माननीय संपादक महोदय,
मी आपल्या दैनिकाचा गेल्या 50 वर्षांपासूनचा वाचक आहे. आपल्या दैनिकात गेले काही दिवस बातम्यांच्या पानावर जागा वाया घालवण्यात येत आहे, असे दिसते. म्हणजे ज्या गोष्टीत काही 'बातमी'च नाही, ती तुम्ही रोज आम्हाला बातमी म्हणून कशी काय देता? ही वाचक म्हणून आमची फसवणूक नाही काय?
उदाहरणच द्यायचे तर 'मुख्यमंत्री दिल्लीला गेले', 'राणे दिल्लीला गेले', 'मुख्यमंत्र्यांची खुर्ची धोक्यात', 'मुख्यमंत्री सेफ', 'राणे अस्वस्थ', 'राणे निश्चिंत' या विषयाच्या बातम्या (याच मथळयांनी) आपल्या वर्तमानपत्राने गेल्या महिन्याभरात किती वेळा दिल्या आहेत, याची मोजदाद करावी.
आता माझी आपल्याला अशी विनंती आहे की यापुढे 'दोन आठवडयांत मुख्यमंत्री दिल्लीला गेले नाहीत', 'चार आठवडे राणे मुंबईतच' अशी माहिती मिळेल, तेव्हाच आम्हाला ती 'बातमी' म्हणून द्या. अशाच काही बातम्या नसलेल्या बातम्या पुढीलप्रमाणे
'चलनवाढीच्या दरात वाढ'
आता हे काही नवीन आहे का? आम्ही स्वैपाकाच्या गॅसपासून भाजीपालाधान्यापर्यंत सगळीकडे तेच भोगतोच आहोत ना! 'चलनवाढीचा दर शून्य टक्क्यांवर' अशी बातमी येईल, तेव्हाच ती द्या.
......................
'सचिन तेंडुलकर दुखापतग्रस्त'
दुखापतींमुळे सचिन दौऱ्यांमधून माघार घेतो आणि सौरव, राहुल मात्र बिचारे 'वगळले जातात.' हे इतक्यांदा झालंय की यापुढे 'सचिन तेंडुलकर ठणठणीत', 'राहुल, सौरव संघात' अशा बातम्या आल्या तर द्या. 'राहुल, सौरवची दुखापतीमुळे माघार', 'सचिनला वगळले' अशा बातम्या येण्याची शक्यता कमी आहे. पण, आल्याच तर त्याही द्या.
.....................
'अमिताभ अनवाणी चालत विनायकाच्या चरणी'
दर सिनेमाला अमिताभ स्वत:च्या कुवतवर विश्वास नसल्यासारखा देवाच्या दारी येऊन हात पसरतो. सुनेच्या कुंडलीतल्या कुठल्यातरी फडतूस योगाला घाबरून त्याने तिचं पिंपळाशी लग्न लावण्याइतपत खुळचटपणा केला, वगैरे सतत वाचून आणि ते फोटो पाहून आम्ही जाम पकलोय. त्याचा एकंदर बुद्ध्यांक आमच्या लक्षात आला आहे. आता तो उलटा धावत मंदिरात जाईल किंवा लोटांगणं घेत किंवा सरपटत वगैरे जाईल (तो हे कधी ना कधी करेलच आणि यापलीकडे त्याच्यासंदर्भात 'बातमी' संभवत नाही) तेव्हाच बातमी द्या.
'ग्रामीण भागाला लोडशेडिंगचा फटका', 'कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या' अशाही अन्य काही दैनंदिन घडामोडी 'बातम्यां'च्या नावाखाली खपवल्या जात आहेत. आपण यात वेळीच लक्ष घालावे, ही विनंती.
आपला,
_चकोर
(महाराष्ट्र टाइम्स)
No comments:
Post a Comment