प्रिय विद्यार्थी मित्रांनो ,
कळविण्यास अत्यंत दु:ख होतं की... (अर्रर्र चक् चक् , काहीतरी गडबड झाली. ही जाहिरात आहे, हेच विसरलो. कंपोझिटर, ही सुरुवात कापून टाका).
प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
दहावीच्या परीक्षेत आमच्या क्लासचा विद्यार्थी नसलेला एक विद्यार्थी पहिला आला (तो इतर कुठल्या क्लासचाही
विद्यार्थी नाही, हेच दु:खात सुख!). 'कोणत्याही क्लासशिवाय आपल्याला हे यश मिळालं' हे त्याचं विधान (वाचून त्याची जीभ छाटावीशी वाटली होती, असो) अनेकांना आवडलं (त्यांचं लेकाच्यांचं कुठे क्लासवर पोट आहे!). तो आमच्या क्लासचा
विद्यार्थी नव्हता तरीही त्याला हे यश मिळालं (याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे... पण, आता हे म्हणून काय फायदा? आता दाजींची युती सत्तेत नाही.) याबद्दल त्याचं मन:पूर्वक अभिनंदन! (पोटासाठी काय काय करावं लागतं?)
त्याच्या या यशात त्याची शाळा आणि शिक्षकांबरोबरच त्याच्या पालकांचा मोठा वाटा आहे. (अरे , आमच्या 'क्लासेस'च्या नुसत्या नोट्सचा उल्लेख केला असता तरी काम झालं असतं. आमची टीम कॅमेरा वगैरे घेऊन अभिनंदनासाठी त्याच्या घरी धडकली होती. बाकी 'व्यवहार'ही पाहिला असता. पण, त्या जुन्या प्रकरणात झालेली बदनामी भोवली आम्हाला! हुसकावूनच लावलं त्याच्या घरच्यांनी!) मित्रांनो, हा पालकांचा वाटा सर्वात महत्त्वाचा आहे, हे लक्षात घ्या. त्याचे आईवडील सुशिक्षित आहेत. ते त्याचा अभ्यास घेऊ शकत होते. (निदान ते तरी आमच्या क्लासचे माजी
विद्यार्थी असतील काय? अंहं, शक्यताच नाही. कारण, ते जेव्हा शाळेत जात असतील तेव्हा मीही शाळेतच होतो नाही का! आणि मीच शाळेत असल्यानं महाराष्ट्रात 'जिथे जाल तिथे' क्लासेसचं पेव फुटलं नव्हतं.)
विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो, ज्यांच्या घरात योग्य मार्गदर्शन करायला कुणी आहे, त्यांना क्लासेसला येण्याची काहीच गरज नाही. (असलं काही लिहावं लागण्याआधी बोटं का नाही झडली रे माझी!) पण, बाकीच्यांचं काय? ( हुश्श! आता खरी लाइन सापडली जाहिरातीची!) त्यांना क्लासेसशिवाय पर्याय नाही आणि ज्यांना क्लासेसशिवाय पर्याय नाही त्यांना आमच्या क्लासेसशिवाय पर्याय नाही. (कंपोझिटर, आता मधल्या भागात आपल्या क्लासेसची नेहमीची यशस्वी टेप लावून टाका दणादण!)
आणि ज्या पालकांना आपल्या मुलांना क्लास लावायचा नाही. आपल्या मुलांचा आपणच अभ्यास घ्यावा, अशी इच्छा आहे, पण तेवढा आत्मविश्वास नाही, अभ्यास घेण्याची शास्त्रीय पद्धत (काही शब्द कसे धावूनच येतात ना मदतीला!) ठाऊक नाही, त्यांच्यासाठी खुशखबर...
... आमच्या क्लासेसतर्फे आम्ही सुरू करीत आहोत 'दहावी आणि बारावीतल्या आपल्या मुलांना क्लासला घालू न इच्छिणाऱ्या पालकांसाठी खास क्लासेस.'
पालकगणहो, लवकर निर्णय घ्या. आपल्या पाल्याचं (आणि मुख्य म्हणजे आमच्या क्लासचं) भवितव्य उज्ज्वल करण्याची ही संधी गमावू नका.
- संचालक , का. को. क्ला.
( अतिमहत्त्वाची सूचना: कंपोझिटर, सगळे कंस गाळूनच जाहिरात घ्या. नाहीतर 'महाराष्ट्रात जिथे जाईन तिथे' काळं फासलं जाईल माझ्या तोंडाला.)
No comments:
Post a Comment