Monday, May 11, 2020

हाच मुलींचा बापलेखाचं शीर्षक वाचताक्षणी नजरेसमोर काय चित्रं येतं?...

नझीर हुसैन किंवा . के. हंगल किंवा चंद्रकांत गोखले यांच्यासारख्या जन्मजात बापुडवाण्या, केविलवाण्या आणि वर उदास चेहऱ्याचा, दाढीखुंटं वाढलेला, मळकट कपड्यांमधला, चपला झिजलेला किंवा फाटलेला माणूसच डोळ्यांसमोर येतो की नाही?

काय करणार? मुलींच्या बापाची प्रतिमाच तशी आहे आपली लोकप्रिय सिनेमांमधलीशिवाय, लोकप्रिय सिनेमा काही आकाशातून पडत नाही किंवा चंद्रावरून येत नाही, तो आपल्या समाजाचं आणि संस्कृतीचंच प्रतिबिंब दाखवत असतो. तिथे मुलीच्या बापाची प्रतिमा काही फारशी वेगळी नाही. बाकी सगळ्या बाबतीत वाघ असलेल्या माणसाचीमुलीचा बापही ओळख म्हणजे एकदम दुखरी नस असते, ती कोणाही गणागणपाने दाबली की वाघाची मांजर होऊन जाते अगदी. ही गत बापाची तर आईचं काय होत असेल? तिला बिचारीला (जीवशास्त्रीय दृष्ट्या मुलगी जन्माला येण्यात तिच्या बाजूने काहीच दोष नसताना) मुलगी जन्माला घातल्याच्या अपराधापायी तोंड वर करून पाहता येत नाही कुणाकडेही. पहिली मुलगी जन्माला घालण्याची चूक दुरुस्त करण्यासाठी हे आईबाप मग लगेच दुसरा चान्स घेतात, नऊ महिन्यांत नऊशे नवस करतात आणि असंख्य उपास तापास, उपासना वगैरे करतात. त्यातून पोटी पुत्ररत्न आलंच तर समाजात जरा डोकं वर काढायची संधी मिळते, पुढचीही मुलगीच झाली, तर मात्र सगळंच मुसळ केरात जातं. वंशाला दिवा हवाच या हव्यासापायी मुलींची मालिकाच लागते आणि मुलीचा बाप हामुलींचा बापबनतो, म्हणजे थोडक्यात सामाजिक आयुष्यातून उठतो.

*******

मीमुलींचा बापआहे.
दोन मुलींचा बाप.

हे वाचून ज्यांच्या मनात कणव वगैरे दाटून आली असेल, त्या सगळ्यांच्या त्याउत्साहावर पाणी ओतण्याचा दोष पत्करून सांगतो की आधी ते वेडगळ कल्पनाचित्र काढून टाका मनातलंवंशाचा दिवा नसलेले दुर्मुखलेले बाप वगैरे. मुलींचा बाप असणं हे जाम आनंददायी आहे, अगदी मुलाचा बाप असण्यासारखंच. फक्त मुलांचेच बाप किंवा आई असलेले काही लोक आम्हाला मुलगी हवी होती, मुलांचे काही लाडच करता येत नाहीत, मुलींचे किती सुंदर सुंदर कपडे असतात, मुलांसाठी काही चॉइसच नसतो, असं सांगत असतात, तेव्हा यांना मुलगी हवी होती, हे सांगायचं आहे की आम्ही फक्त मुलगेच जन्माला घातलेत, याचं कौतुक सांगायचं आहे, हेच कळत नाही. कोणत्याही आईबापांना मुलगा आणि मुलगी हवी असण्यात काही गैर नाही, फक्त ती आवड कशाच्या आधारावर आहे, हे स्पष्ट हवं. निव्वळ व्यक्ती म्हणून आवड आहे की सामाजिक बंधनांपायी ती आवड आहे, हे स्पष्ट हवं. बहुतेकांची तिथे गडबड होते. जिथे मुळात ती गडबड नसते, तिथे मुलगा किंवा मुलगी यांना समभावाने स्वीकारलं जातंच.

*********

किमया लहान होती आणि अनया पाळण्यात होती, तेव्हाची गोष्ट.
वसईच्या सोसायटीच्या दारात एक कोळीण बसायची. तिच्याकडून मासेखरेदी करायचो. गप्पा व्हायच्या. किमया अनेकदा सोबत असायची. एक दिवस अनयालाही फेरी मारायला सोबत घेतली, ती कडेवर, किमया हाताला.
त्या दिवशी मी मागता दोन बोंबील आणि पाचसहा मांदेल्यालावून देत’ (म्हणजे वाट्यात एक्स्ट्रा टाकत) ताई म्हणाली, दादा, तुला दोन्ही पोरीच की रे!

दादा तुझी बँक बुडालीच की रेअशा आवाजातलं ते वाक्य ऐकून मी चक्रावलोच, म्हटलं, ‘हो मग?’

ती कळवळून म्हणाली, ‘पोरगा हवा होता ना रे एक तरी. म्हातारपणी आधार नको?’

मी विचारलं, ‘का? पोरी वाऱ्यावर सोडतील?’

ती म्हणाली, ‘तसं नाही रे. पोरी जीव लावतात खूप. पण, पोरगा तो पोरगाच. आमच्याकडे दोन पोरीच असल्या तर खूप त्रास देतात घरचे, दारचे.’

मी म्हणालो, ‘ताई, पोरगा झाला तर त्याच्यावर सगळेच प्रेम करतात. मुलगी झाली तरी तिच्यावर प्रेम करणारे थोडे असतात की नाही. देव अशा स्पेशल घरांमध्येच मुलगी पाठवतो. माझ्याकडे तर त्याने दोन लेकी पाठवल्यात. म्हणजे माझ्याबद्दल त्याला दुप्पट खात्री असणार. हो की नाही?’

**************

त्या दिवशी त्या ताईला हे स्मार्ट उत्तर दिलं खरं, पण ते स्मार्ट होतं इतकंच.

इथे कुणी इतका विचार केला होता आयुष्याचा?

आता हा काही लग्न करत नाही, असं सगळयांनी गृहीत धरून टाकलं तेव्हा, लग्नाचं वय उलटून आठेक वर्षं झाल्यानंतर अचानक लग्न केलं. वयाच्या त्या टप्प्यावर फक्त जिच्यासोबत म्हातारं व्हायला आवडेल (आणि एकलकोंडेपणाच्या दशकपूर्तीनंतर समजुतीने जमवून, जुळवून घेता येईल), असं वाटलं होतं त्या, एक तपाने लहान असलेल्या मुलीला जोडीदार बनवायचं, यापलीकडे कसलाच विचार तेव्हा नव्हता. दोघांचेही स्वभाव, विचार, स्वतंत्र बाणा आणि वयातलं अंतर पाहता, हे दोघे एकमेकांबरोबर फार काळ राहणार नाहीत, असं दोन्हीकडच्या नातेवाईकांनाही वाटलं असणार आणि मित्रमंडळींत तर तशा पैजाच लागल्या असतील. वंशवृद्धी, मुलांना जन्माला घालून त्यांचं लालनपालन करणं असल्या काही महत्त्वाकांक्षी कल्पना दोघांच्याही मनात नव्हत्या. मातृत्वाची स्त्रीसुलभ ओढ वगैरे कल्पनांना अमिता (बायको) अजूनही हसते, आमच्या घरात मुलींचीबय’ (म्हणजे कारुण्यमूर्ती आई) मी आहे, ती नव्हे.

आधी एकमेकांशी नीट अॅडजस्ट होण्यात आणि आपण आहोत लाँग टर्म एकमेकांबरोबर, याची खात्री करून घेण्यात जेवढा काळ जातो, तेवढा गेलाच. त्यानंतर, अनेक लग्नांमध्ये होतो तसा आता नातं अनब्रेकेबल करण्यासाठी मुलं नावाचा गोंद तयार करू या, अशा प्रकारे मुलांचा विचार नाही ना होत आहे, याची खात्री करून तो विचार सुरू झाला, तेव्हा लक्षात आलं की आपण लहान मुलं सांभाळण्यात एक्स्पर्ट असलो (अनेक आयांची, त्यांच्या खांद्यावर रडणारी पोरंही माझ्या खांद्यावर निमूट झोपतात आणि छोट्याशा प्रवासातही एखादं पिल्लू आईकडून माझ्याकडे अल्लाद येतं. ही शाहरुख खानगिरी पहिल्यापासूनच आहे अंगात, त्याला काय करणार?) तरी स्वत:चं मूल हवं, अशी काही खास ओढ आपल्याला नाही. तसा काही विचारच आपण केलेला नाही. शिवाय, तिशीच्या आसपास मुलं जन्माला घालताना आईला त्रास होतात, आजार जडू शकतात, असं काहीबाही ऐकलं होतं. लग्न म्हणजे (पुलंच्या शब्दांतबिछान्यावर बाजूबाजूला चोपडी वाचत बसलेले’) मी आणि ती, यापलीकडचा विचारच केला नव्हता. छान वाचू, सिनेमे बघू, चर्चा करू, मस्त मस्त पदार्थ बनवून खाऊ, भटकू, उंडारू, मुक्त राहू, अशी काहीतरी कल्पना होती. पण, अमिताला मुलांची ओढ आहे, आपल्याला एक तरी मूल असलं पाहिजे, असं तिचं मत आहे, असं म्हटल्यावर मुलांच्या दृष्टीने विचार सुरू झाला. आम्हाला असलं काही सुचवू धजलेले आमचे पालकही आम्ही अजून एकमेकांबरोबर आहोत, हे लक्षात आल्यावर हळुहळू तिकडे ढकलू लागले होतेच.

