Sunday, March 27, 2011

गांधी नावाचे गारुड


महात्मा गांधीजींची जन्मतिथी किंवा पुण्यतिथी असली की त्यानिमित्ताने लिहिताना, आज गांधीजी हयात असते, तर ते किती वर्षांचे असले असते, याचा हिशोब करण्याची आणि आजच्या राजकारणावर, समाजकारणावर त्यांचा नेमका किती प्रभाव पडला असता, याचे विवेचन करण्याची एक पद्धत आहे. गांधीजींची हत्या झाली नसती आणि त्यांना दीर्घायुरारोग्य लाभले असते, तरी आज ते हयात नसते, हे तर स्पष्टच आहे. आयुष्याचे शतक त्यांनी गाठले असते तरीही ते जवळपास 40 वर्षांपूर्वीच निवर्तले असते. गांधीजींना तसे नैसर्गिक मरण लाभले असते, तर आज गांधीजींना जागतिक पटलावर जे स्थान मिळाले आहे, ते लाभले नसते असे मानणारा एक मोठा वर्ग आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या आनंदात फाळणीचे विरजण पडले, त्याच काळात गांधीजी त्यांच्या अनुयायांमध्ये आणि काँग्रेस पक्षातही एकाकी पडण्याची सुरुवात झाली होती. त्यांचे आदर्शवादी राजकारण धूर्त आणि `व्यवहारी' काँग्रेसजनांना परवडले नसते; त्यांनी गांधीजींना पत्करले होते ते त्यांचा जनमानसावरील प्रभाव लक्षात घेऊन. गांधीजींच्या हयातीतही त्यांचे अनुयायी म्हणविणारे काँग्रेसजन `गांधीवादी' होते, असे म्हणणे धाडसाचे ठरेल.  

गांधीजींनी फाळणीच्या वेळी पराकोटीचा मुस्लिम अनुनय आणि पाकिस्तानधार्जिणेपणा केला, या पद्धतशीर अपप्रचाराच्या परिणामी हिंदुबहुल जनमानसावरील त्यांच्या प्रभावाला हादरे बसू लागले होते. नथुराम गोडसेच्या गोळीने त्यांचा वेध घेतला नसता, तर ते हळुहळु निष्प्रभ होऊन विझून गेले असते आणि त्यांच्याबरोबर गांधीविचार संपला असता, असे मानणारे अनेकजण आहेत. आश्चर्य म्हणजे यात गांधीजींच्या `संपण्यात' रस असलेले प्रखर, कट्टर गांधीद्वेष्टे जसे आहेत, तसेच गांधीविचारांचे अनुयायीही आहेत. नथुरामने गांधीजींना अमर केले, असे मानणाऱयांना गांधीजी कळले नाहीत, असे म्हणावे लागेल. गांधीजींची हत्या झाली नसती, तर वर उल्लेखिलेली प्रत्येक गोष्ट घडण्याची शक्यता होती आणि ते त्यांच्या हयातीत दुर्लक्षिले गेले असते किंवा त्याहून वाईट म्हणजे मखरात बसविले गेले असते, यात शंकाच नाही. तरीही त्यामुळे गांधी नावाचे गारुड संपले असते आणि आजच्या आंतरराष्ट्रीय राजकारणावरही असलेला त्यांचा प्रभाव शिल्लक राहिलाच नसता, असे मानणे भाबडेपणाचे आहे. गांधीजी हे व्यक्तिगत आयुष्यात अतिशय कर्मठ अशा कर्मकांडसदृश हेकेखोर आग्रहांसाठी प्रसिद्ध होते. तरीही, त्यांची प्रतिमा मात्र कमालीची अनाग्रही, लवचिक आणि सर्वसमावेशक राहिली आहे. त्यांचे विचार मानणारे अनुयायी जगभर आहेत, पण, त्यांच्याविषयीच्या भक्तीचे ऊग्र प्रदर्शन मांडणारे भक्त नाहीत.  

