Tuesday, March 8, 2011

बरोबर

 लोकल ट्रेनमध्ये आपल्याबरोबर माणसं असतात, हे सगळ्यांनाच ठाऊक असतं... पण, ती सगळी 'बरोबर' माणसं असतात, हे कधी तुमच्या लक्षात आलंय का?

शेजारी बसलेल्या माणसांचं बोलणं कधी नीट ऐकलंत का? त्यात फार गैर वाटून घेण्याचं कारण नाही. तुमची इच्छा नसली तरी ते ऐकू येतंच की! हल्ली तर शेजारच्या माणसाला बोलण्यासाठी त्याच्या शेजारी कुणी असण्याची गरजही नसते. मोबाइल असतो ना!

तर शेजारचा माणूस इतर कुणाशीतरी बोलायला सुरुवात करतो. बहुतेकवेळा बोलण्याचा विषय असतो तो कुणाशीतरी झालेला वाद, भांडण, तंटा, बखेडा, ऑफिसमधला किंवा घरगुती इश्यू किंवा दोघांनी मिळून केलेली तिसऱ्याची नालस्ती. त्यातली सगळ्यात मोठी गंमत अशी असते की बोलणारा जसजसा त्याची बाजू (तिसऱ्या माणसासमोर) मांडत जातो, तसतशी ती आपल्यालाही पटत जाते. अगदी हमखास पटत जाते. कारण, अशा प्रकारांत त्याच्याकडून झालीच असेल, तर एकच गफलत झालेली असते... माणुसकीने वागण्याची...

''... मी त्याला किती समजावून सांगितलं, पण ऐकायला तयार नाही यार!...''

''... आता तूच मला सांग, या केसमध्ये यापेक्षा वेगळं मी काय करायला हवं होतं?...''

''... अरे, बेअक्कल मुलगी आहे! स्वत:चं नुकसान करून घेणार आहे...''

''... मी परफेक्ट फील्डिंग लावली आणि तो बरोब्बर अडकला... रेड हॅण्ड पकडला त्याला...''

''... बॉसला बोल्लो मी, मला शाणपणा शिकवू नको. तो पण टरकतो आपल्याला. त्याला माहितीये, आपलं जजमेंट कधी फेल नाय जात...''

''... मी त्याला स्पष्ट बोल्ली, इतका तोंड वर करून बोलू नकोस. आधीचे दिवस आठव जरा...''

''... हम तो पहलेसेही कह रहे थे कि जो तू कर रहा है, गलत कर रहा है...''

''... आता मला सांग यात माझं काही चुकलं का?...''

...

'' छे छे, तुमचं काहीच चुकलं नाही. तुम्ही केलंत ते सगळं बरोबर... अगदी हण्ड्रेड परसेण्ट बरोबर...'' शेजाऱ्याच्या शेजाऱ्याने किंवा मोबाइलवर त्याचं बोलणं ऐकणाऱ्याने उत्तर देण्याच्या आता आपल्या मनात त्याच्या या प्रश्ानचं हेच उत्तर दाटून येतं...

आणि मग एक प्रश्ान्ही पडतो...

ज्यांचं साफ चुकतं, जे अडकतात, पकडले जातात, ज्यांची हण्ड्रेड परसेण्ट चूक असते, ते सगळे कोणती ट्रेन पकडतात?

(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment