Tuesday, February 15, 2011

वेळ


आपण लोक वेळेचे जाम पक्के!
म्हणजे दिलेली वेळ पाळायची नाहीच, असं आपलं पक्कं ठरलेलं असतं.
विलक्षण निग्रहाने आणि जिवाच्या कराराने आपण दिलेली वेळ पाळण्याचा मोह टाळत असतो.
अशाच एका निग्रही माणसाचा परवाच सामना झाला.
विरारला गाडीत चढताच त्याने फोन लावला. समोर कुणी मुलगी होती. ती एल्फिन्स्टनला होती (म्हणजे तसं सांगत होती). याने सांगितलं, ''मी अंधेरीत आहे. कामात आहे. आत्ता भेटू शकणार नाही.''
मग पुढचा फोन. कोणातरी मामूचा त्याने अंधेरीत पुतळा बनवला होता (अशा 'पंक्चुअल' लोकांच्या भाषेत एखाद्याला एखाद्या ठिकाणी बोलावून, स्वत: तिथे न पोहोचवून त्याला ताटकळवत ठेवणे, याला 'पुतळा बनवणे' म्हणतात). मघाच्या फोनवरच्या करारी जिभेवर आता साखरच साखर पसरली, ''ऐसा क्या कर रहे हो मामू! मै तो बोरिवलीमे पँहुच गया हूँ. दस मिनट मे पँहुचता हूँ.''
गाडी विरारमधून सुटायला दहा मिनिटं असताना असं सांगण्यासाठी सिंहाचं काळीज लागतं महाराज! हे येरागबाळयाचे काम नोहे!
मग पुढचा फोन दुसऱ्या पार्टीला. तो माणूस आणि तो मामू यांची याने काहीतरी मीटिंग फिक्स करून दिली होती. आता आवाज पुन्हा करारी झाला...
...''किधर हो! अजून मालवणीमध्येच? असं कसं चालेल? मी कितीची वेळ सांगितली होती? ती पार्टी तुझ्यासाठी खोळंबून राहिलीये ना! दुसऱ्याला दिलेल्या वेळेची काहीच किंमत नाही तुला?''
मान गये उस्ताद!
असं मनातल्या मनात म्हटलं खरं. पण, ते म्हणायला जरा घाईच झाली. उस्ताद की उस्तादी तर पुढेच होती.
पुढच्या फोनमध्ये ती समजली. आता आवाजात अधिकाराची धार होती...
...''कुठे आहेस?... स्टेशनला! आत्ता स्टेशनला?... ठीकाय मग परत घरी जा! कळलं का मी काय म्हणतोय तुला? आजपासून मी तुला नोकरीवरून काढून टाकलंय. तू येण्याची गरज नाही. घरी जा.'' कट्!
वॉव! हे तर सिंपली ग्रेटच होतं.
पुन्हा थोडया वेळाने मामूचा फोन आला, तेव्हा ''बस अभी पँहुच ही रहा हूँ मामू. पाँच मिनट मे. अरे, क्या पता क्या हुआ लेकिन गाडी बहुत रखड रखड के चल रही है...'' वगैरे साखरपेरणी होत राहिलीच...
.......
एक बरंय! आपल्यापैकी बहुतेकजण असेच 'पंक्चुअल' असतात, त्यामुळे एकमेकांची वेळेची गणितं जुळतात. इकडचा विरारमध्ये असताना बोरिवलीत असल्याची थाप मारत असतो, तेव्हा बहुतेकवेळा 'मी अंधेरीला पोहोचून पुतळा झालोय,' असं सांगणारा मामूही प्रत्यक्षात कुठेतरी जोगेश्वरीच्या आसपासच असतो.
......
अशाच दोन माणसांची गोष्ट फार उद्बोधक आहे.
एकाचा दुसऱ्याला फोन गेला, तेव्हा तो ट्रेनमध्ये होता.
पहिल्याने दुसऱ्याला विचारलं, ''कुठे आहेस?''
दुसऱ्याने ट्रेनच्या खिडकीतून बाहेर पाहिलं, बोरिवली. मग, उत्तर दिलं, ''अंधेरी क्रॉस केलं.'' याची भेट त्याला टाळायची होती.
पहिल्यालाही तेच करायचं होतं. त्याने बाहेर पाहून सांगितलं, ''मी मात्र अजून भायंदरलाच अडकलोय.''
मग दोघांनी मनसोक्त गप्पा मारल्या. एकमेकांना भेटायची किती आस लागली आहे ते वारंवार सांगितलं. ''कधीतरी सवड काढून नक्की भेटूच'' असं एकमेकांना सांगत दोघे प्लॅटफॉर्मवर उतरले आणि एकमेकांच्या समोर आले, तेव्हा अवाक् झाले.
दोघेही एकाच गाडीच्या एकाच डब्याच्या दोन पॅसेजेसमधूनच एकमेकांशी मोबाइलवर बोलत होते.


(थर्ड आय, महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment