(दादूसाहेब मंचकावर पहुडलेले आहेत.. स्वीय सहायक धावत येतो.)
स्वी. स. (दरडावून) : लोळत काय पडलायत. उठा.
(दादूसाहेब भेदरून उठून बसतात. नंतर भानावर येतात.)
दा. सा. (दरडावण्याचा प्रयत्न करीत) : अरे, साहेब तू आहेस की मी? तूच दरडावतोस माझ्यावर?
स्वी. स. (कडक आवाजात) : काय करणार, तुमची पर्सनॅलिटी ही अशी. माझी अशी. कोण साहेब आहे हे कळेनासं होतं आणि बऱ्याचदा तुमचाही गोंधळ होतो.
दा. सा. (आवाज कडक करण्याचा प्रयत्न करीत) : ठीकाय. जास्त बडबड करू नकोस. धावतपळत का आलास, ते सांग.
स्वी. स. (कपाळावर हात मारून) : मुंबईवर प्रचंड संकट कोसळलंय.
दा. सा. (टुणकन् उडी मारून थरथरत बिछान्यावर उडय़ा मारत) : चला चला चला, लगेच ताज लँड्स एण्डला शिफ्ट होऊया. तिथे आपण सेफ राहू. चला चला चला..
स्वी. स. : साहेब, शांत व्हा. आपण ताज लँड्स एण्डलाच आहोत.
दा. सा. (नि:श्वास सोडून) : अरे, हे आधी नाही का सांगायचंस. घाबरवून सोडलंस. केवढा टरकलो होतो मी.
स्वी. स. : त्यात नवीन काय?
दा. सा. : काय म्हणालास?
स्वी. स. (सावरून घेत) : मी म्हणत होतो की मुंबईवर फार मोठं संकट कोसळलंय.
दा. सा. : कोसळू देत ना! आपण सुरक्षित आहोत ना, मग झालं. संकट ओसरलं की बाहेर पडू आणि भाषण ठोकू. सगळे सैनिक कामाला लागलेत ना रे पण? त्यांनी लढायचं, आपण फक्त..
स्वी. स. : कपडे सांभाळायचे.
दा. सा. : काय म्हणालास?
स्वी. स. : मी म्हणालो, आपण फक्त आदेश द्यायचे. ते सगळं सुरूच आहे. पण, साहेब, परिस्थिती जरा वेगळी आहे. हा लोकलशी संबंधित विषय आहे.
दा. सा. : अरे, म्हणजे आपलाच विषय की. आपल्याला लोकलच्या पलीकडचं कुठे काय कळतं बोंबलायला.
स्वी. स. : तसं लोकल नाही साहेब, लोकल ट्रेन.
दा. सा. : आता हा काय प्रकार असतो? हां हां, आता आलं लक्षात. मी मुंबईची एरियल फोटोग्राफी करताना ती गांडुळासारखी वळवळणारी होती तीच ना लोकल ट्रेन!
स्वी. स. : हो तीच. जिच्यात बसून इटलीचा युवराज, रोमचा राजपुत्र आपल्याला टुक टुक करून गेला तीच ट्रेन.
दा. सा. (फणकाऱ्याने) : तिचं काय झालं?
स्वी. स. : ती बंद पडली आहे.
दा. सा. : अरे मग मेकॅनिकला बोलवा आणि दुरुस्त करून घ्या.
स्वी. स. : ती बंद पडली आहे म्हणजे एक ट्रेन बंद नाही पडलेली, सगळय़ा ट्रेन बंद पडल्या आहेत.
दा. सा. : अरे मग कमिशन खाऊन कंडम माल भरला म्हणून त्या रेल्वेमंत्रिणीच्या नावाने बोंब ठोका. संसद बंद पाडा. मुंबई बंद पाडा.
स्वी. स. (धमकावणीच्या सुरात) : आता दोन मिनिटं थोबाड बंद ठेवून मी काय म्हणतो ते ऐकून घ्या. मुंबई ऑलरेडी बंद पडली आहे, कारण, ट्रेनसेवा बंद पडली आहे. मोटरमनचा संप आहे.
दा. सा. : अरे, पण ट्रेनचा आणि मोटरचा संबंध काय?
स्वी. स. (राग गिळत) : ट्रेन चालवणाऱ्याला मोटरमन म्हणतात.
दा. सा. : मग चॅनेलवाल्यांना बोलवा. मी ताबडतोब त्यांना इशारा देतो. समस्त हिंदू बांधवांची वज्रमूठ त्यांच्या टाळक्यावर आदळल्याशिवाय राहणार नाही, असा. मस्त पॉवरफुल ना रे माझा डायलॉग.
स्वी. स. : ते बहुतेक सगळे हिंदूच आहेत आणि मुख्य म्हणजे आपण त्यांना इशारा देऊ शकत नाही.
दा. सा. (डोळे मिचकावत) : का रे? काही सेटिंग आहे?
