रमणा म्हणजे उपकृतांना वाटलेली खिरापत.
जोगवा म्हणजे देवीच्या नावाने मागितलेली भीक.
या दोन्ही आपल्या महान राष्ट्रीय परंपरा आहेत. त्यांचं अतीव निष्ठेनं पालन करणारे पाईक आपल्या सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रांत किती मोठय़ा संख्येनं आहेत, हे गेल्या आठवडय़ात दिसलं. उच्च सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी सत्त्वशीलता, सचोटी, अभिमान वगैरे क्षुद्र मूल्यांना तिलांजली देणाऱ्या महनीय व्यक्ती पाहून ऊर आनंदाने भरून आला.
यातला वार्षिक रमणा होता पद्म पुरस्कारांचा. पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री हे पद्म पुरस्कार देशाचे सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘मानले जातात.’ म्हणजे हे पुरस्कार ज्यांना मिळतात, ते आणि जे देतात ते ‘सर्वोच्च’ आहेत, असं वाटतं. पण, प्रत्यक्षात तसं असण्याचं काही बंधन नसतं (केवढी ही धोरणात्मक लवचिकता!). पुरस्कारांचे मानकरी निवडताना त्यांची कामगिरी त्यांच्या क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरी आहे का, त्यांचे चारित्र्य या पुरस्कारांच्या योग्यतेचे आहे का, अशा फुटकळ गोष्टींचा विचार करण्यात निवड समिती वेळ वाया दवडत नाही (ही समिती कुठे असते आणि तिचे सदस्य कोण असतात, हे देशाचे ‘सर्वोच्च’ राष्ट्रीय गुपित आहे, म्हणे!). ती आपल्या परंपरेप्रमाणे पुरस्कारांचा रमणा जाहीर करते आणि मग मानक-यांच्या नावांवरून अकारण गदारोळ उडतो. अनेक खटले अंगावर असणारे ‘उद्योगपती’, सरकारचे कोट्यवधी रुपये बुडवणारे सहकारसम्राट, फुटकळ सिनेमानट, राजकारणी नेत्यांवर उपचार करणारे आधुनिक धन्वंतरी अशा सर्व समाजाला आदर्शभूत महानुभावांना पुरस्कार मिळणे हे काही क्षुद्र जंतूंना रूचत नाही. त्याचबरोबर, एखाद्या क्षेत्रात कार्यकर्तृत्वाच्या हिशोबात महनीय असलेल्या आजोबांनाही पद्मश्री आणि त्या क्षेत्रात नुकत्याच रांगू लागलेल्या बालकालाही पद्मश्री, अशा वाटणीतून सरकारने अतिशय खुबीने दिलेला समानतेचा संदेशही काहींच्या डोक्यावरून जातो.
गंमत म्हणजे, आपल्या परंपरेचं भान असणा-यांची समाजात बहुसंख्या असल्यानं हाताच्या बोटावर मोजण्याइतके नतद्रष्ट लोक सोडता या पुरस्कारांसाठी निवड झालेले बहुतेक मान्यवर हा रमणा काहीही खळखळ न करता स्वीकारतात. पद्म पुरस्कार तर फार मोठे झाले, किरकोळवाडी बुद्रुक भूषण पुरस्कार स्वीकारतानाही कोणी असा विचार करत बसत नाही. हा पुरस्कार देणारे कोण आहेत? मुळात त्यांची तो देण्याची पात्रता आहे का? याआधी हा पुरस्कार कोणाकोणाला देण्यात आला आहे? या प्रश्नांच्या खोलात जायचे कशाला? मानपत्रं शोकेसमध्ये छान दिसतात. शाली नातेवाईकांना वाटता येतात. श्रीफळाचे तर नाना उपयोग- चटणीपासून सोलकढीपर्यंत. रोख रक्कम म्हणजे लक्ष्मी. तिला नाकारणे तर डायरेक्ट पाप. आता या तुलनेत पद्म पुरस्कार म्हणजे तर केवढा मोठा मान! त्याचे केवढे फायदे! रेल्वेचा प्रवास असो की टेलिफोनची बिलं- केवढ्या सवलती! मग, आपल्या पंक्तीत कोण आहे किंवा कोणाच्या पंक्तीत आपण आहोत, हे कशाला पाहायचं?
अशीच दुसरी गौरवशाली परंपरा आहे जोगव्याची.
हा कोणीही कोणाकडेही मागू शकतं, पण, तो विशेषत: साहित्यिक-कलावंतांनी सरकारकडे मागायचा असतो. अनुदानाचा जोगवा, मोफत किंवा स्वस्त घरांचा जोगवा (‘एकाला एक’ हे जसं ‘बायकां’च्या संदर्भात बंधन नाही, तसं घरांच्याही बाबतीत नाही), सरकारी समित्यांवर वर्णी लावण्याचा जोगवा (याला पात्रतेचं बंधन नाही, पीएचडी प्रबंधविषयक समितीच्या अध्यक्षपदी बालवाडी शिक्षिकाही असू शकतात), असे जोगव्याचे असंख्य प्रकार. पुन्हा यात ‘सौंदत्ती टाइप’ बळजबरीचा मामला नाही. माणसं स्वत:च स्वहस्ते स्वखुशीने स्वधोतर फेडून लुगडं नेसायला आणि खण्णकन टाळी वाजवायला तयार असतात.
यातलाच एक जोगव्याचा चित्तचक्षुचमत्कारिक प्रकार नुकताच महाराष्ट्राने डोळेभरून पाहिला. आशीर्वादाचा जोगवा. या प्रकारात एखाद्या कलाकृतीला यश मिळालं की त्या कलाकृतीचे कर्ते तिच्या यशाशी कुठलाच संबंध नसलेल्या एखाद्या पक्षाच्या किंवा पक्षनेत्याच्या पायाशी लागून त्याचा जाहीर आशीर्वाद घेतात. आपल्याकडे काही नेते हे स्वत:च कलावंत. त्यांचं त्या त्या कलाक्षेत्रातलं नेमकं मोजमाप किती, याची फारशी माहिती कुणाला नसते, त्याची फिकीरही करायची गरज नसते. त्यांना ज्येष्ठ कलावंत म्हणून आशीर्वादाचा तहहयात अधिकार. या आशीर्वादाचा जोगवा ‘वसूल’ करण्याचीही खास पद्धत असते. कोणा मराठीजनाने काही चमकदार कामगिरी केली की ‘गडा’वरून फोन सुरू होतात. एरवी कोणाचे फोन न घेणारे, घेतला तर गुर्मीत बोलणारे, उडवून लावणारे, हाडहाड करणारे स्वीय सचिव स्वत: फोनवर म्हटल्यावर समोरच्या कलाकाराचा गूळ पाघळतो. ‘साहेबांनी दर्शनाला बोलावलंय, आशीर्वाद घ्यायला या,’ हा निरोप ऐकून कान धन्य होतात. मग कलावंतांची धावपळ सुरू होते. ठेवणीतले कपडे निघतात. अत्तरं फवारली जातात. बंगल्यावर चहापाणी होतं. हवापाण्याच्या गप्पा होतात. साहेबांचं दर्शन मिळतं. आशीर्वाद मिळतात. तेही कलेबद्दल मनापासून आणि भरभरून बोलतात. आपणही कलावंत असल्याचं वारंवार ठसवून सांगतात. जीव कसा हलका हलका होतो.
या सगळ्या भानगडीत कलावंताच्या हे लक्षातच राहात नाही की कलाप्रेमी साहेबांची टोळी आपल्यातल्याच काहीजणांच्या कलाकृतींचा ध्वंस करीत फिरते.
कलावंतांनी काय करायचं, काय छापायचं, काय बोलायचं, काय चित्रित करायचं आणि काय दाखवायचं, यावर साहेबांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारं सुपरसेन्सॉर आहे.
आपल्या बिरादरीचं अभिव्यक्तीस्वातंत्र्य धोक्यात आणणारे, ते टाचेखाली चिरडू पाहणारे यांचेच पित्ते असतात. तरी साहेब कलेच्या गप्पा करतात आणि आपण त्या ऐकतो. माना डोलावतो. आशीर्वादासाठी झुकतो..
..झुकणे हा इथल्या कलाकारांचा स्वभावधर्मच आहे.. ‘मायबाप रसिक’, ‘लोकाश्रय’, ‘राजाश्रय’ हे कलाक्षेत्रातले शब्दच कलाकाराला त्याची आश्रिताची पायरी दाखवून देतात. कलेच्या क्षेत्रात सगळेच कलावंत नसतात, काही नुसतेच कलाकार असतात. कलावंत म्हणवून घ्यायला त्या कलेच्या प्रतिभेचा स्पर्श लाभावा लागतो.. तिच्या वैचारिक प्रज्ञेची देणगी लाभावी लागते.. ज्याला तो लाभतो तो फकिरीतही राजा असतो.. त्याचा कणा वाकत नाही, पाठ झुकत नाही.. डोकं फुटलं तर मान तुकत नाही.. असे असामान्य कलावंत दुर्मीळ असतात.. बहुतेक वेळा समोर येतात ते कलाकार.. कलेच्या पाटय़ा सफाईने टाकणारे कलामजूर.. आपण टाकतो आहोत ती पाटी सोन्याची आहे की मातीची याची जराही जाण नसणारे आणि त्याची गरजही न भासणारे निव्वळ कलावाहक..
..दिमडी वाजायला लागली की चावी दिल्यासारखे यांत्रिकपणे घुमू लागणारे जोगते..
..धोतर फेडून लुगडं पहिल्यांदा नेसवलं जातं तेव्हा अंगाला लाखो इंगळ्या डसल्यासारख्या यातना होतात जोगत्याला..
..पण, त्या लुगडय़ाचीही नंतर सवय लागते आणि एकदा ती सवय लागली की जोगत्या खाट्टकन टाळी वाजवून तोंड विचकायला आणि हात पसरायला शिकतो.. दांडजवान बापयमाणूसही बिनलुगडय़ाचा कासावीस होऊ लागतो..
..ही जोगव्याची नशाच अशी घातक असते.
(31/1/10)
No comments:
Post a Comment