Wednesday, February 23, 2011

तुम्ही चहा पिता?


हा काय प्रश्न झाला का भाऊसाहेब? अहो, आमचा दिवस चहाशिवाय सुरूच होत नाही. दुपारच्या जेवणानंतर डोळयांवर आलेली सुस्ती चहाशिवाय हटत नाही. ऍसिडिटीचा रोग जडलेली चारदोन टकली सोडली, तर अट्टल चहाबाजांचाच देश आहे हा!...
...हेच उत्तर आलं असेल ना तुमच्या ओठांवर!
तरीपण खरा चहा पिणारा कुणीही तुम्हाला सांगेल, तुम्ही चहा पीत नाही. चहाच्या दुनियेतला 'कचरा' मानली जाणारी सर्वात स्वस्त भुकटी वापरून तयार केलेलं चहाच्या स्वादाचं एक गरम पेय पितो आपण. हा अस्सल चहा नव्हेच!...
...अहो, जपून! गरमागरम चहा अंगावर सांडून घ्याल रागाच्या भरात.
...कितीही वाईट वाटलं तरी खरं आहे हे! अहो, आपण पितो ती भुसापावडर. चहाच्या दुनियेत खरी किंमत असते ती 'लीफ टी'ला. दार्जिलिंग चहा, श्रीलंकेचा चहा यांची नावं ऐकली असतील तुम्ही. त्यांचे भावच किलोला पाचसहाशे रुपयांच्या पुढे सुरू होतात आणि 1012 हजार रुपयांपर्यंत सहज पोहोचतात. हा चहा सर्वात महाग कारण तो 'खरा' चहा मानला जातो. चहाच्या रोपावर जी पोपटी पालवी येते, त्या डहाळीवरची कोवळी पानं आणि मधोमध पोटात फांदीचं नाजूक टोक घेऊन उमलणाऱ्या पानाची 'कळी' यांच्यापासून बनतो हा चहा. यात पानं किती, कळया किती यावरून 'ऑरेंज पेको', 'फ्लॉवरी पेको' अशी त्याची प्रतवारी ठरते.
हा चहा बनवण्याची पध्दतही एकदम वेगळी. आपण साखर घातलेल्या उकळत्या पाण्यात चहाची पत्ती उकळून वरून दूध ओतून चहा बनवतो. लीफ टी मात्र जितका नाजूक तितकीच तो बनवण्याची पध्दतही साजूक. एका कपासाठी लांबट काडयांसारखा दिसणारा लीफ टी एका कपातग्लासात अगदी चिमूटभर टाकायचा. पाणी स्वतंत्रपणे उकळून त्यात ओतायचं. ते त्या काळपट कांडयांवर पडताच एक चमत्कार घडतो. तो पाहण्यासाठी हा चहा काचेच्या ग्लासात किंवा किटलीत बनवायला हवा. गरम पाण्यात त्या कांडया जादू झाल्यासारख्या उलगडू लागतात आणि पंख पसरल्यासारख्या पानं उलगडत वर येऊ लागतात. त्याचवेळी त्यांच्यामधून काळसरसोनेरी रंगाचा अर्क निघून पाण्यात मिसळत जातो. ग्लासावर झाकण ठेवून किंवा किटलीमध्ये जेमतेम तीन मिनिटांपर्यंतच हे 'ब्रुईंग' किंवा चहा मुरवणं करायचं आणि मग हे सोनेरी द्रावण गाळून घ्यायचं. माफक साखर घालून हा चहा कोराच प्यायचा असतो. (दूध घालून तो भयंकर पातळ आणि बेचव लागतो.)
या चहाची गोडी लागायला जीभ थोडी सॉफ्ट, फिक्या चवींना सरावलेली असावी लागते. 'कोपभर चा ढोसल्याशिवाय' ज्यांना परसाकडे होत नाही, त्यांच्यासाठी ही चीज नाही. तिथे आपला उकाळाच बरा.

(महाराष्ट्र टाइम्स)

1 comment:

  1. hya khepes mala tula green tea kivha ekhadya phulacha chaha aanayala hava....gulabachya lahan lhan kalya kivha juichya kalyancha chaha masta lagto...sakhareshivay pan...shevantichya lahan phulancha chaha sudhha ...7-8 mitleli suki shevantichi fhule ghyachi ..mafak garam panyat kahi vel thevaychi aapoaap phule umalatat aani chaha tayar...green sudhha pyaylaach hava...roj sakali , dupari hava tevha..tyacha fayda mhanje vajan kami hote....sushi khatana tumhala gren tea kivha ulong tea detat....pachnasathi hi uttam...savay vhyayla thoda vel lagto khara ...nakki try kar re pan..

    ciao.

    ReplyDelete