Monday, February 28, 2011

बोले तो, मुंबई का पंछी कौन?

‘‘भाय, भाय, उठो भाय, देखो..’’
 
भल्या दुपारी दीड वाजताची साखरझोप सर्किटच्या ओरड्याने मोडली, तेव्हा मुन्नाभायचा भेजाच आउट झाला होता. पण, सर्किट एवढा एस्काइटझालाय म्हंजे मॅटर तसाच इम्पोर्टनअसणार, हे जाणून त्याने सर्किटला झापडलं नाही.. फक्त त्रासिक मुद्रेनं त्याच्याकडे पाहात तो करवादला, ‘‘तेरेकू कुच कामधंदा नई क्या रे? सुबै सुबै पकवायला आलास तो.’’
 
‘‘अरे भाय पकाने नई आया हूं, ही न्यूज दाखवायला आलोय,’’ हातातला पेपर फडकावत सर्किट म्हणाला, ‘‘हे वाच ना. मुंबई का बर्ड कौन?..’’
 
‘‘बर्ड बोले तो पक्षी ना? हे काय नाटक आहे?’’
 
‘‘वो ऐसा है भाय की, हरएक गावाचा, शहराचा, कंट्रीचा आपला एक जनावर असतो, झाड असतो, पक्षी असतो.. अपने इंडिया का कैसे टायगर है.. तसाच मुंबईचा पक्षी निवडणार आहेत..’’
 
‘‘इत्ता बडा इलेक्शन आया आणि आपल्याला साधी खबर नाही. बुलाव सब पंटर लोग को.’’
 
‘‘भाय भाय, चिडायचं नाय. ये पेटी, खोकावाला इलेक्शन नही है.’’
 
‘‘फिर तू कायको लेके आया ये लुख्खा मॅटर?’’ मुन्नाभायने परत पांघरूण डोक्यावर ओढून घेतलं. सर्किटने ते पुन्हा खेचलं.
 
‘‘अरे भाय, अपने शहर का पंछी कोई दूसरा चुनेगा तो तुम को चलेगा क्या? विलेक्शन कोई भी असो, अपनाही कॅंडिटेड जीतना चाहिए की नहीं?’’
 
‘‘अरे हो रे, नाही तर आपल्या इज्जतचा फालुदा!’’
 
‘‘म्हणूनच सांगतो, तू फक्त पंछी फायनल कर भाय, आपल्या सगळय़ा पंटरांना बसवतो रपारप वोटिंग करायला.’’
 
‘‘ठीक आहे. पढ पढ तू आगे पढ.’’
 
सर्किट वाचू लागला, ‘‘या निवडणुकीत कावळा, तांबट, फ्लेमिंगो आणि दयाळ पक्षी उमेदवार आहेत.’’
 
‘‘अरे बापरे, हे काय मॅटर घेऊन आलास तू,’’ अंगावरचं पांघरूण उडवून हातातला घोडा सज्ज करीत मुन्नाभाई ताडकन उठून उभा राहात ओरडला.
 
‘‘क्या हुआ भाय?’’ सर्किट भांबावलाच.
 
‘‘ये दयाळका मॅटर लेके आया तू? दयाळ कोण आहे हे ठाऊक नाही तुला? अरे, वो सब भाई लोग का बडा भाई है.. मुंबई का पुलिस कमिशनर.’’
 
पोट धरधरून हसत सर्किट कसाबसा म्हणाला, ‘‘अरे भाय, हा तो दयाळ नाही.. दयाळ नावाचा पक्षी आहे.’’
 
‘‘दुसरं काय नाव नाय सापडलं काय त्याच्या मम्मी-डॅडीला? असल्या मनहूस नावाचा पक्षी आपल्याला या इलेक्शनमध्ये नाय पायजे.’’
 
‘‘ओके. कट. वैसे भी मुंबईमे इतनी चिडिया देखी, पण, हा दयाळ कोण काळा का गोरा कधी बघितल्याचं आठवत नाय.’’
 
‘‘उसको छोड. दुसरा कोन कँडिटेड आहे, ते बोल.’’
 
‘‘हा तांबट नावाचा पक्षी पण कधी पायलेला नाय.’’
 
‘‘अरे सर्किट, या मुंबईमध्ये खडी होणारी एकेक बिल्डिंग आसमान छू रही है.. त्यांच्या गर्दीतून दिवसा सूर्य आणि रात्री चांद दिसणं मुश्कील झालंय आणि तुला पक्ष्याची पडलीये.’’
 
‘‘वो भी सही है भाय, लेकिन ये तांबट..’’

 अचानक मुन्ना गालातल्या गालात हसू लागला, ‘‘क्या क्या नाम है साला ये पंछी लोगका भी. एक का पुलिस कमिशनर का नाम है, तो दुसरा लगता है की किसी गँग का टपोरी.. तांबट.. मुन्ना गँगचा खतरनाक शार्पशूटर पक्या तांबट..’’ मुन्नाभाई गदगदून हसत म्हणाला, ‘‘हटा इस तांबट को भी, कल्टी मार. अब बचा कौन?’’

‘‘फेल्मिंगो या ऐसाही कुछ उल्टासीधा नाम है..’’
 
‘‘कमाल है, एक मुंबईकर ज्याचं नीट नाव घेऊ शकत नाही, तो मुंबईचा पक्षी बनणार? है कौन ये आयटम? कोई फॉरेनर है क्या?’’
 
‘‘व्वा भाय! क्या सही पैचाना. वो सिवडी का खाडी है ना, तिकडे येतो हा पक्षी फॉरेनवरून.’’
 
‘‘फॉरेनवरून उडून येतो इतक्या लांब. साला पंखात काय ताकद असेल रे याच्या आणि जिगर केवढी!’’
 
‘‘तो इसको फायनल करे?’’
 
‘‘नाय रे. याला सिलेक्ट केला तर राज ठाकरेला आयता मॅटर मिळेल ना परप्रांतीय पक्षी निवडला म्हणून.’’
 
‘‘मग आता राहिला कावळाच.’’
 
‘‘हां, ये कौव्वा मुंबई का पंछी हो सकता है..’’ मुन्नाची कळी खुलली, ‘‘तो सगळीकडे दिसतो. मुंबईकरांसारखाच विनातक्रार कितीपण घाणीत राहतो. ती साफसुद्धा करतो. मेहनती आहे बिचारा.’’
 
‘‘मग याला फायनल करू?’’
 
‘‘नही यार सर्किट! 20-25 वर्षापूर्वीच्या सीध्यासाध्या मुंबईचा पक्षी म्हणून बरोबर होता तो. आताची मुंबई फार बनेल झालीये, एकदम चालू आयटम. कौव्वा बहुत सीधा है.’’
 
‘‘भाय, बुरा ना मानो तो मीच एक सजेशन देऊ का?’’
 
‘‘बोल ना, बोल.’’
 
‘‘मुंबईचा पक्षी म्हणून अ‍ॅक्चुअली कोंबडीला निवडलं पायजेल.’’
 
‘‘वो क्यूं?’’
 
‘‘अरे भाय, हर संडे-वेन्सडे-फ्रायडेला या शहरात सगळय़ांच्या तोंडात फक्त एकच नाव असतं.. कोंबडी. लाखो मुर्गी कटती है एकेक दिन में. जी मुंबईकराचं पोट भरते, जिचे एवढे टेस्टी आयटम बनतात, त्या कोंबडीलाच का नाय निवडून द्यायचं?’’
 
‘‘बात तो सही है, वैसेभी मुंबई ही पण सगळय़ा पॉलिटिशन लोकांसाठी कोंबडीच तर आहे सोने के अंडे देनेवाली. पण सर्किट, पब्लिकला असे सस्त्यात कटणारे पंछी आवडत नाहीत. जिंदा पंछीच आवडतात.’’
 
‘‘फिर तो कबूतर ही बचा.’’
 
‘‘अरे, नाव नको घेऊ त्या नामुरादचं. साला नुसता घुमत बसणारा, आयते फेकलेले दाणे खाणारा, जिकडे तिकडे घाण करून ठेवणारा पक्षी. त्याला बघितलं की मला सरकारी बाबूच आठवतात.’’
 
‘‘मग आता तूच बोल भाई मुंबईचा पक्षी कोण?’’
 
विचारमग्न मुन्नाभाई आपल्याच तंद्रीत उठून पुढे निघाला.. टेकडीवरून खाली सगळी मुंबई दिसत होती.. उन्हात सोन्यासारखी चमचमणारी. अचानक आकाशातून अवकाळी काळे ढग झेपावले आणि मुंबईची झळाळी काजळली.. तिकडे पाहात मुन्ना ओरडला, ‘‘वो देख सर्किट, मुंबई का पंछी?..’’
 
सर्किटने डोळे ताणून आकाशात पाहिलं.. ढगांचा आकार थेट गिधाडासारखा दिसत होता.. जणू त्यांनाही माहिती होतं की ही मुंबई आतून कधीच मेली आहे.. तिच्या छाताडावर बिल्डिंगी उभ्या राहतायत, पूल बनतायत, ट्रेना धावतायत, माणसं लोंढय़ांनी येऊन वसतायत.. पण, या शहराचा आत्मा कधीच उडून गेलाय.. एखाद्या पाखरासारखा..

 ..विस्फारल्या आणि ओलावल्या डोळ्यांची पापणीही न लववता भयकंपित सर्किट मुंबईवर झेपावणारा मुंबईचा पक्षी पाहात जागीच खिळून थरथरत राहिला.

(चित्र : प्रदीप म्हापसेकर)

(प्रहार, २७ फेब्रुवारी, २०११) 

Thursday, February 24, 2011

एका लग्नाची कारणमीमांसा


माणूस लग्न का करतो?...
त्याला करांवसं वाटतं म्हणून...
तो लग्न का करत नाही... त्याला करावंस वाटत नाही म्हणून... किती सोप्पं आहे ना! पण, आपल्याकडे हे फार अवघड होऊन बसतं... कारण, समाजात बहुसंख्य लग्न करणाऱयांची आहे आणि उजखुऱयांच्या जगात डावखुरं असणं ही जशी विकृती (ऍब्नॉरमॅलिटी या अर्थी) मानून डावखुऱयाला छळलं जातं. बळजबरीनं उजखुरा बनवण्याचा प्रयत्न केला जातो. तसं लग्न करणारे बहुसंख्य घेरतात लग्न न करणाऱयाला.
गंमत पाहा, `लग्न' ही दोन व्यक्तींमधल्या अंत्यत व्यक्तिगत अशा निर्णयाची फक्त एक सामाजिक आणि कायदेशीर घोषणा आहे... कुणी कुणाशी लग्न केल्या- न केल्यानं समाजाचं फार मोठय़ा प्रमाणावर काही घडत- बिघडत नाही. पण, तरीही माणसं लग्नाचं वय `उलटून चाललेल्या' माणसाला (म्हणजे ज्यानं 15 वर्षांचा असताना केलं, तो 16 वर्षाच्या माणसाला, ज्यानं तिशीत केलं, तो 31 वर्षांच्या माणसाला, असे) जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी विचारत राहतात, ``का रे बाबा लग्न करत नाहीस तू?''
यातला एकही माणूस दुसऱया कुणा माणसाला ``का रे बाबा लोकांशी चांगला वागत नाहीस तू?'', ``का रे बाबा कधीच हसत नाहीस तू?'', ``का रे बाबा पैसे खाणं सोडत नाहीस तू?'', ``का रे बाबा लोकांना बोअर करणं सोडत नाहीस तू?'' असा एकही प्रश्न कधी एकदाही विचारत नाही... समाजावरच्या परिणामांच्या दृष्टीनं विचार केलात, तर हे प्रश्न अधिक सामाजिक नाहीत का?
आणि लग्न केलेल्याला कुणी विचारलं, की ``का रे बाबा तू लग्न केलंस?'' तर त्याचं विचारपूर्वक उत्तर मिळणं फार कठीण आहे. कारण, लग्न ही काही विचारपूर्वक करायची कृती नाही, ती एक रूढी- परंपरेनं करायची गोष्ट आहे... ऑल्मोस्ट श्रद्धेय... जिथे श्रद्धा ठेवायची, तिथं डोकं बाजूला काढून ठेवायचं असतं आणि बहुसंख्य मंडळी डोकं बाजूला काढून ठेवायला सदैव तयार.
`आई- वडिलांचा आग्रह मोडता आला नाही', `लाइफ मे सेटल होने का है', `हेच तर वय असतं लग्न करायचं, हक्कानं शारीरिक सुख अनुभवायचं, `योग्य वयात लग्न केलं की सगळं वेळच्या वेळी होतं', `पोरगी आवडली, हो म्हणून टाकलं, `उपाशी मरावं लागेल, कपडे कोण धुणार?' अशी हमखास यशस्वी कारणांची जंत्री मांडेल कोणी, पण यातल्या प्रत्येक गृहितकातली छिद्रं पाहायची ठरवली तर दिसू शकतात. आईवडिलांचे इतर (गैरसोयीचे) आग्रह मोडले जातात, अनेकजण लग्न करून स्थिरता गमावतात, `योग्य वयात लग्न' ही सगळं वेळच्या वेळी होऊन जाण्याची गॅरंटी नसते, प्रॉबेबिलिटी असते आणि लग्न झाल्यानंतर नवरोबावर दोन माणसांचा स्वयंपाक करण्याची आणि दोघांचे कपडे धुण्याची वेळही येऊ शकतेच ना?
लग्न करण्याच्या या सगळ्या कारणांमध्ये काही विचार मागेच पडतात. उदा. आपण एका व्यक्तीला आयुष्यभराचा जोडीदार मानणार आहोत, तर हे शेअरिंग कशा प्रकारचं असणार आहे? ज्या सवलती आपण स्वत:ला घेतो, त्या जोडीदाराला देणार का? आपण आपल्या सुखाचा विचार करतो, कुणाशी जन्मभराचं नातं जोडताना तिच्या सुखाचा विचार करणार का? कुठपर्यंत करणार? या सगळ्याचा विचार सामाजिक सवयीपोटी लग्न करणारे करतात का?
त्यांच्या बोलण्यावागण्यातून कधी तसं फारसं दिसत तर नाही. मॅरेज इज द ओन्ली ऍडव्हेंचर ओपन टु द कॉवर्डस, या न्यायानं ते आयुष्यभर `लग्न केलं ही `कर्तबगारी' मिरवत फिरतात...
आणि समजा, त्यांनी, त्यांच्या मते विचारपूर्वक घेतला असेल निर्णय; तर त्यांना जसा काही करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे, तसा काही न करण्याचा अधिकार इतरांना नाही की काय?
आता, हा अधिकार कुणी नाकारलाय, आम्ही फक्त विचारणा करतो, अशी मखलाशी करील कुणी. पण, प्रत्यक्षात माणसं एखाद्या कुष्ठरोग्याकडे किंवा कॅन्सरच्या लास्ट स्टेजला असलेल्या पेशंटकडे पाहतात, तसं पाहतात लग्न न करणाऱयांकडे (`लग्न न करणारी'ची तर भयंकरच स्थिती होत असणार) कधी काळजी (कसं रे बाबा होणार याचं पुढे?), कधी उपहास (काही फॉल्ट वगैरे तर नाही ना?)... तर कधी थेट तिरस्कार (पोरीबाळींचं घर आहे, त्याला कशाला बोलावताय?)... प्रतिक्रिया काहीही असो, पण ती असतेच... जणू लग्न न करणं ही एक महान क्रिया आहे आणि तिला प्रत्येकाची प्रतिक्रिया असलीच पाहिजे... मग, दर लग्नात ``आता तुझा नंबर कधी'' असं तोंडभर कुत्सित हसत विचारणाऱया हितचिंतकाला, तो अंत्ययात्रेला भेटल्यावर तेवढेच दात विचकून `आता तुझा नंबर कधी' असं विचारावंसं वाटतंच काऱया (लग्न न केलेल्या) माणसाला.
अशा माणसांची विचारून विचारून तोंडं दुखल्यानंतर, `आता काही हा बोहोल्यावर चढत नाही', अशी अगदी खात्री पटल्यानंतर जेव्हा माणूस अनपेक्षितपणे लग्न करण्याचा निर्णय घेतो, तेव्हा तो का घेतो?
उत्तर फार कठिण आहे... कारण, ते फार सोपं आहे आणि इतकं सोपं उत्तर आपल्याला पटवून घेता येत नाही.
तोवर तसं करावंस वाटलं नव्हतं म्हणून केलं नव्हतं आणि आता करावंसं वाटलं म्हणून केलं, इतकं सरळ उत्तर असू शकतं या प्रश्नाचं. इतक्या सोपेपणानं वाटण्यामागे काही कारणपरंपरा असू शकते म्हणा.
माणसाचा सर्वकाळ स्वत:शी आणि भोवतालाशी एक लढा चालू असतो. लोकलच्या एका सीटवर चार माणसं एकमेकांशेजारी खेटून बसताना खांदे हलवून हलवून एकमेकांकडे रोगेरागे पाहून, भांडून जशी ऍडजस्ट होतात अखेरीस आणि नंतर एकमेकांच्या खांद्यांवर डोकी टेकत पेंगतात, तसं काहीतरी आयुष्याशी सुरू असतं... काहीजणांची ऍडजस्टमेंट लवकर होते आणि मग प्रवासाचा पुढचा टप्पा सुरू होतो... काहीजणांचे झगडे लवकर संपत नाहीत. रक्ताची उकळी ज्सात काळ टिकते... आत्ममग्नतेचा भोवरा अधिक काळ गरगरवतो... अशा वेळी दुसऱया कुणाला त्या भोवऱयात गटांगळ्या खाण्याचं आवतण का द्यायचं?
`स्व'चं भान आलं, तरच आपल्याशी `कम्पॅटिबल' काय, हे कळणार ना? आपली स्पेस नेमकी किती, हे कळेपर्यत थांबावं, ती कुणाशी किती शेअर होऊ शकते, याचा अंदाज घ्यावा, दोन माणसांमधलं कोणतंही नातं म्हणजे तो अखंड चालणारा प्रयोग आहे, याचं भान ठेवावं. आणि तेच भान ठेवून आपल्याबरोबर कुणी उत्साहानं उडी घ्यायला तयार झालं, तर हातात हात गुंफावा...
म्हणजे प्रवास कुठेही, कसाही थांबो... जेवढा होईल तेवढा आनंदाचा होतो... आणि महत्त्वाचे म्हणजे, एक तह्ह्यात अधिकार मिळतो... आपलं वय काय, आपली पात्रता काय, आपला पगार किती, यातल्या कशाचीही तमा न बाळगता कुणालाही कधीही, कुठेही विचारण्याचा, ``का रे बाबा तू लग्न का नाही करत?''

(महाराष्ट्र टाइम्स, २२ एप्रिल, २००७)

Wednesday, February 23, 2011

सामर्थ्य आहे प्रयोगाचे!


भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) गुप्त तळावर आमचं गुप्त विमान अगदी गुप्तपणे उतरलं आणि डोळे बांधून एका वाहनात (बहुधा ड्रिंक्सची ट्रॉली असावी) बसवून आम्हाला एका गुप्त स्थळी नेण्यात आलं. (ऍक्चुअली, त्या वाहनानं जागच्या जागीच चार चकरा मारून समोरच्याच एका दरवाज्यातून आत प्रवेश केला होता. असो.) डोळयांवरच्या पट्टया निघाल्या आणि आम्ही सगळे चकितच झालो. आम्ही एका प्रचंड मोठया प्रयोगशाळेत पोहोचलो होतो. सगळा धूरच धूर पसरला होता. वेगवेगळया यंत्रांवरची रंगीत बटणं लुकलुकत होती. पांढरेधोप गणवेश घातलेले अनेक कर्मचारी लगबगीनं इकडे तिकडे ये जा करत होते.
आमचे आश्चर्यचकित डोळे एका प्रचंड परीक्षानळीवर स्थिरावले आणि आता डोळे भुवया फाडून बाहेर पडतील की काय इतके विस्फारले. त्या परीक्षानळीत चक्क तेंडल्या होता आपला. एका निळया द्रवात तो गटांगळया खात होता. ''वेलकम, जंटलमेन फ्रॉम द प्रेस!'' मागून फडर्या इंग्रजीत स्वागत झालं. वळून पाहिलं, तो चॅपेलगुर्जी पांढरा ऍप्रन घालून हातात दोन छोटया परीक्षानळया घेऊन उभे. ''प्लीज, फॉलो मी.''
आम्ही लगेच त्यांच्या मागे निघालो. पुढच्या वळणावर एका परीक्षानळीत सेहवाग. चॅपलगुर्जींनी चार्टवरच्या नोंदी वाचल्या. मनोमन विचार केला. मग हातातल्या परीक्षानळयांकडे बराच वेळ रोखून पाहिलं आणि मग निर्धारपूर्वक त्यांनी त्यातल्या एका द्रवाचे काही थेंब सेहवागच्या परीक्षानळीत टाकले. सेहवागचा चेहरा वेदनेनं पिळवटला. तो 'ओय ओय' म्हणून ओरडत, चॅपेलगुर्जींच्या दिशेनं चमत्कारिक हातवारे करीत जागच्या जागी नाचू लागला.
गुर्जींच्या चेहऱ्यावर हास्य विलसलं. म्हणाले, ''एक्स्परिमेंट सक्सेसफुल!''
आम्ही विचारलं, ''कसला एक्स्परिमेंट?''
ते म्हणाले, ''मी सेहवागच्या मनात असुरक्षितता निर्माण केली. त्याचा फलंदाजीतला क्रम बदलला जाण्याची. आता तो ताबडतोब फॉर्मात येईल पाहा. मी राहुलवर दु:स्वप्नप्रयोग केलाय. आपलं कर्णधारपद गेलंय, अशी दु:स्वप्नं त्याला पडतात. मग तो खूप मेहनत करतो. युवराजला त्याच्या गर्लफ्रेंडनी डच्चू दिलाय, असं दाखवून जागेवर आणावं लागलं मला. सच्चू, ढोण्या, इर्फू, झैरू यांच्या जाहिरातींचे करार फाडून फेकले जाण्याचा प्रयोग करावा लागला. आणि दादावर तर सगळयात जालिम प्रयोग करावा लागला. पण, रिझल्ट तुम्ही पाहताच आहात.''
''एक शंका आहे. हे सगळे प्लेयर इथे प्रयोगशाळेत, परीक्षानळयांमध्ये आहेत. मग, श्रीलंकेविरुध्द लास्ट मॅच खेळले ते कोण?''
''तोही माझा गुप्त प्रयोगच आहे,'' चॅपेल डोळे मिचकावून म्हणाले, ''ते आपल्या प्लेयर्सचे क्लोन आहेत!!!''
''तरीच ते जिंकले!!!'' आम्ही सारे एकमुखानं म्हणालो आणि तिसऱ्याच क्षणाला प्रयोगशाळेबाहेर फेकले गेलो!!!

(महाराष्ट्र टाइम्स)

'बिफोर' आणि 'आफ्टर'


क्रिकेट हा भारताचा धर्म आहे म्हणतात... साधारणत: माणसं धर्माचं जे काही करतात (म्हणजे वांगं), तेच क्रिकेटचंही झालं आहे... 11 माणसं विरुध्द 11 माणसं यांचा हा एक मैदानी खेळ आहे, याचा विसर सर्वांनाच पडलाय बहुतेक! त्यामुळे, वजन घटवण्याच्या पट्टयांच्या, औषधांच्या जाहिरातीत जसा 'बिफोर' या नावाखाली एक लठ्ठ फोटो छापतात आणि मग त्याच माणसाचा अगदी चवळीच्या शेंगेसारखा (किंवा टीबीच्या रुग्णासारखा खंगलेला) फोटो 'आफ्टर' या नावाखाली छापला जातो, तसा प्रत्येक सामन्याच्या आधी आणि नंतर तमाम क्रिकेटशौकिन आपल्या 'बिफोर' आणि 'आफ्टर' प्रतिक्रिया व्यक्त करत असतात.
त्यातलेच हे काही मासले... मॅच कोणती, टीम कोणती आणि मुख्य पात्र कोण, हे क्रिकेट पाहणाऱ्याला आपोआप कळेल (सध्या सगळयाच माध्यमांमधून क्रिकेटचा इतका मारा सुरू आहे की, इच्छा असो वा नसो, क्रिकेट न पाहणारा असा कुणी राहिलेलाच नाहीये शिल्लक या भारतवर्षात.)
1. बिफोर : आमची टीम वाघांची, समोरचे तर कालचे बछडे!
आफ्टर : अरे हे कसले वाघ! हे तर कागदी वाघ! दात पाडले यांचे पिंटुकल्या बच्च्यांनी!
2. बिफोर : हा आमचा ग्रेटेस्ट बॅट्समन. आजच्या युगातला ब्रॅडमन. कुठल्याही टीमच्या बोलिंगचा खिमा करणार आमचा पठ्ठया!
आफ्टर : भरवशांच्या म्हशीला टोणगा लेकाचा! अरे, हा ग्रेट 'होता' म्हणा रे!
3. बिफोर : आमचा कॅप्टन म्हणजे एकदम थंड डोक्याचा जबरदस्त प्लॅनर! शिवाय कोणत्याही माऱ्यासमोर 'द वॉल' बनून उभा राहतो.
आफ्टर : अरे यार! याचं काय डोकं फिरलंय की काय? आणि खेळ पाहा याचा... 'द वॉल' कसला, 'बर्लिन वॉल' आहे हा!
4. बिफोर : आयला! याचे मानेवर रुळणारे केस काय सेक्सी दिसतात यार! आपण तर फुल फिदा याच्या तुफान फटकेबाजीवर.
आफ्टर : शिट यार! याच्यासारखे लांब केस वाढवले आणि आता पोरी हसायला लागल्यात आपल्या या स्टाइलवर. म्हणतात, तूही त्याच्यासारखा ऐन गरजेच्या वेळी विकेट फेकून बसणार की काय? आता टक्कलच केलेलं बरं!
5. बिफोर : अमका हे बिस्कीट खातो, मी तेच खाणार. तमका ती बाइक चालवतो, तीच मी घेणार. ढमका हे कोल्ड्रिंक पितो, मी तेच पिणार.
6. आफ्टर : अरे, जाहिराती हा यांचा मेन बिझनेस आहे आणि क्रिकेट हा साइड बिझनेस!
आता अशा दर सामन्यागणिक प्रतिक्रिया बदलत जाणाऱ्या क्रिकेटधर्मांधांना शहाणी माणसं काय म्हणतात माहितीये...
बिफोर : तुम्ही अडाणी आहात.
आफ्टर : तुम्ही अडाणीच आहात.
आफ्टर आफ्टर : तुम्ही अडाणीच राहणार!!!

(महाराष्ट्र टाइम्स)

विमेन्स डे!

ती जागी झाली... खिडकीतून आलेल्या प्रकाशानं खोली भरलेली पाहून स्वत:शी जोरदार चरफडली. ''शिट शिट श्टि'' असं म्हणत पांघरूण भिरकावून ती ताडकन उठून बसली. गजराच्या घडयाळाच्या टाळक्यावर थपडा देत तिनं दोन-चार सणसणीत शिव्याही घातल्या त्या घडयाळाला. ''जाम दगा द्यायला लागलंय हे घडयाळ. आता किमान तासभर लेट झालाय. आता आवरायचं कधी, नाश्ता कधी करायचा आणि ट्रेन कशी गाठायची?'' तिच्या डोक्यात हजार चिंतांचा स्फोट झाला. ते नतद्रष्ट घडयाळ उचलून खिडकीतून भिरकावून द्यावं की फुटबॉलसारखं लाथाडून त्याचा चुराडा करून टाकावा, अशा क्रूर विचारांच्या दुविधेत ती असतानाच बेडरूमच्या दारावर 'टक् टक्' झालं... दार उघडून तो आत आला आणि त्याला पाहून ती चाटच पडली. त्याच्या हातात चक्क ट्रे होता. ट्रेमध्ये गरम, वाफाळत्या चहाचा कप, कुरकुरीत भाजलेले बटर टोस्ट आणि 'सनी साइड अप' ऑम्लेट! ''माय माय!'' ती आनंदाश्चर्यानं चित्कारली. त्यानं खास बबर्जी छाप कुर्निसात करून ''गुडमॉर्निंग मादाम'' असं विश केलं आणि ''एनीथिंग एल्स मादाम!'' असं अतिशय विनम्रतेनं विचारलं. त्याच्या त्या अदाकारीमुळे तिला क्षणभर सगळया जगाचाच विसर पडल्यासारखं झालं. उशिराची जाग, ऑफिसला लेट होणार वगैरे सगळया विवंचना काही क्षण मागे पडल्या आणि ती ब्रेकफास्टवर तुटून पडली...
...मस्तपैकी ढेकर देऊन तिनं चहाचा शेवटचा घोट संपवला. ट्रे क्षणार्धात उचलून त्यानं बाजूला ठेवला आणि विचारलं, ''काय राणीसाहेबा, हाऊ वॉज द टी?''
''फँटास्टिक! आणि ऑम्लेटसुध्दा ग्रेट होतं!''
''थँक यू! आणि टोस्ट बरोबर भाजले गेले होते का?''
''अरे, एकदम परफेक्ट!''
''ही चव तुझ्या लक्षात राहील ना पक्की!''
''ऑफकोर्स हनी!''
''आणि ब्रेकफास्ट सर्व्ह करण्याची पध्दत!''
''ती तर फारच स्वीट होती!'' तिला त्याच्याबद्दल एकदम अतीव प्रेम दाटून आलं...
...अचानक त्याचा स्वर बदलला. रूक्ष, कोरडया आणि व्यवहारी सुरात तो म्हणाला, ''हं! हे सगळं नीट लक्षात ठेव. गेले कित्येक दिवस मी तुझ्या हातचा ब्रेकफास्ट खातोय, पण, त्यात काहीतरी कमतरता वाटत होती. शेवटी मी ठरवलं, आपणच एकदा करून दाखवूयात. नाऊ प्लीज रिमेंबर ऑल ऑफ धिस आणि उद्यापासून एक्झॅक्टली अशाच पध्दतीनं मला ब्रेकफास्ट सर्व्ह झाला पाहिजे!''
त्याच्या शब्दाशब्दागणिक तिचे डोळे पाण्यानं भरत चालले होते. चेहरा लालबुंद झाला होता. गळयात हुंदका दाटला होता. आता रडू फुटणार इतक्यात त्यानं तिच्या डोक्यावर एक टप्पू मारला, छान हसत तिच्या गालावर ओठ टेकवून तो म्हणाला, ''ए वेडाबाई! तो जोक होता. हॅपी विमेन्स डे!!!''

