Friday, February 11, 2011

मराठीचे खाते

तळपत्या सूर्यावर अचानक ढगाचा पडदा आला.. मळभ दाटून आलं, तसा हलका वारा सुटला आणि भेळेचा एक कागद- एका जुन्या वर्तमानपत्राचा कपटा भिरभिरत मायमराठीच्या कपाळावर चिकटला..
मायमराठी नेहमी जिथे असते, तिथेच होती.. जीर्ण लक्तरे नेसून.. मंत्रालयाच्या दारात.. हल्ली तिच्या हातात एक कटोराही असतो.. 50 वर्षापासून दुर्दैवाचे इतके दशावतार भोगल्याने तिचा चेहरा इतका दीनवाणा झाला आहे की येता-जाता लोक काही ना काही टाकतातच कटो-यात. पूर्वी फाटके कार्यकर्ते खूप यायचे, त्यामुळे कटोरा रिकामा असायचा.. आता सुगंधी कपड्यांमध्ये न सामावणा-या शेठ लोकांची वर्दळ वाढली असल्याने मायमराठीच्या कटो-यात नाण्यांबरोबरच नोटाही पडतात करकरीत..
 
कधीकधी ते दोघे भाऊ येतात, तेव्हा मायमराठी लगेच कटोरा रिकामा करून नाणी-नोटा कनवटीला लावून टाकते.. सगळा कटोरा हिसकावून घेतात ना हे दोघे.. शिवाय नुसते पैसे घेऊन भागत नाही.. तिचा कटोरा येणा-या जाणा-या लुंगीवाल्याच्या, शेठजीच्या टाळक्यात हाणायचा हा यांचा आवडता धंदा.. कटोरा मायमराठीचा, गल्ला घेणार हे, हल्ला करणार हे आणि बदनाम होणार ती. तरी हल्ली एक बरं आहे की हे दोघेही आता हा कटोरा आळीपाळीने एकमेकांच्याच टाळक्यात हाणतात.. इतरांचा त्रास वाचला..
 
फार वर्षापूर्वी कवी कुसुमाग्रजांनी स्थापनाकेल्यापासून मायमराठी इथेच आहे.. कधीतरी आपल्या आतल्या लेकरांना आपली याद येईल आणि आपल्या अवस्थेची दया येईल, या भरवशावर रोजचा दिवस ढकलते आहे.. तिच्या गावंढळ बहिणींची खबर तिला इथे रोजच मिळते.. तिकडे गावखात्यात राहूनही त्यांचं छान चाललंय आणि ही मात्र शिकली-सवरलेली असून तिची अशी दशा.
 
‘‘असतात एकेकाचे भोग,’’ स्वत:शीच पुटपुटून मायमराठीने कपाळावर चिकटलेला वर्तमानपत्राचा कपटा काढला आणि तिची नजर एकदम चमकली.. त्या कपट्यावर फक्त तीन शब्दांचा मथळा दिसत होता.. मराठीसाठी स्वतंत्र खाते’.. ते शब्द वाचले आणि मायमराठीच्या डोळ्यांत अश्रू तरळले.. हृदयात हर्षाचा आवेग दाटला.. 50 वर्षाची तपश्चर्या अखेर एकदाची फळाला आली.. माझ्या लेकरांना माझी आठवण झाली.. भावनांचा कल्लोळ उडाला तिच्या मनात.. डोळ्यांतले अश्रू टिपून ती वेगाने मंत्रालयाच्या गेटकडे निघाली..
 
‘‘ए म्हातारे, कुठे निघालीस? पास काढलायस का? तिकडे लायनीत उभी राहा,’’ तिचं एक द्वारपाल लेकरूखेकसलं.
 
‘‘अरे दादा, मला ओळखलं नाहीस. मी मराठी. माझ्यासाठी स्वतंत्र खातं तयार झालंय तुझ्या या बिल्डिंगीत.’’ मायमराठीने काकुळतीला येऊन सांगितलं.
 
‘‘तुझ्यासाठी?’’ तिला आपादमस्तक न्याहाळून द्वारपालानं विचारलं, ‘‘दिसायला कशी साजुक दिसतीये बघा म्हातारी आणि भल्या सकाळपासून टाइट!’’ त्याने- ज्यांच्यासाठी मंत्रालयातली खाती असतात अशा दिसणा-या एका सभ्य गृहस्थाला सांगितलं आणि म्हातारीच्या पुढ्यात काठी आपटली.
 
‘‘अरे बाळा, खोटं कशाला बोलू मी. ही बघ पेपरात आलेली बातमी,’’ त्याच्या डोळ्यासमोर पेपरचा कपटा नाचवत मायमराठी म्हणाली. त्यानेही तो कपटा वाचला आणि डोकं खाजवत म्हणाला, ‘‘म्हातारे, सूर्य पश्चिमेकडून उगवला तरी तुझ्यासारख्या दिसणा-या माणसांसाठी या बिल्डिंगीत काही असेल, असं मला वाटत नाही. हां, एकच शक्यता आहे. सरकारनं एखाद्या योजनेखाली तुझ्यासारख्या भिका-यांचं- म्हणजे निराधार, निराश्रितांना बँकेत खातं उघडलं असेल. तेव्हा तू इथे टाइमपास करण्याऐवजी एखादी बँक गाठ.’’ म्हातारी वळण्याआधी ही मौलिक माहिती दिल्याचा मोबदला त्याने तिच्या कटो-यातून वसूल केलाच.
 
************
 
इस्टेट बँक ऑफ इंडिया
 
पाटी वाचून म्हातारी आत शिरली.
 
‘‘ओ बाय, किधर जानेका है? किससे मिलने का है?’’ इथेही बंदूकधारी दरवानानेच हटकलं.
 
‘‘अरं बावा, मेरा येहीच बँक मे खाता निकालेला है?’’ मुंबईत राहून मायमराठीची हिंदी भाषेवर चांगलीच कमांड आलेली आहे.
 
‘‘खाता निकालेला है? किसने निकाला तुम्हारा खाता?’’
 
‘‘अरे बाबा, गवरमेंटनेच निकालेला है मेरा खाता. ये देख पेपरमे पढ.’’ म्हातारीने तो कपटा दरवानापुढे नाचवला.
 
‘‘अरी ससुरी, ई तो मराठी मे लिखा हुआ है..’’ दरवानाने आता बंदुकीच्या दस्त्याने म्हातारीला अटकाव केला.
 
‘‘तर काय झालं?’’
 
‘‘ई तो देश का बँक है. बडा बँक है. इधर मराठी नहीं चलता.’’
 
‘‘क्यूं, बँक तो महाराष्ट्रमेइच है ना?’’
 
‘‘वो तो है, मगर वो केबिनमे बैठे बडे साहबसे लेकर हमजैसे दरवानतक सब के सब हम यूपी-बिहार सेही आते है. देश का बँक है ना. इसमें मराठी का खाता होना मुश्किल है..’’
 
************
 
अलमट्टू, पलमट्ट बँक
 
बोर्ड वाचण्यातच मायमराठीची तीन-चार मिनिटं खर्ची पडली. बँक आहे म्हटल्यावर नव्या उमेदीनं ती आत शिरायला गेली.
 
‘‘यंडगुंडू, खुरमुंडू, व्हेअर यू गोईंग खालीमुंडू?’’
 
पाताळविजयमसिनेमातल्या राक्षसासारखे दिसणा-या मिशाळ, ऊग्र दरवानाने म्हातारीला दारातच अडवले.
 
म्हातारीने त्याला पेपर दाखवला. तो त्याने उलटा धरून वाचलाआणि विलक्षण हातवारे करीत ‘‘कन्नडा येंद्रा, मल्याळम येंद्रा, तमिळा येंद्रा, तेलुगू येंद्रा, म्हराटी येन्ना, खोळबुळकुंडी येरखुरसुंडी सोग्गम पोंचू. कुण्णम कुंचू. घरी जाचू.’’ असं बडबडून हाताची जी काही खूण केली, त्यातून एकही शब्द न कळता, ‘इथे आपलं खातं असू शकत नाहीही मौलिक माहिती म्हातारीला समजली आणि ती पाय-या उतरू लागली.
 
************
 
महानराष्ट्र बँक
 
कळकट्ट पाटीवरची अक्षरं कशीबशी वाचता येत होती. सरकारी ऑफिसाची कळा असलेल्या इमारतीसमोर कसलीही वर्दळ नव्हती. हीच असणार आपली बँकम्हातारीच्या अंतर्मनाने कौल दिला. बँकेत शुकशुकाट. ना खातेदार ना कर्मचारी.
 
‘‘कोन पायजे?’’ कानातली काडी फिरवत, जगातली सगळी तुच्छता आवाजात एकवटून शिपायाने विचारलं.
 
‘‘बँकेत काम आहे जरा.. माझ्या खात्याचं..’’
 
‘‘अवो बाई, वाजले किती? साडेचार झाले. आता कोन भेटनार बँकेत.’’
 
‘‘पण, पाच वाजेपर्यंत चालू असते ना बँक? इतर बँका तर रात्रीपर्यंत चालू असतात..’’
 
‘‘त्या वायल्या बँका. ही (बोर्डाकडे बोट दाखवून) महानराष्ट्र बँक आहे. हिचा टायमिंग अल्लग आहे.’’
 
‘‘पण, बोर्डावर तर पाचपर्यंत लिहिलंय.’’
 
‘‘ता मी काय करू त्याला. हिते साडेचारला मानसं घराकडे जायला निघतात. नंतर लोकलला गर्दी किती होते. दादरला भाजी घेऊन जायची तर जल्ला लवकर नको निघायला? आता हिते मानसंच नसतील, तर पाचपर्यंत कसा चालंल कामकाज?’’
 
‘‘बँकेत खातेदारही नाहीत कोणी.’’
 
‘‘कशे असतील? त्यांना रियल टायमिंग म्हायती हाये. आनि त्यांना नाय भाजी घेऊन लोकलनी डोंबिवली-कल्यान-वसई-विरारला जायचा?’’ शिपायाने चंची काढून बार मळायला घेतला.
 
‘‘पण, माझं खातं..’’
 
‘‘ह्या बँकेत? ह्या बँकेत ज्यांची खाती होती त्यांनी सगल्यांनी दुस-या बँका गाठल्या. गेल्या धा वर्षात ह्या बँकेत खातं काडायला कोनी आलेलाच नाय. आम्ही तर खातं खोलायचा फॉर्म छापनंबी बंद करून टाकलं. कश्शाला करायचा फुक्कट खर्च! आता फक्त आमचीच पगाराची अकौंट हायेत ह्या बँकेत..’’
 
‘‘पण, माझं खातं असेल तर पाहायचं होतं..’’
 
‘‘आता जी काय म्हायती हवी असेल, ती एक आठवड्यानंतर मिलेल.’’
 
‘‘का?’’
 
‘‘आज गुरुवार. उद्या नॅशनल हॉलिडे. परवा हाफ डे म्हन्जे बँक बंदच धरायची. तेरवा रविवार. सोमवारी बँकेची पिकनिक आहे. मंगळवारी हळदीकुंकू. बुधवारी सत्यनारायणाची पूजा आहे. तुम्ही पुढच्या गुरुवारी या. येताना आजीआजोबाच्या लग्नाचा दाखला, बापाच्या मुंजीचं प्रमाणपत्र, तुम्ही हयात असल्याचं प्रमाणपत्र, कायद्याने सज्ञान झाल्याचं प्रतिज्ञापत्र, तीन पिढय़ांचा उत्पन्नाचा दाखला, 77 पासपोर्ट साइझचे फोटो, तीन प्रतींमधला 222 पानी अर्ज, मॅरेज सर्टिफिकेट, गॅरेज सर्टिफिकेट..’’
 
तो यादी वाचत असतानाच मायमराठी बाहेर पडली. इथे आपले खाते नकोच आहे, असा तिचा निर्धार झाला होता.
 
************
 
पुन्हा मंत्रालयाच्या दाराशी आल्यावर मायमराठीला हायसं वाटलं. कटोरा घेतलेला हात पसरून ती उभी राहिली.
 
मळभ हटलं.
 
सूर्य तळपू लागला.
 
वारा सुटला.
 
मायमराठीने पेपरचा कपटा वा-यावर सोडून दिला.
 
आता ती मंत्रालयाच्या दारात आहे.
 
आणि तिच्या नावाचे खाते आत आहे.
 
सारे कसे नेहमीसारखेच आहे.      

(2/5/10)

No comments:

Post a Comment