कार्यकर्ता : अहो अहो आजोबा! इकडे कुठे घुसताय असे ?
आजोबा : इच्छापूतीर् फाऊंडेशनचं ऑफिस आहे ना हे ? पत्ता तर हाच दिलाय.
कार्यकर्ता : पत्ता बरोबरच आहे. पण , इथे तुमचं काय काम ?
आजोबा : माझीही एक इच्छा आहे. मला ना...
कार्यकर्ता : एक मिनिट , एक मिनिट आजोबा! अहो , आम्ही इच्छापूतीर् करतो ती असाध्य विकारांनी ग्रस्त बालकांची...
आजोबा : हात्तिच्या! एवढंच ना! अहो , म्हातारपण म्हणजे दुसरं बालपणच नाही का ? आणि इतकी वर्षं जिवंत राहण्याइतका असाध्य विकार दुसरा कोणता असायचा ? आणि माझी इच्छा फार साधी आहे... मला ना , एक तिकीट हवंय फक्त!
कार्यकर्ता : आजोबा , निवडणुकांना अजून खूप वेळ आहे. आणि स्वत: रिटायरमेंटच्या वयानंतरही खुचीर्ला चिकटून तरण्याताठ्या धडधाकटांना व्हीआरएस देण्याची दळभदी धोरणं आखणाऱ्या तुमच्या वयाच्या राजकारण्यांची देशात कमतरता आहे की काय ?
आजोबा : अहो , पण मला निवडणुकीचं तिकीट नकोय. अहो , या देशात जन्मल्यामुळे मी बालपणापासून ' बाय डिफॉल्ट ' क्रिकेटवेडा आहे. दुसरा कुठला खेळ कधी खेळलाही नाही , बघितलाही नाही ना कधीच. जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी क्रिकेट एके क्रिकेट. असो , भारताच्या क्रिकेट मॅचचं तिकीट हवंय मला.
कार्यकर्ता : ते कशाला ?
आजोबा : कशाला म्हणजे ? मॅच बघायला!
कार्यकर्ता : भले शाब्बास! जगाच्या फारच मागे आहात तुम्ही आजोबा! अहो क्रिकेट मॅचचं तिकीट कुणी ' काढत ' वगैरे नसतं. मॅचचं तिकीट एकतर ' मिळतं ' किंवा ' मिळवावं लागतं. ' तुम्ही पोलिस आहात का ?
आजोबा : नाही.
कार्यकर्ता : मग क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी , पदाधिकाऱ्याचे नातेवाईक किंवा मित्र किंवा बॉस किंवा नोकर ?
आजोबा : नाही.
कार्यकर्ता : मंत्री किंवा मंत्रालयात अधिकारी आहात ? पालिकेचे सदस्य किंवा अधिकारी आहात ?
आजोबा : यातलाही काही नाही.
कार्यकर्ता : मॅचच्या प्रायोजकांपैकी किंवा जाहिरातदारांपैकी आहात ?
आजोबा : नाही.
कार्यकर्ता : मग आकाशवाणी , दूरचित्रवाणी , प्रसिद्धी माध्यमं , टपाल-तार खातं , फायर ब्रिगेड , सफाई कर्मचारी , पाणी पुरवठा वगैरे ऐनवेळी उपयोगी किंवा उपदवी ठरू शकणाऱ्या यंत्रणांशी काही संबंध ?
आजोबा : अजिबातच नाही.
कार्यकर्ता : म्हणजे तुम्ही या देशाच्या सामान्य , खरंतर अतिसामान्य नागरिकांपैकी एक आहात. आणि तरीही तुम्हाला मॅचचं तिकीट हवंय ?
आजोबा : कमाल आहे तुमची ? अहो , स्टेडियमवरच्या कुठल्याही आसनासाठी योग्य किंमत मोजायची आणि त्यासाठी शिस्तशीर रांगेत उभं राहण्याचीही माझी तयारी आहे.
कार्यकर्ता : आणि फक्त तेवढ्यावर आपल्याला तिकीट मिळेल , असं वाटतंय तुम्हाला ? तब्येत बरी आहे ना तुमची ? अहो , ही काय विटीदांडू स्पर्धा आहे की आट्यापाट्यांची ? हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्याच देशांमध्ये खेळल्या जाणाऱ्या , पण तरीही महान अशा एका आंतरराष्ट्रीय खेळाची स्पर्धा आहे ही! तिचं तिकीट मिळायला सत्ता असावी लागते , वशिला असावा लागतो किंवा काळ्या बाजारातून खरेदी करायची तयारी ?
आजोबा : यापेक्षा वेगळा मार्गच नाही आमच्यासारख्यांसाठी ?
कार्यकर्ता : आहेत , बरेच आहेत! असं करा. तुम्ही या कंपनीची कार खरेदी करा. फक्त पाच लाखांची. मग शोरूमसमोर तुम्ही बॅटनं चेंडू असा तडकावायचा की , बरोब्बर तुमच्याच गाडीचीच काच फुटली पाहिजे. ते जमलं तर तुम्हाला तिकीट मिळण्याचा चान्स आहे. दर पाचशे गाड्यांमागे एक तिकीट मिळणारच. नाहीतर या कंपनीचा फ्रीज घ्या किंवा त्या कंपनीचा टीव्ही. अचूक बोलिंग करून तीन टीव्हींमधला आपल्या टीव्हीचा मिडल स्टम्प उडवायचा. दर हजारी एक तिकीट पक्कं.
आजोबा : अहो , गेल्या मॅचच्या वेळेलाच ही सगळी खरेदी करून झाली माझी. त्यात पैसे गेले ते गेले आणि नेम चुकल्यामुळे नुकसानभरपाईचाही भुर्दंड पडला.
कार्यकर्ता : तुम्हाला खरं सांगू का आजोबा! एवढं सगळं करून तुम्हाला तिकीटं मिळणार ती एकदम कंडम ईस्ट किंवा वेस्ट स्टँडची. आत शिरताना धक्काबुक्की. प्यायला पाणी मिळायची मारामार. खायला-प्यायला मिळालंच तर दामदसपट भावानं. आणि मॅच दिसणार ती भलत्याच भीषण अँगलनं. तेव्हा हे सगळे उपक्रम करण्यापेक्षा तुम्ही इतर सर्व सर्वसामान्य भारतीय मॅच पाहण्यासाठी जे करतात तेच का नाही करत ?
आजोबा : ते काय ?
कार्यकर्ता : काही नाही , फक्त टीव्ही ऑन करायचा!!!
(महाराष्ट्र टाइम्स)
No comments:
Post a Comment