************

मुलांचा विचार सुरू झाल्यानंतरमुलगा की मुलगीहा विचार सुरू झालामलाकाहीही चालेल, दोन्ही सारखेचअसं मी म्हणालो, ते पोलिटिकली करेक्ट असण्याची शक्यता आहे. मुलगा कसा असतो, काय काय करतो, ते स्वानुभवावरून माहिती असल्याने आणि निसर्गत: बाबांना मुलीची ओढ असतेच, असं म्हणतात, त्यानुसार माझा कल मुलीकडेच होता खरंतर. अमिता माझ्याइतकी पोलिटिकली करेक्ट वगैरे नसल्याने तिने मुलगीच हवी, असं सांगून ठेवलंगंमत म्हणजे आमच्या पहिल्या, जन्माला येऊ शकलेल्या, तीन महिन्यांतच कॉम्प्लिकेशन्स होऊन उदरातच संपून गेलेल्या बाळाशी मात्र तीतो मुलगा असल्यासारखीबोलायची एकटीचतासनतास

मुलगा झाला तर कबीर हे नाव फिक्स होतं आमच्या डोक्यात. किमयाला आम्ही अजून सांगतो की तू मुलगा असतीस तर कबीर असली असतीसती मग केस चापून चोपून बसवून दादूची म्हणजे मावसभावाची हूडी चढवून फुल टु मुलासारखा लुक बनवून येते आणि आवाजबिवाज बदलूनहाय मी कबीरअशी ओळख करून देऊन कबीर असल्यासारखीच वागते...

मुलीचं नाव मात्र आधी ठरलं नव्हतंपहिल्या बाळाचा आकस्मिक अंत ओढवल्यानंतर अमिताच्या गर्भात किमया अंकुरली, स्थिरावली, त्यावेळच्या हळव्या भावस्थितीत किमया हे नाव सुचलंमाधव आचवलांचं पुस्तक आणि पुलंनी आमच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये उभारलेल्याकिमयाचा संदर्भ तर या नावाला होताच, पण तिच्या अस्तित्वाने आकार घेतल्यानंतर आम्हा दोघांच्या आणि कुटुंबाच्या आयुष्यात एक जादू घडू लागली होतीचनात्यांचे वेगवेगळे संदर्भ समजावून देऊन ती आणखी सखोल करणारी.

********

आपणमुलीचा बापआहोत, याची पहिली जाणीव झाली किमयाच्या जन्माच्या वेळी.

पहाटेच्या सुमारास बाळाला जन्म दिल्यानंतर अमिताने विचारलं, मुलगा की मुलगी.

शक्य तेवढा दु:खी चेहरा करून डॉक्टर म्हणाल्या, मुलगी.

हे ऐकल्यावर ती आनंदाने चीत्कारली, तेव्हा त्या बेशुद्ध पडायच्याच बाकी होत्या. मला मुलगीच हवी होती, हे तिने त्यांना सांगितलं, तेव्हा त्यांनीमुलगा आणि मुलगी आजच्या युगात सारख्याच असतात,’ असं १२७० वेळा केलेलं भाषण क्रमांक ३७ आम्हाअन्य कुटुंबियांना ऐकवण्याचा विचार केला असणारपण, मुलीचा बाबाही खूष, दोन्हीकडचे आजीआजोबाही खूष, नातेवाईकही खूष हे पाहून तिला आश्चर्याचा धक्काच बसला असेल

हे प्रकरण किती गंभीर असतं आणि मुलगी झाली म्हटल्यावर लोक कसे वागतात, हे कळलं अनयाच्या जन्माच्या वेळी.

तेच हॉस्पिटल, तीच डॉक्टर, तोच प्रसंग, पुन्हा मुलगीच, पुन्हा तोच आनंद, पुन्हा त्यांना तेच आश्चर्य.

अनयाला गुंडाळून आणून पहिल्यांदा बाबाच्या कुशीत दिल्यानंतर शेजारी बसलेल्या एका बाईने तिची कहाणी सांगितलीतिच्या मुलीची डिलिव्हरी होती. पहिलीच खेप. मुलगी झाली हे कळल्यावर सासरचा एकही नातेवाईक फिरकला नव्हता, दोन दिवसांत मुलीच्या बाबालाही आपल्या लेकीला पाहावंसं वाटलं नव्हतं. आपण काहीतरी भयंकर गुन्हा केला आहे, असं तिच्या लेकीला वाटत होतं आणि ती तिच्या लेकीशी, त्या नवजात बाळाशी तुटकपणे वागत होती. या पार्श्वभूमीवर दुसऱ्या मुलीच्या जन्माचं सेलिब्रेशन करणारी फॅमिली चंद्रावर राहात असावी, असं तिला वाटणं स्वाभाविक होतंएक मुलगी असताना दुसरं मूल जन्माला घालण्याचा निर्णय हामुलगा हवायाच कारणाने होतो, अशी तिची समजूत होतीतसा तो ९९.९९ टक्के वेळा त्याच कारणाने होतो, हे खरंच आहे की. आम्ही .०१ टक्क्यातले आहोत की आली वेळ साजरी करतो आहोत, याचा निर्वाळा तिला कसा मिळणार?

अनया ही (दुसऱ्या क्रमांकाच्या असंख्य मुलांप्रमाणे) अनप्लॅन्ड चाइल्ड होतीजिथे तिने मनीध्यानी नसताना अशी अनपेक्षितपणे आमच्या कुटुंबातघुसखोरी केली होती, तिथेमुलगा हवा म्हणून दुसरा चान्सही कल्पनाही विनोदी होतीआपण आयुष्याबाबत फार काही ठरवायच्या फंदात पडू नये, आयुष्य आपल्या वळणांनी चालतं, असं दाखवून आमची स्वतंत्र बाण्याची नांगी थोडी ठेचणाराच अनुभव होता तोकिमयाच्या पहिल्या वाढदिवसाच्या आसपासच तडकाफडकी नोकरी सोडली होती, आपल्याला काय, लगेच नोकरी मिळेल दुसरी, ही अवास्तव कल्पना हवेत विरल्यावर वेगवेगळ्या मार्गांनी संसारनौका तरवण्याचे प्रयत्न सुरू होतेफ्रीलान्सिंग अर्थात घरी बसून काम करण्याचा तो पहिलावहिला अनुभव होताअशा अस्थिर काळात अनयाची चाहूल लागली, तेव्हा आम्ही काहीतरीप्रागतिकनिर्णय घेऊ, असं नातेवाईकांनाही वाटलं होतंपण, एक जीव नष्ट करणारे आपण कोण, तो येतोच आहे तर येईल आपलं नशीब घेऊन, असा विचार आम्ही केला. म्हणून तर हिब्रू भाषेत देवाचा प्रसाद असा अर्थ असलेल्या अनाइया या नावाचं रूपांतर अनया असं झालं तिचं नाव ठेवताना. अर्थात, अनयाच्या प्रेग्नन्सीच्या काळात आसपासचे बहुतेक लोकपुरोगामी म्हणवतात, मुलगा आणि मुलगी सारखेच असतात, असं सांगतात आणि प्रत्यक्षात पाहा मुलासाठी दुसरा चान्स घेतात,’ अशा नजरेनेच पाहायचे आणि तिकडे ते मनोमन हसायचे, इकडे आम्ही मनोमन हसायचोदोन हातांना दोन मुली पाहिल्यानंतर आजही रस्त्यांवर, लोकलमध्ये, बागेत, मॉलमध्ये, सोसायटीत तशा काही कणवयुक्त नजरा वळतातचआम्ही त्यांची कणव करून सोडून देतो

*********

मोठी किमया आता पाचवीत आहे. अनया पहिलीत.

मधला सव्वा-दीड वर्षांचामी मराठीच्या संपादकपदाचा काळ सोडता मी घराबाहेर पडून नोकरी केलेली नाही. जवळपास सातेक वर्षं मी सतत त्यांच्यासोबत आहे, शाळेचा वेळ वगळता २४ तास त्यांच्याबरोबर आहे, त्यांच्यासमोर आहे. घरातूनच काम करतो आहे. उद्या कुणी त्यांना माझं चित्र काढायला सांगितलं किंवा पुतळा बनवायला सांगितला, तर हरवून गेलेल्या चेहऱ्याने तिन्हीत्रिकाळ लॅपटॉपवर मजकूर बडवणारा चष्माधारी मनुष्य, यापेक्षा वेगळं चित्र त्यांच्या मनात येणार नाही
सामान्यत: नोकरी करणारे आणि मुंबईत उपनगरात राहून नोकरी करणारे वडील किमान १० ते १२ तास घराबाहेरच असतात. उरलेल्यात सहा तास झोपतात, दोन तास आन्हिकांचे पकडा, म्हणजे रोजचे चार तास आणि वीकेण्डचा वेळ एवढाच कुटुंबाला मिळतो, त्यावर इतर कसलं आक्रमण नसलं तर. त्या हिशोबाने पाहाल तर मुलांबरोबर नोकरदार बाबाने व्यतीत केलेला ३० वर्षांचा काळ मी मुलींबरोबर साताठ वर्षांतच व्यतीत केला आहे, तोही त्यांच्या घडणीचा काळकोपरापुढच्या हाताएवढ्या आकाराची ही पिल्लं आता खांद्यावर आली, तो सगळा काळ त्यांच्या सगळ्या लालनपालनात मी आहेचअमिताच्या बरोबरीनेकाही बाबतीत कदाचित जास्तही.

*********

किमया बाळ होती तेव्हाची गंमत. या बाळाबद्दल अतिशय संवेदनशील झालेल्या आम्हा दोघांचं, बरचसं फिल्मी प्रेम ती पोटात असल्यापासूनच उतू जात होतंत्यामुळे इतक्या प्रेमळ आईबाबांना कधी एकदा पाहतो असं होऊन की काय तिने सातव्या महिन्यातच बाहेर येण्याचा प्रयत्न केला होता, तो डॉक्टरांच्या मदतीने आम्ही हाणून पाडला आणि तिच्या बाबतीत आणखी हळवे झालो. नवसबिवस मानणारे लोक नवसाच्या पोरांचं जे काही कोडकौतुक करत असतील, ते तिच्या वाट्याला आलंखासकरून माझ्याकडून. मी घरी असेन तेव्हा (म्हणजे अमिताच्या माहेरी) हातभराच्या किमयाला घेऊन बसायचो, तिची शी शू साफ करणं, अंघोळ झाल्यावर तिला नीट बांधून ठेवणं हे सगळं करायचो. मी तिला इतका घेरून होतो की अमिताच्या आजीने तिच्याकडे तक्रार केली, अगं जावई तिला आमच्याकडे देतच नाहीत, जेव्हा बघावं तेव्हा तेच घेऊन बसलेले असतात.

एवढं करूनही एक वर्षाची होईपर्यंत किमया तिच्या आईशीच जोडलेली राहिली. माझ्याकडे ती यायची, पण परक्यासारखी. आईच्या दुधावर पोसल्या जाणाऱ्या बाळांच्या बाबतीत हे नैसर्गिक आहे, हे सुशिक्षित माणसाला कळू शकतं, पण मुलीच्या बाबाला ते कळत नाही, त्याला असूया वाटते. पहिल्या वाढदिवसाच्या आदल्या रात्री एकच्या सुमारास काही कारणाने ती भयंकर रडू लागली. वेळ अशी की करायचं काय? आई, अमिता दोघींनी त्यांना माहिती असलेले उपाय करून झाले, पण ते रडू काही थांबेना. हा खेळ पहाटे चारपर्यंत चालला. नंतर मी त्यांना सांगितलं, तुम्ही सगळे झोपायला जा, आता ही आहे आणि मी आहे. किमयाला खांद्यावर घेतलं आणि हॉलमध्ये सगळे दिवे मालवून तिला घेऊन जोजवत फिरत राहिलो. तिने थोडा निषेध करून पाहिला, पण हा मनुष्य आता काही ऐकायचा नाही, हे लक्षात आल्यावर किंवा कदाचित दुखणं पसार झाल्यामुळे ती जी काही गुल झाली ती झालीच

तेव्हा तिला बाबाची ओळख पटली की काय कोण जाणे, पण तेव्हा जी चिकटली ती चिकटलीच.

***********

अनया मात्र अगदी सुरुवातीपासून बाबाची लाडकी! (...म्हणजे बाबाची लाडकी धाकटी मुलगी. कोणाही एका लेकीला नुसतीबाबाची लाडकीम्हणता येत नाही… ‘बाबाची लाडकी मोठी मुलगीकिंवाधाकटी मुलगीअसं स्पष्ट करावं लागतं, दुसरीचे कान टवकारलेले असतातनुसतं लाडकी मुलगी म्हटलं तर दुसरी येऊनआणि मी काय दोडकी काय,’ असं म्हणून कान उपटू शकते. एखादा पदार्थ एकीला भरवला की दुसरीला भरवावाच लागतो, एकीकडचं चॉकलेट खाल्लं की दुसरीच्या हातातलं चॉकलेट खावंच लागतं. शास्त्र असतंय ते.)

तर सांगत काय होतो, अनया जन्मानंतर पहिल्याच आठवड्यात पाठीत पू होऊन आजारी पडली आणि एका डॉक्टररूपी कसायाच्या कृपेमुळे एका रात्रीत फिकुटलेली होऊन एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाली तीच आयसीयूमध्ये. किमान ४८ ते ७२ तास ती तिथेच राहील असं सांगितलं गेलं होतंआयसीयूमध्ये फक्त तिच्या आईलाच परवानगी होती, तीही दिवसातून दोन वेळा दूध पाजायला. एरवी तिला कापसाच्या बोळ्याने दूध पाजत होतेते सर्व दिवस सर्व वेळाचा मुक्काम हॉस्पिटलमध्येच होतालेकीला सोबत पण लेकीला काचेतूनच पाहावं लागत होतंप्रचंड भुकेने, दुखण्याने आणि माणसाच्या ऊबेच्या गरजेने (हे नंतर लक्षात आलं) ती ठ्यां ठ्यां रडायची, सगळा मजला डोक्यावर घ्यायची, दुरून पाहण्याशिवाय काही करता यायचं नाहीया भयंकर वेदनादायी अनुभवाला आणखी एक किनार होतीकिमया आईच्या उदरात असताना तिच्या आगमनाकडे डोळे लागले होते, तेव्हा सगळं सुस्थिर होतंआयुष्यातल्या एका अत्यंत अस्थिर टप्प्यावर अनपेक्षितपणे आयुष्यात येऊ घातलेल्या अनयाच्या आगमनाच्या वेळेला अनेक चिंतांनी व्यापलो होतो, अनेक प्रश्नांनी गांजलो होतो, शिवाय पहिल्या बाळाच्या आगमनाला जो उत्साह असतो, तो दुसऱ्या बाळाच्या वेळी थोडा फिकुटतोचमी मनाने अजून दुसऱ्या बाळाचा स्वीकार करण्याच्या स्थितीला पोहोचतो ना पोहोचतो, तोच हा प्रसंग ओढवला होता आणि तिच्या क्रिटिकल असण्याने हे लेकरू आपल्यासाठी काय आहे, याची पोटात खड्डा पाडणारी जाणीव करून दिली होतीअखेर एका सकाळी डॉक्टरांचं हृदय द्रवलं आणि त्यांनी पाच मिनिटं आत जाण्याची परवानगी दिली. आत जाताच ते रडणारं पिलू माझ्या हातात सोपवलं गेलं आणि तत्क्षणी तिचं रडू थांबलंती शांत झाली, कुशीत घेऊन जोजवली तर शांतपणे झोपी गेलीत्या चिमुरड्या विश्वासाने त्या दिवशी माझ्या बाजूने पडलेलं सगळं अंतर क्षणात पार करून टाकलं आणि त्या दिवशी ती जी कुशीत शिरली ती आता पहिलीत गेली तरी सोडत नाहीबाबाचं शेपूट बनून सतत चिकटून चिकटून असते

***********

घरातून काम करताना मुलींचा अडथळा होत नाही का, डिस्टर्ब होत नाही का, असं अनेक लोक अनेकदा विचारतात. तेव्हा मला ओशोंनी सांगितलेली रवींद्रनाथ ठाकुरांच्या कवितेची गोष्ट आठवते. त्या कवितेत यशोधरा गौतम बुद्धाला विचारते, ज्यासाठी घर सोडून, आम्हाला सोडून जंगलात जाऊन राहणंच अनिवार्य होतं, असं कोणतं सत्य तुला गवसलं? अद्भुत प्रश्न आहे हा! ते जे काही गवसायचं होतं ते संसारात राहूनही गवसलं नसतं का?
लेकींच्या लालनपालनात सहभाग घेऊन घरातून काम करतानाचा अनुभव तोच प्रश्न जागवणारा होता. नोकरीतली धावाधाव, त्यातली भावनिक गुंतवणूक, घालवला जाणारा वेळ, मिळणारं कामाचं समाधान आणि अर्थातच आर्थिक उत्पन्न, यांची एकत्रित बेरीज ही लेकींबरोबर राहून आपल्या सोयीने काम करून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या आणि समाधानाच्या बेरजेपेक्षा जास्त नसेल तर मग उगाच ती यातायात का करा, असाच विचार होता. शिवाय प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर बाहेर कोणी नोकऱ्यांसाठी पायघड्या घालून निमंत्रित करत नव्हतं, जिथून विचारणा होत होती, तिथे जाण्याची इच्छाच नव्हती.

