Friday, February 11, 2011

और कितने तेलंगण?

तेलंगणाचे स्वतंत्र राज्य खरोखरीच स्थापन होईल का?
 
फक्त११ दिवसांच्या उपोषणानंतर एका प्रादेशिक नेत्याची एवढी मोठी मागणी मान्य करण्यात केंद्राचा नेमका हेतू काय?
 
राष्ट्रीयकाँग्रेसने असा प्रादेशिकतावादाला खतपाणी घालणारा निर्णय घेण्यात नेमके काय राजकारण दडलेले आहे?
 
वायएसआर रेड्डींच्या वारसदाराचा प्रश्न निकालात काढण्यासाठी काँग्रेसने खेळलेला हा जुगार आहे का?
 
देशाची आयटी कॅपिटलहैदराबादचे काय होणार?
 
विदर्भ, हरित प्रदेश, गोरखालँड, बुंदेलखंड, पूर्वाचल, मिथिलांचल वगैरेंच्याही स्वातंत्र्याचा मार्ग आता  मोकळा होणार का?
 
११ दिवस उपोषण करा आणि स्वतंत्र राज्य मिळवा, अशी सुलभ स्कीम केंद्राने अप्रत्यक्षरित्या जाहीर केली आहे का?
 
या आणि अशा अनेक प्रश्नांचे मोहोळ सध्या उठले आहे.
 
त्यात एक प्रश्न कोणीच विचारताना दिसत नाही.. या तुकडेबाजीत या देशाचे काय होणार?
 
हॅ! हा काय प्रश्न आहे? या देशाची भरभराटच होत राहणार? आपला विकासदर अमुक आहे. आपल्याकडे उद्योगधंदे तमुक गतीने वाढताहेत, भारत २०२० साली महासत्ता होणार, वगैरे पोपटपंची रटू नका.
 
२०२० साली महासत्ता बनायला भारत हा एक देशउरेल का? हा प्रश्न आहे.
 
यावरही, दोनाची चार राज्ये झाल्याने देश कसा दुबळा होईल, उलट सत्तेचे विकेंद्रीकरण होऊन दारोदारी विकासगंगा वाहू लागेल, असेही कोणी सांगेल. पण, ‘देश उरेल का,’ हा प्रश्न या देशाच्या भूगोलाशी संबंधित नाही, या देशातील जनतेच्या मनातील देशभावनेशी संबंधित आहे.
 
हात्तिच्या, एवढेच ना! तीही आपल्याकडे बक्कळ आहे. बॉर्डरसिनेमा पाहताना सनी देओलच्या प्रत्येक संवादावर आपण टाळ्या पिटतो. १५ ऑगस्टला भोंगाण्यांवर मिस्टर भारतमनोजकुमार यांच्या चित्रपटगीतांची पारायणे करतो. दोन रुपयांचा तिरंगा विकत घेऊन गाडीवर लावतो. (दुस-याच दिवशी तो कच-यात फेकतो.) भारतीय क्रिकेट टीम जिंकत असली की आपला ऊर अभिमानाने भरून येत असतो. ती पाकिस्तानला ठोकत असेल, तर त्या अभिमानाला जणू युद्धातील विजयाची सोनेरी किनार लाभते, वगैरे बालिश शाळकरी देशभावना सोडा. (बाय द वे, आपली क्रिकेटची टीम भारताची नव्हे, तर बीसीसीआयची असते, हे बीसीसीआयनेच एकदा स्पष्ट केले आहे. जिथे भारताच्या टीम जातात, तिथे त्यांचे काय हाल होतात, ते सर्वविदित आहे. आपला राष्ट्रीयखेळ आपण किती पाहतो, ते सांगा. हा खेळ कोणता आहे, हा गृहपाठही स्वत:ला घालायला हरकत नाही.)
 
देशभावना इतकी स्वस्त नसते.
ती भाषा, प्रांत, जात, धर्म यांच्यापलीकडे जाऊन माणसांना एकमेकांशी बांधणारी असावी लागते.
 
इथे तर मुळात भाषावार प्रांतरचनेचाही फज्जा उडतोय?
 
ब्रिटिशांनी पादाक्रांत केलेला, अनेक सुलतानी राजवटींमध्ये विभागलेला एक प्रचंड मोठा भूभाग हा भौगोलिक सलगता आणि समान सांस्कृतिक परंपरेच्या आधारावर एक देशम्हणून उभा राहिला, हे एक आक्रित होते. तेव्हाचा एकोपा कृत्रिम होता की काय, असे वातावरण आज देशभर आहे. देशात सगळ्यांवर अन्याय होतोय आणि त्याच्या निराकरणासाठी सगळ्यांना स्वतंत्र सुभा हवाय. राज्यकारभाराच्या सोयीसाठी देशाने भाषावार प्रांतरचना स्वीकारली. इंग्रजांच्या राजवटीत ती नव्हती आणि त्याने राज्यकारभारात काही महान बिघाड झाल्याचे ऐकिवात नाही.  भाषावार प्रांतांमध्येही एकट्या हिंदीभाषकांची तीन मोठी राज्ये झाली. त्यांचे पुढे तुकडे पडले आणि आता उर्वरित उत्तर प्रदेशाचे आणखी तीन तुकडे पाडण्याची मागणी खुद्द मुख्यमंत्री मायावती यांनी रेटून धरली आहे. महाराष्ट्रात मराठी बोलणारा विदर्भ वेगळा करा, हे तुणतुणे अधूनमधून वाजतेच आहे. आंध्रमधून फुटून निघणारा तेलंगणही तेलुगूभाषकच आहे.
 
हा काय प्रकार आहे?
 
राज्यांवर केंद्र सरकार अन्याय करते. राज्य सरकारे वेगवेगळ्या प्रांतांमध्ये दुजाभाव करतात. एका भाषेचे लोक एकत्र आले तरी त्यांचा विकास होत नाही? आपल्याला समान भाषाही बांधून ठेवू शकत नाही?
 
मग, आता नव्या प्रांतरचनेचा आधार काय करायचा? बोलीवार प्रांतरचना? तिच्यातून विकास कसा होईल, याची गॅरंटी काय? आणि तसे केले, तर आपल्या कोकणात काय दर १२ कोसांवर नवीन राज्याची निर्मिती करणार?
 
आपल्या राज्यातही भाषक अस्मिता डोके वर काढतेच आहे. आपल्याला आपल्या भाषेचा साधासुधा नाही, जाज्वल्य अभिमान आहे. (आपली भेंडय़ाची भाजीही जाज्वल्य असते. साधे असे आपले काहीच नसते.) हा अभिमान बाळगण्यासाठी मराठी भाषा बोलण्याचे, लिहिण्या-वाचण्याचे, तिच्यात विचार करण्याचे बंधन मराठीजनांवर नाही. महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी माणसाने दिवसभरात एकही मराठी शब्द बोलला नाही, तरी चालते. नेत्यांची आणि अनुयायांची मुले इंग्रजी माध्यमात शिकतात, जाज्वल्य हिंदुत्वाचे जानवे कानात अडकवून कॉन्वेंटमध्ये रोज सकाळी मदर मेरीचे स्तुतीस्तोत्र गातात. इंग्रजी ही जगाची ज्ञानभाषा असल्याने आणखी १० वर्षानी महाराष्ट्रातील घरोघरी फक्त तीच भाषा बोलली जाईल, असा चंग सर्वानी बांधला आहे. फक्त बाहेरून आलेल्या भय्यांनी मराठी बोललीच पाहिजे आणि दुकानांवरच्या पाट्या मराठी भाषेत पाहिजेत. (कंपोझिटर, तो मस्ट आहे बरं का! त्या एका अक्षरावर कितीतरी बोलबच्चन पुढा-यांनी इथे पोटं भरली आहेत.)
 
भय्यांना विरोध म्हणून हिंदीला विरोध. हिंदी ही एकमेवराष्ट्रभाषा नाही, हे खरेच आहे. मराठीसह अन्य अनेक भाषांपैकी तीही एक राष्ट्रभाषा आहे. महाराष्ट्रात तिच्या प्राधान्याचा अट्टहास नको, तिचा नसता टेंभा नको. पण, त्यासाठी त्रिभाषा सूत्र नाकारण्याचे कारण काय? तिथे आपण हटाव लुंगीवाल्या द्रविडांचा धडा का गिरवायचा? आता ते तरी काय करताहेत? जरा ऊटी, मैसूर, चेन्नै, केरळात जाऊन पाहा. जिथे जिथे देशभरातून पर्यटक जातात, तिथे तिथे अय्यो, अम्माकरीत का होईना, मोडकीतोडकी हिंदी बोललीच जाते. शेवटी प्रश्न पैशाचा, धंद्याचा आणि पोटाचा असतो. अस्मितांनी पोटे भरत नाहीत, हे त्यांनाही कळते. अरुणाचल प्रदेशासारख्या अनेक बोलींमध्ये विभागलेल्या राज्याने राज्यभाषा म्हणून परकीहिंदी स्वीकारली. त्याच्या शेजारच्या नागालँड, मिझोरमने ख्रिस्ती धर्माबरोबर इंग्रजी आत्मसात केली. आज या राज्यांमध्ये जाऊन पाहा. कोठे जास्त सुरक्षित आणि आपल्या देशातअसल्यासारखे वाटते, ते झटकन् कळेल.
 
हिंदी सर्वानी नाकारायची असेल, तर या देशात एका राज्यातील माणसांनी दुस-या राज्यात गेल्यावर एकमेकांशी कोणत्या भाषेत बोलायचे? इंग्रजीत? म्हणजे भारतीयत्वाचा पत्ता नाही, डायरेक्ट विश्वमानव्य?
 
मराठीचा हिंदीविरोध तर अतीव हास्यास्पद आहे. आपण हिंदी सिनेमे पाहतो, सिरीयली पाहतो. त्या भाषेचे एवढे प्रदूषण मराठीत झाले आहे की, आपण मराठीत कार्यक्रम संपन्नकरतो, मिरवणुकींऐवजी शोभायात्राकाढतो, मराठीचे अभिमानी अधूनमधून मोडतोड करण्याऐवजी तोडफोडकरतात, आपले वृत्तनिवेदक हिंदीचे मराठी डबिंगकेल्याप्रमाणे बातम्या वाचतात. मराठी कानावरच पडत नसल्याने भावी पिढी मराठी कर्ता-क्रियापदामध्ये हिंदी कर्म घुसडून तू मला प्यार करअशी भेसळभाषा बोलते आणि ते चिमखडे बोल आपण कौतुके ऐकतो. हा आपला हिंदीद्वेष आणि हे मराठीप्रेम?
 
तेलंगणाच्या निमित्ताने स्वत:ला विचारायला हवे की आपल्याला काय हवे आहे? प्रादेशिक अस्मिता की राष्ट्रवाद? की हे दोन्ही एकत्र नांदू शकतात, या, आता भ्रामक सिद्ध होत असलेल्या, समजुतीवरचा अंधविश्वास?..
 
या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर काय येते, यावर बरेच काही अवलंबून आहे.. तेलंगणाची वाट चोखाळायची असेल, तर उद्या विरार-डोंबिवली-कल्याणहून निघून दादरला उतरताना रोज सकाळी पासपोर्टवर शिक्का मारून घेण्याचीही तयारी ठेवायला हवी. 

(13/12/09)

No comments:

Post a Comment