स्वी. स. : तुम्हाला दुसरं काही सुचतं की नाही? मोटरमनच्या आंदोलनाला आपण ऑलरेडी पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे आपलेच सैनिक आपल्याला शोधतायत.
दा. सा. : कशाला?
स्वी. स. : आरती करायला? महाआरतीच होईल ती.
दा. सा. : अरे बापरे, मग आता काय करायचं?
स्वी. स. : पाठिंबा काढून घ्यायचा.
दा. सा. : अरे, पण त्या मोटरमनचं आंदोलन न्याय्य असेल तर.
स्वी. स. : असा विचार करून आपला पक्ष चालतो का? मुळात विचार करण्याची आपली पद्धत आहे का? जिकडे सरशी तिकडे आपली पार्टी. आता भडकलेल्या पब्लिकची संख्या खूप जास्त आहे. मोटरमन कमी आहेत. तेव्हा आता आपला पाठिंबा जनआंदोलनाला. आणि सगळय़ात महत्त्वाचं म्हणजे, मुंबई बंद पाडण्याचा ठेका आपल्याकडे आहे, तो आपल्याकडेच राहिला पाहिजे.
*******************
(छोटूसाहेब मंचकावर पहुडलेले आहेत. अस्वस्थ दरबारी साहेब उठण्याची वाट पाहतात. शेवटी कंटाळून घडय़ाळाचा गजर वाजवतात.)
छोटूसाहेब (आळस देत उठून, भडकलेल्या आवाजात) : काय कटकट आहे रे! त्या बारामतीच्या काकांनी भेट दिलेली सगळी घडय़ाळं फेकून दिली, तरी कुठून ना कुठून गजर होतोच. बोला. आज सक्काळी सक्काळी येऊन बसलायत माझ्या बोडक्यावर. कामंधंदे नाहीत दुसरे?
नेता नं १ : साहेब, जरा गडबड झालीये. मुंबईवर संकट कोसळलंय.
छो. सा. : अरे मी गेली कित्येक र्वष बोंबलून सांगतोय मुंबईवर संकट कोसळलंय म्हणून आणि तुम्हाला आत्ता साक्षात्कार झाला. त्या भय्यांना..
नेता नं. २ : साहेब, नेहमीची टेप नको. संकट वेगळं आहे. लोकलचा इश्यू आहे.
छो. सा. : अरे, लोकल सगळे इश्यू आपलेच. काय झालंय.
नेता नं. १ : ट्रेन बंद पडल्यात साहेब.
छो. सा. : अरे मग पडू द्यात की. मराठी माणसाचं रक्त उसळलं की हे होणारच. आमची ताकद दिसू द्यात जगाला.
नेता नं. २ : साहेब, हा पराक्रम आपण केलेला नाही.
छो. सा. : अरे बापरे, दादूपार्टीने मुंबई बंद पाडली? तुम्ही काय झोपा काढत होतात की काय?
नेता नं. १. : साहेब, मुंबई मोटरमन मंडळींनी बंद पाडली आहे.
छो. सा. : ट्रॅफिक जॅम केला की काय त्यांनी? अरे, परप्रांतीयांचे लोंढेच्या लोंढे येऊन आदळल्यावर दुसरं काय होणार?
नेता नं. २. : साहेब, मोटरमन ट्रेन चालवतात. त्यांनी आंदोलन केलंय.
छो. सा. : माजलेले उत्तर भारतीय असणार ते सगळे. आपली पोरं पाठवा आणि..
नेता नं. १ : साहेब, त्यात मराठी माणसंही आहेत आणि त्यांनी रीतसर इशारा देऊन आंदोलन केलंय.
छो. सा. : आता आली का पंचाईत? आता काय करायचं? दादूपार्टी काय करतेय?
नेता नं. २ : दादूपार्टीने आंदोलनाला पाठिंबा दिला होता. आता त्यांना तो काढून घ्यावा लागतोय.
छो. सा. (चुटकी वाजवून) : मग, आपलं धोरण ठरलं. ते जे करतील त्याच्या विरुद्ध आपण. आता त्यांचा इशारा यायच्या आत आपला इशारा जाऊद्यात. आंदोलन मागे घेतलं नाही, तर आमच्या स्टाइलनं प्रश्न सोडवू म्हणावं.
नेता नं. १ : पण साहेब, आपल्या स्टाइलने सुटणारा प्रश्न नाहीये हा.
छो. सा. : कुठला प्रश्न सुटतो आपल्या स्टाइलने? कुठलाच नाही. आणि इथे प्रश्न सोडवायचाय कुणाला? प्रश्न सुटला तर आपल्याला कोण विचारेल. आपण फक्त प्रश्न मांडायचा आणि इशारे द्यायचे. जा रे, इशाऱ्याची तयारी करा. पोरं पाठवून हंगामा करा आणि आता मला दोन तास झोपू द्या. जाताना ती सगळी घडय़ाळं घेऊन जा.(9/5/10)
No comments:
Post a Comment