Tuesday, June 28, 2011

तुमच्या 'रिअॅलिटी'चा 'शो' होतोय का?

काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या दोन बातम्यांनी बरीच खळबळ माजवली होती.

एक होती, पुण्यातल्या एका प्रख्यात कॉलेजातल्या लेडीज होस्टेलमधल्या विद्याथिर्नींची बातमी. या विद्याथिर्नींनी एकमेकींशी लैंगिक चाळे करतानाचे फोटो एका अश्लील फोटोंच्या वेबसाइटला कसे विकले, याचे (अर्थातच सचित्र) दर्शन त्या बातमीने घडवले.

दुसरी बातमी होती एका मॉलमधली. त्या मॉलच्या चेंजिंग रूममध्ये कपड्यांची ट्रायल घेत असलेल्या एका महिलेला चेंजिंग रूमच्या खालच्या फटीजवळ 'पडलेला' मोबाइल दिसला. नंतर असे उघड झाले की, तो मोबाइल पडला नव्हता, तर कॅमेरा ऑन करून मुद्दाम तेथे टाकण्यात आला होता. त्या महिलेच्या अनावृत अंगप्रत्यंगांचे चित्रिकरण करण्यासाठी.

त्यात ताजी बातमी येऊन थडकली. इचलकरंजीसारख्या आडगावात एका शिक्षकाने आपल्या विद्याथिर्नींचे अश्लील एमएमएस बनवून पाठवल्याची.

आता तर इंटरनेटवर अशा एमएमएसचे पेव फुटले आहे... सर्वात जास्त एमएमएसमध्ये भारतीय 'कलाकार' दिसतात.
 ही नव्या युगातल्या 'चमचमीत मनोरंजना'ची पुढची पायरी आहे. पिवळ्या पुस्तकांच्या जुन्या जमान्यापासून हे मनोरंजन कितीतरी पुढे आले आहे. काही काळापूवीर् धूम होती 'सेलिब्रिटी एमएमएस' आणि क्लिप्सची. काही वर्षांपूवीर् एका प्रख्यात अभिनेता-अभिनेत्री जोडप्याचे खाजगीतले चुंबन एमएमएसद्वारे जगजाहीर झाले होते.  
त्यानंतर एका तितक्याशा प्रसिद्ध नसलेल्या अभिनेत्रीचा, तिच्याइतक्याही प्रसिद्ध नसलेल्या अभिनेत्याबरोबरचा संपूर्ण प्रणयप्रसंगच (सिनेमातला नव्हे, खराखुरा) इंटरनेटवरून प्रसृत झाला. चुंबनदृश्यांमुळे प्रसिद्धीस आलेल्या एका हॉट अभिनेत्रीची ब्लू फिल्म स्टाइल क्लिप, एका खळीदार अभिनेत्रीचे स्नानदृश्य, अन्य एका अभिनेत्रीचे कपडे बदलतानाचे दृश्य अशी 'सेलेब-स्कँडल्स' इंटरनेटवर आजही दिसतात. यातली बरीचशी स्कँडल्स ही त्या त्या वेळच्या गरजेप्रमाणे संबंधित सेलिब्रिटींकडूनच प्रसृत केली जातात, अशी एक वदंता आहे.

त्यामुळेच की काय, आंबटशौकिनांना आता या स्कँडल्सचे अप्रूप वाटेनासे झाले आहे. त्यांची जागा घेतली आहे ती खऱ्याखुऱ्या स्कँडल्सनी. म्हणजे प्रसिद्धीच्या झोतात नसलेल्या सामान्य माणसांचे आयुष्य (म्हणजे त्यातली लैंगिकता) येनकेनप्रकारेण टिपून ती जगजाहीर करणारी स्कँडल्स.
 
 
चित्रपटांपासून ब्लू फिल्म्सपर्यंत दिसणारी लैंगिकता 'खोटी', 'बनवलेली' असते. तिच्यात 'अभिनया'चा भाग मोठा असतो. रस्तोरस्ती मिळणाऱ्या सीडीज आणि इंटरनेटवरच्या पॉर्न साइट्सच्या माध्यमातून या लैंगिकतेचे महाद्वार खुले झाले आणि ते पाहणारे शौकिन लगेचच त्या 'तोचतोचपणा'ला कंटाळले. टीव्हीचे प्रेक्षक तकलादू मालिकांमधल्या कंठाळी अभिनयाला विटून 'रिअॅलिटी शो'मधल्या अधिक रंजक (भासणाऱ्या) वास्तवाकडे वळले, तोच नेमका हा काळ आहे, ही एक गंमत.

लैंगिकतेमधला खराखुरा रसरशीतपणा दाखवणाऱ्या स्कँडल्सचे पेव फुटले ते याच काळात. सायबर कॅफे, प्रेमिकांना एकांत मिळवून देणारे आडोसे, त्यासाठी कुप्रसिद्ध हॉटेल्स, रिसॉर्ट्सच्या रूम्स इत्यादि ठिकाणी छुपे कॅमेरे बसवून हे चित्रण केले जाते. इतर कोणाच्या तरी लैंगिक संबंधांचे तिऱ्हाइताने केलेले चोरटे चित्रण, हाही टप्पा या स्कँडल्सनी लवकरच ओलांडला आणि आपल्याच प्रणयाचे आपणच केलेले चित्रण या धाडसी टप्प्यावर ते येऊन पोहोचले आहे... हीच चिंतेची बाब आहे. 


 दोन सज्ञान व्यक्तींमधला प्रणय हा सर्वस्वी खाजगी मामला. त्यात 'गंमत' आणण्यासाठी तो चित्रित करण्याचा निर्णयही सर्वस्वी त्यांचा. त्याला संस्कृतीरक्षकी पावित्र्यात कोणी आक्षेप घेण्याचे कारणच नाही. ज्यांना तशी खुमखुमी असेल, त्यांनी शाळा-कॉलेजांतले किशोर-किशोरी, नवयुवक्युवतींपासून नवविवाहितांपर्यंत अनेकांना प्रश्ान् विचारून सिद्ध झालेली सवेर्क्षणे पाहावीत. 'कामसूत्रा'च्या या देशातली लैंगिकता किती धाडसी झाली आहे, ते उमगेल.

मुद्दा खाजगीत कोणी काय करावे हा नाही. खाजगीतले क्षण (भले ते कोमल, हळवे वगैरे नसले तरी) असे चव्हाट्यावर आणण्याचा अधिकार कोणाला आहे का? काही धाडसी जोडपी एकमेकांच्या संमतीने (चेहरे झाकणारे इफेक्ट वापरून किंवा न वापरता) आपला प्रणय जगापुढे मांडण्याचा उपद्व्याप करतात. पण, त्यांचे प्रमाण कमी आहे. इंटरनेटच्या चावडीवर येणारी बहुतेक स्कँडल्स हा फसवणुकीचा मामला आहे. सहसा प्रणयी जोडी मोबाइलवर किंवा कम्प्युटरमधल्या वेबकॅमवर प्रणयप्रसंगाचे चित्रिकरण करते. काहीवेळा पुरुष आग्रही जबरदस्तीने किंवा छपून हे चित्रिकरण करतो. काही काळाने काही कारणाने हा 'संबंध' संपुष्टात आला, तर सूड म्हणून हे चित्रण नेटवर अपलोड केले जाते. काहीवेळा ते बऱ्यापैकी मोबदल्याला विकलेही जाते. प्रणयाच्या उन्मादात केल्या जाणाऱ्या या चित्रणाचा वापर मुलींना ब्लॅकमेल करण्यासाठी केला जातो किंवा निव्वळ फसवण्याचा विकृत आनंद मिळवण्यासाठी. दिल्ली, कोलकाता, संगरूर, लुधियाणा, अहमदाबाद, पुणे, मुंबई, कोचि, त्रिची, हैदराबाद, चेन्नई... भारतातलं एकही माहितीचे गाव नसेल, ज्याच्या नावे इंटरनेटवर एक तरी स्कँडल सापडणार नाही.

 


प्रेमात किंवा निव्वळ लैंगिक संबंधांची ज्याची त्याची रिअॅलिटी ज्याची त्याने किंवा जिची तिने ठरवायची. मात्र त्याचवेळी तिचा 'शो' होणार नाही, याची काळजी घेण्याचीही जबाबदारी उचलायला हवी. नाहीतर आयुष्य नासवून टाकणारी चिरंतन कुप्रसिद्धी पदरात पडते.(महाराष्ट्र टाइम्स)


1 comment:

  1. solid lihile aahe....vachun angavar kata yeto....aani kaljihi vatate abodh,masum mul,mulinchi.....

    ReplyDelete