Sunday, May 10, 2020

हुई मुद्दत के गालिब मर गया पर याद आता है…मिर्झा गालिबने इंग्रजीत कविता लिहिली असती, तर जगातल्या सगळ्या भाषांमधला तो सार्वकालिक सर्वश्रेष्ठ कवी ठरला असता.’
-    राल्फ रसेल
ऑक्स्फर्ड इंडिया गालिब : लाइफ, लेटर्स अँड गझल्स
हैं और भी दुनियामें सुखनवर बहुत अच्छे
कहतें है कि गालिब का है अंदाज--बयाँ और
(जगात अनेक चांगले कवी आहेत, असं म्हणतात की गालिबची भावार्थ मांडण्याची पद्धतच काही वेगळी आहे, खास आहे…)
-    खुद्द गालिब
विनम्रता हा फार मोठा गुण मानला जातो आपल्याकडे, त्यामुळे दांभिकांचं फावतं. तो खुंटीला गुंडाळून, ‘आयम द बेस्ट आयम द बेस्टम्हणून स्वत:च स्वत:ची तारीफ करणाऱ्या सिनेमातल्या शाहरूख खानसारखा गालिब स्वत:च आपल्या श्रेष्ठत्वाची ग्वाही देतो आणि तीही अशा शब्दकळेत की जणू कोणी तिसराच माणूस त्याच्याविषयी बोलतोय
शेक्स्पीयरच्या बाबतीत (‘थोर ब्रिटिश नाटककारअसं शेक्स्पीयरच्या नावामागे म्हणावं लागत नाही, गालिबचाही असाच थेट उल्लेख होतो) १६व्या शतकातला नाटककार बेन जॉन्सन याने म्हटलं होतं, ‘नॉट ऑफ अॅन एज, बट फॉर ऑल टाइम’… शेक्स्पीयर कोणत्याही एका काळाचा नाही, सार्वकालिक आहेहे गालिबलाही तंतोतंत लागू होतं त्याच्या मृत्यूला दीडशे वर्षं होऊन गेलीदीडशे वर्षांपूर्वीची त्याची कविता आजही लोकांच्या तोंडी आहे, तो आजही समकालीन आहे
हे एक फार मोठं आश्चर्य आहे
गालिबने उर्दूपेक्षा अधिक काव्यरचना, ग्रंथरचना फारसीमध्ये केली आहे, फारसीतही तो महाकवीच मानला जातोतरीही त्याची ९९ टक्के लोकप्रियता ही उर्दूमधल्याच काव्यरचनेची लोकप्रियता आहेतो उर्दू भाषेतला आजवरचा नि:संशय सर्वात लोकप्रिय कवी आहे आणि अनेकांच्या मते आजवरचा सर्वश्रेष्ठ कवीही आहे
त्यामुळेच तर त्याची लोकप्रियता आश्चर्यकारक आहे

उर्दू ही या देशात जन्मलेली, १०० टक्के भारतीय भाषा आहेपण, तिच्याविषयी फार मजेशीर आणि अज्ञानमूलक गैरसमज प्रचलित आहेतती मुसलमानांची भाषाआहे हा त्यातला, उर्दूच्या नाजुक गळ्याला नख लावणारा असाच एक बिनडोक समज

वास्तविक पाकिस्तानातही सिंधी, पंजाबी, उर्दू, पख्तून, फारसी वगैरे अनेक भाषा बोलल्या जातात. गुजरातचे मुसलमान गुजराती बोलतात, कोकणी मुसलमान मराठी बोलतात, बंगाली मुसलमानांची भाषा बांगला आहे, केरळी मुसलमानांची मल्याळी. उर्दू ही मुसलमानांची भाषा मानून तो गैरसमज पुढे पसरवणारा समाज आजही मुसलमानांनीच देशात आणलेले सामोसे नाश्त्यात खातो, त्यांनीच आणलेली जिलबी लग्नात खातो आणि पोर्तुगिजांनी आणलेले बटाटे, मिरच्या आणखी कोणी आणलेले साबुदाणे यांचंच त्याच्या स्वदेशी उपवासाला सेवन करतो. एवढीच बुद्धी असलेल्या मुस्लिमद्वेष्ट्यांच्या जहाल अपप्रचारामुळे एकेकाळी वायव्य सीमेवरच्या सगळ्या साहित्यिकांची लेखनाची भाषा असलेली उर्दू हळुहळू पद्धतशीरपणे वाळीत टाकली गेली आहे, ज्यांची ती मादरी जुबाँम्हणजे मातृभाषा आहे, अशा एका वर्गापुरती सीमित केली गेली आहे

असं असताना या जाणीवपूर्वक दुर्लक्षित भाषेतला कवी इतका लोकप्रिय कसा?...

गंमत म्हणजे ही लोकप्रियता भाषेच्या सीमा उल्लंघून गेलेली आहेज्याची मातृभाषा उर्दू नाही, ज्याला जेमतेम हिंदीचा गंध आहे किंवा तोही नाही, असा माणूसही संभाषणात, लेखनात गालिब उद्धृत केल्याशिवाय राहात नाहीजगातल्या सर्वाधिक वापरल्या गेलेल्या कवनांची यादी कुणी केलीच तर त्यात हजारो ख्वाहिशे ऐसी के हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले,’ या गालिबच्या अजरामर ओळी पहिल्या क्रमांकावर असतील… ‘इश्कने गालिब निकम्मा कर दिया, वरना हम भी आदमी थे काम केही ओळ दुसऱ्या क्रमांकाची दावेदार ठरेल. देशातल्या राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक घडामोडींवर भाष्य करणारी मीम्स लिहिणारे लोकही गालिबला वेठीला धरतात आणि श्लील-अश्लील अशा अनेक चतुर गंमतचित्रांमध्ये गालिबच्या ओळींचं विडंबन वापरलं जातंआचार्य अत्र्यांनी झेंडूची फुलंच्या प्रस्तावनेत सांगितलं होतं की ही काही मान्यवर कवींच्या कवितांची नालस्ती नाही, ही त्यांना दिलेली सर्वोच्च मानवंदना आहे. नक्कल कुणाची होऊ शकते? जे लोकप्रिय आहे त्याचीच नक्कल होऊ शकते. मूळ कविता लोकांना माहिती नसेल, पाठ नसेल तर विडंबन कशाचं आहे हेच त्यांना कळणार नाही आणि काहीच मजा येणार नाही. गालिबच्या बाबतीत त्याच्यानंतरच्या, त्याच्या भाषेतही न जन्मलेल्या तरूण मुलांनाही ही खात्री आहे की गालिबचं (ही पिढी त्याला गालिबचाचा म्हणते, ही आणखी एक मजा) नाव टाकलं की लोकांना एक व्यक्तिमत्त्व दिसतंआणि त्यावर विडंबन समजून जातंकाय अचाट विश्वास आहे हा?

याबाबतीत आणखी एक मजा आहेअनेकदा लोक वाक्प्रचारांसारखे गालिबचे शेर वापरतात, अतिशय लोकप्रिय ओळी वापरतात आणि त्या गालिबच्या आहेत, हे त्यांना माहितीच नसतंयाचं दुसरं टोक म्हणजे फेक गालिब’… म्हणजे भलत्याच कुणाच्या तरी ओळी गालिबच्या नावावर घुसडून देणंआपल्याकडे कोणाही माणसाला समाजाला उद्देशून काहीही सांगायचं असलं की तो ते लिहून खाली नाना पाटेकर किंवा प्रकाश आमटे किंवा अब्दुल कलाम अशी सही करून मोकळा होतो, त्यातलाच हा प्रकार. त्यामुळे जाहिद शराब पीने दे मस्जिद में बैठकर, या वो जगह बता जहाँपर खुदा न हो’ (जाहिद म्हणजे धर्मगुरू) ही कोणा अज्ञात कवीची अप्रतिम ओळ गालिबच्या नावावर सर्रास खपवली जाते. गालिबचं नाव म्हणजे कोणत्याही दगडाचं सोन्यात रूपांतर करणारी जादूची छडी आहे, हे या सगळ्यांना माहिती आहे

गालिब हा काळाच्या, भाषेच्या सीमा उल्लंघणारा जनकवी आहे, लोककवी आहे, हे यातून स्पष्ट व्हायला हरकत नाहीपण, जनकवी हे सोपे, सुघड असतातआपल्याकडे ग्यानबा-तुकाराम असं लोक एका श्वासात म्हणत असले तरी ज्ञानेश्वर जे सांगतात तेआणि तुकाराम जे सांगतो ते’, यात फार फरक आहे… 

ज्ञानेश्वर कवी म्हणूनही प्रासादिक प्रतिभेच्या उंचीवर राहतात, तुकोबा हा तुकोबा आहे, आपल्या गळ्यात हात घालून नको रे भलत्या नादांना लागूसअसं प्रेमाने समजावणारा, आपल्या भाषेत बोलणारा जिव्हाळ्याचा मित्र आहेसाहजिकच तो जनकवी आहे… 

इथे गालिब आणखी एका कोड्यात पाडतो आपल्यालातो जनकवी आहेच, पण सोपा कवी नाहीत्याच्या अफाट लोकप्रिय झालेल्या ओळी तुलनेने सोप्या आहेत, असल्याच पाहिजेत, नाहीतर त्या इतक्या सुदूर कशा पोहोचतीलपण, तो खालिस उर्दूमध्ये लिहितो, ती एका टप्प्यानंतर समजून घ्यावी लागतेच

वो आये घर हमारे खुदा की कुदरत है
कभी हम उनको कभी अपने घर को देखते हैं
हा शेर लाखो प्रियकरांनी आपल्या घरी पहिल्यांदाच आलेल्या प्रेयसीला उद्देशून वापरला असेल आणि विविध स्वरूपात वाहवाही बटोरली असेलकाही नामुरादांना हा शेर ऑफिसमधल्या बॉसपुढे लाळघोटेपणा करायलाही उपयोगी पडला असेलपण हा झाला सोपा गालिब. याच गझलेत तो पुढे जबरी घामटं फोडतो. तो म्हणतो,
तेरे जवाहिर--तर्फ--कुल को क्या देखें
हम औज--ताले--लाल--गुहर को देखतें है
(तुझ्या मुकुटातल्या हिऱ्याकडे कोण पाहतो, आम्ही त्या हिऱ्याचं सौभाग्य पाहतो आहे…)

आता जुन्या काळात शब्दकोश घेतल्याखेरीज किंवा आताच्या काळात गालिबला वाहिलेल्या असंख्य वेबसाइट्सपैकी एकीच्या शरण जाण्याखेरीज हे समजून घ्यायला काही मार्ग आहे का? आधी त्याच्या शब्दांचा अर्थ लागणार, मग ओळींचा अर्थ लागणार, मग तो काय सांगतो आहे ते कळणार, मग त्याने केलेली शब्दांतली गंमत कळणार आणि मग गालिब समजणारअरे बापरे, भलताच व्याप आहे हा!

उदाहरणार्थ,
गालिबसाहेब म्हणतात,
आखिर--कार गिरफ्तार--सर--जुल्फ हुआ
दिल--दीवाना के वारस्ता--हर-मजहब था
(अखेर शेवटी जाऊन मन तिच्या कुंतलांत कैद झालंच, बिचारं मन सगळ्या धर्मांना उबलंच होतं.)

यात हुआ, था, दिल, दिवाना, जुल्फ, गिरफ्तार, मजहब हे शब्द सगळ्यांना माहिती असलेले शब्दपण त्यांचा एकमेकांशी जुळलेला संबंध शोधायला उर्दूची जानकारी तरी हवी नाहीतर शब्दकोशाचं साह्य तरीदोन ओळी समजून घ्यायला कोण करतो यार ही सगळी झंझटमारी, असं म्हणावं तर लगेच वेगळी गजल समोर येते,
नुक्ता-चीं है ग़म--दिल उस को सुनाए बने
क्या बने बात जहाँ बात बनाए बने
मैं बुलाता तो हूँ उस को मगर जज़्बा--दिल
उस पे बन जाए कुछ ऐसी कि बिन आए बने
इथे गालिबने बात बन जाए, बिन आए, बनाए, बने एवढ्या तीन चार पदार्थांत जे काही परम्युटेशन-काँबिनेशन केलंय, ते एकीकडे शब्दखेळाचा आनंद देतं, पण तो पोरकट खेळ नाही, त्यात सघन अर्थ आहे. ना शब्द इकडचा तिकडे होत, ना अर्थाचा तोल ढळत. याच गझलेतल्या ओळी प्रेमाची दाहकता सांगणाऱ्या ऑलटाइम ग्रेट ओळी बनून बसल्या आहेत

इश्क़ पर ज़ोर नहीं है ये वो आतिश 'ग़ालिब'
कि लगाए लगे और बुझाए बने
किंवा
उनके देखे से जो जाती है मुँहपर रौनक
वो समझते है कि बीमार का हाल अच्छा है
हा एव्हरग्रीन मुखडा वापरून किती प्रेमिकांनी प्रेमाचे सगळे पर्क्स एका फटक्यात वसूल केले असतीलगालिबसाहेबांना कळतं की मासा गळाला लागला आहे, ते पुढे कुठे घेऊन जातात पाहा
देखिए पाते है उश्शाक बुतों से क्या फैज
इक बरहमनने कहा है के ये साल अच्छा है
ज्या काळात मूर्तीपूजक काफिरांबद्दल सच्च्या मुसलमानाच्या मनात नफरतच असली पाहिजे, बुतपरस्ती म्हणजे मूर्तीपूजेबद्दल घृणाच असली पाहिजे, अशी समजूत असलेल्या कट्टर इस्लामची राजवट होती त्या काळात हे गृहस्थ मूर्ती तरी पावतात का ते पाहू या, अशी चर्चा करत होते. तेही का, तर एका ब्राह्मणाने हे वर्ष चांगलं जाईल म्हणून सांगितलं होतंम्हणजे हा ज्योतिष्याला हात दाखवतो की काय? लाहौलविलाकुव्वत, धर्मद्रोहीच म्हणायचा हा. इथे जाता जाता गालिबमियांनी बुतपरस्ती आणि निर्गुणाची कर्मकांडी बंदगी हे दोन्ही निरुपयोगीच आहे, असं हलकेच सूचित केलंयपण गाडी इथेच थांबत नाहीत, प्रेमिकांच्या इंप्रेशनबाजीपासून सुरू झालेली गझल थेट जन्नतवर पोहोचते आणि गालिब म्हणतो,
हमको मालूम है जन्नत की हकीकत लेकिन
दिल के खूष रखने को गालिब ये खयाल अच्छा है
स्वर्गाची आमिषं इतरांना दाखवा, ही नुसती कल्पनाच आहे, हे आम्हाला ठाऊक आहे, पण मन बहलवायलाही चांगली कल्पना हवीच की!

अडकलात की नाही पुरते, आता बसा बोंबलत उर्दू-हिंदी-मराठी-इंग्लिश डिक्शनरी घेऊन

वरवर गालिब चाळू पाहणाऱ्याला प्रश्न पडतो की हा इतका अवघड प्रकार इतका लोकप्रिय कसा आहे? आजच्या फास्ट फूडच्या जमान्यात सकाळपासून वेगवेगळ्या वाटणाघाटणांत गोश्त घोळून नंतर रात्रभर मंद आचेवर रांधलेल्या एखाद्या नजाकतदार शाही मुघलई डिशसारखी ही शायरी समजून घेण्याची प्रक्रिया करतो कोण?

करणारे करतात, आजही करतात, भाषा अवगत नसतानाही करतात, शब्दकोश घेऊनही करतात

गालिब भारी आहे, आपला दोस्त आहे, तो सांगतो ते इम्पॉर्टंट आहे, तो आपल्याला उमगला पाहिजे, अशी ही आंच येते कुठून? आणि का?
*****

दबीर-उल-मुल्क, नज्म-उद-दौला, मिर्झा नौशा, निजाम--जंग, असद-उद-दौला बेग खाँ गालिबचा जन्म २७ डिसेंबर १७९६चा आणि मृत्यू १५ फेब्रुवारी १८६९चा. म्हणजे महात्मा गांधींचा जन्म ज्या साली झाला, त्या साली गालिब वारला. एका सेल्जुक तुर्क सेनाधिकाऱ्याच्या घराण्यात जन्मलेल्या गालिबचे वडील आणि काका त्याच्या लहानपणीच वारले. वडील अल्वारच्या राजाच्या सेवेत होते, काका ईस्ट इंडिया कंपनीच्या सेवेत होते. गालिबचा उदरनिर्वाह काकांना मिळणाऱ्या पेन्शनवरच होत होता. वयाच्या चौथ्या वर्षी पितृछत्र गमावलेल्या गालिबच्या आयुष्यात तेव्हापासूनच एकाकीपणाची भावना आणि बंडखोरी जन्मली असावी, असं मानलं जातं. वडिलांच्या मृत्यूनंतर तो आजोळी आगऱ्याला राहायला आला आणि इथेच त्याने घरची परंपरा मोडून तलवारीऐवजी लेखणी हातात घेतली. वयाच्या ११व्या वर्षापासूनच तो फारसी आणि उर्दूत उत्तम कविता करू लागला. असद हे आपलं नावच सुरुवातीला त्याने कवितेसाठी वापरलं. असदचा अर्थ सिंह. हे नाव सोडून त्याने नंतर स्वीकारलेल्या आणि मरणापर्यंत तीच ओळख स्वीकारलेल्या गालिब या शब्दाचा अर्थ आहे जिंकणारा, जेता. ते बिरूद त्याने सार्थ ठरवलं. लेखणीच्या बळावर अनेक पिढ्यांची हृदयं जिंकली.

बालवयात उमराव बेगमशी लग्न केल्यानंतर १३व्या वर्षी तो दिल्लीत आला. जुन्या दिल्लीतल्या बल्लीमारानच्या नागमोड्या गल्ल्यांमधल्या गली कासिममध्ये स्थित हवेलीत त्याने आयुष्य काढलं. ही हवेली आजही आहे, तिथे गालिबचं राष्ट्रीय स्मारक आहे. बहादुरशाह जफरच्या दरबारात त्याला राजकवीपद लाभलं होतं. १८५७च्या उठावानंतर तो ब्रिटिशांच्या आश्रयाला जाण्याचे प्रयत्न करत होता. ते काही सफल झाले नाहीत. त्याचं सगळं आयुष्य हे स्वत:ची हवेली, घरात नोकरचाकर असलेल्या माणसाचं जेवढं ओढगस्तीत जाऊ शकतं, तेवढं ओढगस्तीचं गेलं. त्या काळात कवीमंडळींना राजाश्रय आवश्यक होता. त्यासाठीच्या तडजोडी आवश्यक होत्या, त्या त्याने केल्या. गालिबच्या सगळ्या द्वैभाषिक काव्यसृष्टीत राजकारणावर दोन ओळीही थेट दाखवता येणार नाहीत. गालिबला पेन्शनच्या भानगडीत अतिशय तापदायक असलेला दिल्ली-कलकत्ता प्रवास करायला लागायचा. त्याचाही उल्लेख त्याच्या पत्रांमध्ये, कवितांमध्ये आहे; पण, त्या काळातली सगळ्यात मोठी घडामोड असलेल्या १८५७च्या उठावाबद्दल चकार शब्द नाही. फ्रेंच वाइन्सचा शौकीन असलेला गालिब बहादुरशहा जफरच्या छत्रछायेतून बाहेर पडल्यानंतर इंग्रजांकडे आश्रय मिळतो का, हे पाहात होता. या अर्थाने तो नीट व्यवहारी आणि धूर्त होता, असं दिसतं. गंमत म्हणजे, गालिबचे इंग्लिश भाष्यकार त्याची तुलना नेहमी वर्ड्सवर्थशी करतात. दोघेही जनकवी म्हणून. गालिबप्रमाणेच वर्ड्सवर्थवरही सोयीस्कर राजकीय भूमिका घेण्याचा आरोप झाला, हा एक विलक्षण योगायोग.

गालिबचं हे जीवनचरित्र गालिबच्या आगेमागे होऊन गेलेल्या मीर तकी मीर किंवा इब्राहीम जौक यांच्यासारख्या मंडळींच्या जीवनप्रवासापेक्षा काही फार वेगळं असण्याची शक्यता नाही. तरी त्यांचं काव्य मागे पडलं, गालिब काळाबरोबर राहिला, त्याच्या काळाच्या पुढे राहिला. हे कसं काय झालं असेल?
********

गालिब टिकून राहिला तो त्याच्या अफलातून काव्यगुणांमुळे आणि समकालीनत्वामुळे हे खरंच आहेपण त्यापलीकडची काही शुद्ध व्यावहारिक कारणंही आहेत.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चरित्रलेखन, इतिहासाच्या नोंदी ठेवणं, याबाबतीत अतिशय गहाळ असलेल्या भारतवर्षात गालिबचे शिष्य अल्ताफ हुसेन हाली यांनी यादगार--गालिब हे चरित्र लिहिलं, तेही १८९७ साली, गालिबच्या निधनानंतर जेमतेम २८ वर्षांनी. हे चरित्र हाच नंतर गालिबवर तयार झालेल्या अनेक कलाकृतींचा, सिनेमा-नाटक- मालिकांचा आधार ठरला. एडवर्ड फिट्झगेराल्डने उमर खय्यामच्या रुबाइयतचं भाषांतर केल्यानंतर पाश्चिमात्य जगात एकंदर अरबी-फारसी-उर्दू कवींबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. १९व्या शतकाच्या मध्याला गालिबच्या गझलांचं इंग्रजीत भाषांतर होऊ लागलं होतं. कालिदास गुप्ता रझा यांनी अतिशय मेहनत घेऊन गालिबची सगळी उर्दू कविता कालानुक्रमाने संगतवार लावली. त्यातूनच हसन अब्दुल्ला यांनी इव्होल्युशन ऑफ गालिबहा ग्रंथ सिद्ध केला. पवन के वर्मा यांनी गालिब : मॅन, टाइम्सहा ग्रंथ लिहिला. राल्फ रसेलच्या ऑक्स्फर्ड इंडिया गालिब : लाइफ, लेटर्स अँड गझल्सचा उल्लेख तर सुरुवातीलाच आला आहे. गालिबने लिहिलेली पत्रं हा तर आपल्याकडे जी. . कुलकर्णींनी लिहिलेल्या पत्रांसारखाच कवीच्या अंतरंगात डोकावण्याची संधी देणारा मौलिक ऐवज आहे आणि त्यांचा स्वतंत्र अभ्यास होतो. या सगळ्यामुळे गालिबचा शिस्तशीर अभ्यास होत राहिला. तो अॅकॅडमिक वर्तुळात टिकून राहिला, त्याचा दीवान, त्याची चरित्रं ही अभ्यासक्रमात लागलेली पुस्तकं आहेत.

दुसरीकडे हेही लक्षात घ्यायला हवं की मधल्या एका टप्प्यात गझलचा सुवर्णकाळ होता. गझलने आपल्याकडे माधव जूलियनांपासून ते सुरेश भटांपर्यंत अनेकांना कसं वेड लावलं ते आपल्याला माहितीच आहे. पण, गुजरातीसह अन्य भाषांमध्येही गझल सादर होते. त्याचप्रमाणे स्पॅनिशमध्येही गझल लिहिली जाते. गझलचा उत्कर्ष गालिबच्या उत्कर्षाला पोषक ठरणार हे उघडच आहे. गझलचा विचार गालिबला वगळून होऊच शकत नाही आणि एकदा माणूस गालिबच्या जाळ्यात अडकला की त्याला तो सोडत नाही. अरबस्तानात जन्मलेल्या या गझलने फारसी, अरबी आणि उर्दू या तिन्ही भाषांमध्ये कमालीची लोकप्रियता मिळवली आणि तिचा घाट, तिचं चलन भाषांच्या सीमा ओलांडून सर्वत्र पोहोचला.

गालिबला जिवंत ठेवायला सिनेमाही कारणीभूत ठरला. सोहराब मोदींनी भारतभूषणला घेऊन (हा सिनेमा पाहण्याचं दुसरं कारण शोधण्याची गरजच नाही) १९५४मध्येमिर्झा गालिबया सिनेमाची निर्मिती केली. त्यात सुरय्याने गालिबच्या गझला गायल्या होत्या आणि लेखन सआदत हसन मंटोंचं होतं, हीच काय ती त्याची आकर्षणं. याच काळात पाकिस्तानातही गालिबवर एक सिनेमा निघाला होता.

पण, या सगळयांच्या आधी एका फार मोठ्या हस्तीने गालिबला हिंदी सिनेसंगीतप्रेमींच्या कानांमनांत उतरवलं होतं. हे होते कुंदनलाल सैगल. सैगलसाहेबांनी तबियतीत गायलेला गालिब इंटरनेटवर उपलब्ध आहे. तो ऐकल्यावर एकदम साक्षात्कार होऊन जातो की गालिब कसा गायचा याचा भारतीय उपखंडातला वस्तुपाठ त्यांनी घालून दिलेला आहे. त्यानंतरच्या काळातल्या कोणाही गायकाने गालिबचं क्रांतिकारकरित्या वेगळं सांगितिक इंटरप्रिटेशन केलेलं नाही, इतकं सैगलसाहेबांनी ते परफेक्ट करून ठेवलेलं आहे. गझलची अनभिषिक्त सम्राज्ञी अख्तरीबाई अर्थात बेगम अख्तर यांनी सरळ सांगून टाकलं की सैगलसाहेबांनी जो गालिब गायला तो अखेरचा. त्याच्या आसपासही कोणी जाऊ शकत नाही. सैगलच्या व्यक्तिगत आयुष्यावरही गालिबचा मोठा प्रभाव होता, असं त्यांचा चरित्रकार प्राण नेविल यानेही मान्य केलेलं आहे.

मात्र, गालिबच्या शायरीने भारून गेलेल्या पिढीला आणि त्यापुढच्या अनेक पिढ्यांना गालिब दाखवलातो १९८८ साली गुलजारांनी दूरदर्शनवर सादर केलेल्या मिर्झा गालिबया मालिकेने आणि त्यात नसीरुद्दीन शाहने साकारलेल्या अफाट गालिबने. असं म्हणतात की विष्णुपंत पागनीसांनी साकारलेला संत तुकाराम पाहिल्यानंतर खुद्द तुकोबाराय अवतरले असते, तरी भाविक म्हणाले असते, आम्ही तुकाराम पाहिलाय, तो काही असा दिसत नाही. आजही अनेक घरांमध्ये तुकोबांचं चित्र म्हणून जे चित्र लावलेलं दिसतं, ते विष्णुपंत पागनीसांचं चित्र आहे. तोच प्रकार गालिबच्या बाबतीत नसीरने करून ठेवला आहे. गालिबसाहेबांना लोक सांगतील, छे हो, आम्ही गालिब पाहिलाय, तुम्ही तो असू शकत नाही. या मालिकेच्या अभूतपूर्व यशाचा आणि अजूनही न उणावलेल्या प्रभावाचा आणखी एक शिल्पकार म्हणजे जगजीत सिंग. गालिबचं बोट धरून जगजीत एका पिढीच्या मनात शिरला आणि मग त्याच्या मखमली स्वरांनी त्या पिढीचं सगळं भावविश्व समृद्ध केलं, व्यापून टाकलं. या पिढीला, यात सर्वभाषिक आले, उर्दूच्या नजाकतीची, खुमारीची, खानदानी अदबची पहचानच या मालिकेने करून दिली आणि गझलांना अनुकूल माहौल निर्माण केला. याच काळात तिकडे मेहदी हसन, आबिदा परवीन, गुलाम अली, इकडे जगजीत, भूपेंद्र, मिताली, तलत अझीझ, चंदन दास नंतरच्या पिढीत हरिहरन या मंडळींनी गझल हे साहित्यिक अभिरुची असलेल्या तरुणाईचं एक्स्प्रेशन बनवून टाकलं होतं

बारमध्ये बसून दोन पेगनंतर प्रेमविव्हळ वगैरे होणाऱ्यांसाठी पंकज उधास उडत्या चालीच्या आणि उठवळ बोलांच्या गझला सादर करत होताच. गैरफिल्मी संगीताचा सगळा माहौल गझलमय झाला होता, त्या युगाचे सुरेल पडसाद गमन,’ ‘बाजार,’पासून निकाह,’ ‘आवारगी,’ ‘साथ साथ,’ ‘आखिर क्यों,’ ‘अर्थ’ ‘आहिस्ता आहिस्ता,’ ‘ऐतबारआणि अर्थातच उमराव जानपर्यंतच्या सिनेमांमध्ये उमटलेले दिसतात.

सांगायचा मुद्दा म्हणजे गुलजार, नसीर आणि जगजीत या त्रिकुटाने अजरामर केलेली दूरदर्शन मालिका आणि तिचं संगीत हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. या मालिकेसाठी निवडलेल्या नज्म आणि गझलांचा समावेश आजही गालिबच्या सर्वात लोकप्रिय गझलांमध्ये आहे, अनेकांचा गालिब तर तेवढ्यातच आटोपतो आणि तेवढाच सगळ्या आयुष्यभर पुरतो, पुरून उरतोम्हणजे पाहा काय काम केलं असेल या मंडळींनी. दूरदर्शनच्या सुवर्णकाळातलं हे एक रत्नजडित पान आहे. अतिशय तबियतीत, कसलीही घाई न करता, गालिबच्या काळातल्या जीवनाच्या संथगतीने एकदम फुरसतीत घडत जाते ही मालिका. त्यात गुलजारसाहेबांच्या लेखणीने जिवंत केलेल्या व्यक्तिरेखा. या मालिकेने गालिबचा खुंटा पुढच्या दोनपाच पिढ्यांच्या मनात बळकट करून ठेवला.

इकडे गालिबचं चरित्र अनेक भाषांमध्ये प्रसिद्ध झालं. त्याच्यावर काझी अब्दुस सत्तार यांनी गालिबयाच नावाची चरित्रपर उर्दू कादंबरी लिहिली, रविशंकर दल यांनी बांगला भाषेत दोजखनामाया सआदत हसन मंटोच्या कथेभोवती फिरणाऱ्या कादंबरीत गालिब आणि मंटो यांना आमनेसामने आणून एकमेकांशी आपापल्या काळाबद्दल बोलायला लावलं होतं. मुघल दिल्ली आणि ब्रिटिश दिल्ली यांच्यातल्या साम्यभेदांचं आणि त्या दिल्लीतल्या जीवनाचं दर्शन घडवणारी ही कादंबरी आहे. अलीकडच्या काळात नीरज पांडे यांनी लिहिलेल्या गालिब डेंजरया कादंबरीतल्या गँगस्टरला असं वाटत असतं की जगातल्या प्रत्येक समस्येवर गालिबच्या कोणत्या ना कोणत्या गझलेत, शेरात, नज्ममध्ये उपाय आहेच डॉ. सईम आलम यांनी वेगवेगळी साधनं वापरून गालिब के खत’, ‘गालिब’, ‘गालिब इन न्यू डेल्हीअशी नाट्यत्रयी सादर केली आहे.

आता अनेक लोक असं सांगतील की यातला सिनेमा, मालिका आणि गुलजारांच्या गालिबचा भाग सोडल्यास आम्हाला काहीच माहिती नाही गालिबबद्दल. आजच्या पिढीतल्या अनेकांना तर ती मालिकाही माहिती नसेल आणि अनेक गायकांनी गायलेला गालिबही माहिती नसेल. तरीही त्यांना गालिब माहिती आहेच आणि तो हमउम्र, हमखयाल वाटतो, हे कसं काय शक्य आहे?

गालिबने फारसीमध्ये एक ओळ लिहून ठेवली आहे,
शुहरात--शेरम बागीती बाद--मान ख्वाहिद-शुदाँ
म्हणजे माझ्या कवनांना माझ्या मृत्युपश्चातच खरी लोकप्रियता लाभेल.

असं अनेक कवी म्हणून ठेवतात. कुणी माझिया जातीचे मज मिळो कोणी, असं म्हणतं, कोणी भवभूती म्हणतो, उत्पत्स्यते हि मम कोsपि समानधर्मा कालोह्ययं निरवधि:विपुला पृथ्वी म्हणजे या भूतलावर कधी ना कधी कोणी ना कोणी माझा समानधर्मा निर्माण होईलच आणि त्याला माझ्या कृतींची श्रेष्ठता कळेलचथोडक्यात आता तुम्हाला कळत नसेल तर तो तुमचा दोष आहे, मी काळाच्या पुढे आहे, तुम्ही काळाच्या मागे आहात.

गालिबची गंमत अशी की तो त्याच्या काळातही अफाट लोकप्रिय होता. तो आपल्या काळातच जगला, त्याने काही भविष्याचा वेध घेणारी भाकितबाज कविता लिहिलेली नाही. तरीही तो आताच्या काळातल्या सामान्य माणसाला, खासकरून तरुणाला भिडतो, याचं कारण काय?

सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे तो देवत्वाला पोहोचलेला आणि देव्हाऱ्यात बसवलेला संत वगैरे नव्हता. तो एक निखालस, अंतर्बाह्य माणूस होतासगळ्या गुणदोषांनी युक्त आणि स्खलनशील. त्याची दारूबाज आणि जुगारी म्हणून वासलात लावण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण, त्याच्या या अवगुणांनी त्याला बहाल केलेलं माणूसपण उलट कवचकुंडलांत रूपांतरित झालं. परिपूर्ण नसण्याचेही फायदे असतात की.

दारूच्या बाबतीत त्याचा एक किस्सा मशहूर आहे, कुणीतरी त्याला म्हणालं की दारू पिणाऱ्याची प्रार्थना परमेश्वरापर्यंत पोहोचत नाही. गालिब शांतपणे उत्तरला की पण दारू पिणाऱ्याला मुळात परमेश्वराची प्रार्थना करण्याचं कारणच उरत नाही.
*****

गालिबचे असे खरे-खोटे अनेक किस्से प्रचलित आहेतदंतकथा बनण्यासाठी आणि काळात टिकण्यासाठी हेही फार आवश्यक असतं. उदाहरणार्थ, गालिब हा जेवढा मद्याचा शौकीन होता, तेवढाच आंब्याचाही शौकीन होता. उन्हाळा आला की गालिबचा आम्रयज्ञ सुरू व्हायचा. त्याचे मित्र हाकिम रझियाउद्दिन खान यांना आंब्यांची नफरत होती. एकदा त्यांच्यासमोर बसून आंबे खाऊन गालिब साली बाजूला फेकत होता. शेजारून जाणाऱ्या गाढवाने साल हुंगली आणि तो पुढे गेला. हाकिमसाहेब म्हणाले, देखो गालिबमियाँ, गधे भी आम नहीं खाते.

गालिबने शांतपणे उत्तर दिलं, सही फरमाया आपने हाकिमसाहब, गधे आम नही खाते.

गाढव आंबे खात नाहीत, हे बरोबरच आहे, विषय कट.

शब्दांचे हे खेळ गालिब फार सहजतेने करायचा आणि अवघड परिस्थितीतून सुटका करून घ्यायचा.

एकदा रमझानमध्ये बहादुरशाह जफरने विचारलं, मिर्झा नौशां, तुम्ही रमझानमध्ये किती उपवास केलेत

गालिबने अतिशय करेक्ट उत्तर दिलं, तो म्हणाला, एक नाही केला.

आता एकच उपवास सुटला की एकही उपवास केला नाही, ते तुमचं तुम्ही समजून घ्या.

गालिबच्या आधीची बरीचशी उर्दू कविता ही भक्तिपर होती. तोच रिवाज होता. मीरसारख्या गालिबच्या काही पूर्वसुरींनी तिला त्या बंधनांतून सोडवलं आणि मानवी भावभावना तिच्यात व्यक्त करायला सुरुवात केली. याला अवगुंठन होतं सूफी गूढवादाचं. उमर खय्यामच्या सगळ्या रुबाया या साकी आणि जाम याभोवती घुटमळत होत्या, त्यामुळे पहिल्या भाषांतरातून तो फार रोमँटिक कवी आहे, अशी कल्पना झाली पाश्चिमात्यांची. नंतर साकी म्हणजे परमेश्वर, जाम म्हणजे कृपा असं विश्लेषण व्हायला लागलं. बहुतेक उर्दू गझलकारांनी प्रेमिका, दारू, विरहवेदना यांवर लिहिलेल्या गझलांवर कर्मठांचे आक्षेप येऊ नयेत म्हणून हीच प्रतीकसृष्टी पुढे चालवली.

गालिब मात्र व्यवहारातही बंडखोर राहिला आणि कवितेतही. दारू पिणारा, अय्याश, जुगारी म्हणजे इस्लामच्या दृष्टीने तो पाखंडी होताच. पण, तो धर्ममार्तंडांना थेट आव्हानही द्यायचा आणि त्यांची थट्टाही उडवायचा.
हजारो ख्वाहिशें ऐसीमध्ये तो म्हणतो,
कहाँ मैखाने का दरवाजा गालिब और कहाँ वाइज
मगर ऐसा है के कल वो जाता था के हम निकले 
(मधुशाळेचा आणि धर्ममार्तंडाचा संबंध तरी काय, पण काल मी आत चाललो होतो, तेव्हा तो बाहेर पडला.)

याच गझलेत तो पुढे म्हणतो,
खुदा के वास्ते पर्दा न काबे से उठा जालिम
कही ऐसा न हो याँ भी वही काफिर सनम निकले
(काब्यावरचा पडदा हटवू नकोस, इथेही काफिर मूर्ती निघाली तर काय घ्या- अर्थात देवाच्या ठिकाणीही मला प्रेयसीच दिसली तर काय घ्या, असा जोडअर्थही आहेच.)

एका गझलेत तो म्हणतो,
गो वाँ नहीं वाँ के निकाले हुए तो हैं
काबे से उन बुतों को बी निस्बत है दूर की
(मूर्तीत परमेश्वर नसेल, पण त्या परमेश्वरापासूनच निर्माण झाल्या आहेत, तिथूनच निघाल्या आहेत, काब्याशी मूर्तींचंही दूरचं का होईना, नातं आहेच की.)

आणखी एका ठिकाणी तो म्हणतो,
बंदगी में भी वो आझादा--खुद-बई हैं कि हम
उल्टे फिर आये दर--काबा अगर वा ना हुआ
(आम्ही भक्तीतही स्वाभिमान सोडलेला नाही. काब्यात जर ईश्वर नसेल तर लगेच उलटे फिरू.)

त्याची एक फार साधी भासणारी, फार लोकप्रिय आणि फारच सखोल अर्थाची रचना आहे, तो म्हणतो
काबे तुम किस मूँह से जाओगे गालिब 
शर्म तुमको मगर नही आती
(तू काब्याला कोणत्या तोंडाने जाशील गालिब, तुला लाजलज्जा काही आहे का?)

एखादा दारूडा माणूस सकाळी तौबा करतो, तशातला प्रकार वाटतो ना हा? पण, जरा मनात घोळवून पाहा. तो काही शरमेने हे म्हणत नाही, त्याच्या राहणीमानात, त्याच्या जगण्यात, विचारांत आणि कृतींमध्ये काही लाज बाळगण्यासारखं आहे, असं त्याला वाटत नाही. याची लाज बाळगा, ते शर्मनाक आहे, असल्या धर्माज्ञांना तो जुमानत नाही, किंमत देत नाही, हे त्याचं मर्म आहे.

धर्माला आणि धार्मिक कट्टरतेला ललकारण्याचा आत्मविश्वास गालिबला त्याच्या सच्चाईतून मिळालेला आहे. शब्दांशी जोडलेलं इमान हेच त्याचं बलस्थान. तो म्हणतो
सादिक हूँ अपने कौल में, गालिब खुदा गवाह
कहता हूँ सच के झूठ की आदत नहीं मुझे
(सत्य सांगण्यात काही थोर गुण नाही, मला खोटं बोलायची सवयच नाही तर काय करणार?)

व्यावहारिक आयुष्यात त्याला अनेक तडजोडी कराव्या लागल्या. तत्कालीन हिंदुस्तानात अनेक उलथापालथी होत होत्या. कोण कधी धुळीला मिळेल आणि कोण बलवत्तर ठरेल, ते सांगता येणं कठीण होतं. त्यामुळे आश्रयदात्यांना आणि संभाव्य आश्रयदात्यांना न दुखावण्याची कसरत साधावी लागत होती. त्याला आयुष्यात अव्यवहारीपणाचे अनेक फटके खावे लागले, यातना भोगाव्या लागल्या, पण त्याचं लेखन त्या सगळ्या हिणकसाचा स्पर्शही न झालेलं झळझळीत सोनं बनून राहिलं ते याच इमानामुळे.

राजकवी म्हणून मानमरातब आणि मुख्य म्हणजे दिवसरात्र फक्त मनात कविताच घोळवत ठेवण्यासाठी आवश्यक आर्थिक स्थैर्य मिळालं, तरी त्यातून स्वातंत्र्य काही अंशी हिरावलं गेलंच, हे त्याला माहिती होतं. अशा ठिकाणी त्याची मिष्कील विनोदबुद्धी धावून यायची.

बादशहाची चाकरी स्वीकारल्यानंतर त्याने गंमतीने म्हटलं आहे,
गालिब वजीफाख्वार हो, दो शाह को दुआ
वो दिन गये के कहते थे नौकर नहीं हूँ मैं
(गालिब आता पगारदार झालाय, शाहला दुवा दे. आता ते दिवस गेले, जेव्हा तू मी काही कुणाचा नोकर नाही,’ असं तोऱ्यात सांगू शकायचास.)

आता हीच भावना पाहा, नोकरदारांच्या वर्मावर अचूक बोट ठेवणारं याहून समकालीन असं काही आपले समकालीन कवी तरी लिहीत असतील का?

एकदा बहादुरशहा जफरच्या दरबारात त्याला घेरण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा त्याने दिलेलं उत्तर फार अफाट आहे (हा प्रसंग गुलजारांच्या मालिकेतही फार बहारदार वठला आहे), तो म्हणतो,
हर एक बात पे कहते हो तुम के तूक्या है?
(उर्दूमध्ये सगळा आप और हमचा खानदानी अदबशीर कारभार, तिथे तुम, मैं, तू वगैरे संबोधनं अवमानास्पद समजली जातात.)

हर एक बात पे कहते हो तुम के तूक्या है?
तुम्ही कहो के ये अंदाजे गुफ्तगू क्या है?
रगों में दौडते फिरने के हम नहीं कायल
जब आँखहीं से ना टपका तो फिर लहू क्या है?

(नसांमधून वाहात राहण्याचं कंटाळवाणं काम करायला आम्ही बांधील नाही. डोळ्यांतूनच जे वाहिलं नाही, ते रक्त कसलं- दु:खातिरेकाने काळीज फाटून अश्रूऐवजी जे टपकतं ते रक्त. खून के आँसू रोना म्हणतात ते हेच.)

१८४२मध्ये गालिबला दिल्ली कॉलेजात शिक्षकाची जागा मिळणार होती. त्यासंदर्भात तो थॉमसन नावाच्या लेफ्टनंट गव्हर्नरला भेटायला गेला. तत्कालीन शिष्टाचाराप्रमाणे तो गालिबला घ्यायला दारात गेला नाही. गालिबही घोडागाडीतून खाली उतरला नाही. आतून निरोप आला की तुम्ही फक्त मुघल दरबाराचे सरदार असता तर तुमच्या स्वागतासाठी लेफ्टनंट गव्हर्नर स्वत: आले असते दारात. आता तुम्ही चाकरी मागायला आला आहात, तुम्हाला तो सन्मान दिला जाणार नाही.

गालिबने परतण्याआधी उलट निरोप धाडला, तुमची नोकरी हा माझा अतिरिक्त सन्मान आहे. पण, तो मिळवण्यासाठी मी माझा पुश्तैनी, पिढीजात सन्मान सोडणार नाही.

हा त्याचा पीळ होता, तो परिस्थितीच्या असंख्य थपडा खाल्ल्यानंतरही कायम होता. हा उर्मटपणा कोणत्याही पिढीतल्या तरुणाला भावून जातोच.

गालिबची कविता सामान्य माणसाच्या जगण्याचं तत्त्वज्ञान सांगते आणि तेही अचूक शब्दांत. गालिबच्या कवितेची महत्ता अशी आहे की तुम्ही तिच्यातला एक शब्दही इकडचा तिकडे केलात तर डोलारा कोसळेल. आजकालच्या सिनेमाच्या भाषेत प्रतिमा निर्माण करायची तर ब्युटिफुल माइंडमधल्या जॉन नॅशभोवती जशी समीकरणं फिरायची तशी गालिबच्या सभोवती असंख्य शब्द फिरतायत आणि मनातल्या विचाराच्या अनुरूप शब्द प्रकाशमान होऊन संगतवार जाऊन बसतायत, असं वाटतं त्याच्या कविता वाचल्यावर.
गालिबचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो शुद्ध भारतीय कवी आहे.
त्याच्याआधीची कविता अरबी आणि फारसी प्रभावांमुळे तिकडच्या प्रतिमासृष्टीत वावरत होती. गालिबच्या कवितेत ब्राह्मण सहज नांदून जातो, त्यामुळे उभयतांपैकी कोणाचाही धर्म बाटत नाही. मूर्ती आणि मूर्तीपूजेचे संदर्भ सतत येत जातात

मूलतत्ववादाविरोधात ठामपणे बोलणारा आणि माणसाचे प्रश्न सोडवायला परमेश्वराची गरज नाही, माणसाने आपलं आयुष्य आपण जगावं, आपले प्रश्न आपण सोडवावेत, ते मानवतेच्या आधारावर सोडवावेत, असं स्पष्टपणे सांगणाऱ्या आधुनिक उर्दू कवींचा तो अग्रणी होता.
त्याच्या कवितेत शोधला तर वेदांतही सापडतो, उपनिषदंही सापडतात
न था कुछ तो, खुदा था
कुछ न होता तो खुदा होता
डुबोया मुझ को होनेने
न होता मै तो क्या होता?
हा कोSSहमचाच वेगळ्या शब्दांतला उच्चार नाही का?

याच गझलेतला लोकप्रिय शेर पाहा,
हुई मुद्दत के गालिब
मर गया पर याद आता है
वो हर इक बात पे कहना
के यूँ होता तो क्या होता

चैतन्यशील माणूस कोणत्याही धर्माज्ञेपुढे झुकून मेंढरासारखा चालत नाही. सतत प्रश्न पडणं, असं झालं असतं तर काय झालं असतं, तसं झालं असतं तर काय झालं असतं, असं वाटणं हे जिवंत माणसाच लक्षण आहे.
एका गझलेत तो म्हणतो,
कैद--हयात ओ बंद--गम
अस्ल मे दोनों एक है
मौत से पहले आदमी
गम से निजात पाये क्यूँ

माणूस अस्तित्वाचा बंदी आहे. जिथे तुम्ही मनुष्यजन्मात अडकलात तिथेच दु:खाची बेडी आली. मग मरणाआधी दु:खापासून मुक्तता व्हावी तरी का?

सार्त्रचा अस्तित्ववाद यापेक्षा वेगळा काय आहे?

हे सगळं त्याच्या तत्वचिंतक मनाला दिसलं, जाणवलं, त्याच्या शब्दांत उतरलं, म्हणूनच तो केवळ आजचाच नव्हे, उद्याचाही कवी आहे, पुढच्या अनेक पिढ्यांचा कवी आहे.

तो स्वत:च म्हणतो,
आते हैं गैब से ये मजामीं खयाल में
गालिब सरीर ए खामा नवा ए सरोश है
मला कुठून अदृष्टातून या ओळी स्फुरतात कोण जाणे, माझ्या लेखणीतून उतरणारे हे शब्द दैवी आहेत

म्हणूनच गालिबची प्रतिमासृष्टी अलौकिक आहे, त्याची रचना कोड्यात पाडते, अर्थाचे अनेक पदर सोडवत जाण्याचा छंद जडवते आणि तरी सामान्यातल्या सामान्य बुद्धीच्या, इतक्या खोलात कसलाच विचार करू न शकणाऱ्या माणसालाही तो भिडतोभिडतो म्हणजे एखाद्या भिडूसारखा भिडतो.
*****
गालिबचं हे समकालीनत्व आणखी वेगळ्या बाजूने पाहता येईल.

ते डेंजर आहे.

गालिब ज्या समाजात जन्मला, ज्या काळात वाढला, तो २०० वर्षांपूर्वीचा काळ कट्टरतेचा होता, असं आपण वारंवार म्हणतो आहोत, गालिबची कविता त्या कट्टरतेचा विरोध करून, तिची खिल्ली उडवून त्या युगाला मानवताधर्म शिकवू पाहतो आहे, आयुष्याचा आनंद कोणत्याही धार्मिक-आध्यात्मिक चिखलात लोळत पडता रसरशीतपणे उपभोगायला सांगते आहे

बस के दुश्वार है हर काम का आसाँ होना
आदमी को भी मयस्सर नहीं इन्साँ होना
ही त्याची त्या काळातली भावना आहे

ती समकालीन असेल, तर त्याचा सर्वात भयंकर अर्थ असा आहे की आपण फक्त वर्षांच्या हिशोबात पुढे सरकलो आहोत, समाज म्हणून मनाने आणि वृत्तीने त्याच काळात आहोत, अजूनही आपल्याला जातप्रांतधर्मभाषा यांच्या बेड्या झुगारून निखळ माणूस बनता आलेलं नाही

गालिबचं समकालीनत्व हे असं असेल, तर त्याला मोडीत काढणं, त्याला जुनाट, मागासलेला बनवणं हे एक देश, एक समाज म्हणून आपलं परमकर्तव्य आहे

तसं एखाद्या टप्प्यावर खरोखरच होऊ शकलं तर गालिबलाही मुक्ती मिळेलसदा-समकालीनतेच्या शापातून!

11 comments:

 1. सावकाश आणि शांतपणे वाचतो!

  सुरूवात तर आवडलीय.

  ReplyDelete
  Replies
  1. आत्ता संपूर्ण वाचला; “लाजवाब!”

   Delete
  2. गालिब हा विषय घेऊन kpg2 व्हावं...
   नासिर ची सिरियल मी चुकवली नाही.तेव्हा तरूण होतो ..एक गुरुवार चुकणार होता.मनात रूखरूख होती.कामानिमित्त वाराणसीला जात होतो.गंमत म्हणजे जबलपूरला गाडीचा हाँल्ट नेमका लांबला नि स्टेशनवर तो एपिसोड पाहता आला...
   कासिद के आते आते खत और लिख रखू | मैं जानता हूँ वो क्या लिखेंगे जवाब में....हा शेर ही नेमका आठवतो.कदाचित तो पेन्शनसाठी केलेल्या भागदौडीसंबंधी असावा किंवा प्रिय पात्राच्या जवाब साठी असावा...
   लेख आवडला खूप खूप आवडला..
   अर्थात विषय गालिब असल्याने तो मनापासून वाचला .😀 हे ही मोकळेपणाने सांगायला हवं

   Delete
 2. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 3. वाह! क्या बात है ।

  ReplyDelete
 4. आपल्या लेखणाचे ही कौतुक

  ReplyDelete
 5. अप्रतिम

  ReplyDelete