Friday, February 11, 2011

टेन परसेंटांची कहाणी

‘‘एका महिन्याच्या आत तुला टेन परसेंटचं घर मिळवून दिलं नाही, तर नावाचा शक्कलजमवकर नाही..’’ सिनीयर रिपोर्टर श.ज.करांनी क्लबातले टेबल ठोठावून सांगितलं, तेव्हा चौथा पेग अर्धा रिकामा झालेला असतानाही ज्युनियर रिपोर्टर रेवणनाथ बाळेकुंद्रीकराची सगळी दारू उतरली. वृत्तपत्र व्यवसायात चांगला दबदबा असलेल्या श.ज.करांचा या ग्रामीण भागातून आलेल्या खेडवळ, नवशिक्या पण गुणी रिपोर्टरवर फार जीव. म्हणूनच थेट वरपर्यंत शब्द टाकून त्याला मुंबईत घर मिळवून देण्याचा चंगच त्यांनी बांधला होता. अंबरनाथवरून रोज गर्दीत पिचून धक्के खात करायचा लोकल प्रवास संपणार आणि मुंबईत आपल्याला हक्काचं घर मिळणार, या कल्पनेनं रेवणनाथ हरखला. पण..‘‘पण, सर, मुळात हे अनैतिक नाही का? म्हणजे, मला घराची नितांत गरज आहे हे बरोबर आहे. पण, मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातून घर घेतलं तर ते सरकारचे उपकार घेतल्यासारखं नाही का? सरकारवर विधायक टीका करण्याची जबाबदारी असलेल्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभानं असं मिंधं होणं योग्य आहे का?’’ कसाबसा धीर करून रेवणनाथ प्रश्न करता झाला.‘‘बा फोर्थ पिलर रेवणनाथा, तुझ्या डोक्यातला गुंता हलके हलके सोडवायला हवा. पहिली गोष्ट म्हणजे जे जे नैतिक नसतं ते अनैतिकच असतं, असं नाही. काही गोष्टी ननैतिक असतात ननैतिक.. म्हणजे नैतिकतेच्या कक्षेबाहेरच्या,’’ श.ज.कर पूर्वाश्रमीचे समाजवादी- लहानपणी संघाच्या आणि तरुणपणी कम्युनिस्ट पक्षाच्या मांडवाखालून जाऊन आलेले- त्यामुळे सैद्धांतिक मांडणी पक्की, ‘‘टेन परसेंट हा असाच ननैतिक प्रकार आहे. राहता राहिली चौथ्या स्तंभाची गोष्ट. मला सांग, एखादं मखर चार खांबांवर उभं असेल, त्यातले तीन सडलेले असतील आणि एकच धडका राहिला असेल, तर काय होईल? मखर तिरकं होऊन उलटंपालटं होत कोसळेल आणि त्याच्या आत जे काही असेल, त्याचा चुराडा होईल. करेक्ट?’’रेवणनाथाने मान डोलवली. श.ज.करांचं निरुपण पुढे सुरू झालं, ‘‘तेच जर त्या मखराचे चारही खांब समान प्रमाणात सडलेले-किडलेले असतील, तर काय होईल? ते मखर हळुहळू खचत सरळ खाली बसेल. म्हणजे कोसळतानाही ते सेफ राहील आणि आतल्या वस्तूही सुरक्षित राहतील. नव्या खांबांवर ते जसंच्या तसं बसवताही येईल. म्हणजे तू म्हणतोस त्या चार खांबांवर आपली समाजव्यवस्था समजा आधारलेली असलीच, तर तिचा योग्य प्रकारे, टप्प्याटप्प्याने आणि सुरक्षित ऱ्हास होण्यासाठी काय व्हावं लागेल? चौथ्या खांबानेही समान प्रमाणात सडावं लागेल. ते आपल्या लोकशाहीसाठी आवश्यक आहे.’’
* * *
‘‘सर, एक शंका आहे..’’ रेवणनाथ ऑफिसात श.ज.करांच्या केबिनीत डोकावला. ‘‘रेवणनाथ, शंकासमाधानाची जागा क्लबात आणि वेळ सूर्यास्तानंतरची, हे तुम्हाला ठाऊक नाही का? लघुशंका असेल, तर विचारून टाक.’’‘‘मी अर्ज भरला सर टेन परसेंटचा. त्यात उत्पन्नाची अट आहे. माझं उत्पन्न कितीतरी जास्त आहे त्यापेक्षा.’’‘‘हो? आपल्या संपादकाचं उत्पन्न तुझ्यापेक्षा कितीपट जास्त आहे? त्याचे तीन फ्लॅट आहेत. तुझी ती फेमस नटी- काय तिचं नाव ते- मेनका की रंभा- तिचं उत्पन्न किती? तिचे मुंबईत दोन आणि पुण्यात तीन असे पाच फ्लॅट आहेत?’’‘‘इतरांचं ठीक आहे, सर. पण, आपण पत्रकारांनी असं का करायचं? ती अट काढून टाका, असं सगळय़ांनी मिळून सांगता नाही का येणार?’’