Friday, February 11, 2011

पाणी कपात, पाणी बशीत

कोणे एके काळी म्हणे येथे काही ऋतू होते. येथील लोक त्यांस त्यांच्या बोलीत सीझन म्हणत. थंडीचा सीझन. पावसाचा सीझन. उन्हाचा सीझन. आता इथे कायम  उन्हाचा कडाका.
 
पाऊस बारक्या पोरासारखा चुळकाभर पाणी सोडून जातो. थंडी म्हणजे २४ तास गरगरत्या फॅनचा स्पीड चारवरून तीनवर आणण्याची मुभा आणि बारोमास एकच सीझन.. पाणी कपातीचा.
 
गावांत १२ महिने १३ काळ पाणी टँकरनेच येते, नाहीतर आयाबाया काही कोसांवरून डोईवर हंडे भरून घेऊन येतात.
 
शहरांतल्या झोपडपट्ट्या इथल्या बिल्डिंगींच्या, चाळींच्या २०-२५ पट पैसे मोजून बादलीच्या हिशोबात पाणी घेतात. (तरीही त्या फुकट्या उप-यांच्या वस्त्या म्हणून हिणवल्या जातात.) इथे चार बादल्यांमध्ये आंघोळ, स्वयंपाक, पिण्याचं पाणी, धुण्याचं पाणी.. सगळं बसवायचं.
 
चाळींमध्ये उत्तररात्री किंवा भल्या पहाटे कोणत्याही वेळी नळ फुरफुरतात, ते जेमतेम अध्र्या पाऊण तासासाठी. त्यात वाहत्या एकीकडे पाण्यातली कामं करून घ्यायची, दुसरीकडे पाइप लावून हंडे, पिंपं, टाक्या भरतील तेवढय़ा भरून घ्यायच्या.. नळाने अखेरचा श्वास सोडेपर्यंत.
 
बिल्डिंगींमध्ये जरा बरी स्थिती. पाणी आधी खालच्या टाकीत. मग पंपाने वरच्या मेन टाकीत. मग, ठरल्या वेळी घरच्या टाकीत. मग आपल्याला हवं तेव्हा वापरायचं. वापराचं सगळं गणित घरातल्या टाकीच्या कपॅसिटीत बसवायचं.
 म्हणजे नदी नावाच्या मोठ्या नाल्यांच्या शेजारी राहणारे आणि उच्चभ्रूंच्या पंचतारांकित वसाहतींमधले ‘ट्वेंटी फोर अवर्स पाणी’वाले भाग्यवान वगळले, तर बाकी सगळे ‘२४ तास पाणी कपात’वालेच की!
पण, म्हणून आम्हाला पाण्याची किंमत कळली असेल, पाणी जपून वापरण्याची शिस्त आमच्या अंगी बाणली असेल, अशी कुणाची समजूत असेल, तर ती साफ चूक.
 
आमची घडणच अशी आहे.
 
पाच पैशाची पत नसली, तरी आम्ही नेहमीच गणपत. दातावर मारायला पैसा नसला, तरी ऋण काढून सण करणार. तोंड धुवायला पाणी नसलं, तरी १० लिटर पिण्याचं पाणी भस्सदिशी फ्लशमधून खळखळवणार.
 
जगात कुठेही पिण्यासाठी शुद्ध केलेलं पाणी इतक्या कमी दराने सगळ्या कामांना दिलं जात नाही. हा मूर्खपणा फक्त इथे चालतो. एखाद्या घरात, इमारतीत, ऑफिसात दिलेलं पाणी किमान पाच वेळा रिसायकल केल्याशिवाय सांडपाणी म्हणून सोडायचं नाही, असा नियम आहे बडय़ा देशांमध्ये. इकडे आम्ही पिण्याचं पाणी एका दिवसात शिळं झालं म्हणून रोज फेकतो. त्याची भांडी पिण्याच्या पाण्याने धुतो आणि त्यात पुन्हा पिण्याचं पाणी भरून ठेवतो.. दुस-या दिवशी फेकण्याकरता.
 
सकाळी पेंगुळलेल्या स्थितीत तोंडात ब्रश धरलेला असतो आणि बेसिनमध्ये पाणी वाहात असतं. घरात एक आणि बाहेर दुसरं असा दुटप्पीपणा आमच्यात नाही.. आम्ही घरात जेवढे बेदरकार तेवढेच बाहेरही बेपर्वा.
 
सार्वजनिक नळ म्हणजे राष्ट्राची संपत्ती. म्हणजे काय, तर त्यातून मिळणा-या पाण्यावरचा अधिकार आमचा, तो गळत असेल, फुसांडून वाहात असेल, तर ती दुरुस्ती करण्याचं कर्तव्य राष्ट्राचं. ही जबाबदारी राष्ट्रानं ज्यांच्यावर टाकलीये, ते पैसे खाऊन कनेक्शनं देण्यात आणि पाण्याच्या टायमिंगमध्ये, मीटरांमध्ये फेरफार करण्याच्या त्याहून महान कर्तव्यात मग्न. वाहणारे नळ वाहात राहतात.
 
