Tuesday, February 15, 2011

बायकांचा डबा


हा तमाम पुरुषांच्या उत्सुकतेचा विषय.
तसा दिसायला तो पुरुषांच्या डब्यासारखाच दिसतो.
पण आत?...
...आतलं सगळं जगच वेगळं असतं... 'मेन आर फ्रॉम मार्स, विमेन आर फ्रॉम व्हीनस' हे सिध्द होईल इतकं वेगळं...
त्याविषयी जरा जास्तच उत्सुकता असलेली पुरुषमंडळी बायकांच्या डब्याला चिकटून असलेला डबा पकडतात आणि 'व्हिडिओ कोच'चा आनंद लुटतात. पण, हा डबा नुसता असा पाहून समजत नाही हो! (आत न शिरता) जाणून घ्यावा लागतो.
इथल्या सगळया सिस्टम वेगळया.
साधं सीट देण्याचं उदाहरण घ्या.
पुरुषांच्या डब्यात सोपी पध्दत असते. ज्याला सीट हवी असते, तो डब्यात आत शिरतो, ज्याला हवा खायचीये, तो बाहेर उभा राहतो. दोन सीटच्या मध्ये लाइन लागते. एकेक सीट रिकामी होईल, तशी लायनीप्रमाणे मिळत जाते.
बायकांचा डबा इतका सोपा नसतो. तिथे सीट क्लेम करावी लागते. म्हणजे डब्यात चढलेल्या बाईला सीट हवी असेल, तर सगळया बायकांना विचारायचं, 'तुम्ही कुठे उतरणार?' मग त्यातल्या एकीला सांगायचं, 'तुम्ही उतराल तेव्हा ही सीट माझी.' लागला क्लेम. मग येणारी प्रत्येक बाई तेच सत्र चालवते. म्हणजे, एखादीला झोप लागली असेल, तर तिला गदागदा हलवून जागं करून हे विचारलं जाणारच. शिवाय क्लेम लागल्यानंतरही आराम नाही. नंतर येणाऱ्या प्रत्येकीला 'तिचा क्लेम आहे' असं सांगत बसावं लागणार... आधीच अवघड असलेला ट्रेनचा प्रवास या बायका आणखी इतका अवघड का करून घेतात?
त्यालाही कारण आहे. मठ्ठ पुरुषांच्या डब्यात ज्यांना सीट हवीये त्यांना तिथल्या कोंदट गर्दीत धक्के खात, लक्ष ठेवून उभं राहावं लागतं. हुश्शार बायका क्लेम लावून ते स्टेशन येईपर्यंत हवा खायला मोकळया! आहे ना गम्मत!
......
बायकांचं लॉजिक हा एक लॉजिकच्या कक्षा रूंदावणारा विषय आहे. याचा पडताळा एकदा सीएसटी स्टेशनात आला. एका मैत्रिणीला गाडी पकडायची होती. स्टेशनात गाडी शिरताच ती उडी मारून डब्यात शिरली, खिडकीशी बसली. गाडी थांबल्यावर एक मध्यमवयीन बाई येऊन म्हणाली, ''ही माझी जागा आहे.''
''कशी काय?''
''मी इथे बसले होते. रिटर्न आले आहे. कोणती गाडी लागलीये हे बघायला दरवाजात गेले होते.''
''अहो, मग हातातली पिशवी इथे ठेवून जायचं होतं ना! इतरांना कसं कळणार ही जागा तुम्ही अडवलीये म्हणून!''
''वा गं वा! अशी कशी पिशवी ठेवून जाणार मी. पण, मी इथे बसून आले होते. ही माझी जागा आहे, उठ इथून.''
आश्चर्य म्हणजे, एरवी भांडण्यात तरबेज असलेल्या त्या मैत्रिणीनेही हे 'लॉजिक' मान्य केलं आणि चूपचाप दुसरीकडे उलटी विन्डो पकडली.
......
बायकांचं लॉजिक हे असं एकदम वेगळया स्टाइलने चालतं... पुरुषांच्या कल्पनेपेक्षा एकदम हट के. पुरुषांच्या डोक्यात बायकांविषयी काही रूढ, साचेबध्द कल्पना असतात. पुरुषांबरोबर किंवा पुरुष सोबत असताना बायकाही त्या कल्पनांना अनुसरूनच वागतात... पुरुष सोबत नसले की त्यांना 'स्वत्व' गवसतं की काय?
काही वर्षांपूर्वी कुठेतरी पश्चिमेकडच्या देशात एक प्रयोग केला गेला होता. एक हॉरर सिनेमा तुफान हिट झाला होता. प्रत्येक शोला बायका भयाने किंचाळायच्या. दोनपाच तरी बायका घाबरून बेशुध्द पडायच्या. त्या सिनेमाचा एक 'लेडीज स्पेशल' खेळ ठेवला गेला. त्या शोला मात्र एकही बाई किंचाळली नाही... बेशुध्द वगैरे पडणं, तर लांबच राहिलं...
...पुरुषांच्या डब्याला जोडून असलेल्या डब्यातल्या बायका स्वतंत्र लेडीज डब्यातल्या बायकांपेक्षा वेगळया वागत असतील का?
......
बायकांच्या डब्यात बायका बऱ्याच वेगळया वागतात, असं बायकाच सांगतात. दारात हवेशीर जागा अडवून उभे राहणे, सहप्रवासी बायकांवर 'ताई'गिरी करणे, अशील शब्दांत शिवीगाळ करणे, बोचकारणेकेस ओढणे, ढकलून देणे... पुरुषांना (बायकांच्या संदर्भात) कधी स्वप्नातही येणार नाहीत, असे प्रकार याही डब्यात चालतातच. ''मी ओल्या हळदीची नवी नवरी असताना एकदा भांडणात त्या बायांनी माझी साडी फेडली होती...'' असं जेव्हा एक सहकारी बाई सांगते, तेव्हा धक्काच बसतो...
...बायकांच्या डब्याविषयी जसजशी माहिती मिळत जाते, तसतसं लक्षात येत जातं... 'बायकां'प्रमाणेच बायकांचा डबा हा विषयही आपल्यासाठी अनादिअनंत काळ अनाकलनीयच राहणार आहे.

 (थर्ड आय, महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment