Friday, February 11, 2011

रॅगिंगबंदीचा निषेध असो!

रॅगिंगसारख्या मनुष्योपयोगी आणि समाजहितकारक प्रथेविरुद्ध समाजातील काही अतिसंवेदनशील आणि अतिशहाण्या मंडळींनी जो काही गदारोळ माजवला आहे, तो सर्वथैव अनुचित, गर्हणीय आणि त्रिवार निषेधार्ह आहे. रॅगिंगला विरोध करणा-यांच्या हे लक्षात येत नाही की असा विरोध करून ते एका प्रकारे विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांना प्रोत्साहनच देत आहेत. रॅगिंगविरोधकांवर त्या रूचिका प्रकरणातल्या राठोडप्रमाणेच अबेटमेंट ऑफ सुसाइडच्या कलमाखाली खटले भरले पाहिजेत. हे मत तुम्हाला स्फोटक वाटेल कदाचित. सनसनाटी सुद्धा वाटेल. रॅगिंग आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, या दोन गोष्टींचा परस्परसंबंध काय, असा प्रश्नाही पडला असेल. पण सावधचित्ताने आणि विचक्षण विवेकबुद्धी जागृत ठेवून पुढील मजकूर वाचला, तर हे मत कोणालाही पटेल. त्यासाठी आधी हे समजून घ्यायला हवे की रॅगिंग म्हणजे काय?
 
तर, रॅगिंग म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांला शारीरिक, मानसिक हानी पोहोचविणारे कृत्य करायला लावणे. म्हणजे, सहसा कोणीही सभ्य व्यक्ती चारचौघांदेखत जे करणार नाही, ते जाहीरपणे करायला लावणे. ज्याचे रॅगिंग करायचे त्याच्या आत्मसन्मानाच्या ठिक-याठिक-या होऊन तो धुळीला मिळाला पाहिजे, आपण एखाद्या जनावरापेक्षाही कमी प्रतीचे आहोत, अशी शरमेची भावना त्याच्या मनात जागृत झाली पाहिजे, हा रॅगिंगचा प्रधान हेतू आहे. वरवर पाहता ही अतिशय क्रूर, असंवेदनशील, राक्षसी, पाशवी पद्धती वाटेल कदाचित. पण, नीट डोळे उघडे ठेवून पाहाल, तर तिच्यामागचे उच्च आध्यात्मिक अधिष्ठान स्पष्टपणे दिसेल.
 
रॅगिंगया नावाने ही प्रथा मुख्यत: भारतात आणि श्रीलंकेत सुरू आहे. त्यातही (रावणाचा आणि प्रभाकरनचा वारसा असल्यामुळे असेल कदाचित) श्रीलंका रॅगिंगमध्ये भारताच्या पुढे आहे. बाकी जगभरातही वेगवेगळ्या नावांनी ही उदात्त प्रथा सुरू आहे. अमेरिकेत सिनीयर्सनी ज्युनियर्सना छळण्याला हेझिंगम्हणतात. इंग्लंडमध्ये फॅगिंगया नावाने सिनीयर स्टुडंट ज्युनियर्सना हे बहुमोल जीवनविषयक प्रशिक्षणदेतात. तेथील पब्लिक स्कूल्समध्ये ज्युनियर विद्यार्थ्यांना सिनीयर्सचे घरगडी असल्याप्रमाणे सगळी कामे करावी लागतात. जगभरात गुरुकुल परंपरेप्रमाणे एका पिढीतून दुस-या पिढीकडे हे ब्रह्मज्ञान संक्रमित होत आले आहे. परंतु, भारतात खुळचट आणि पुळचट रॅगिंगविरोधकांनी अचानक जोर करून रॅगिंगविरोधी कायदे करवून घेतल्याने या थोर देशात ही प्रथा संपुष्टात येते की काय, अशी भीती वाटू लागली आहे. हा धोका ओळखून प्रत्येक सुजाण नागरिकाने आता हा राष्ट्रीय ठेवा जपण्यासाठी रॅगिंग बचाओमोहिमेसाठी कंबर कसली पाहिजे. किंबहुना शालेय स्तरापासून रॅगिंगकम्पल्सरी करावे, यासाठी आंदोलन केले पाहिजे.
 
अंहंहं! असे संतापू नका. जरा शांत डोक्याने विचार करा. रॅगिंगमध्ये काय घडते? जीवनाचा अधिक अनुभव असलेले वरच्या वर्गातले विद्यार्थी खालच्या वर्गातील अननुभवी विद्यार्थ्यांना शिस्तीचे, आज्ञापालनाचे धडे देतात. त्यासाठी आपले संख्याबळ, वयोज्येष्ठता, शारीरिक ताकद यांचा वापर करून ते कनिष्ठ विद्यार्थ्यांना त्यांच्या मनाविरुद्ध काही गोष्टी करायला भाग पाडतात. यात कपडे उतरवणे, नग्नावस्थेत नाच करणे, सिनीयर्सची हलकीसलकी कामे करणे, माकडउडय़ा मारून वा अन्य शारीरिक हालचालींमधून सिनीयर्सचे मनोरंजन करणे, एरवी खासगीत करतो ती लैंगिक कृत्ये जाहीरपणे करणे, प्रसंगी अनैसर्गिक कृत्ये करणे, असे साधारणत: रॅगिंगचे स्वरूप असते.
 
नीट विचार करून सांगा.
 
आपल्या आसपास पाहून सांगा.
 
आपले रोजचे जगणे आठवून सांगा.
 
आयुष्य आपल्याशी आयुष्यभर वेगळे काय करते?
 
आयुष्याच्या सुरुवातीपासूनच या रॅगिंगची सुरुवात होते. शाळा-कॉलेजचे रम्य, फुलपंखी वगैरे दिवस ज्यांना लाभत नाहीत, त्यांच्यासाठी तर ते जन्मापासूनच सुरू होते. शाळा-कॉलेजात जाण्याचे भाग्य ज्यांना लाभते, त्यांचे रॅगिंगवाचा फुटल्यापासून सुरू होते.
 
अनुष्का (प्री प्री केजी), पोएम्स म्हणून दाखव काकांना!
 
यश (इयत्ता चौथी), ‘जागतिक शांततेतील भारताचे योगदानया विषयावर निबंध लिही.
 
रोहन (इयत्ता तिसरी), ‘ग्लोबल वॉर्मिगवर तू काढलेलं चित्र दाखव आँटीला.
 
आर्यन, गप्प बस.
 
साहिल. बोल.
 
नूपुर, नाच कर.
 
कनक, एका जागी स्वस्थ बस.
 
शुभम, टीव्ही बंद कर.
 
श्रवण, अभ्यास कर.
 
हे कर.
 
ते करू नकोस.
 
हेच कर.
 
हे सगळे काय असते?
 
रॅगिंगनसते?
 चांगले आयुष्य जगायचे असेल, तर पैसा कमावला पाहिजे. तो कमावायचा, तर उत्तम नोकरी-धंदा पाहिजे. तो मिळवायचा तर शाळा कॉलेजात गेले पाहिजे. मान मोडून शिकले पाहिजे. ज्याची चलती तो धंदा, तो व्यवसाय केला पाहिजे. ही उदात्त शिकवण देण्यासाठी पालक मुलांशी जे काही वर्तन करतात, ते काय असते?
मुलांचे दोनच प्रकार असतात. अभ्यासात हुशार आणि अभ्यासात ढ. हे मानून चालणारी झापडबंद शिक्षणव्यवस्था विद्यार्थ्यांशी सगळ्या शिक्षणकाळात वेगळे काय करते?
 
शिक्षणोत्तर आयुष्यात बॉस, सहकारी, संस्था, कंपनी, पोलिस, सरकारी अधिकारी, जातपातवाले नेते, पुढारी, बायको, नवरा, क्वचितप्रसंगी मुलेसुद्धा माणसाशी कशी वागतात? बाकी सोडा, बहुसंख्यांचे मत प्रमाण मानणारी लोकशाही ज्या देशात असते, त्या देशात रॅगिंगहाच राष्ट्रधर्म नसतो का? संख्याबळाच्या आणि/किंवा राक्षसी बळाच्या जोरावर अल्पमतवाल्याला किंवा आपल्याशी दुमत असलेल्याला नंगे नाचवणे, झुकवणे, हिणवणे, एकटे पाडणे, खच्ची करणे, याला काय म्हणायचे?
 
मग, जगाविषयी भाबड्या समजुती घेऊन स्वप्नाळू जगात वावरणा-या विद्यार्थ्यांना त्यांच्या आसपासच्या क्रूर जगाचं भान आणून देण्याची रॅगिंगपेक्षा चांगली पद्धत कोणती? त्यांच्या सिनीयर्सनाही अशाच प्रकारे जगाचे भान आलेले असते ना? हे भान पुढच्या पिढीकडे सोपविण्याच्या इतक्या नि:स्वार्थ आणि उपकारक प्रथेला प्रोत्साहन देण्याऐवजी तिला विरोध करणे म्हणजे करंटेपणाच आहे. या विरोधामुळे रॅगिंग करणा-यांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे. (म्हणजे रॅगिंग करणा-यांचेच रॅगिंग!) त्यांच्यावर चोरून मारून रॅगिंग करण्याची वेळ आली आहे. रॅगिंग करणे हा गुन्हा मानला जातो आहे.
 
विचार करा. रॅगिंगला जर योग्य प्रतिष्ठा लाभली, ते शाळेपासून कंपल्सरी केले, तर काय चमत्कार घडेल!
 
भावी आयुष्यात जे अत्याचार भोगायचेच आहेत, त्यांचे भान शाळकरी वयातच मुलांना येईल. आयुष्याविषयीच्या भाबड्या कल्पनांचे योग्य वयातच भस्म होऊन जाईल. रॅगिंगचे चटके त्यांना वास्तवाच्या जगात आणतील आणि त्यांच्या नाजुक, संवेदनशील त्वचेची जागा जाड, चामट, निबर कातडी घेईल.. मग, पालकांनी दटावले, परीक्षेत नापास झालो, प्रेयसी नाही म्हणाली, यांसारख्या फुटकळ कारणांनी आत्महत्या करण्याइतके कोवळे मनच त्यांच्याकडे उरणार नाही आणि एकही विद्यार्थी आत्महत्या करणार नाही..
 
..कारण, आधीच मेलेल्याला दुस-यांदा मारता येत नाही.

(10/1/10)

No comments:

Post a Comment