सार्वजनिक ठिकाणी आम्ही टॉयलेटला जातो, तेव्हा आमची शान पाहण्यासारखी असते. टॉयलेटमध्ये पाणी वापरून जी स्वच्छता करायची ती न झाल्यामुळे नाकांवर रूमाल दाबण्याची पाळी आलेली असते. पण, बेसिनमध्ये मात्र पाण्याची चंगळच असते. निम्मे नळ २४ तास गळत असतात. उरलेल्यांच्या पाण्याची आम्ही नासाडी करत असतो. उदाहरणार्थ, आपल्याला साबणाने हात धुवायचा आहे. तर आम्ही काय करतो? नळ सुरू करतो.. हातावर पाणी घेतो.. साबण घेतो आणि घसाघसा घासतो घासतो घासतो.. नळ सुरूच.. मग आम्ही नळाखाली हात धरतो.. धुतलेल्या हातावरचा साबण काढायचा म्हणून पुन्हा तो घसाघसा घासतो घासतो घासतो.. नळ सुरूच. मग आम्ही दोन चार ओंजळी पाण्याचे चेहऱ्यावर हबके मारतो.. रूमाल काढून खसाखसा खसाखसा खसाखसा तोंड पुसतो.. नळ सुरूच.. मग आम्ही एक ओंजळ पाणी केसांवर मारतो.. मागच्या खिशातून कंगवा काढून मस्तपैकी चापून चोपून चापून चोपून चापून चोपून भांग पाडतो.. नळ सुरूच.. मग आम्ही आपल्या केसांचा कोंबडा किंवा कबूतर किंवा घुबड किंवा जे काय असेल ते झक्कपैकी जमलंय की नाही, हे या कोनातून, त्या कोनातून, मान वळवून, मान तिरकी करून, डोळे बारीक करून पाहतो.. नळ सुरूच.. आता आपण सलमान-शाहरुखच्या थेट थोबाडीत मारण्याइतके देखणे दिसत आहोत, याची खात्री झाली की शीळ वाजवत आम्ही नळ बंद करण्याचा अभिनय करतो.. आमच्या विलक्षण सौंदर्यसंपन्न मुखकमलावरून आमची नजर फडतूस नळावर पडत नाही, तो घट्ट बंद झालाय का, हे पाहण्याची तसदी आम्ही घेत नाही.. आम्ही फ्रेश होऊन बाहेर पडतो, तेव्हाही नळ सुरूच असतो.
 
पिण्याच्या पाण्याचं थेट सांडपाण्यात रूपांतर करून दाखवणा-या या महान राष्ट्रीय प्रयोगाला प्रखर सामाजिक जाणीवेचा नोबेल पुरस्कार कसा नाही मिळालेला आजपर्यंत. कोणी शिफारस का करीत नाही गेला बाजार मॅगसेसेसाठी तरी.
 
कालपर्यंत हंड्यांमधून मिळणारं पाणी ‘कपात’ का मिळू लागलंय, आम्हाला प्रश्न पडत नाही.
 
उद्या ते बशीत मिळू लागलं, तरी आमचे डोळे उघडणार नाहीत. परवा ते चमच्या चमच्यानं दिलं जाईल. तेरवा डोळ्यांत औषध घालायच्या ड्रॉपरमध्ये मिळू लागेल. १० रुपयांना एक ड्रॉपर. तीन ड्रॉपरवर एक फ्री. तेव्हाही आम्ही ड्रॉपरसुद्धा धुवूनच वापरू. पाण्याचे नळ आणि टाक्या पाहायला प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियममध्ये जावं लागेल.
 
सगळी सरकारं नद्यांचे बंद कॅनॉल करतील आणि समुद्रावर निळय़ा प्लॅस्टिकचं झाकण घालतील, पाणीचोरी रोखण्यासाठी.
 
पावसाच्या पाण्याचं ऑडिट होईल आणि बेकायदा पाणी साठवणा-यांना काळ्या पाण्यावर जावं लागेल. तिसरं जागतिक महायुद्ध पाण्यावरूनच होईल, असं तज्ज्ञ लोक सांगतात. त्या युद्धात आमचा पराभव शंभर टक्के ठरलेला असेल. कारण, आमचं सैन्य शत्रूशी लढून मरणार नाही. ते तर पाण्याअभावी तहानव्याकूळ होऊन लढाईआधीच मेलेलं असेल.

(8/11/09)

No comments:

Post a Comment