Tuesday, February 15, 2011

आल्बम

या या, बसा बसा!
पाणी घ्या. सरबत की चहा!
आरामात रेलून बसा आणि आमचा आल्बम बघा.
नुकतेच आम्ही पाऊण महिन्याच्या टूरला गेलो होतो ना, त्याचे फोटो आहेत. फार नाही, जेमतेम अडीच किलो वजनाचाच तर आहे. तरीपण उचलून नका घेऊ, टी पॉय वर ठेवूनच पाहा.
हा पाहा हा पहिला फोटो. ट्रेनमधला. आमच्या ग्रूपचा. हे डावीकडे दिसतायत ना, ते अमुक. हो हो! व्यंगचित्रकार आहेत ना, तेच. त्या मधल्या आहेत त्या तमुक... करेक्ट... लेखिका... उजवीकडच्या ख्यातनाम कवयित्री ढमुक.
(ग्रूपमधले बरेचजण त्या दिवशी पहिल्यांदाच भेटले होते एकमेकांना. तरी किती चटकन गोत्रं जुळली सगळयांची. हा एक फोटो पाहताच ती सगळी धमाल आठवते...)
_पाहुण्याला मात्र ट्रेनच्या धडधडीत थरकापलेला, हललेला, चेहरे अस्पष्ट झालेला धूसर फोटो दिसतोय...
...
हा बघितलात का गेंडा... हो हो! तो ठिपक्याएवढा दिसतोय तो गेंडाच आहे. जंगलात दोन तास फिरल्यानंतर दिसलेला हा पहिला गेंडा आणि हे हत्ती. पाठमोरे दिसले आम्हाला !
(नंतर जंगलभर पर्यटकांच्या सेवेला नेमल्यासारखे इतके गेंडे दिसले की आता गेंडा बैलगाडीला जुंपलेला पाहिला कधी, तरी आश्चर्य नाही वाटायचं. पण, दोन तासांच्या भटकंतीनंतर, हुरहुरीनंतर पहिला गेंडा दिसला, तेव्हा काय अद्भुत फीलिंग आलं होतं. अधाशासारखे दणादण फोटो काढत सुटले सगळे... हे हत्ती तर अगदी 15 फुटांवरून गेले जीपच्या. कॅमेरे सरसावेपर्यंत पाठ वळलीही होती त्यांची.)
_पाहुण्याला मात्र फोटोंमध्ये हिरव्याच्या असंख्य छटांच्या मधोमध एक करडा ठिपका दिसला आणि झाडांआड दडलेल्या दोन खडकांसारखं काहीतरी.
...
आता हा फोटो पाहा बरं का! एकदम स्वर्गीय जागा आहे. डिव्हाइन. 14 हजार फुटांवर बर्फाळ डोंगराच्या माथ्यावर प्रचंड मोठ्ठं तळं आहे हे. अंडाकृती बर्फाच्या कटोरीत थंडगार, नितळशार पाणी. आकाशाचं प्रतिबिंब किती क्लिअर पडलंय पाहा ना त्यात.
(होते नव्हते ते सगळे कपडे अंगावर चढवले होते इथे जाताना. तरी कानशिलं सुन्न पडली होती, पोटात बर्फ झाल्यासारखा गारठा. त्या जुळया तळयांच्या काठावर उभं राहिल्यावर काळ जणू स्तब्ध झाला होता. आतबाहेर विलक्षण शांतता दाटली होती...)
_फोटोत यातलं काहीच नाही आलं. पाहुण्याला धुरकट फोटोत धुकं, बर्फ, खडक आणि पाणी मिळून काही काळं आणि काही पांढरं दिसलं
......................................
पाहुणे,
नका उलटू पुढलं पान!
नंतर फोटो काढलेच नाहीत आम्ही.
काढायची इच्छाच संपली.
इतके फोटो काढल्यानंतर लक्षात आलं की, ज्या वेळी जिथे जो असतो, त्या वेळी तिथे तोच असतो. फोटो काढून, शूटिंग करून, वर्णनं लिहून त्या क्षणाच्या रसरूपगंधस्पर्शाची जेमतेम 'बातमी' देता येते... अनुभव नाही देता येत... तो ज्याचा त्यालाच घ्यावा लागतो आणि तोही प्रत्येकाचा, प्रत्येक क्षणाचा वेगळा...
...आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी तो क्षण जगण्याऐवजी तो टिपून ठेवण्यासाठी धडपडत होतो. हे म्हणजे वधूवरांनी आपल्या लग्नात स्वत:चे फोटो काढत सुटल्यासारखं झालं...
...हे कळलं, तेव्हा आम्ही आधी तो तो क्षण जगायचं ठरवलं... मन तृप्त झाल्यावर फोटोही काढले... पण, ते आम्ही एकेकटेच पाहतो किंवा आमचा 'तो' ग्रूप जेव्हा एकत्र असतो, ना तेव्हाच पाहतो...
आमच्यासाठी ते 18 दिवस जिच्यात जसेच्या तसे बंद आहेत अशी कालकुपी आहे ती...
...इतरांसाठी निर्जीव वॉलपेपर्स.
...पुढचा आल्बम रिकामाच आहे.

(थर्ड आय, महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment