सध्या मराठीत विविध कारणांनी ‘प्याला’ गाजतो आहे. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ यांना अमेरिकाध्यक्ष बराकजी ओबामा यांनी एक स्वाक्षरीकृत प्याला रिटर्न गिफ्ट म्हणून पाठवावा आणि पाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माणाध्यक्ष राजजी ठाकरे यांना भारतीय जनता पार्टीच्या ऑफिसात जाऊन एकच प्याला (चहाचा का होईना) जाहीरपणे पिण्याची हुक्की यावी, हा योगायोग खचितच नाही. या वादळं उठवणाऱ्या प्याल्यांमध्ये नेमके कोणी आणि कसे कारस्थानी काव्याचे द्रव भरले होते, याचा (काहीही न पिता) पर्दाफाश करण्यासाठी हा लेखनप्रपंच.
शास्त्रशुद्ध विवेचन हे प्रस्तुत लेखकाच्या आशयगर्भ आणि मर्मज्ञ शैलीचे व्यवच्छेदक लक्षण (कोण आहे रे तिकडे? वाचकासाठी एक कांदा आणा! ‘तिकडून’ उत्तर : भाव माहितीयेत का कांद्याचे?) असल्याने आपण ‘प्याला’ या शब्दाच्या अर्थाचाच कांदा सोलू. (हा कांदा काही पिच्छा सोडत नाही. असो.) तर ‘प्याला’ हा मराठीतील एक द्वयर्थी शब्द आहे. काहीही प्यायचे झाल्यास ते ज्यातून प्यायचे, त्या पात्राचे नाव ‘प्याला’ आणि त्यातून ज्याने तो द्रव प्राशन केला, तोही ते ‘प्याला’च. हा शब्द हिंदीतील ‘पियेला’वरून आला आहे, असं एक संशोधन सांगतं, तर दुसरं संशोधन असं सांगतं की काही विशिष्ट द्रवपदार्थ प्याल्यातून पिणारा माणूसही द्रवप्राशनानंतर द्रव धारण केलेलं ‘पात्र’च बनतो. हेच लक्षात घेऊन सुज्ञ व्याकरणकारांनी त्याच्यासाठीही ‘प्याला’ याच शब्दाची सूचक योजना करण्यात आली आहे. त्यात ‘प्यायलेला’ या चार अक्षरी शब्दातील ‘यले’ची बचत होते, ती वेगळीच. उपरोल्लेखित दोन्ही संशोधनं प्रस्तुत लेखकाचीच आहेत, हे विचक्षण वाचकांना सांगणे न लगे! (पहिलं संशोधन ‘मराठी भाषेवरील हिंदुस्थानीचा प्रभाव’ या ग्रंथातलं आहे आणि दुसरं ‘मराठी भाषेतील चित्तपावन लेणी’ या ग्रंथातलं आहे.)
मराठीतला ‘प्याला’ हा एक तर पाणी प्यायला तरी वापरतात, नाहीतर थेट ‘प्यायला’ तरी वापरतात. (संदर्भ : ‘एकच प्याला’ हे अत्यल्पमद्यपानाचे दुष्परिणाम सांगणारे रा. ग. गडकरी यांचे लोकप्रिय आणि प्रभावी नाटक. ते पाहून अनेकांनी आपला कोटा दोन-तीन प्याल्यांवर नेला.) इतर फुटकळ आणि मचूळ द्रवांसाठी कप, तांब्या अशी इतर भांडी असतात.
आता अमेरिकाध्यक्ष ओबामा यांना मराठीतील प्याल्याचा अर्थ किंवा गुह्यर्थ ठाऊक असण्याचं कारण नाही. मा. छगनरावजी हे महाराष्ट्राच्या द्राक्षपट्टय़ातील लोकप्रतिनिधी आहेत, हेही माहिती असणं शक्य नाही. मग त्यांनी छगनरावजींना एक प्यालाच (भले चांदीचा का असेना) पाठवावा, हे आक्रित कसे घडले? याचे उत्तर हवे असेल, तर बराकजींच्या आगमनावेळचे दृश्य आठवा. काळा गॉगल घातलेले आणि नंतर त्यांच्या विमानाच्या परिसरात घुटमळून फोटोसेशन करून घेणारे एक गृहस्थ तेव्हा चर्चेचा विषय झाले होते. (त्याच वेळी आपल्या आदर्श वर्तणुकीने ते महाचर्चेचा विषय झालेच होते, ते सोडा.) त्यांनी महाराष्ट्रावरचे एक कॉफीटेबल बुक बराकजींना नजर केले आणि विंग्रेजीत काही वार्तालाप केला. तो काय होता, त्याचा उलगडा छगनरावजींना आलेल्या प्याल्यामुळे झाला आहे. ‘प्याल्या’चा अर्थ आणि छगनरावजींचा द्राक्षपट्टा यांची गुप्त खबर त्यांनीच बराकजींना दिली आणि म्हणूनच बराकजींनी छगनरावजींसाठी सुयोग्य भेटीची निवड केली, हे उघड आणि स्पष्ट आहे.
‘रसातळाला जाईन तर तुमच्यासोबत’ असा पण करून आपल्याबरोबर इतरांनाही ‘ले डूबनेवाले’ इसमाच्या चेह-यावरचं विकट हास्य आता लवकरच लयाला जाईल. कारण, या गृहस्थांच्या सखोल सांस्कृतिक कार्याची आणि कलासक्ततेची टिप छगनरावजींनी बराकरावांना देऊन ठेवली आहे. त्यामुळे बराकरावांकडून त्या इसमाला एक कॉफीटेबल बुक भेट मिळेल. हॉलिवुडच्या मादक मदनिकांच्या अल्पवस्त्रांकित छायाचित्रांचं हे कॉफीटेबल बुक जेव्हा ‘भाभीं’च्या हाती पडेल (तशी व्यवस्था करण्यात आली आहे) तेव्हा त्यांचे डोळे पुरते पांढरे होतील.
***
सांप्रति महाराष्ट्रात गाजणा-या दुस-या ‘प्याल्या’मध्ये निव्वळ चहा होता, यावर मात्र आमचा अजूनही विश्वास बसलेला नाही. राजजी ठाकरे हे केवळ त्यांच्या काकांची केवळ प्रतिकृतीच नाहीत, तर त्यांनी आपली सगळी जीवनशैलीच त्यांच्यावर बेतलेली आहे. राजजींचे काका हे आपल्या प्याल्यामध्ये चहासारख्या गढूळ पेयाचा थेंबही खपवून घेत असतील असे वाटत नाही. त्यामुळे राज यांनीही आपला प्याला अशा कोमट द्रवाने विटाळला असेल, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. मात्र, ते कार्यालय सदैव मंगलमय, पवित्र, शुचितासंपन्न अशा भाजपचे असल्यामुळे तिथे राजजींना चहापेक्षा वेगळे काही मिळाले असण्याची शक्यता नाही. त्यामुळेच की काय, प्याल्याला तोंड लावल्यासारखे करून राजजी अतीव कडवट मुद्रेने तडक बाहेर पडल्याचे दृश्य महाराष्ट्राने पाहिले. (भाजपच्या सदैव मंगलमय, पवित्र, शुचितासंपन्न कार्यालयात अन्य पाहुण्यांसाठी कमंडलूतून गोमूत्र हाच एक ऑप्शन असल्यामुळे बंधु‘राज’ उद्धवजी यांच्यासह अन्य पाहुणे तर सोडाच, खुद्द भाजपचे कार्यकर्तेही त्या दिशेला फिरकत नाहीत म्हणे.)
आता भाजप कार्यालयात जास्तीत जास्त चहाच मिळण्याची शक्यता असताना राजजींनी तिकडे वाट वाकडी का केली?
झाले असे, की विनोदजी तावडे यांनी राजजींना ‘पार्टी कार्यालयात या’ असे दूरध्वनीवरून सांगितले. राजजींनी ‘पार्टी करूयात, या’ असे ते ऐकले आणि हा सगळा घोळ झाला. मात्र, राजजींच्या चहापानाची खबर ऐकताच उद्धवजींनी (काहीही न पिता) जो काही हंगामा केला, तो पाहून सर्वाच्या मनी हाच विचार आला..
..केवढे हे बंधुप्रेम!
एकच प्याला हा प्याला
आणि चढली त्याला!!
(चित्र : प्रदीप म्हापसेकर)
(26/12/10)
No comments:
Post a Comment