(महाराष्ट्र टाइम्स)

कुट कुट ऑरकुट!

 
सैनिक : महाराज, महाराज! शाबासकी द्या!
महाराज : काय रे! असा काय पराक्रम गाजवलात? बिहाऱ्यांची मुस्काटं फोडलीत, भय्यांना ताताथय्या करायला लावलंत की एखाद्या मुख्याध्यापकाला काळं फासलंत?
सैनिक : महाराज, आज आम्ही कॉम्प्युटर फोडले आणि आपल्याच बांधवांची तोंडं रंगवली.
महाराज : वा! पण का?
सैनिक : का म्हणजे काय महाराज, तुमचा कुणी अपमान केला की आमचं रक्त सळसळतं, हात शिवशिवतात.
महाराज : भले बहाद्दर! पण, आमचा अपमान करण्याची हिंमत कुणाची झाली?
सैनिक : ते काय ते ऑरकुट आहे ना त्याची.
महाराज : हे ऑरकुट काय आहे?
सैनिक : आता तेवढं कळलं असतं, तर सैनिक झालो असतो का? काहीतरी इंटरनेट का काहीतरी असतं, त्याच्यावरचं प्रकरण आहे. त्याच्यावर तुमची बदनामी झाली, असं आम्हाला कुणीतरी सांगितलं. आम्ही लगेच कारवाई केली.
महाराज : हो का? काय कारवाई केलीत.
सैनिक : आमच्या कल्याणमधल्या पलीकडच्याच गल्लीतल्या एका सायबर कॅफेमध्ये गेलो. तिथे मोडतोड केली. सायबर कॅफेत आलेल्या गिऱ्हाईकांना बदडून काढलं.
महाराज : अच्छा! तेच नतद्रष्ट आमची बदनामी करत होते का?
सैनिक : छे हो! त्यांची काय हिंमत. पण, ज्या कम्प्युटरवरून तुमची बदनामी होते, त्या कम्प्युटरचा वापर करत होते ना ते!
महाराज : पण, कल्याणमधले सगळे कम्प्युटर फोडून टाकलेत का तुम्ही?
सैनिक : ते कसं शक्य आहे महाराज.
महाराज : हात्तिच्या! म्हणजे काम अर्धवटच राहिलं तुमचं. आणि नुसत्या कल्याणमध्ये कशाला, सगळया महाराष्ट्रात कितीतरी ठिकाणी कम्प्युटर आहेत. त्यावर बऱ्याच ठिकाणी इंटरनेट आहे. आता लोक त्या ऑरकुटवर आमची काय बदनामी झाली आहे, ते चवीचवीनं वाचतील. ही बदनामी थांबवायची कशी?
सैनिक : एक आयडिया आहे महाराज. आपण महाराष्ट्रात कम्प्युटरबंदी करून टाकू. कुणीही नवा कम्प्युटर घ्यायचा नाही. जुने आहेत, ते आम्ही फोडूच. म्हणजे तो कम्प्युटर नको, ते इंटरनेट नको आणि ते ऑरकुट नको.
महाराज : अरे, पण या कम्प्युटरच्याच जोरावर आयटी इंडस्ट्री उभी राहिलीये आपल्या राज्यात. लाखो पोरांना कामं मिळालीयेत. चांगले पगार मिळताहेत.
सैनिक : असल्या नोकऱ्या आणि पगार काय जाळायचेत? तुमची बदनामी करणाऱ्या कम्प्युटरचं नामोनिशाण मिटवून टाकलं पाहिजे.
महाराज : अरे, पण मग ती लाखो पोरं बेकार होतील, त्याचं काय?
सैनिक : त्यांना देऊयात ना आपण रोजगार. वडापावाच्या गाडया टाकून देऊयात त्यांनाही!

(महाराष्ट्र टाइम्स)

आधुनिक लोकसेवक : भाग 1

 सुसंवादिनी गोडबोले : रसिकहो, 'ह्याला भेट त्याला भेट' या तुमच्या लाडक्या कार्यक्रमात आज आपल्या भेटीला आले आहेत... अं... मी नाव नाही सांगणार. कारण, नावापेक्षा या व्यक्तींचं काम अधिक महत्त्वाचं आहे. हे आधुनिक युगातले लोकसेवक आहेत. चला तर भेटूयात आपल्या पाहुण्यांना.
नमस्कार...
(पाहुणा मोबाइलवर हिमेश रेशमियाचं गाणं मोठया आवाजात ऐकण्यात मग्न आहे. त्याला ऐकूच जात नाही)
नमस्कार... अहो, नमस्कार
पाहुणा (चमकून, मग ओशाळून) : नमस्कार!
सुसंवादिनी : नमस्कार! आपण काय लोकसेवा करता?
पा. : मी मोबाइल वाजवतो.
सुसंवादिनी : म्हणजे? मला समजलं नाही. मोबाइल लोक बोलण्यासाठी वापरतात.
पा. : ते बॅकवर्ड लोक. एकदम मागासलेले. त्यांच्याकडे एकदम जुनाट हँडसेट असतात. मी मात्र मोबाइल वाजवतो.
गो. : म्हणजे वाद्यं वाजवतात तसा?...
पा. : नाय ओ! माझ्या मोबाइलला एकदम फुल टु पावरफुल स्पीकर आहेत टकाटक. त्याच्यावर मी गाणी वाजवतो.
सु. गो. : अच्छा अच्छा! म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाइलचा ट्रँझिस्टरसारखा उपयोग करता... हाऊ इनोवेटिव्ह! पण, मला सांगा, तुम्ही मोबाइल कुठे वाजवता?
पा. : कुठे म्हणजे? कुठे पण वाजवतो. कधी पण वाजवतो. कसा पण वाजवतो. अरे, धा हज्जार रुपये खर्चून एवढा खटाखट लेटेस पीस घेतला, तर वाजवणार नाय?
सु. गो. : पण तरीही तुमची एखादी खास जागा असेल ना मोबाइल वाजवण्याची.
पा. : ट्रेन... आपली लोकल ट्रेन. त्या खडॅक खडॅक आवाजात फुल व्हॉल्युमला गाणी ऐकायला जाम मजा येते.
सु. गो. : पण, इतर प्रवासी...
पा. : ते पण एंजॉय करतात ना! आपलं माइण्ड इतकं नॅरो नाय. आपण म्हणतो, अपुन सुन रैला है, तो तुम भी सुनो. ये म्युझिक सेवा है.
सु. गो. : म्हण्जे आजूबाजूचे प्रवासी ऐकतात मन लावून गाणी?
पा. : नायतर काय? आपला व्हॉल्युम एवढा असतो की बाकी कशात मन लागणारच नाय कुणाचं.
सु. गो. : पण, कुणी डिस्टर्ब होत नाही का? झोपलेला वगैरे असला तर.
पा. : अरे ट्रेन काय झोपायची जागा आहे का? झोपेत स्टेशन चुकलं म्हणजे. माझी गाणी सगळयांना जागं ठेवतात. ही केवढी मोठी सेवा आहे.
सु. गो. : खरोखरच. ही खूपच मोठी...
(...तिचं पुढचं बोलणं पावण्याच्या मोबाइलच्या म्युझिकमध्ये विरून जातं.)


