Friday, February 11, 2011

मुंबई का स्कायवॉक देखो

मुंबईत उन्हाळय़ाच्या सुटीत येणा-या पाहुण्यांना दरवर्षी नवं काय दाखवायचं, हा समस्त मुंबईकरांसाठी एक मोठा प्रश्न असतो.. तो येत्या किमान एक-दोन वर्षासाठी तरी सुटलेला आहे.. तुम्ही शहरात राहत असा की लांबच्या उपनगरांत.. आपल्या पाहुण्यांना खास मुंबई स्पेशल अशी एक अनोखी गोष्ट नक्कीच दाखवू शकता.. ठिकठिकाणच्या स्टेशनांबाहेर उभारले जात असलेले स्कायवॉक! जगातील आठवं आश्चर्य!
सर्वाच्या सोयीचं, घरापासून सोयीच्या अंतरावर, फुकटात पाहता येईल आणि फुकटात ज्याची गंमत अनुभवता येईल, असं अत्यंत प्रेक्षणीय पर्यटनस्थळ म्हणजे स्कायवॉक! यातील फुकटात हा शब्द किती महत्त्वाचा आहे, हे पाहुण्यांची वार्षिक पीडा सहन करणा-या मुंबईकरांना सांगायला नको. पण, केवळ फुकट आहे, हे स्कायवॉकचं एकमात्र वैशिष्टय़ मानाल, तर मुंबईच्या महान नगररचनाकारांवर ते फार अन्यायकारक होईल. पाहुण्यांना मुंबईचं ख-या अर्थाने दर्शन घडवण्याची ही केवढी सुरेख सोय आहे, याची कल्पना प्रत्यक्ष स्कायवॉकवर गेल्यावरच कळेल.
स्कायवॉकचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणजे स्कायवॉकवर गेल्यावर मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वेचं दर्शन घडतंच घडतं. त्यासाठी वेगळा घाट घालावा लागत नाही. पाहुण्यांना फिरवण्याचा वेगळा खर्च नको असलेल्यांसाठी तर ही बेस्ट सोय. कारण, पाहुणे गावाहून आल्यावर आपल्या स्टेशनात उतरले की त्यांना सगळा बोजा घेऊन स्कायवॉकवर चढवायचं. तिथून रेल्वे स्टेशन, त्यावरची गर्दी, वेगाने येत जात असलेल्या ट्रेन्स, त्यातून बाहेर पडणारे लोंढे, त्या माणसांचे आपल्याला बसणारे धक्के, जाण्या-येण्याच्या वाटेत सामान घेऊन उभे असल्याबद्दल फेकले जाणारे तिरस्काराचे दृष्टिक्षेप, यांतून पाहुण्यांना मुंबईच्या सर्वात मोठय़ा आश्चर्याचं म्हणजे लोकल रेल्वेचं अफाट दर्शन घडेल. (सामान घेऊन स्कायवॉकवर चढल्याने पाहुण्यांचे खांदे, पाठ, पाय असे काही सणसणीत दुखतील की नंतर आठ दिवस घराबाहेर पडण्याचं नाव काढणार नाहीत. शिवाय, मुंबईबाहेरच्या प्रत्येकाच्या छातीत धडकी भरवणाऱ्या मुंबईच्या ओशट, घामट गर्दीचा फर्स्टहँड-फर्स्टनोज अनुभवही त्यांना आणखी पर्यटनापासून परावृत्त करील, हा फायदा वेगळाच.)
मनसोक्त स्टेशन पाहून झालं की पाहुण्यांना फरफटत स्कायवॉकवरून पुढे न्यायचं. खालचे गर्दीने गजबजलेले फुटपाथ, फेरीवाल्यांचे ठिय्ये, नाना वस्तूंची दुकानं, वाहनांचं ट्रॅफिक जॅम पाहत पाहत जिना कधी उतरलो, हे त्यांना कळणारच नाही. (वरूनच पाहुण्यांचं विंडो शॉपिंगच्या धर्तीवर स्काय शॉपिंगही होऊन जाईल. म्हणजे खालून गेलो असतो तर पाहुण्यांच्या खरेदीचा भरुदड सोसावा लागला असता, तोही टळेल.)
खरं तर स्कायवॉक हा मुंबईचा मानबिंदू आणि भारताचा राष्ट्रीय ठेवा म्हणून जाहीर करावा आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावरील महत्त्वाच्या ठिकाणांमध्ये त्यांचा समावेश करावा, अशी आग्रही मागणी केली पाहिजे. आंतरराष्ट्रीय नगररचनाकारांना तर स्कायवॉकमधून शिकण्यासारखं बरंच काही आहे. उपलब्ध जागेचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल, याचा तर तो आदर्श वस्तुपाठ आहे.
स्टेशनलगतचे सगळे रस्ते आणि फुटपाथ हे अनुक्रमे वाहनांसाठी आणि पादचाऱ्यांना चालण्यासाठी आहेत, असा एक गैरसमज बराच काळ तग धरून होता. अस्सल मुंबईकरांच्या मनातून तो कधीच दूर झाला असला, तरी त्याला कायदेशीर स्वरूपात कायमचं दूर करण्याची मोठी कामगिरी स्कायवॉकच्या बांधकामांनी झालेली आहे. स्टेशनलगतचा सर्व परिसर हा रिक्षावाले, दुकाने आणि फेरीवाले यांच्यासाठी राखीव आहे, हे स्कायवॉकने स्पष्ट केलं आहे. स्टेशनातून मुख्य रस्त्यावर आणि मुख्य रस्त्यावरून स्टेशनावर येण्या-जाण्यासाठी या रस्त्यांचा बेकायदा वापर करणा-या प्रवाशांना या स्कायवॉकनी चांगलीच चपराक दिली आहे. नुसतंच चालायचं आहे का, फक्त गाडी किंवा बस किंवा रिक्षाच पकडायला धावायचं आहे का, मग मूर्खासारखे रस्ता कशाला अडवताय, चढा जिने आणि चाला स्कायवॉकवरून.
