Tuesday, June 28, 2011

आंटी, माझ्या लग्नाला याल ना?

' हॅलो आंटी, मी पिंकी बोलतेय...' शेजारच्या पिंकीनं का फोन केला असेल, म्हणून आंटींना वाटलेलं आश्चर्य तिच्या पुढच्या वाक्यात ओसरलं.. 'मी लग्न करतेय आज... तुम्ही याल... या ना प्लीज!' या वाक्यानं आंटींच्या पायाखालची जमीनच सरकली... तुझे आईबाबा येणार आहेत का लग्नाला?'... त्यांनी कोरडेपणानं विचारलं... अपेक्षेप्रमाणेच 'नाही' असं उत्तर आलं आणि त्यांनी फोन ठेवला... तत्क्षणी त्यांना वाटलं, 'कोणी शोधला हा नतदष्ट व्हॅलंटाइन डे?'

... मुंबईत मंगळवारी लागलेल्या गांधर्वविवाहाची ही कथा...मंगळवारी किमान 20 युगुलांनी आईवडिलांच्या इच्छेविरुद्ध लग्न केलं, असं वांदे लग्नकोर्टातला माहितगार सांगतो.. सगळं जग प्रेमाचा सण साजरा करत असताना, या सगळ्या युगुलांच्या आईबाबांना, नातेवाइकांना, त्या आंटींसारख्या स्नेह्यांना मनस्ताप, संताप, दु:ख, चिंता, शरम आणि द्वेषाचे कढ येत होते... आग लागो या 'व्हॅलंटाइन डे'ला...

... त्या आंटींना पिंकी राहून राहून आठवत होती... गुणी मुलगी.. त्यांच्या जातीत मुलींना फार शिकवलं तर नवरा मिळत नाही, मिळाला तरी दुप्पट हुंडा द्यावा लागतो, म्हणून बाबा तिला शिकवायला तयार नव्हते... या आंटींनीच मध्यस्थी करून तिला शिकवायला भाग पाडलं आणि आता एसवायला असतानाच या मुलीनं संसाराचा सारीपाट मांडला... तोही परभाषिक एसटीडी बूथवाल्याशी... 'पाहा, शिकून काय दिवे लावले पोरीनं ते', पिंकीचे जाब विचारणारे बाबा आंटींच्या डोळ्यासमोर येऊ लागले...आमची शहाणीसुरती मुलं अशी कशी बहकवली या परक्यांच्या सणानं?...

... पण, या पोरांना 'बहकवायला' या परक्या सणाची गरज होती का? प्रेमाला किंवा त्यांना जे प्रेम वाटतंय त्याला 'व्हॅलंटाइन डे'च्या मुहूर्ताची गरज होती का कधी? आणि पोर बहकली असं तरी कसं म्हणायचं?... आंटी विचारात पडल्या... पिंकीला घरातल्या कडक शिस्तीनं कोंडून घातलं होतं... शिक्षणाचा वेळ हाच तिचा मोकळा श्वास. वडिलांनी धाकापलीकडे वेगळं कर्तव्य मानलंच नव्हतं... मग तिनं हवासा आधार, प्रेम बाहेर शोधलं... वयसुलभतेनं कुणा तरुणामध्ये... त्याला तरी फार काय कळत असणार? ज्यांना 'कळतं', त्यांनी या गरजा जाणल्या नाहीत... मुलांना भावविश्वातल्या उलथापालथी व्यक्त करण्याचं हक्काचं स्थान दिलं नाही... मग प्रेमात पडलेले हेच दोघे एकमेकांचे मित्र, हितचिंतक आणि प्रसंगी वडीलधारेही...

... हा आधार धरून ठेवण्याची कोवळी धडपड त्यांनी केली, तर त्यांचा काय दोष?...आंटींना एकदम शरमल्यासारखं झालं... किंचित् विचार करून मनाशी हसल्या... पिंकीनं सांगितलेला पत्ता आठवू लागल्या...No comments:

Post a Comment