(महाराष्ट्र टाइम्स)

बापू, यू आर लकी!

 बिलेटेड हॅपी बर्थडे बापू!
अरे नाराज नही होनेका हां बापू. क्या है ना, अपुन जरा गणपतीशंकरपार्वतीरामतिरूपती ऐसा जो भगवान मिले उस के दर्शन करने मे बिझी है आजकल. इसलिए विश करने मे जरा लेट हुआ.
अरे बापू, आता अशा नजरेने बघू नका. तुम्ही आमच्या भेज्यात कितीही ज्ञान भरलंत तरी संकटाच्या समयी आमची धाव मंदिरापर्यंतच. अपुन के अंदर तुम्हारेजितनी ताकद असती, तर आपुन भी बापू नही बनता क्या?
बापू, तुमचा बर्थडे आमच्यासाठी फक्त ड्राय डे आणि हॉलिडे उरलेला आहे. अरे ड्राय डे नसता तर आम्हाला कळलंच नसतं की तुमचा बर्थडे आहे आणि हे तुमच्यासाठी किती चांगलं आहे याचा तुम्हाला काही अंदाज नाही बापू!
अरे, तुमचा बर्थडे आहे म्हणून गावभर उंचउंच बॅनर लागत नाहीत. सगळया शहराची ब्युटी खराब करणारे बोगस बॅनर लागत नाहीत. पेपरवाले इस्पेशल पुरवण्या काढत नाहीत (त्या काढायला पैसे कोण देणार आणि त्या वाचणार कोण?)
बापू, तुमच्या वाढदिवसानिमित्त कुठे मंडप उभारले जात नाहीत. कुठे पुतळे बसवले जात नाहीत. मग दिवसभर तिथे तुमच्याशी, तुमच्या कामाशी कसलाही संबंध नसलेली गाणी ढयॅण ढयॅण वाजत नाहीत. (तुमच्याशीतुमच्या कामाशी कसलाही संबंध नसलेले पुढारे तुमच्याबद्दल बोलतात काही ठिकाणी. पण, उतना तो चलता है... इनको सुनता कौन है बापू?)
तुम्ही 'देश का बापू' झालात बापू, पण, तुमचे बेटे तुम्हाला मानत नाहीत. आमच्या इतर राष्ट्रपुरुषांचे देव करून ठेवलेले आहेत आम्ही. पण, तुम्ही आमचे गॉड झाला नाहीत, याचा एक फायदा आहे बापू. तुमची मिरवणूक काढून तुमची तसबीर बुडवत नाही कुणी. (वैसे तो हम ने तुम को कब का डुबो दिया है... पण, तुम्ही पण अजब आहात... साला त्या तुकारामाच्या गाथेसारखे तरंगून वर येताच अधून मधून.) आणि मेन म्हण्जे तुमच्या मिरवणुकीत नाचण्याची संधी पब्लिकला मिळत नाही. त्यामुळे स्पीकरच्या भिंती उभ्या राहात नाहीत. (बापू, हँसो मत! तुमच्या घराखालून तुमचीच मिरवणूक 36 तास चालली ना मग समजेल... भेजे की पूरी वाट लग जाएगी बापू.)
पण बापू, तुमचा सुमसाम बर्थ डे बघून आपुन के भेजे मे एक सवाल आता है... तुमच्या जन्मालाही आम्ही असं सुतक पाळावं, एवढं कोणतं मोठं पाप केलं होतं तुम्ही?
(महाराष्ट्र टाइम्स)

वॉक इन द स्काय!


''बाबा, बाबा, आपण लोकांच्या बाजूचे आहोत की त्यांच्या विरुध्द हो!''
''अरे गधडया, आपण राजकारणात आहोत. आपल्याला लोकांच्या बाजूनेच असावे लागते. नाहीतर लोक आपल्या बाजूने उभे राहतील का?''
''मग आपण लोकांच्या हिताचा विचार करून निर्णय घेतो की अहिताचा?''
''कमाल झाली तुझी. आपण लोकांच्या हिताचाच विचार करून निर्णय घेतो.''
''कोणत्या लोकांच्या हिताचा विचार करतो आपण?''
(मिनिटभर शांतता... बाबांचा आवाज जरा मवाळ होतो.)
''बाळा, तुझा प्रॉब्लेम काय आहे? आज तुला कविता सुचत नाहीयेत का? हे सगळे प्रश्न तुला का पडतायत?''
''बाबा, हे सगळे प्रश् मला स्कायवॉकमुळे पडतायत.''
(आतून आवाज) ''तू कशाला गेला होतास स्कायवॉकवर? थरथरतो ना तो! उगाच काही झालं म्हणजे?''
''आई गं! त्या स्कायवॉकबद्दल बोलत नाहीये मी. आपल्या बालेकिल्ल्यात होणाऱ्या स्कायवॉकबद्दल बोलतोय.''
''(एकदम सभेत बोलल्याप्रमाणे) स्कायवॉक आम्ही त्रिवार होऊ देणार नाही.''
''तेच मी विचारतोय. का होऊ देणार नाही?''
''ते लोकांच्या गैरसोयीचं आहे म्हणून.''
''कोणत्या लोकांच्या गैरसोयीचं आहे?''
''त्या भागातले स्थानिक व्यापारी, दुकानदार...''
''त्यांना कुठे त्या स्कायवॉकवरून चालायचंय? त्यांना तर दुकानात बसायचंय?''
''अरे पण त्यांची अडचण होते ना?''
''कसली अडचण होते?''
''कसली ना कसली अडचण होतच असणार ना! त्याशिवाय का ते विरोध करतायत?''
''पण म्हणजे ते करतायत म्हणून आपण विरोध करायचा?''
''अरे आपले अनुयायी आहेत ते?''
''आणि आपण त्यांचा अनुनय करायचा? नेते आपण आहोत की ते?''
''कसा तू माझा वारसा चालवणार रे बाबा! आजकाल असं नाही चालत. आपल्याला लोकांच्या कलाप्रमाणे चालावं लागतं. त्यांना काय हवंनको, ते पाहावं लागतं. ही बहुमताची लोकशाही आहे बाळा!''
''काय सांगताय? पण, तुम्ही तर वेगळंच वागताय.''
''कसं काय?''
''स्कायवॉकमुळे बालेकिल्ल्यात येणाऱ्या लाखो पादचाऱ्यांची सोय होईल. नुकसान होईल, ते काहीशे किंवा काही हजार माणसांचं. मग आपण जास्त लोकांच्या हिताचा विचार करायचा की मूठभरांच्या हिताचा?''
(पुन्हा मिनिटभर शांतता.)
''बाळा, एकदम सोप्पं करून सांगतो तुला. कायमचं लक्षात ठेव. आपण फक्त आपल्या स्वत:च्या हिताचा विचार करायचा.''
''आणि लोकांचं काय?''
''लेट देम वॉन इन द स्काय!''

(महाराष्ट्र टाइम्स)

आजच वाचा... उद्यासाठी!


'उद्या काय होणार, हे तुम्ही आज काय करता, यावर अवलंबून असते.'
_अज्ञात
उपरोल्लेखित वचनाची सत्यता कशी पडताळून पाहाल. सोपं आहे. उद्या काय घडेल, हे तुम्हाला जाणून घ्यायचंय? मग आज तुम्ही कोणत्याही तारखेचा पेपर घ्यायचा. त्यातल्या बातम्या वाचायच्या. त्यातून तुम्हाला 'उद्या'च्या (म्हणजे भविष्यातल्या) बातम्या आजच कळू लागतील.
विश्वास बसत नाही?
मग ही 'उद्या'ची बातमी पाहा.
विधिमंडळाच्या आवारात
निषिध्द साहित्य जप्त
6 आमदार निलंबित
मुंबई : घातक साहित्य घेऊन विधिमंडळाच्या आवारात प्रवेश करू पाहणाऱ्या सहा आमदारांना आज अटक करण्यात आली. अटकेनंतर त्यांची सुटका झाली असली, तरी त्यांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. या आमदारांनी चक्क काही पुस्तके, टाचण्या, वह्या, वर्तमानपत्रे, चष्मे, पेने, पेन्सिली, खोडरबर, कानात घालायच्या काडया, दातकोरणी आदी सभागृहात निषिध्द असलेली सामुग्री घेऊन प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. आपल्यावर भर सभागृहात प्राणघातक हल्ला करण्याचाच हा विरोधकांचा कट होता, असा सनसनाटी दावा महसूलमंत्र्यांनी केला आहे. गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून सीबीआय चौकशी जाहीर करण्यात आली आहे...
...आता हे भविष्य आम्ही कोणत्या बातमीवरून जाणलं, हे तुम्ही जाणलं असेलच...
...
...आता पुढची बातमी वाचा.
पुरेशा सुरक्षा साहित्याअभावी
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची बैठक तहकूब
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाची आज येथे होणारी महत्त्वपूर्ण बैठक पुरेशा सुरक्षासाहित्याअभावी बेमुदत तहकूब करण्यात आली आहे. बैठक ठरवताना क्रिकेट बोर्डाच्या सदस्यांसाठी पुरेशी हेल्मेट्स, चिलखते, लाइफ जॅकेट्स वगैरे साहित्य आहे की नाही, याची खबरदारी न घेतल्याबद्दल बोर्डाच्या सचिवांना निलंबित करण्यात आले आहे. पाच वर्षांसाठी बंदी घालण्यात आलेला प्रख्यात माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याच्या चौकशीसाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. सुपरफास्ट गोलंदाजीबरोबरच गरम डोक्यासाठी कुप्रसिध्द शोएब बैठकीला स्वत: हजर राहणार म्हटल्यावर 'कोरम' पूर्ण होणार नाही, या भयाने ही बैठक तहकूब करण्यात आली असावी, अशी चर्चा आहे...
आता याही बातमीचे मूळ तुम्हाला कळलेच असेल...
...
...आता तिसरी बातमी पाहा.
'कधीही नाही.'
हो, ही एवढीच बातमी आहे 'उद्या'ची.
मग, आजची बातमी ओळखा.
नाही येत ओळखायला? आजची बातमी आहे,
'जीवनावश्यक वस्तूंचे, भाज्यांचे भाव कधी कमी होणार?'...
...
...लोकही उगाच माननीय कृषीमंत्री शरदरावजी पवारसाहेबांना काहीतरी प्रश् विचारत बसतात...
ते काय ज्योतिषी आहेत का?

(महाराष्ट्र टाइम्स)

या पावसाला जबाबदार कोण?


तुफान पावसाने मुंबई आणि परिसराला झोडपून काढले. जागोजागी पाणी साचले, तुंबले. भिंती पडल्या, लोकल अडल्या, शाळाकॉलेजेसऑफिसेसना बुट्टी बसली, तेव्हा कुठे मुंबईकरांना समजले, 'पावसाळा आला!'
'अहोरात्र नॉनसेन्स' वाहिनीने 'त्या' 26 जुलैची क्लिपिंग्ज दाखवून सगळीकडे घबराट पसरवली आणि 'या पावसाला जबाबदार कोण' असा (अर्थातच नॉन्सेन्स) प्रश्न घेऊन त्यावर सटासट नेत्यांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली. या मुलाखतींमधली ही वेचक मुक्ताफळं. ती कोणाची आहेत हे बा वाचका, तूच ओळखायचे आहेस...

1. पाऊस पडला, तेव्हा मी परदेशात होतो. त्यामुळे मला नेमके काय झाले त्यासंबंधीची माहिती घ्यावी लागेल आणि मगच त्यासंबंधी एक निश्चित अशी भूमिका मांडता येईल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी आज संध्याकाळी माझी भेट होणार आहे. त्यावेळी या प्रश्नावर चर्चा होईल. याला जबाबदार असलेले चुकार ढग आमच्या पक्षाचे असतील, असं मला वाटत नाही. तसं असलंच तर प्रदेशाध्यक्षांकडून अहवाल मागवून कारवाई करू.

2. पावसाचे ढग मुंबई पोलिसांची करडी नजर चुकवून आत शिरले असतील. पण, ते अपराध करून तसेच निसटू शकणार नाहीत. त्यांच्या मुसक्या आवळायला आमचे पोलिस सक्षम आहेत. देशाच्या आर्थिक राजधानीचे चक्र बंद पडणारया, गोरगरीबांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या दोषी ढगांची गय केली जाणार नाही. त्यांना भरआकाशात चाबकाने फोडून काढू.
3. हे ढग आले कुठून? ते नैऋत्य मोसमी वारे, मॉन्सून वगैरे शास्त्र आम्ही जाणत नाही. अहो, या देशाच्या आणि राज्याच्या राशीला गेली ५० वर्षं जळवेसारख्या चिकटलेल्या काँग्रेजी सरकारांनी इथल्या शेतकऱ्याला, आयाबहिणींना इतकं नाडलंय, इतकं पिडलंय की आमचा शेतकरी, आमच्या आयाबहिणी आज ढसढसा रडतायत. त्यांचे अश्रूच त्यांच्या संतापाच्या धगीवर वाफ होऊन आकाशात गेले आहेत आणि त्याचेच ढग झाले आहेत. हा आपल्याच माताभगिनींचा तळतळाट आज शाप बनून आपल्यावर कोसळतोय. आता तरी शहाणे व्हा.

4. आता तोंडं का बंद आहेत यांची दातखीळ बसल्यासारखी? मी बोललो की पोरकटपणा म्हणून हिणवता ना? आता बोला की! तुम्ही फार मोठे आहात ना! उचकटा ना जीभ! मला सांगा, हे ढग तरी कुठून आले. बाहेरूनच ना! बाहेरच्यांनी येऊन इथे वाट्टेल तसा राडा घालायचा, ही परंपरा यांनीच निर्माण केलीये. बाहेरच्यांचे हे लाड मी चालू देणार नाही.

