Tuesday, March 8, 2011

मनोरंजन!

गर्दीची वेळ. फास्ट ट्रेन पहिल्याच स्टेशनात पूर्ण भरलेली. पुढे तीन-चार स्टेशनांत गाडी ओव्हरफुल्ल. मुंगीलाही शिरायला जागा नाही अशा गर्दीत तरीही पुढच्या स्टेशनांवर माणसं रेटारेटी, धक्काबुक्की करून चढत होती.

अशाच एका स्टेशनावर तो धावत आला... पाठीला सॅक लटकावलेला १६-१८ वर्षांचा मुलगा... गाडी ऐन सुटण्याच्या बेताला... त्याला घाई असावी... एरवी स्टेशनात गाडी उभी असतानाही तिच्यात शिरण्याची हिम्मत कुणी केली नसती अशा परिस्थितीत त्याने धावती गाडी पकडली... पकडली म्हणजे काय... एक पाय ठेवायला जागा मिळवली आणि हाताने धरायला दांड्याचा पंजाएवढा तुकडा... या दोन आधारांवर देह झुलतोय... सॅक लटकतेय...

गाडीने वेग घेतला तशी त्याच्या चेहऱ्यावर भीतीची छाया पडली... असा गाडीला तो पहिल्यांदाच लटकला असणार... आतून येणारा प्रवाशांचा रेटा धनुष्यासारखी कमान केलेल्या अंगावर झेलत, झपझप पाठी जाणाऱ्या इलेक्ट्रिकच्या खांबांपासून स्वत:ला वाचवत, प्रचंड वेगाने सुसाट चाललेल्या गाडीत फक्त पायाच्या चवड्याच्या आधारावर उभं राहणं हे किती भयानक असतं, याचा प्रत्यय त्याला येत होता... पुढचं स्टेशनही बऱ्यापैकी लांब होतं... त्याची अस्वस्थता खिडकीतून त्याला पाहताना समजत होती... खिडकीतून दारावरचा तो संपूर्ण दिसत होता, म्हणजे तो किती बाहेर होता पाहा!

अधलीमधली स्टेशन्स मागे पडत गेली. तो त्याच्या अस्थैर्यात स्थिरावला आणि हळूहळू त्याचा चेहरा रिलॅक्स होऊ लागला. भन्नाट वाऱ्यात भुरभुरणारे केस, आपण काहीतरी धाडसी करून बसलो आहोत, याची जाणीव... शरीरातलं अॅड्रेनलीन चढू लागलं असावं... सराईत लटकूंचे चेकाळलेले चीत्कार त्याच्यातही जोश भरू लागले असावेत... पुढचं स्टेशन आलं, तोवर त्याच्या चेहऱ्यावर नशा केल्यासारखं हसू पसरलेलं होतं... उत्कट पण क्षणभंगुर.

या स्टेशनात आतली गदीर् थोडी आत दाबली गेली. यानं ठरवलं असतं तर आता आत सरकून सुरक्षित होऊ शकला असता. पण, आता त्याला या जीवघेण्या धाडसातलं मनोरंजन गवसलं होतं... त्याने दारावरच्या सराईतासारखं प्लॅटफॉर्मवरच्या दोनचारजणांना आत शिरू दिलं आणि स्वत: पुन्हा एका पायावर एका हातावर देह तोलून बाहेर लटकत राहिला...

... आता त्याला अशा प्रवासाचं व्यसन लागणार आहे...

... पुढे मागे आणखी भीड चेपली की तो लेडीजशेजारच्या दारावर लटकून हरएक प्लॅटफॉर्मच्या विरुद्ध दिशेला उतरेल आणि लेडीजमधल्या छोकऱ्या-आण्ट्यांच्या कौतुकभरल्या नजरा झेलत टेन सुटल्यावर फुटबोर्डला लटकून ट्रेन पकडण्याची हुकमी कसरत करून दाखवेल...

कुणाचा असेल हा मुलगा?

कुणाचा असेल हा भाऊ?

त्याच्या घरातल्यांना ठाऊक असेल, आपला मुलगा कसा प्रवास करतो ते?...

... तुम्हाला ठाऊक आहे तुमचा मुलगा, भाऊ, नवरा, प्रियकर, भाचा, पुतण्या कसा प्रवास करतो ते?

कधी विचारलंयत त्याला?

(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment