतात. आपला वेळ गेलेलाच नाही, अशा समजुतीने तुम्ही वाचायला बसलात.”
“पण, आपण पुन्हा वर आलो तेव्हा घड्याळ राइट टाइम होतं मामा,” बन्याने पॉइंट काढला.
“कारण विक्रांतसाहेबांना काटे पुन्हा फिरवायला खूप वेळ होता आपण सगळे खाली होतो तेव्हा. अब आयी बात समझ में.”
**************************
नानासाहेबांची कॅडिलॅक मलबार हिल उतरत होती, तेव्हा सकाळची कोवळी उन्हं पसरली होती. मॉर्निंग वॉक, व्यायाम करणारी मंडळी लगबगीने वर चालली होती. काल रात्री इथे काही हजार कोटी रुपयांचं केवढं मोठं प्रकरण घडलं, याची त्यांना कल्पना नव्हती आणि ते त्यांना कधीही माहिती होणार नव्हतं.
“बन्या, तुझी गाडी तर चुकली की रे. आता जाऊन झोपशील ना डाराडूर?”, बिकामामाने विचारलं.
“छ्या! आय अॅम सो एक्सायटेड. माझा विश्वासच बसत नाहीये मी एवढ्या मोठ्या केसमध्ये तुझ्याबरोबर होतो. आता मला झोपच येणार नाही.”
“भाच्या, मामावर गेलायस लेका,” बिकामामा म्हणाला आणि त्याने ड्रायव्हरला सांगितलं, “कयानीला सोडा आम्हाला. भाच्या, काल रात्रीपासून आता पहिल्यांदा भूक लागलीये. मस्त खिमा पॅटीस, आकुरी आणि कडक ब्रून खायला घालतो. वर एकेक पानी कम. आपल्या दोघांच्या पहिल्या केसचं सेलिब्रेशन.”
अत्यानंदाने बन्याची जीभ टाळूला चिकटली आणि त्याच्याही नकळत, त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच भा. रा. भागवतांच्या बनेश फेणेप्रमाणे बनेश बेणारेच्या तोंडून ‘ट्टॉक्’ असा आवाज निघाला!