(महाराष्ट्र टाइम्स)

'बातमी' द्या


माननीय संपादक महोदय,
मी आपल्या दैनिकाचा गेल्या 50 वर्षांपासूनचा वाचक आहे. आपल्या दैनिकात गेले काही दिवस बातम्यांच्या पानावर जागा वाया घालवण्यात येत आहे, असे दिसते. म्हणजे ज्या गोष्टीत काही 'बातमी'च नाही, ती तुम्ही रोज आम्हाला बातमी म्हणून कशी काय देता? ही वाचक म्हणून आमची फसवणूक नाही काय?
उदाहरणच द्यायचे तर 'मुख्यमंत्री दिल्लीला गेले', 'राणे दिल्लीला गेले', 'मुख्यमंत्र्यांची खुर्ची धोक्यात', 'मुख्यमंत्री सेफ', 'राणे अस्वस्थ', 'राणे निश्चिंत' या विषयाच्या बातम्या (याच मथळयांनी) आपल्या वर्तमानपत्राने गेल्या महिन्याभरात किती वेळा दिल्या आहेत, याची मोजदाद करावी.
आता माझी आपल्याला अशी विनंती आहे की यापुढे 'दोन आठवडयांत मुख्यमंत्री दिल्लीला गेले नाहीत', 'चार आठवडे राणे मुंबईतच' अशी माहिती मिळेल, तेव्हाच आम्हाला ती 'बातमी' म्हणून द्या. अशाच काही बातम्या नसलेल्या बातम्या पुढीलप्रमाणे
'चलनवाढीच्या दरात वाढ'
आता हे काही नवीन आहे का? आम्ही स्वैपाकाच्या गॅसपासून भाजीपालाधान्यापर्यंत सगळीकडे तेच भोगतोच आहोत ना! 'चलनवाढीचा दर शून्य टक्क्यांवर' अशी बातमी येईल, तेव्हाच ती द्या.
......................
'सचिन तेंडुलकर दुखापतग्रस्त'
दुखापतींमुळे सचिन दौऱ्यांमधून माघार घेतो आणि सौरव, राहुल मात्र बिचारे 'वगळले जातात.' हे इतक्यांदा झालंय की यापुढे 'सचिन तेंडुलकर ठणठणीत', 'राहुल, सौरव संघात' अशा बातम्या आल्या तर द्या. 'राहुल, सौरवची दुखापतीमुळे माघार', 'सचिनला वगळले' अशा बातम्या येण्याची शक्यता कमी आहे. पण, आल्याच तर त्याही द्या.
.....................
'अमिताभ अनवाणी चालत विनायकाच्या चरणी'
दर सिनेमाला अमिताभ स्वत:च्या कुवतवर विश्वास नसल्यासारखा देवाच्या दारी येऊन हात पसरतो. सुनेच्या कुंडलीतल्या कुठल्यातरी फडतूस योगाला घाबरून त्याने तिचं पिंपळाशी लग्न लावण्याइतपत खुळचटपणा केला, वगैरे सतत वाचून आणि ते फोटो पाहून आम्ही जाम पकलोय. त्याचा एकंदर बुद्ध्यांक आमच्या लक्षात आला आहे. आता तो उलटा धावत मंदिरात जाईल किंवा लोटांगणं घेत किंवा सरपटत वगैरे जाईल (तो हे कधी ना कधी करेलच आणि यापलीकडे त्याच्यासंदर्भात 'बातमी' संभवत नाही) तेव्हाच बातमी द्या.
'ग्रामीण भागाला लोडशेडिंगचा फटका', 'कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या' अशाही अन्य काही दैनंदिन घडामोडी 'बातम्यां'च्या नावाखाली खपवल्या जात आहेत. आपण यात वेळीच लक्ष घालावे, ही विनंती.
आपला,
_चकोर

(महाराष्ट्र टाइम्स)

(गॉड) सेव्ह मराठी!

 लेले : ओ हाय! डल्लासमध्ये लास्ट इयर सत्यनारायणाला भेटला होतात, त्यानंतर थेट इथे नागपुरातच.
नेने : हाय! मी दरवर्षी या ऑल इंडिया मराठी लिटरेचर मीटला हजेरी लावतोच. यू नो, आफ्टरऑल आपण मराठी माणसांनीच मराठी सेव्ह केली पाहिजे.
लेले : राइट यू आर! त्यामुळेच माझी दोन्ही मुलं जेव्हा यूएसमध्ये सेटल झाली, मुलगी लंडनची सून झाली, त्यानंतर मी निर्धार केला- व्हेअरेव्हर देअर इज एनीथिंग कन्सर्न्ड विथ मराठी, आय हॅव टु बी देअर.
नेने : दॅट्स द स्पिरिट! यू नो, मी यूएसचा सिटिझन असलो, तरी तिथेपण आपलं मराठी कल्चर जपतो हां. आम्ही एलिफंट गॉडची... आय मीन गणेशाची प्रतिष्ठापना करतो, दिवाळीला पुण्याहून चितळयांचा फराळ आणि स्पेशल उटणं मागवतो, हळदीकुंकू समारंभ करतो, संक्रांत करतो, सिसॅमीची स्वीट्स डिस्ट्रिब्युट करतो. वर्षातून एकदा 'संगीत शारदा'चा नाहीतर कुठल्यातरी क्लासिक संगीत नाटकाचा शो करतो. आमच्या मुलांना आयतोबाचा अंगारा आणि स्वयंसिध्द बापूंचं लॉकेट घातल्याशिवाय कोणत्याही एग्झॅमला, इंटरव्ह्यूला पाठवत नाही.
लेले : दॅट्स राइट! मी पण बाँबेला आलो की सिध्दिविनायकाचं दर्शन घेऊन हंड्रेड डॉलर्सचं डोनेशन देतो. पुण्यात दगडूशेठ हलवाई ऍंड शिर्डीला साईबाबांना नमस्कार केल्याशिवाय आय डोन्ट गो बॅक टु यूएस ऍट ऑल.
नेने : वॉव! दॅट्स ग्रेट. आपल्या मदरटंगची एवढी ओढ वाटते, म्हणूनच तर मी साहित्य संमेलनाला एव्हरी इयर हजेरी लावतो. ऍंड यु नो, आय बाय बुक्स वर्थ ऍटलीस्ट टेन टु ट्वेंटी थावजंड. अस्सल मराठी रेसिपी बुक्स, लक्ष्मी व्रता पोथी, घरचा वैद्य, कुत्रा कसा पाळावा ऍंड ऑफ कोर्स द वन ऍंड ओन्ली पुला!
लेले : सेम हियर! आय ऑल्सो बाय लाइट मराठी बुक्स लाइक फडकेज कादंबऱ्या, अत्रेज ह्यूमरस बुक्स ऍंड ऑफ कोर्स 'मजेत टाइमपास कसा करावा' वगैरे गायडन्स बुक्स.
नेने : बाय द वे! हॅव यू हर्ड ऑफ धिस गाय साधू, हू इज चेअरिंग धिस मीट!
लेले : या, ही हॅज रिटन द फिल्म 'सिंहासना'! इट्स ओके इफ वुई हॅवन्ट रेड मच ऑफ हिम. ऍक्चुअली दीज गाइज हिअर इन महाराष्ट्रा शुड बी थँकफुल टु अस!
नेने : व्हाय?
लेले : अरे, इकडे महाराष्ट्रात ठाकऱ्यांपासून साधूंपर्यंत सगळयांनी 'सेव्ह मराठी'ची क्राय दिलेली असताना, तिकडे सातासमुद्रापार वुई आर डुइंग सो मच फॉर अवर मराठी कल्चर! वुई शुड बी प्राऊड ऑफ आरसेल्व्ह्ज!

(महाराष्ट्र टाइम्स)