‘‘पुन्हा तोच गुंता करतोस रेवणनाथ! अरे, ती अट काढून टाकली आणि नियमाप्रमाणे सगळं घरवाटप केलं, तर केवढा घोटाळा होईल याची कल्पना आहे का तुला? सरकारची केवढी पंचाईत होईल? सरकारी पातळीवर एक काम नियमाप्रमाणे होतं, असा संदेश सामान्य जनतेपर्यंत गेला, तर तो पायंडा पडेल. मग, सगळीच कामं नियमाप्रमाणे व्हायला हवीत, असा हट्ट धरतील लोक. ते शक्य आहे का? यातून सरकारी यंत्रणा, पुढारी आणि पत्रकार यांच्यात दुरावा वाढेल, तो वेगळाच. अरे, जेव्हा आपणही नियम वाकवून कामं करून घेतो, तेव्हा पुढाऱ्यांमध्ये आपल्याबद्दल ममत्व आणि सरकारी कर्मचा-यांमध्ये आपल्याबद्दल दरारायुक्त आदर निर्माण होतो.’’* * * फायलीवर रेवणनाथाचं पेन वाजू लागलं आणि श.ज.करांच्या लक्षात आलं की पोरगा अस्वस्थ झालाय. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भल्या सकाळी त्यांच्यासारख्या इतर अनेकांच्या गर्दीत बसले होते दोघे. सीएमची एक सही झाली की रेवणनाथाच्या घराचा मार्ग मोकळा होणार होता.‘‘काय रेवण्णा! काही गडबड?’’‘‘सर, हे असं भिका-यासारखं बसणं फार लाजिरवाणं वाटतंय हो! आपण असं घर मिळवायचं आणि नंतर ‘सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय’ असे बाणेदार लेख लिहायचे, हे सगळं दुटप्पीपणाचं वाटतंय.’’‘‘बरोबर आहे तुझं. पण, दुटप्पीपणा ही आपली व्यावसायिक परंपरा आहे. ते संचित तू नाकारू शकत नाहीस,’’ श.ज.करांनी रेवणनाथाच्या पाठीवर थोपटून सांगितलं, ‘‘तो पकपकवार रोज पेपरमधून सरकारला ठोकतो. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात दणदणीत बातम्या छापतो. लोकांना वाटतं, काय महान बाणेदार पत्रकार. इकडे तोही चौथ्या घरासाठी सही घ्यायला तोंड फाकवून हसत हजर होतोच ना. या सगळय़ाचं इतकं वाईट वाटून घ्यायचं नाही. अरे, आपण लोकशाहीतले राजे आहोत. कितीही मोठा मंत्री झाला, तरी तो आपला सेवकच. त्याने तुझ्या फायलीवर सही करणं हे त्याचं कर्तव्य आहे. तो ते बजावतोय, असं आपण आपल्या मनाला सांगायचं. मन हलकं होतं.’’‘‘पण, सर, ही आपल्या पेशाशी, व्यवसायाशी, कंपनीशी प्रतारणा नाही का?’’‘‘बाळा, हे एक चक्र आहे. सृष्टीचं जसं चक्र असतं, तसंच चक्र. आपली कंपनी काय करते? भरपूर जाहिराती छापते. जाहिरातीच्या रेटने ‘याची लाल, त्याची लाल’ करणा-या बातम्या छापते. पेपरच्या नावाने भूखंड मिळवून गगनचुंबी टॉवर उभारते. त्यातले गाळे भाडय़ाने देऊन कोट्यवधी रुपये कमावते. पत्रकारांना पोटमाळय़ावर बसवून पेपरच्या नावाखाली सत्राशेसाठ धंदे पेपरच्या बिल्डिंगमध्ये चालवते. हा सगळा डोलारा तुझ्या-माझ्या जिवावर चालतो. तुला मला काय मिळतं? फत्रं? कंपनी आपला उपयोग करून घेते. नेते कंपनीचा वापर करून घेतात. हे चक्र पूर्ण कसं होणार? आपण नेत्यांचा वापर करून घेऊ, तेव्हा! चक्र पूर्ण करण्याचं तुझं निसर्गदत्त कर्तव्यच तू करतो आहेस. बाकी काही नाही. चल, बोलावणं आलं आतून.’’
* * *
आज 20 वर्षानंतर रेवणनाथ सीनिअर रिपोर्टर आहेत. त्यांनी तीन घरं विकून चौथं नुकतंच घेतलंय. आपल्याकडे भांडी घासणा-या मोलकरणीच्या नावावर केलेला पाचव्या घरासाठीचा अर्ज घेऊन ते लगबगीने मंत्रालयाच्या दिशेने लगबगीने निघालेले आहेत. स्वर्गस्थ श.ज.करांचा आत्मा हे विलोभनीय दृश्य पाहून कृतकृत्य होत्साता आकाशातून हात उंचावून आपल्या सत्शिष्याला आशीर्वाद देतो आहे....बाळ रेवणनाथाला श.ज.करांच्या रूपाने जसा ज्ञानी, विचारी आणि व्यवहारी गुरू लाभला, तसाच तुम्हा-आम्हा सर्वाना लाभो आणि ही टेन परसेंटांची कहाणी सेंट परसेंट सुफळ संपूर्ण होवो.

(चित्र : प्रदीप म्हापसेकर)
(4/7/10)

No comments:

Post a Comment