Tuesday, March 8, 2011

गलत हाथ

'' हम हिंदुस्थान को गलत हाथों में नहीं जाने देंगे...''

' जोधा-अकबर'मधला अकबर हा संवाद म्हणतो, तेव्हा शिरस्त्राण आणि चिलखताआडून महाराष्ट्राचा नवनिमिर्त महानायक बोलतोय की काय, असा भास होतो...

' गलत हाथ'...?

कोणाचे?

अफगाण आक्रमकांचे?

आणि मग तू कोण?

तुझे हाथ 'सही' कसे ठरतात?

अकबर हा राजपुतान्यात जन्म झालेला मुघल. म्हणून तो स्वत:ला 'भूमिपुत्र' मानतो किंवा तसं प्रोजेक्ट करतो. त्याच 'न्याया'नं तो 'भूमिकन्या' जोधाशी लग्नही करतो... राजकीय धोरणाचा एक भाग म्हणून. अकबर हा न्यायी, सहृदयी सम्राट होता, तरीही तो मुघल होता आणि 'राजा'ही होता... लोकांनी निवडून दिलेला प्रतिनिधी नव्हता. या 'उपऱ्या' मोगलांनी आपल्यावर राज्य करावं हे न रूचलेले अनेक राजे राजपुतान्यात होतेच की!

आता हे राजे 'भूमिपुत्र' होते, हिंदू होते, म्हणून त्यांची राजवट प्रजेसाठी सुखा-समाधानाची, शांतीची, भरभराटीची असेल, असंही काही नाही. (तसं असतं तर चातुर्वण्यासारख्या, अस्पृश्यतेसारख्या समाजाच्या मोठ्या घटकावर अन्याय करणाऱ्या रूढीपरंपरांविरुद्ध काही राजकीय निर्णय झाले असते आणि देशात विज्ञान-तंत्रज्ञानाचा काहीएक विकास झाला असता.) तत्कालीन राजांचे पेहराव, ऐषारामी महालांमधले भोगविलास आणि गलिच्छ राजकीय तडजोडी यांना विटलेला वर्ग समाजात असेलच की! म्हणजे याही राज्यर्कत्यांचे हात 'सही' होते, असं म्हणवत नाही...

... मग हळूहळू अकबराच्या संवादाचा अर्थ उमगू लागतो... राज्यर्कत्यांसाठी देश-प्रांत-समाज हे वडिलाजिर्त मालमत्तेसारखे असतात किंवा स्वअजिर्त स्त्रीसारखे. त्यांची 'मालकी' स्वत:कडेच राहणे महत्त्वाचे. जो तिला आव्हान देईल, तो उपरा. त्याचे हात 'गलत'...

... म्हणून अकबर अफगाणांना गलत म्हणणार...

राजपूत राजे अकबराला गलत म्हणणार...

पिचलेली जनता राजे-रजवाड्यांना गलत म्हणणार...

...

झाडं, मुके प्राणी, पक्षी वगैरे 'मूळ भूमिपुत्रां'ना बोलता येत नाही म्हणून ठीक आहे...

... ते कदाचित अखिल मानवजातीलाच गलत म्हणाले असते!!!



(महाराष्ट्र टाइम्स) 

No comments:

Post a Comment