Monday, March 7, 2011

महाजन साहेब, हमारा चुक्याच...


चुक्या म्हंजे काय साधासुधा नही , एकदम सपशेल चुक्या! अहो , भारताचं नेतृत्त्व करू इच्छिणाऱ्याचे आई-वडील दोघेही भारतीय हवेत , असं तुम्ही म्हणालात , तेव्हा आमच्या डोक्यात किडा वळवळला... आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांशी , वसुंधराराजेंशी तुमची काय बुवा दुश्मनी असेल ? ( राहुल आणि प्रियांकाप्रमाणेच) वसुंधराराजेंचे बाबा भारतीय असले तरी आई , स्व. विजयाराजे शिंदे या तर नेपाळच्या. म्हणजे ' विदेशी ' मूळ असणाऱ्या. पण त्या तर तुमच्या पक्षाच्या नेत्या. म्हणजे सोनिया गांधींच्याही बऱ्याच आधी ' विदेशी मुळा ' ला तुमच्याच पक्षानं खतपाणी घातलं म्हणा की!

अरारारारा! परत हमारा चुक्याच!

नेपाळ हे भूतलावरचं एकमेव हिंदूराष्ट्र आहे. तेव्हा तिथलं कुणीही , कधीही आपल्यासाठी ' विदेशी ' कसं ठरेल ? ( आता हिंदूराष्ट्र असूनही , शेजारी असूनही नेपाळ हा ' विदेश ' च का आहे , हा प्रश्न अलाहिदा.) शिवाय , मूळ भारतीय वंशाचे नागरिक विदेशांत- कधी मॉरिशसमध्ये , कधी फिजीमध्ये , कधी अन्य कुठे सत्तास्थानी पोहोचतात , तेव्हा आपण त्यांचा सार्थ अभिमान बाळगायचा असतो ; पण , बाहेरच्या कुणाला इथे मात्र समान संधीला मज्जाव हा आपला ' न्याय ' आहे , याचाही विसर पडला... चुक्याच हमारा!

बाकी काही म्हणा! सोनिया गांधींबद्दल तुम्ही आम जनतेत जागवलेल्या प्रखर रोषामुळे काँग्रेसला आता राहुल आणि प्रियांकापुढे लांगूलचालन करण्याची पाळी आली आहे , हा तुमचा शतप्रतिशत विजय आहे. त्याबद्दल नि:संकोचपणे ' गुड फील ' करून घ्यायला हरकत नाही. शंभर वर्षार्ंची परंपरा सांगणाऱ्या काँग्रेसमधल्यासारखं लाजिरवाणं व्यक्तिस्तोम तुमच्या पक्षात नाही , तुमच्या मित्रसेनेतही नाही , याबद्दल आम्हालाही फारच गुड फील होतं बरं का! तुमच्याकडे कशी अडवाणीजी , मुरली मनोहरजी , सुषमाजी , तुम्ही स्वत:जी , जेटलीजी , उमाजी वगैरे तरुण रक्ताच्या , तरुण नेत्यांची फळीच आहे. आता निवडणुकांच्या वेळी मतदारांचा अटल विश्वास कॅश करण्यासाठी , वाजपेयी हेच आमचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत , हे तुम्हाला जाहीर करावं लागतं खरं ; पण , याला काय व्यक्तिस्तोम म्हणायचं का ? ही तर मजबूरी! (काँग्रेसच्या राजवटीत ' मजबूरी का नाम ' वेगळं होतं!) आणि तुमच्या मित्रसेनेत तर , उच्चपद ही कुणाचीही मक्तेदारी नाही , असं स्पष्ट शब्दांत फटकारलंय सेनापतींनी. कुणाचीही म्हणजे... सामान्य कार्यर्कत्याचा नेता झालेल्या कुणाचीही. हा सामान्यजनांसाठीचा निकष युवराजांना किंवा नुसत्याच राजांना कसा लागू असेल ? पण , हे काही व्यक्तिस्तोम , घराणेशाही किंवा आडनावमाहात्म्य नाही बरं का! ते सगळे अवलक्षणी प्रकार चालतात ते त्या दळभदी काँग्रेसमध्ये!

पण , महाजनसाहेब , तुमचा मुद्दा आम्हाला पटला. तुमच्या पिढीची , खासकरून तुमच्या पिढीच्या नेत्यांची झालेली पंचाईत आम्हाला कळते. तुम्ही तरुण होतात तेव्हापासून वरच्या जागा अनुभवी वृद्धांनी बसमधल्या ' वृद्धांसाठी राखीव ' आसनांसासारख्या अडवून ठेवल्या आहेत. आता कुठे तुमच्या दुसऱ्या फळीला संधी मिळायची शक्यता निर्माण झाली , तेवढ्यात तारुण्याचं इतकं सुसाट वारं सुटलं देशात की आता तुम्ही ' म्हातारे ' ठरण्याची भीती निर्माण झाली! अहो , पण 50 टक्के मतदार पंचविशी-तिशीतले आहेत म्हणून काय त्या वयोगटातल्या नेतृत्त्वाकडे सत्ता सोपवायची ?

तरुण वयात भलते आदर्श असतात डोक्यात. जग सुधारायची , जमल्यास उलथून टाकायची उमीर् असते. मूल्याबिल्यांवरच्या भाबड्या श्ाद्धांचे , दुधाचे दातही पडलेले नसतात. अशा उत्साही , सचोटीच्या , देशप्रेमानं भारलेल्या , आदर्श समाज (वाली-शंबुकाचा ' वध ' करणारं , कुणा धोब्याच्या बकवासीवर विसंबणारं ' रामराज्य ' नव्हे) निर्माण करण्याचं स्वप्नं पाहणाऱ्या पिढीच्या हाती सत्ता सोपवायची का ? सत्ताकारणाचा रथ न कुरकुरता चालवायचा , तर नोकरशाहीपासून गुंडपुंडांपर्यंत कुठकुठले स्क्रू टाइट-ढिले करावे लागतात , कुठेकुठे ' वंगण ' घालावं लागतं, जातीपातींची , धर्माबिर्मांची कोंबडी झुंजत ठेवावी लागतात. शेवटी आपली म्हणून काही लोकशाहीची 'संस्कृती' आहे की नाही? ती 'पाळावी' लागते. देशातल्या सगळ्याच समस्या संपल्या तर राजकारण्यांना काम काय उरणार , हे लक्षात घेऊन वेळप्रसंगी नव्या समस्या निर्माण कराव्या लागतात. हे सगळं या कोवळ्या पोरांना जमणार आहे का?

तेव्हा तुमची सूचना आम्हाला शतप्रतिशत मान्य आहे. इन फॅक्ट आम्ही तिला आमच्याकडून एक उपसूचना जोडत आहोत- या देशात उच्चपद यापुढे, ज्यांचा जन्म 1950 च्या आसपास, शक्यतोवर 1949 मध्ये, त्यातही साधारण त्या वर्षाच्या उत्तरार्धात , शक्यतोवर ऑक्टोबरमध्ये, त्यातही ऑक्टोबरच्या उत्तरार्धात, शक्यतोवर 30 ऑक्टोबरला जन्मलेल्या अनुभवी 'तरुणां'कडेच सोपवावं...

... ही तुमचीच जन्मतारीख आहे का?...

... बोंबला, परत हमारा चुक्याच!!!

(महाराष्ट्र टाइम्स) 

No comments:

Post a Comment