अन्य महापुरुषांची जराशानेही विटंबना होते आणि त्यावरून हळहळय़ा भावना दुखावण्याचे निमित्त करून रणधुमाळय़ा झडतात. गांधीजींवरून मात्र कोणाच्या भावना दुखावल्याचे आणि त्यातून काही हिंस्त्र उन्मादी घडल्याचे कानी येत नाही, हा गांधीजींच्या प्रतिमेचा विजय आहे. गांधीजींचे `सत्याचे प्रयोग' हे आत्मचरित्रपर पुस्तक आजही भारतातील बेस्टसेलर पुस्तक आहे. त्यातील त्यांच्या प्रयोगांची बेधडक चिरफाड करणारे, त्यांच्या लैंगिक आयुष्याचीही चिकित्सा करणारे लेखन होत असते. त्याने कोणाच्या भावना दुखावून रस्त्यांवर राडे झाल्याचे उदाहरण नाही. असा चिकित्सेला खुला असलेला दुसरा महापुरुष भारतवर्षाच्या इतिहासात सापडणे कठीण आहे. इतिहासाच्या अभ्यासकांना महाकाव्यांमधील ज्या व्यक्तिरेखा प्रत्यक्षात होत्या की ती निव्वळ मिथके आहेत, याचा एकमुखी पक्का निर्वाळा देता येत नाही- ज्यांच्या संदर्भात सप्रमाण कालनिश्चितीही करता येत नाही- अशा श्रद्धेयांच्या कथित जन्मभूमीवरून झालेले रणकंदन पाहता गांधीजी भाग्यवानच म्हटले पाहिजेत. त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि हिंदू जीवनपद्धती (`धर्म' नव्हे) यांच्यातील साम्य पाहिले, तर हिंदू जीवनपद्धती आजवर का टिकली आणि गांधीजी यापुढेही का टिकतील, याचा अदमास येऊ शकतो

रामाला देव मानणाऱयाबरोबरच रावणाला देव मानणाऱयाला सामावून घेणारी, इतकेच नव्हे, तर देव नाहीच असे मानणाऱया नास्तिकालाही जागा देणारी ही गंगेसारखी विशाल जीवनपद्धती आणि अनेक अंतर्विरोधांसह जगणारे, आपले `मर्यादित पुरुषोत्तम'त्व स्वीकारून त्यात सतत सुधारणा करू पाहणारे गांधीजी यांच्यातील अद्वैत ज्याला समजेल, त्याला यापुढेही अनेक पिढय़ांच्या भेजामध्ये `केमिकल लोच्या' घडवून आणण्याची गांधीजींच्या प्रतिमेची, विचारांची क्षमता लक्षात येईल.

(प्रहार)

Saturday, March 12, 2011

आम्ही मरायला समर्थ आहोत...

दिवस- शुक्रवारचा
 
वेळ- हातघाईची
 
वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावरच्या बातम्यांची उतरंड रचण्यासाठीची न्यूज मीटिंग.. पहिली बातमी अर्थातच जपानची.. किंबहुना तीच एकमेव बातमी.. कारण किल्लारी आणि भूजमधल्या भूकंपांपेक्षा कितीतरी जास्त घातक्षमतेचा, या शतकातला पाचव्या क्रमांकाचा विध्वंसक भूकंप तिथे झालाय.. जपानला भूकंपांची सवय असल्यानं तिथली बांधकामं ब-यापैकी भूकंपप्रुफ आहेत, हे सर्वज्ञात आहे, मात्र, या महाभूकंपामुळे उसळलेल्या त्सुनामीच्या प्रचंड लाटांनी जपानच्या भूभागावर राक्षसी आक्रमण केलंय..
 
टीव्हीच्या पडद्यावर सगळं दिसतंय..
..माणसांनी मोठय़ा मेहनतीनं उभे केलेले, भव्यदिव्य, प्रचंड भासणारे इमले निसर्गाच्या अक्राळविक्राळ थपडांनी पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळतायत.. कचकडय़ाच्या खेळण्यांसारखे वाहून जातायत..
 
बाझीचा-ए-अतफाल है दुनिया मेरे आगे
 
होता है शबो रोज, तमाशा मेरे आगे
 
निसर्ग थेट कृतीतूनच सांगतोय की तुमचा हा सगळा खेळ माझ्यासाठी साधा पोरखेळ आहे.. ही भातुकली मी केव्हाही विस्कटू शकतो..
 
निर्गुण, निराकार आणि निर्हेतुक निसर्गालाही सगुण-साकार-क्रूर रूप देण्याची इच्छा प्रबळ करणारा उत्पात त्यावर किती प्रतिक्रिया..
 
60 माणसांच्या ऑफिसात दोन जण असे निघतात, ज्यांची पहिली प्रतिक्रिया, ‘‘असं काहीतरी मुंबईत व्हायला पाहिजे?’’ ही असते..
 
‘‘का?’’
 
‘‘खूप अनावश्यक माणसं झालीयेत इथे.. खूप गर्दी झालीये.. जरा लोकसंख्या कमी होईल इथली.’’
 
‘‘त्यासाठी त्सुनामीची कशाला वाट बघताय?’’, एक परखड सूचना, ‘‘स्वत: पुढाकार घ्या, तुम्ही दोघे हातात हात गुंफून स्वत:च समुद्रात चालत जा. तेवढीच दोनाने तरी लोकसंख्या कमी होईल मुंबईची.’’
 
‘‘हा हा हा..’’
 
‘‘काय पोझिशनला बातमी घ्यायची?’’ आता चर्चा सिरीयस होते..
 
‘‘अर्थातच लीड.. मुख्य बातमी.. आठ कॉलम हेडलाइन’’
 
‘‘अरे, आधी कॅज्युअल्टी किती आहे पाहा, मग ठरवा..’’
 
‘‘काय भयंकर विध्वंस झालाय बघितलंत का? पाच-दहा हजार बळी पक्के..’’
 
‘‘ग्रेट.. आठ कॉलम स्कायलाइनच करायला लागेल मग..’’ बळींचा आकडा जेवढा मोठा, तेवढे पत्रकार खूष’.
 
‘‘छे छे.. फक्त 22 जण मृत्युमुखी पडलेत..’’
 
‘‘अरेरेरेरे, फारच फुसकी निघाली ही त्सुनामी. मग काय मजा?..’’
 
..ती बातमी आठ कॉलम लीडच होते, पण, रात्री उशिरापर्यंत तिच्यात मजाकाही येत नाही.. बळींचा अधिकृत आकडा साठच्या आगेमागेच घुटमळत राहतो.. अनधिकृत आकडा तीनशे-साडेतीनशेच्या घरात आणि बातम्यांमधली नेहमीची भीती’.. हजारो जणांचा बळी गेला असण्याची शक्यता आहे अशी..
 
गंमतीची गोष्ट म्हणजे सगळे वाढीव आकडे किमान एवढे जण तरी मेले असलेच पाहिजेत यारअशा भारतीय मनोवृत्तीतून आलेले.. इकडे मराठी वृत्तवाहिनीवरची निवेदिका हातवारे करून, घशाच्या शिरा ताणून त्सुनामीच्या लाटेवरच्या फळकुटावरच उभी राहिल्यासारख्या आविर्भावात या दुर्घटनेची बातमी रंगवतअसताना जपान टाइम्सआणि योमिउरी शिंबूनया जपानमधल्या वर्तमानपत्रांच्या वेबसाइट मात्र रडारड, सनसनाटी काहीही न करता सौम्यपणे बातमी देतायत आणि तीनशे-चारशे बळींच्या आकडय़ांवर ठाम आहेत..
 भारतीय प्रसारमाध्यमांचीही चूक नाही म्हणा.. त्यांना भारतीय परिप्रेक्ष्यातून प्रत्येक बातमीकडे पाहतात.. ही आपत्ती भारतावर आदळली असती तर?
तर हा आकडा जपानच्या आकडय़ाच्या हजार पटींनी वाढला असता, याबद्दल कोणाच्याही मनात शंका नसेल..
 
पण, तिकडे हा आकडा कमी का?
 
‘‘तिकडे सगळ्यांचं ट्रेनिंग दिलेलं असतं, अ‍ॅलर्ट पण दिले गेले होते, त्यामुळे, जीवितहानीचा आकडा फार वाढणार नाही. त्यातही नुसता भूकंप असता तर एवढीही प्राणहानी झाली नसती, पण, त्सुनामीमुळे ती वाढली,’’ योगायोगाने तेव्हाच ऑफिसात आलेली, जपानमध्ये काही काळ राहिलेली मैत्रीण सांगते, ‘‘आणि हेही पक्कं की जे बळी असतील, ते आपत्तीचे बळी असतील. बेपर्वाईचे, दिरंगाईचे, अनास्थेचे बळी शून्य.’’
 
हे म्हणजे पुण्याच्या भाषेत अशक्यच आहे.. आपल्याकडे असं ट्रेनिंग देण्याचं ठरलं असतं, तर काय काय झालं असतं.. हे करण्यासाठी चार समित्या आणि 15 उपसमित्या नेमण्यात इतका वेळ गेला असता की त्यात पंधरा भूकंप आणि सात त्सुनामी येऊन गेल्या असत्या. नंतर ट्रेनिंगसाठीच्या सामानाची, मनुष्यबळाची किंमत फुगवून टेंडरं निघाली असती, ते पूर्ण होता होता इतका वेळ गेला असता की तोही खर्च दुपटीवर गेला असता. मधल्या काळात दुय्यम दर्जाचं बंडल सामान खरेदी केलं गेल्याच्या बातम्या आल्या असत्या.. आणि ज्यांना हे ट्रेनिंग देण्यासाठी एवढा खटाटोप, त्या सगळ्या सामान्य माणसांनी आयची कटकटम्हणून ट्रेनिंगला न जाताच ते मिळवल्याची बनावट सर्टिफिकेटं पैदा केली असती आणि आणखी एक घोटाळा उघडकीला आला असता..
 
..या सगळ्यात आपल्या सर्वाचे प्रिय लोकप्रतिनिधी आणि त्यांनी चालवलेली सरकार नावाची यंत्रणा सोडून द्या.. नाहीतरी ती देवाला सोडलेल्या सांडासारखी मोकाटच असते.. आपण कसे वागतो, ते पाहा..
 
..दुस-या महायुद्धात लंडनवर जर्मनीच्या विमानांनी तुफान बॉम्बवर्षाव चालवला असताना जीव वाचवण्यासाठी खणलेल्या बंकर्सच्या दारांबाहेर म्हणे शिस्तप्रिय ब्रिटिशांनी रांगा लावल्या होत्या..
 
..आपल्यावर असा हल्ला झाला आणि त्याआधी अशी बंकर्स बांधून तयार असलीच, तर शत्रूचे बॉम्बचे पैसे वाचतील.. बंकरमध्ये शिरण्यासाठी सुरू असलेल्या बेफाम बेशिस्त गदारोळात चिरडून काही लोक हल्ला होण्याच्या आधीच मरतील.. नंतर विमानं थोडी खाली आणून वैमानिकांनी तोंडानंच धुडुम्असा आवाज काढला, तर घाबरून बाहेर होणाऱ्या पळापळीत आणखी काही मरतील..
 
.. देवस्थानांबाहेरच्या गर्दीमध्ये झालेल्या अपघातात एक-दोन जण मेले असताना, अपघात झाला म्हणून झालेल्या पळापळीत आणि चेंगराचेंगरीत शे दोनशे लोक मरतातच ना इथे?..
..उद्या आपल्याकडेही त्सुनामी आली तर आपण तिला निक्षून सांगूयात, तू तिकडे इंडोनेशिया, मालदीव, जावा, सुमात्रा, बाली, हवाई वगैरे बघ.. इकडे आमचे आम्ही मरायला समर्थ आहोत!   

(चित्र : प्रदीप म्हापसेकर)

(प्रहार, १३ मार्च, २०११)

Tuesday, March 8, 2011

'एप्रिल फूल' बनाया...


आपण वर्षातील उरलेले 364 दिवस काय असतो , याची आठवण करण्याचा दिवस म्हणजे एक एप्रिल. - मार्क ट्वेन

इतर सर्व अ-मूर्ख दिनांमध्ये आणि ' एप्रिल फूल ' च्या दिवसात फरक काय ? म्हणजे , तसे बरेच असतील , पण , मुख्य फरक म्हणजे हा दिवस नेमका कधीपासून आणि का ' साजरा ' होऊ लागला आहे , याचा ठोस इतिहास सापडत नाही. परंपरा मात्र जवळपास सर्व संस्कृतींत. त्यामुळे या दिनाची संकल्पना साधारण एकाच काळात अनेक संस्कृतींत आकारत गेली असावी , असा कयास बांधला जातो.

ऋतुराज वसंताचे आगमन साजरे करण्याचा हा उत्फुल्ल काळ. भारतातली होळी , रंगपंचमी , धुळवड यांचा एकंदर खेळकर , थट्टेखोर समाँ आठवा... हीच मनोवस्था जगभरात सर्वत्र असते या काळात. बहुतेक पुरातन संस्कृतींमधली नववर्षाची सुरुवात याच काळात असते.

युरोपातही 16 व्या शतकात नवे वर्ष एक एप्रिलला सुरू व्हायचे. फ्रान्समध्ये 1564 साली नवव्या चार्ल्सच्या राजवटीत हे कॅलेंडर बाद करून एक जानेवारीपासून नवे वर्ष गणणारे ग्रेगरियन कॅलेंडर लागू झाले. अप्रगत वाहतूक साधनांच्या त्या काळात या फतव्याचा पैदल वेगही इतका कमी होता की , काही प्रांतांत ही बातमी पोहोचायला अनेक वषेर् लागली. शिवाय काही प्रांतातल्या कर्मठ नागरिकांनी नवे नववर्ष स्वीकारायला नकार दिला. परिणामी , या , एक एप्रिलच्याच नववर्षाला कवटाळून बसलेल्या अल्पसंख्याकांची गणना बहुसंख्याकांनी मूर्खात केली आणि मग त्यांची टवाळी सुरू झाली , हाच एप्रिल फूल्स डे किंवा ऑल फूल्स डे चा शुभारंभ म्हणे! या दिवशी ' वेड्यां ' ना खोट्या पाटर््यांची आमंत्रणं देऊन त्यांची फजिती उडवायची आणि त्यांना ' पॉयसॉ द अवरिल् ' म्हणजे ' एप्रिलचा मासा ' अशा संबोधनानं चिडवायचं , अशी ही प्रथा. (याच काळात सौरराशींमध्ये सूर्य मीन राशीतून मेष राशीत मुक्काम हलवतो , म्हणून एप्रिलचा ' मासा ') अशा अनुकरणीय प्रथेचा प्रसार झपाट्याने युरोपभर आणि पुढे अमेरिकेत झाला नसता तरच नवल!

तेव्हापासून , एखादं ' गिऱ्हाईक ' हेरून बरोब्बर गळ टाकायचा आणि ' मासा ' गळाला लागला , की ' एप्रिल फूल ' असं चित्कारून आपल्या शहाणपणाची जोरदार जाहिरात करायची , ही परंपरा जगभर साजरी होते. या ' प्रॅक्टिकल जोक ' चा एकच नमुना पाहा. ब्रिटनमध्ये एका एक एप्रिलला एक लघुपट दाखवला गेला. शेवयांपासून तयार केल्या जाणाऱ्या स्पॅघेटी या जगप्रसिद्ध इटालियन पक्वान्नाची ' शेती ' कशी करतात , अशी ती फिल्म होती... ' स्पॅघेटीची झाडं ' दाखवली होती त्यात!

स्कॉटलंडसारख्या देशांचे एका मूर्खदिनाने भागत नाही , त्यामुळे तिथे दोन दिवस तो साजरा होतो. त्यातल्या एका दिवशी थट्टामस्करी करायची ती मनुष्यशरीराचा पार्श्वभाग या आणि एवढ्याच ' बैठकी ' वर. पोर्तुगालमध्येही एप्रिल फूलांना दोन दिवस बहाल आहेत. गंभीर , विचारपरिप्लृत रोममध्ये तो दिलखुलास हसण्याचा दिवस म्हणून 25 मार्चला साजरा होतो.

सगळ्यात गंमत मेक्सिकोची. इथे ' एप्रिल फूल ' चा दिवस साजरा होतो तो 28 डिसेंबरला...

5.4.03

... काय म्हणावं या मूर्खपणाला , असं म्हणत पोटभर हसून घ्या... कारण मार्क ट्वेननंच म्हणून ठेवलंय ,

जगात मूर्ख लोक आहेत , याबद्दल आपण कृतज्ञ असलं पाहिजे , नाहीतर उरलेले सगळे (शहाणे ठरण्यात) यशस्वी कसे झाले असते!

(महाराष्ट्र टाइम्स) 

मनोरंजन!

गर्दीची वेळ. फास्ट ट्रेन पहिल्याच स्टेशनात पूर्ण भरलेली. पुढे तीन-चार स्टेशनांत गाडी ओव्हरफुल्ल. मुंगीलाही शिरायला जागा नाही अशा गर्दीत तरीही पुढच्या स्टेशनांवर माणसं रेटारेटी, धक्काबुक्की करून चढत होती.

अशाच एका स्टेशनावर तो धावत आला... पाठीला सॅक लटकावलेला १६-१८ वर्षांचा मुलगा... गाडी ऐन सुटण्याच्या बेताला... त्याला घाई असावी... एरवी स्टेशनात गाडी उभी असतानाही तिच्यात शिरण्याची हिम्मत कुणी केली नसती अशा परिस्थितीत त्याने धावती गाडी पकडली... पकडली म्हणजे काय... एक पाय ठेवायला जागा मिळवली आणि हाताने धरायला दांड्याचा पंजाएवढा तुकडा... या दोन आधारांवर देह झुलतोय... सॅक लटकतेय...

गाडीने वेग घेतला तशी त्याच्या चेहऱ्यावर भीतीची छाया पडली... असा गाडीला तो पहिल्यांदाच लटकला असणार... आतून येणारा प्रवाशांचा रेटा धनुष्यासारखी कमान केलेल्या अंगावर झेलत, झपझप पाठी जाणाऱ्या इलेक्ट्रिकच्या खांबांपासून स्वत:ला वाचवत, प्रचंड वेगाने सुसाट चाललेल्या गाडीत फक्त पायाच्या चवड्याच्या आधारावर उभं राहणं हे किती भयानक असतं, याचा प्रत्यय त्याला येत होता... पुढचं स्टेशनही बऱ्यापैकी लांब होतं... त्याची अस्वस्थता खिडकीतून त्याला पाहताना समजत होती... खिडकीतून दारावरचा तो संपूर्ण दिसत होता, म्हणजे तो किती बाहेर होता पाहा!

अधलीमधली स्टेशन्स मागे पडत गेली. तो त्याच्या अस्थैर्यात स्थिरावला आणि हळूहळू त्याचा चेहरा रिलॅक्स होऊ लागला. भन्नाट वाऱ्यात भुरभुरणारे केस, आपण काहीतरी धाडसी करून बसलो आहोत, याची जाणीव... शरीरातलं अॅड्रेनलीन चढू लागलं असावं... सराईत लटकूंचे चेकाळलेले चीत्कार त्याच्यातही जोश भरू लागले असावेत... पुढचं स्टेशन आलं, तोवर त्याच्या चेहऱ्यावर नशा केल्यासारखं हसू पसरलेलं होतं... उत्कट पण क्षणभंगुर.

या स्टेशनात आतली गदीर् थोडी आत दाबली गेली. यानं ठरवलं असतं तर आता आत सरकून सुरक्षित होऊ शकला असता. पण, आता त्याला या जीवघेण्या धाडसातलं मनोरंजन गवसलं होतं... त्याने दारावरच्या सराईतासारखं प्लॅटफॉर्मवरच्या दोनचारजणांना आत शिरू दिलं आणि स्वत: पुन्हा एका पायावर एका हातावर देह तोलून बाहेर लटकत राहिला...

... आता त्याला अशा प्रवासाचं व्यसन लागणार आहे...

... पुढे मागे आणखी भीड चेपली की तो लेडीजशेजारच्या दारावर लटकून हरएक प्लॅटफॉर्मच्या विरुद्ध दिशेला उतरेल आणि लेडीजमधल्या छोकऱ्या-आण्ट्यांच्या कौतुकभरल्या नजरा झेलत टेन सुटल्यावर फुटबोर्डला लटकून ट्रेन पकडण्याची हुकमी कसरत करून दाखवेल...

कुणाचा असेल हा मुलगा?

कुणाचा असेल हा भाऊ?

त्याच्या घरातल्यांना ठाऊक असेल, आपला मुलगा कसा प्रवास करतो ते?...

... तुम्हाला ठाऊक आहे तुमचा मुलगा, भाऊ, नवरा, प्रियकर, भाचा, पुतण्या कसा प्रवास करतो ते?

कधी विचारलंयत त्याला?

(महाराष्ट्र टाइम्स)

बळी... कट्टर (अन्ध)श्रद्धेचे!


देशप्रेम म्हणजे आपण ज्या भूभागात जन्मलो तो भूभाग- केवळ आपण तिथे जन्मलो म्हणून- जगातील सर्वश्रेष्ठ भूभाग मानण्याची प्रवृत्ती'...

...जॉर्ज बर्नार्ड शॉने केलेली ही देशप्रेमाची जळजळीत व्याख्या धर्मप्रेम, धर्मनेताप्रेम, समाजप्रेम, पक्षप्रेम, पुढारीप्रेम, जातिप्रेम, राज्यप्रेम, जिल्हाप्रेम, गावप्रेम, गल्लीप्रेम, मतप्रेम आणि विचारसरणीप्रेमालाही तंतोतंत लागू पडते... माणसांना स्वत:च्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक तरी किती असतं पाहा. एखादी गोष्ट आपल्या पचनी पडली नाही, तर आपल्या पचनसंस्थेत काही बिघाड असू शकतो, ही शंकाही शिवत नाही त्यांना. त्यामुळेच एखाद्या सिनेमा- नाटकातल्या फुटकळ गोष्टीनं भावना दुखावल्याचं भांडवल करून लोक थिएटरं फोडायला, बाँबस्फोट करायला, पोस्टरं फाडायला तयारच असतात. इतक्या या भावना सदासर्वदा हळहळ्या हुळहुळ्या कशा?

त्यातही ही भावना धर्मभावना असली, तर शांतम् पापम्! कारण प्रत्येकाच्या मते त्याच्या त्याच्या धर्मातलं सर्वकाही सत्यम् शिवम् सुंदरम्! त्याला धक्का पोहोचवणारं काहीही घडलं की सामूहिक पित्तदोष उफाळून येतो आणि सामुदायिक गुंडगिरीला उधाण येतं. अलीकडच्या काळात 'सिन्स', 'ब्लॅक फ्रायडे', 'गर्लफ्रेंड', 'फायर', 'वॉटर', 'गदर', 'जो बोले सो निहाल' वगैरे सिनेमांवरून जो गदारोळ माजवला गेला आहे, त्यात नवं काही नाही. आपल्या परंपराप्रिय देशात ही परंपराही किती मोठी आहे, हे याच पानावर ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक इसाक मुजावर यांच्या लेखातून समजून येईल. आणि तो वाचताना, किती फालतू गोष्टींवर इथे समाजाच्या भावना भडकतात, हे पाहून हसूही येईल. पण, पुढे जाऊन ज्या गोष्टीचं हमखास हसं होणार आहे, ती ती गोष्ट समाजातले स्वयंघोषित संस्कृतिरक्षक त्या त्या वेळी मात्र फार पोटतिडकीनं, तळमळीनं करत असतात, हे सर्वात विनोदी आहे.

या मंडळींना ना संस्कृतीची जाण असते, ना धर्मविचाराचा अभ्यास असतो ना कलेचं भान. त्यांना एकच कला अवगत असते, आपल्याला काही पटलं नाही की लगेच त्या गोष्टीचा विध्वंस करून मोकळं व्हायचं. हीच यांची 'संस्कृती' आणि हाच यांचा 'धर्म'. कशाचीही चिकित्सा नाकारणारा हा आंधळा, अवैज्ञानिक आविर्भाव असतो फक्त. प्रगत समाजांकडे आशाळभूतपणे पाहणारे, त्यांच्या जीवनशैलीची आंधळी नक्कल करणारे आतून असे अप्रगत असतात, म्हणून त्या प्रगतीची नक्कल काही, काहीकेल्या जमत नाही.

अमेरिकेसारख्या देशात राष्ट्रध्वजालाही पावित्र्याच्या सोवळ्यातून मुक्त ठेवण्यात आलं आहे. म्हणून तिथले, राष्ट्रध्वजाची अंतर्वस्त्रं करून पेहरणारे लोक राष्ट्रप्रेमीच नाहीत, असं काही सिद्ध झालेलं नाही किंवा तो देश 'उज्ज्वल परंपरां'ना मुकल्यामुळे त्याचं भौतिक-आधिभौतिक नुकसान झाल्याची नोंद नाही. आणि जागतिक अध्यात्म, संस्कृती, मूल्यं, पावित्र्य यांची स्वघोषित गंगोत्री असलेल्या देशांनी जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात अमेरिकेच्या वरताण कामगिरी केल्याचीही नोंद नाही. मग, उपयोग काय तुमच्या कट्टरपणाचा?

फ्रान्सचा राष्ट्रपुरुष असलेल्या नेपोलियनवर तिथे विनोदी सिनेमा निघू शकतो. त्याचा मनसोक्त आनंद लुटणाऱ्या फ्रंेच माणसाच्या नेपोलियनविषयीच्या आदरात काही उणीव निर्माण होत नाही. या दोन गोष्टी तो स्वतंत्र ठेवू शकतो. आपल्याकडे एखाद्या राष्ट्रपुरुषावर असा सिनेमा काढण्याचा विचार कुणी स्वप्नात तरी करू शकेल का? (अनेक राष्ट्रपुरुषांवरचे 'गंभीर' सिनेमेही मांडणीत 'विनोदी' ठरतात ते सोडा.) महात्मा गांधींना मात्र कुणीही 'कार्टून'छाप पद्धतीनं चित्रित करू शकतो, त्यावर फारसा गदारोळ होत नाही, हे लक्षणीय आहे. आणि समस्त राष्ट्रपुरुषांमध्ये तेच गांधी आजही आंतरराष्ट्रीय स्तरावर 'रेलेव्हंट' ठरतात, हा योगायोग नाही.

प्रगत देशांमध्ये माणसे कलासाक्षर आहेत, त्यांना व्यक्तिगत भावना बाजूला ठेवून निखळ कलास्वाद घेता येतो. आपल्या देशात माणसे अजून अडाणी आहेत, तेव्हा तिथले निकष इथे लावू नयेत, असा एक लोकप्रिय युक्तिवाद आहे. हे म्हणजे एखादं मूल 35 वर्षांचं झालं तरी रांगतेच आहे, तर त्याच्याकडून चालण्याची अपेक्षा करू नका, असं म्हणण्यासारखं आहे.

...फुटकळ भावनांचे चोचले पुरवण्याइतकी श्ाीमंती आपल्याकडे नाही. या देशात करू पाहणाऱ्याला बरीच कामे आहेत. त्यासाठी जरा रांगणं सोडून, उभे राहून चालायचा प्रयत्न तरी करून पाहायला काय हरकत आहे?

(महाराष्ट्र टाइम्स)