Tuesday, March 8, 2011

'एप्रिल फूल' बनाया...


आपण वर्षातील उरलेले 364 दिवस काय असतो , याची आठवण करण्याचा दिवस म्हणजे एक एप्रिल. - मार्क ट्वेन

इतर सर्व अ-मूर्ख दिनांमध्ये आणि ' एप्रिल फूल ' च्या दिवसात फरक काय ? म्हणजे , तसे बरेच असतील , पण , मुख्य फरक म्हणजे हा दिवस नेमका कधीपासून आणि का ' साजरा ' होऊ लागला आहे , याचा ठोस इतिहास सापडत नाही. परंपरा मात्र जवळपास सर्व संस्कृतींत. त्यामुळे या दिनाची संकल्पना साधारण एकाच काळात अनेक संस्कृतींत आकारत गेली असावी , असा कयास बांधला जातो.

ऋतुराज वसंताचे आगमन साजरे करण्याचा हा उत्फुल्ल काळ. भारतातली होळी , रंगपंचमी , धुळवड यांचा एकंदर खेळकर , थट्टेखोर समाँ आठवा... हीच मनोवस्था जगभरात सर्वत्र असते या काळात. बहुतेक पुरातन संस्कृतींमधली नववर्षाची सुरुवात याच काळात असते.

युरोपातही 16 व्या शतकात नवे वर्ष एक एप्रिलला सुरू व्हायचे. फ्रान्समध्ये 1564 साली नवव्या चार्ल्सच्या राजवटीत हे कॅलेंडर बाद करून एक जानेवारीपासून नवे वर्ष गणणारे ग्रेगरियन कॅलेंडर लागू झाले. अप्रगत वाहतूक साधनांच्या त्या काळात या फतव्याचा पैदल वेगही इतका कमी होता की , काही प्रांतांत ही बातमी पोहोचायला अनेक वषेर् लागली. शिवाय काही प्रांतातल्या कर्मठ नागरिकांनी नवे नववर्ष स्वीकारायला नकार दिला. परिणामी , या , एक एप्रिलच्याच नववर्षाला कवटाळून बसलेल्या अल्पसंख्याकांची गणना बहुसंख्याकांनी मूर्खात केली आणि मग त्यांची टवाळी सुरू झाली , हाच एप्रिल फूल्स डे किंवा ऑल फूल्स डे चा शुभारंभ म्हणे! या दिवशी ' वेड्यां ' ना खोट्या पाटर््यांची आमंत्रणं देऊन त्यांची फजिती उडवायची आणि त्यांना ' पॉयसॉ द अवरिल् ' म्हणजे ' एप्रिलचा मासा ' अशा संबोधनानं चिडवायचं , अशी ही प्रथा. (याच काळात सौरराशींमध्ये सूर्य मीन राशीतून मेष राशीत मुक्काम हलवतो , म्हणून एप्रिलचा ' मासा ') अशा अनुकरणीय प्रथेचा प्रसार झपाट्याने युरोपभर आणि पुढे अमेरिकेत झाला नसता तरच नवल!

तेव्हापासून , एखादं ' गिऱ्हाईक ' हेरून बरोब्बर गळ टाकायचा आणि ' मासा ' गळाला लागला , की ' एप्रिल फूल ' असं चित्कारून आपल्या शहाणपणाची जोरदार जाहिरात करायची , ही परंपरा जगभर साजरी होते. या ' प्रॅक्टिकल जोक ' चा एकच नमुना पाहा. ब्रिटनमध्ये एका एक एप्रिलला एक लघुपट दाखवला गेला. शेवयांपासून तयार केल्या जाणाऱ्या स्पॅघेटी या जगप्रसिद्ध इटालियन पक्वान्नाची ' शेती ' कशी करतात , अशी ती फिल्म होती... ' स्पॅघेटीची झाडं ' दाखवली होती त्यात!

स्कॉटलंडसारख्या देशांचे एका मूर्खदिनाने भागत नाही , त्यामुळे तिथे दोन दिवस तो साजरा होतो. त्यातल्या एका दिवशी थट्टामस्करी करायची ती मनुष्यशरीराचा पार्श्वभाग या आणि एवढ्याच ' बैठकी ' वर. पोर्तुगालमध्येही एप्रिल फूलांना दोन दिवस बहाल आहेत. गंभीर , विचारपरिप्लृत रोममध्ये तो दिलखुलास हसण्याचा दिवस म्हणून 25 मार्चला साजरा होतो.

सगळ्यात गंमत मेक्सिकोची. इथे ' एप्रिल फूल ' चा दिवस साजरा होतो तो 28 डिसेंबरला...

5.4.03

... काय म्हणावं या मूर्खपणाला , असं म्हणत पोटभर हसून घ्या... कारण मार्क ट्वेननंच म्हणून ठेवलंय ,

जगात मूर्ख लोक आहेत , याबद्दल आपण कृतज्ञ असलं पाहिजे , नाहीतर उरलेले सगळे (शहाणे ठरण्यात) यशस्वी कसे झाले असते!

(महाराष्ट्र टाइम्स) 

No comments:

Post a Comment