रस्त्यातल्या फेरीवाल्यांचा केवढा अडथळा होतो, अशी या पादचाऱ्यांची उलटी बोंब. हे सगळे लेकाचे परप्रांतीय उपरेच असणार. अस्सल मुंबईकरांसाठी स्टेशन परिसरातले सगळे फेरीवाले कसे जीवनावश्यक असतात, याची या गाढवांना काय कल्पना? स्टेशनमध्ये शिरताना रुमाल, पास कव्हर, कंगवा, पाकिटं, पिना, हेअर बँड, टिकल्या, गजरे, खाऊच्या वस्तू, थंड पाण्याच्या, शीतपेयाच्या बाटल्या, वडापाव-भजीपावासारखे मुंबईचं इन्स्टंट फास्ट फूड, नाना प्रकारची सरबतं, फळरस, शहाळी, ताक यांची व्यवस्था गाडी पकडायला धावत असताना त्याच मार्गावर व्हायला नको का? स्टेशनातून उतरून घराकडे जाताना भाजी, फळं, भिजवलेली कडधान्यं, किरकोळ किराणा माल, विडी-काडी-पान, फूलपुडय़ा यांसारखा बाजारहाटही रिक्षा किंवा बस पकडण्याच्या वाटेवरच व्हायला हवा. त्यासाठी का कोणी बाजारात जाणार? एवढा वेळ असतो का मुंबईत कोणाला?
काय क्रांतिकारक विचार आहे पाहा. स्टेशनचा परिसर आम्ही साफ करू शकत नाही. मुळात तो साफ करावासा वाटणं, हीच चुकीची वृत्ती आहे, असं आपल्या नगररचनाकारांनी ठणकावून सांगितलं आहे. या बेडरपणाची जिवंत स्मारकं म्हणजे हे स्कायवॉक! ते पाहण्यासाठी विदेशांतून खास शिष्टमंडळं आली तरी आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण तिकडचे लोक भयंकर मागासलेले आहेत. त्यांच्याकडे जमीन खूप. माणसं त्या मानाने कमी. आणि बुद्धी आपल्यापेक्षा खूपच कमी. त्यामुळे तिकडे फुटपाथ चालण्यासाठी, दुकानांचा कारभार चार भिंतींच्या आत, रस्त्यात वाहतुकीचे नियम, फेरीवाल्यांना तर संपूर्ण बंदी असा शुद्ध अडाणीपणाचा आणि बोअरिंग कारभार असतो. तिकडे मुळात स्टेशनात कोणी जात नाही. जो-तो आपापल्या गाडीतून फिरतो. जे कोणी स्टेशनात जातात, ते म्हणे रांगाबिंगा लावून गाडीत चढतात, एकमेकांपासून सभ्य अंतरावर उभे राहतात (राहू शकतात, हा भाग वेगळा. आपल्याकडे पूर्ण रिकाम्या गाडीतही माणसं एकमेकांशी जवळीक साधून असतात, तो जिव्हाळा तिकडे नाही.) अशा नाकासमोर चालणा-या माणसांना स्टेशनबाहेर पडून फुटपाथवर चालण्याची वेडपट सवय असणार, यात आश्चर्य ते काय?
पण, स्टेशनांच्या परिसरांचा आर्थिक (फेरीवाले उठवले, रिक्षावाले हटवले, दुकानांना घटवलं तर हप्त्यांची अर्थव्यवस्था कोलमडायला हप्ता तरी लागेल का), सामाजिक (जाता-येता खरेदीची सोय म्हणजे बाजारहाट करण्यासाठीचं किती स्वतंत्र मनुष्यतास वाचले), शैक्षणिक (रस्त्यातून वाट काढणं, घासाघीस करून योग्य भावात माल खरेदी करणं, याचं चालता-बोलता शिक्षण) असा किती प्रकारांनी विचार करता येतो, याचं आदर्श उदाहरण म्हणजे आपले स्कायवॉक!
त्यांच्या बाबतीत अडचण फक्त एकच आहे.. मुंबईबाहेरून येणारे पाहुणे आणि परदेशी पर्यटक यांच्याशिवाय या स्कायवॉकवर येणार कोण?.. अस्सल मुंबईकरांना त्याचा उपयोग काय? माणसांची रहदारी नसेल, तर स्कायवॉकवरचा खर्च वायाच जाणार.
आहे.. आहे.. त्यावरही उपाय आहे..
स्कायवॉकवर फेरीवाल्यांना परवानगी दिली की आपोआप मुंबईकरांची पावलं स्कायवॉकचे जिने चढू लागतील, सगळे स्कायवॉक छान गजबजतील..
..नंतर स्कायवॉकवर खूप गर्दी होते म्हणून कोणी बोंब मारली तर?..
तर त्याच्यावर दुसरा स्कायवॉक बांधायचा.. त्याचं नावच स्कायवॉक आहे, म्हणजे त्याला स्काय इज द लिमिट!
आणखी शंभर वर्षानी आपली मुंबई ही टोलेजंग उंचीच्या बहुमजली स्कायवॉक्सचं महानगर म्हणून नावारूपाला येणार, यात काहीच शंका नाही.

(21/2/10)

1 comment:

  1. स्काय-वॉक वापरणार्या नागरिकांना प्रत्येकी दोन रुपये आणि ग्लासभर उसाचा रस देण्याची योजना विचाराधीन आहे.

    ReplyDelete