Thursday, February 24, 2011

एका लग्नाची कारणमीमांसा


माणूस लग्न का करतो?...
त्याला करांवसं वाटतं म्हणून...
तो लग्न का करत नाही... त्याला करावंस वाटत नाही म्हणून... किती सोप्पं आहे ना! पण, आपल्याकडे हे फार अवघड होऊन बसतं... कारण, समाजात बहुसंख्य लग्न करणाऱयांची आहे आणि उजखुऱयांच्या जगात डावखुरं असणं ही जशी विकृती (ऍब्नॉरमॅलिटी या अर्थी) मानून डावखुऱयाला छळलं जातं. बळजबरीनं उजखुरा बनवण्याचा प्रयत्न केला जातो. तसं लग्न करणारे बहुसंख्य घेरतात लग्न न करणाऱयाला.
गंमत पाहा, `लग्न' ही दोन व्यक्तींमधल्या अंत्यत व्यक्तिगत अशा निर्णयाची फक्त एक सामाजिक आणि कायदेशीर घोषणा आहे... कुणी कुणाशी लग्न केल्या- न केल्यानं समाजाचं फार मोठय़ा प्रमाणावर काही घडत- बिघडत नाही. पण, तरीही माणसं लग्नाचं वय `उलटून चाललेल्या' माणसाला (म्हणजे ज्यानं 15 वर्षांचा असताना केलं, तो 16 वर्षाच्या माणसाला, ज्यानं तिशीत केलं, तो 31 वर्षांच्या माणसाला, असे) जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी विचारत राहतात, ``का रे बाबा लग्न करत नाहीस तू?''
यातला एकही माणूस दुसऱया कुणा माणसाला ``का रे बाबा लोकांशी चांगला वागत नाहीस तू?'', ``का रे बाबा कधीच हसत नाहीस तू?'', ``का रे बाबा पैसे खाणं सोडत नाहीस तू?'', ``का रे बाबा लोकांना बोअर करणं सोडत नाहीस तू?'' असा एकही प्रश्न कधी एकदाही विचारत नाही... समाजावरच्या परिणामांच्या दृष्टीनं विचार केलात, तर हे प्रश्न अधिक सामाजिक नाहीत का?
आणि लग्न केलेल्याला कुणी विचारलं, की ``का रे बाबा तू लग्न केलंस?'' तर त्याचं विचारपूर्वक उत्तर मिळणं फार कठीण आहे. कारण, लग्न ही काही विचारपूर्वक करायची कृती नाही, ती एक रूढी- परंपरेनं करायची गोष्ट आहे... ऑल्मोस्ट श्रद्धेय... जिथे श्रद्धा ठेवायची, तिथं डोकं बाजूला काढून ठेवायचं असतं आणि बहुसंख्य मंडळी डोकं बाजूला काढून ठेवायला सदैव तयार.
`आई- वडिलांचा आग्रह मोडता आला नाही', `लाइफ मे सेटल होने का है', `हेच तर वय असतं लग्न करायचं, हक्कानं शारीरिक सुख अनुभवायचं, `योग्य वयात लग्न केलं की सगळं वेळच्या वेळी होतं', `पोरगी आवडली, हो म्हणून टाकलं, `उपाशी मरावं लागेल, कपडे कोण धुणार?' अशी हमखास यशस्वी कारणांची जंत्री मांडेल कोणी, पण यातल्या प्रत्येक गृहितकातली छिद्रं पाहायची ठरवली तर दिसू शकतात. आईवडिलांचे इतर (गैरसोयीचे) आग्रह मोडले जातात, अनेकजण लग्न करून स्थिरता गमावतात, `योग्य वयात लग्न' ही सगळं वेळच्या वेळी होऊन जाण्याची गॅरंटी नसते, प्रॉबेबिलिटी असते आणि लग्न झाल्यानंतर नवरोबावर दोन माणसांचा स्वयंपाक करण्याची आणि दोघांचे कपडे धुण्याची वेळही येऊ शकतेच ना?
लग्न करण्याच्या या सगळ्या कारणांमध्ये काही विचार मागेच पडतात. उदा. आपण एका व्यक्तीला आयुष्यभराचा जोडीदार मानणार आहोत, तर हे शेअरिंग कशा प्रकारचं असणार आहे? ज्या सवलती आपण स्वत:ला घेतो, त्या जोडीदाराला देणार का? आपण आपल्या सुखाचा विचार करतो, कुणाशी जन्मभराचं नातं जोडताना तिच्या सुखाचा विचार करणार का? कुठपर्यंत करणार? या सगळ्याचा विचार सामाजिक सवयीपोटी लग्न करणारे करतात का?
त्यांच्या बोलण्यावागण्यातून कधी तसं फारसं दिसत तर नाही. मॅरेज इज द ओन्ली ऍडव्हेंचर ओपन टु द कॉवर्डस, या न्यायानं ते आयुष्यभर `लग्न केलं ही `कर्तबगारी' मिरवत फिरतात...
आणि समजा, त्यांनी, त्यांच्या मते विचारपूर्वक घेतला असेल निर्णय; तर त्यांना जसा काही करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे, तसा काही न करण्याचा अधिकार इतरांना नाही की काय?
आता, हा अधिकार कुणी नाकारलाय, आम्ही फक्त विचारणा करतो, अशी मखलाशी करील कुणी. पण, प्रत्यक्षात माणसं एखाद्या कुष्ठरोग्याकडे किंवा कॅन्सरच्या लास्ट स्टेजला असलेल्या पेशंटकडे पाहतात, तसं पाहतात लग्न न करणाऱयांकडे (`लग्न न करणारी'ची तर भयंकरच स्थिती होत असणार) कधी काळजी (कसं रे बाबा होणार याचं पुढे?), कधी उपहास (काही फॉल्ट वगैरे तर नाही ना?)... तर कधी थेट तिरस्कार (पोरीबाळींचं घर आहे, त्याला कशाला बोलावताय?)... प्रतिक्रिया काहीही असो, पण ती असतेच... जणू लग्न न करणं ही एक महान क्रिया आहे आणि तिला प्रत्येकाची प्रतिक्रिया असलीच पाहिजे... मग, दर लग्नात ``आता तुझा नंबर कधी'' असं तोंडभर कुत्सित हसत विचारणाऱया हितचिंतकाला, तो अंत्ययात्रेला भेटल्यावर तेवढेच दात विचकून `आता तुझा नंबर कधी' असं विचारावंसं वाटतंच काऱया (लग्न न केलेल्या) माणसाला.
अशा माणसांची विचारून विचारून तोंडं दुखल्यानंतर, `आता काही हा बोहोल्यावर चढत नाही', अशी अगदी खात्री पटल्यानंतर जेव्हा माणूस अनपेक्षितपणे लग्न करण्याचा निर्णय घेतो, तेव्हा तो का घेतो?
उत्तर फार कठिण आहे... कारण, ते फार सोपं आहे आणि इतकं सोपं उत्तर आपल्याला पटवून घेता येत नाही.
तोवर तसं करावंस वाटलं नव्हतं म्हणून केलं नव्हतं आणि आता करावंसं वाटलं म्हणून केलं, इतकं सरळ उत्तर असू शकतं या प्रश्नाचं. इतक्या सोपेपणानं वाटण्यामागे काही कारणपरंपरा असू शकते म्हणा.
माणसाचा सर्वकाळ स्वत:शी आणि भोवतालाशी एक लढा चालू असतो. लोकलच्या एका सीटवर चार माणसं एकमेकांशेजारी खेटून बसताना खांदे हलवून हलवून एकमेकांकडे रोगेरागे पाहून, भांडून जशी ऍडजस्ट होतात अखेरीस आणि नंतर एकमेकांच्या खांद्यांवर डोकी टेकत पेंगतात, तसं काहीतरी आयुष्याशी सुरू असतं... काहीजणांची ऍडजस्टमेंट लवकर होते आणि मग प्रवासाचा पुढचा टप्पा सुरू होतो... काहीजणांचे झगडे लवकर संपत नाहीत. रक्ताची उकळी ज्सात काळ टिकते... आत्ममग्नतेचा भोवरा अधिक काळ गरगरवतो... अशा वेळी दुसऱया कुणाला त्या भोवऱयात गटांगळ्या खाण्याचं आवतण का द्यायचं?
`स्व'चं भान आलं, तरच आपल्याशी `कम्पॅटिबल' काय, हे कळणार ना? आपली स्पेस नेमकी किती, हे कळेपर्यत थांबावं, ती कुणाशी किती शेअर होऊ शकते, याचा अंदाज घ्यावा, दोन माणसांमधलं कोणतंही नातं म्हणजे तो अखंड चालणारा प्रयोग आहे, याचं भान ठेवावं. आणि तेच भान ठेवून आपल्याबरोबर कुणी उत्साहानं उडी घ्यायला तयार झालं, तर हातात हात गुंफावा...
म्हणजे प्रवास कुठेही, कसाही थांबो... जेवढा होईल तेवढा आनंदाचा होतो... आणि महत्त्वाचे म्हणजे, एक तह्ह्यात अधिकार मिळतो... आपलं वय काय, आपली पात्रता काय, आपला पगार किती, यातल्या कशाचीही तमा न बाळगता कुणालाही कधीही, कुठेही विचारण्याचा, ``का रे बाबा तू लग्न का नाही करत?''

(महाराष्ट्र टाइम्स, २२ एप्रिल, २००७)

2 comments:

  1. tumchya lagnachi karanmimansa saangana.

    ReplyDelete
  2. मित्रा, माझ्या लग्नाच्या दिवशी प्रकाशित झालेला हा लेख इतर कुणाच्या लग्नाची कारणमीमांसा करण्यासाठी लिहिला असेन का मी? :-)

    ReplyDelete