नीलला गंभीर स्वरूपाचा आजार झालाय, हे त्याला पहिल्यांदा पाहताच लक्षात आलं...
...तो आपल्या आईबाबांबरोबर एका ठिकाणी जेवायला आला होता. त्रासिक चेहरा आणि संतप्तरडवेल्या आवाजात 'मी नाही येणार'चा धोशा. त्याच्या आईने त्याला (त्याच्याच मागणीनुसार) सकाळीच एक कार, एक डॉल आणि एक हेलिकॉप्टर घेऊन दिलं होतं... पण, आता त्याला बाबाकडून एक खरंखुरं हेलिकॉप्टर हवं होतं... साधारणपणे ज्यात तो स्वत: बसून उडवू शकेल एवढयाच आकाराचं... त्याच्या शब्दांत 'छोटंसं'.
त्याच्या बाबाने सांगितलं, ''हे काका आहेत ना, यांची फॅक्टरी आहे हेलिकॉप्टरची. आपण सांगूयात का त्यांना हेलिकॉप्टर द्यायला. पाठवाल ना हो काका?...''
त्यानंतर नील अगदी शहाण्या मुलासारखा वागला, खेळला, जेवला. हेलिकॉप्टरवाल्या काकाच्या नजरेत आपण 'गुड बॉय' राहिलं पाहिजे, याची तो काळजी घेत होता आणि मध्येच हेलिकॉप्टरविषयी निरुपद्रवी भासणारे प्रश् विचारून काका 'जेन्युइन' आहे का, याचीही चाचपणी करत होता...
...नीलमध्ये दोन सिंड्रोम दिसत होते... एक श्रीमंत आई सिंड्रोम आणि दुसरा बिझी बाबा सिंड्रोम... ऍक्चुअली पहिला सिंड्रोम हा दुसऱ्या सिंड्रोममधूनच जन्म घेतो.
म्हणजे असं की बाबा सतत बिझी असतो. त्याच्याकडे नीलला देण्यासाठी वेळच नाही. त्यामुळे शाळेचा वेळ सोडला तर नील तिन्हीत्रिकाळ आईबरोबरच असतो. त्याच्या भुणभुणीवर तिच्याकडे उपाय एकच. त्याला नाना तऱ्हेची खेळणी, गॅजेट्स घेऊन देणं. त्याने तो (तात्पुरता का होईना) शांत बसतो. बिझी बाबाला जेव्हा केव्हा नीलला भेटायला वेळ मिळतो, तेव्हा 'आपण आपल्या मुलासाठी वेळ काढू शकत नाही' हा त्याचा अपराधगंड उसळी मारून बाहेर पडतो आणि तो लाडांच्या स्वरूपात बाहेर पडतो. नीलला बाबाचा वीकपॉइंट माहिती आहे. त्यामुळे, विशेष आर्थिक तरतुदीची गरज असलेल्या मागण्या तो वीकेण्डसाठी राखीव ठेवतो... या जोडीला त्याला अगदी कॉमन असणारा 'अतिप्रेमळ आजीआजोबा' सिंड्रोमही असणार, हे उघड आहेच.
खरंतर आजार नीलला झालेला नाही. त्याच्या आईबाबांच्या पिढीला झालाय. आज नीलकडे एकटयाकडे जेवढी खेळणी आहेत, तेवढी त्याचे आईबाबा लहान असताना त्यांच्या अख्ख्या चाळीत, बिल्डिंगमध्ये किंवा मोहल्ल्यात मिळून नसायची. मुलींकडे लाकडी बाहुली, मुलांकडे विटीदांडू, गोटया, पतंग, भोवरे, क्रिकेटची गावठी बॅट आणि रबरी चेंडू... संपली खेळणी. एखाद्याकडे पत्त्याचा कॅट, बॅडमिंटनचा सेट किंवा 'व्यापार'चा खेळ असला, तर त्याची मोठी वट असायची. अशा (त्यांच्या मते) अभावग्रस्त बालपणाने त्यांच्यात एक विचित्र प्रवृत्ती निर्माण केलीये... 'जे आपल्याला मिळालं नाही, ते सगळं आपल्या मुलांना मिळालं(च) पाहिजे... त्यांना काही कमी पडता कामा नये'... म्हणूनच मग नीलच्या बिल्डिंगमधली एक मुलगी जेव्हा सकाळी 300 रुपयांची रंगांची पिचकारी घेऊन येते, तेव्हा संध्याकाळपर्यंत बिल्डिंगमधल्या सर्वच्या सर्व 18 मुलांकडेही तीच पिचकारी आलेली असते... आणि तोवर त्या सर्वांनाच इतर कुणाकडच्या तरी 50 रुपयांच्या पिचकारीचा मोह पडलेला असतो.
...आता पुन्हा नीलची भेट होणार असेल, तेव्हा केस वगैरे रंगवून 'मी हेलिकॉप्टरवाला काका नव्हे, त्याचा जुळा भाऊ' असं सांगायचं पक्कं ठरवलंय... पण तेव्हाही नीलच्या बाबाने 'या काकांची बर्फाच्या गोळयांचं यंत्र बनवण्याची फॅक्टरी आहे,' असं सांगितलं तर काय करायचं?
(थर्ड आय, महाराष्ट्र टाइम्स)
No comments:
Post a Comment