किमया आणि अनया यांच्या अंघोळीपासून शाळेच्या तयारीपर्यंत, वेण्या किंवा पोनी घालण्यापर्यंत सगळं काही मी अगदी अलीकडेपर्यंत करत आलो. आता मम्माहीवर्क फ्रॉम होमअसल्याने हा जिम्मा तिने उचलला आहे. माझ्यावरतिन्ही मुलींना चमचमीत पदार्थ करून खायला घालण्याची किंवा स्वयंपाकाच्या बाईंकडून करवून घेण्याची जबाबदारी आहे (त्यात आता चौथ्यामुलीची म्हणजे माझ्या मम्माची भर पडली आहे). शिवाय मी दोघींचीबयतर आहेच, दोघीही मला कधीही इमोशनली ब्लॅकमेल करू शकतात. ती सोय फक्त माझ्याकडेच आहे, मम्मा इज हार्ड नट. म्हणूनच दोघींच्या अभ्यासाची जबाबदारी मम्माकडे आहे. मी फक्त तिने अभ्यासावरून डाफरल्यावरकिती क्रूर ही बाई, किती कठोर ही आईया त्यांच्या गाण्याला पूर्ण सहानुभूतीने कोरस देण्याचं काम करतो. आम्हा दोघांच्या त्यांच्याकडून फारशा शैक्षणिक अपेक्षा नाहीत, दोघी स्कॉलर असणार नाहीत, हे आम्हाला आमच्यावरून माहिती आहेपण, अनया गाते, किमयाला अभिनयाची आवड आहे, दोघी उत्तम मराठी बोलतात, वाचतात, त्यांच्यापाशी रोज करण्यासारखं खूप काही असतं, ते करत असतातत्यातून त्यांचं व्यक्तिमत्त्व घडत जावं आणि त्यांच्यातून जे काही सर्वोत्तम बनण्याची शक्यता आहे, ते बनण्यासाठीची रसद पुरवण्याची आमची पात्रता असावी, एवढाच आमचा प्रयत्न आहेजनगणना अहवालाच्या नोंदींमधून आम्ही जात आणि धर्माचे रकानेही मोकळे सोडले आहेत सर्वांचेच. दोघींना पुढे जाऊन या कुबड्यांची गरज पडली तर तो त्यांचा प्रश्न राहील

मला एकेकाळी, म्हणजे आमच्या लग्नाच्या वेळी अमिता म्हणाली होती की आमच्या (म्हणजे तिच्या माहेरच्या) घराचं एक युनिट आहे. आम्ही दोघी बहिणी आणि आमचे आईबाबा. यात पाचव्या माणसाची (तिच्या मोठ्या बहिणीचे यजमान) सवय व्हायला वेळ लागला, आता तुम्ही सहावे आलात. पण आम्ही चौघे असतो तेव्हा आम्हीच चौघे असतो. आमचंही तसंच काहीसं होऊन गेलंय. आम्ही सतत एकमेकांबरोबरच राहतो, सिनेमे पाहतो, कार्यक्रमांना जातो, फिरायला जातो, त्याने सगळ्यांना एकमेकांची अशी सवय होऊन गेली आहे की आजोळीही मुली आजीआजोबांच्या कुशीत उत्साहाने झोपायला जातात आणि दोन तासांनी उठून पुन्हा परत आमच्याकडेच येतात. त्यांना सोडून फार काळ परगावी राहण्याची सोय नाही. त्या बिथरतात

हे सगळं चांगलं आहे की वाईट आहे की काय, कोण जाणे!

काही सन्मित्र आणि सन्मैत्रिणींना वाटतं की आम्ही (म्हणजे मी) आयुष्यातला मोलाचा काळ बेबीसिटिंगमध्ये वाया घालवतोय. या काळात मी वाचावं, लिहावं, सिनेमे वगैरे पाहून प्रगल्भ व्हावंकाही वेळ स्वत:ला द्यावावयाच्या ३८व्या वर्षापर्यंत ठार एकटेपणात काढलेला मनुष्य तेव्हा तो किमान दहा वर्षांचा, ऐन उमेदीचा वेळही सार्थकी लावू शकला नाही, तर आता काय मोठे दिवे लावणार आहे, असा प्रश्न माझा मलाच पडतोउलट मी या सगळ्या गोतावळ्यात आहे, त्यांच्याप्रतीच्या काही जबाबदाऱ्या आहेत म्हणून नेटाने चार गोष्टी करतो आहे, एकटा असतो तर कदाचित इतका टिकावही धरू शकलो नसतोकिमया आणि अनया यांचं आसपास असणं, सतत काहीतरी विचारत राहणं, सांगत राहणं, हा त्यांच्याबरोबरच माझ्या वाढीचाही भाग आहेत्यांना घडवताना रोज मीही माणूस म्हणून घडतो आहेआपली मूल्यसारणी, माहिती, विवेकबुद्धी या सगळ्यांना कसाला लावतो आहेपारखून घेतो आहे

आणखी काही वर्षांतच त्या आमच्या पंखांखालून बाहेर पडतील, त्यांचं त्यांचं विश्व तयार होत जाईल, तेव्हा मला हे सगळं व्यक्तिगत आत्मिक उन्नयन वगैरे करायला वेळ मिळेलच की भरपूर

अलीकडेच एकदा अनया रात्री माझ्या कुशीत असताना अपसेट दिसलीतिला विचारलं तर रडू लागलीम्हणाली, पप्पा, तुम्ही आताच इतके मोठे आहात, मी किती छोटी आहे. मी कॉलेजात जाईन तेव्हा तुम्ही म्हातारे असालतुम्ही लवकर लग्न करायला हवं होतं ना?...

मी म्हणालो, बेटा, बरोबर आहे. पण तुझ्याच आईबरोबर लग्न करायचं होतं तर ती इतकी लहान होती की तो बालविवाह झाला असता, त्याला बंदी आहे. दुसऱ्या कुणाशी लग्न केलं असतं तर दुसरं कुणीतरी मूल झालं असतं, तू कशी झाली असतीसआणि इतर कोणत्याही बाबाने त्याच्या मुलींबरोबर जेवढं आयुष्य घालवलं असेल, त्याच्यापेक्षा खूप जास्त काळ मी तुमच्याबरोबर घालवलायमी म्हातारा होईपर्यंत पकशील मला आणि म्हणशील, बास झालं आता, सारखा आमच्या बरोबरच असतोस, सारखा चिकटून चिकटूनच असतोस आम्हालाबाहेर जा की आता.

तिचं रडू पळालंतिने एक गालगुच्चा घेतला आणिक्यूटी पायअसं म्हणून गालावर एक किशी देऊन ती कुशीत शिरून गाढ झोपलीरात्रभर हाताला तिची मिठी पडलेली होती

...तरहाच मुलींचा बापअसणं हे असं आणि इतकं सुखाचं असतं; करुणेने कसलं बघताय, जळा लेको जळा!

(
ता. . : मुलींच्या डब्यासाठी अरबी फ्राय बनवणे, अंडी उकडून देणे, अनयाच्या कोल्ड कुकिंग असाइनमेंटचे प्रोफेशनल फोटो काढणे, उटणं लावलेल्या किमयाचाहम काले हैं तो क्या हुआ दिलवाले हैंया गाण्यावरचा अर्धा मेहमूद स्टाइल आणि अर्धा कोकणी बाल्या डान्स स्टाइल नाच पाहून प्रोत्साहन देणे, संगीत शिकणाऱ्या अनयाचीबिरज में धूम मचाओ श्यामही चीज ७१३ वेळा ऐकणे, सुटी असल्यामुळे तिने दर दहा पंधरा मिनिटांनी जवळ येऊन, कामात डिस्टर्ब करूनमी पकलीयेअसं सांगितलं की मगताटात जाऊन बस, सगळे शिजलेले पदार्थ ताटातच वाढले जातातअसा किंवा तिनेमी बोर झालेयअसं सांगितलं कीतिखट मीठ लावून येअसा पाचकळ विनोद करणे आणि तिला हसवून हुसकावणे, अशा सगळ्या व्यापातून लेखकाने सदरहू लेख लिहिला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.)


9 comments:

 1. बढिया!!! 😊😊😊💐💐💐

  ReplyDelete
 2. अप्रतिम !
  आपण जगांतील सर्वोत्तम जन्मदाते आहात.

  ReplyDelete
 3. कित्ती भारी...

  ReplyDelete
 4. अप्रतिम

  ReplyDelete