Friday, February 11, 2011

मुक्काम पोस्ट पोरगाव

जे फक्त सणासुदीला गजबजतं, गणपती-दसरा-होळीलाच जिथल्या चुली धगधगतात, जिथे रेसिडेंट गावकऱ्यांपेक्षा नॉन-रेसिडेंट गावकऱ्यांची संख्या जास्त असते, अशा कोणत्याही गावाचं कागदोपत्री नाव काहीही असो.. ते असतं ‘पोरगाव’च.
 
..हेच नाव का बुवा?
 
ही गंमत समजून घेण्यासाठी पाव्हण्याला त्या गावातल्या नदीवरच जावं लागतं.
 
प्रत्येक पोरगावात एक नदी असतेच असते.
 म्हणजे, करंगळीएवढय़ा धारेतून निर्माण होणाऱ्या फयफय पान्याच्या ओहोळापासून धो धो पावसात दिवसभरात तास-दीड तास जेमतेम कमरेएवढं पाणी घेऊन कण्हत-कुथत वाहवणाऱ्या कोणत्याही प्रवाहाला पोरगावात ‘नदी’च म्हटलं जातं. त्या गढूळलेल्या प्रवाहात तळाला पाठ टेकवून झोपलं, तर पोट पाण्यावर तरंगतं आणि पोटावर झोपलं, तर पाठीला उन्हाचे चटके बसतात, इतकं उथळ पात्र. पण, त्याला पाव्हण्यानं हसायचं नसतं. ऑब्जेक्शन तर बिल्कुलच घ्यायचं नसतं. कारण, गावातल्या पाच ते पंचाहत्तर या सर्व वयोगटांमधल्या ‘पोरां’साठी ती नदीच असते.
चाळिशीच्या पुढच्या ‘पोरां’च्या बोलण्यात ‘आमच्या काळी या नदीला केवढं पाणी असायचं!’ असा गौरवपूर्ण उल्लेख असतो.. त्यातली अतिशयोक्ती सोडायची आणि सध्याच्या करंगळीऐवजी अंगठय़ाएवढी धार होती किंवा कमरेच्या वर आणखी चार बोटापर्यंत माणूस बुडायचा, एवढाच अर्थ लक्षात घ्यायचा.
 
एकाच नदीत तुम्ही दुस-यांदा पाय ठेवू शकत नाहीत, असं तत्त्वज्ञ सांगतात.
 
पाणी वाहतं असतं. म्हणजे नदी सतत बदलत असते. तुम्ही दुस-यांदा पाय ठेवता तेव्हा पहिल्यावेळची नदी राहिलेली नसते, असा याचा अर्थ.
 
पोरगावात हे तत्त्वज्ञान लागू होत नाही.
 
शहरात गंभीर चेह-याने काम करणारे बाप्ये आणि बहुश: तशाच गांभीर्याने त्यांचे संसार हाकणाऱ्या बाया सणासुदीला पोरगावात येतात, तेव्हा त्यांच्या पोक्त ओळखी गळून पडतात. कात टाकावी किंवा एखाद्या झाडाच्या खोडाचे गोलगोल पापुद्रे निघावेत, तशी त्यांच्या वयातली र्वष पोरगावाच्या हद्दीत जणू अलगद सोलून निघतात आणि आत उरतो पोरपणाचा कोवळा कंद.
 
शहरातले मान्यवर बाळासाहेब इथे नदीवर येतात, तेव्हा त्यांच्या नावाचा ‘बाल्या’ झालेला असतो आणि या नामाभिधानाला साजेसाच- निव्वळ हाफ चड्डी किंवा बम्र्युडा किंवा थ्री फोर्थ असा- वेष किंवा खरं तर वेषाचा अभाव त्यांच्या अंगावर असतो. शहरात या महानुभावाला असा उघडा त्याच्या बायकोनेही क्वचितच पाहिला असेल. इथे मात्र तो समोर आपल्या वयाच्या बाया आहेत, लहान पोरं आहेत, याचाही विचार करत नाही. कसा करणार? तेवढी फुरसतच त्याला नसते. तो आपल्या वयाच्याच बंब्या बाप्यांबरोबर चीत्कारून बोलण्यात, मोठमोठय़ाने हसण्यात मग्न असतो. त्याच्या चेहऱ्यावर निर्मळ, खटय़ाळ आणि विलक्षण गोड असा बालिश उत्साह भरभरून ओसंडत असतो. शहरातल्या आदबशीर ‘कसं काय वहिनी, बरं आहे ना’चं पोरगावातलं रूप ‘काय गं ढमे, किती सुटलीस चारी बाजूंनी? आमच्या अप्पाचं घर धुवून खाल्लंस का काय?’ असं असतं आणि त्याला उभयपक्षी धपाटय़ांची जोड असते. पाण्यात डुंबणारी-बागडणारी पोरं-पोरी आणि ‘आता गुडघे दुखतात’, ‘डॉक्टरनी मना केलीये’, ‘पाय घसरला तर हाड मोडेल, आता ठिसूळ झालो आपण’, ‘नाय रे, तब्येत जरा शीक आहे’ अशा कारणांची देवाणघेवाण करीत काठावरच रमलेले त्यांचे आई-बाप आणि आज्ये-आजोबा या सगळय़ासगळय़ांचा वयोगट एकच झाला आहे, असा (‘थोर’च्या चालीवर) पोर साक्षात्कार ती नदी घडवते..
 ..माणसांना वय गोठवण्याचा चॉइस असता तर त्यांनी पोरवयच निवडलं असतं, यात कोणाला काही शंका असेल, तर त्याने पोरगावच्या नदीवर जावं. क्षणात ‘शंका’ फिटेल, यात शंका नाही. मोठय़ा वयाच्या जबाबदाऱ्या नाहीत आणि लहानपणाचे (फडताळांवर हात न पोहोचणे, सदैव लिंबू-टिंबूमध्ये गणना होणे, यांसारखे) तोटे नाहीत, असं वय म्हणजे पोरवय( शिवाय तारुण्याच्या उंबरठय़ावरून पलीकडे डोकावण्यातून लागणाऱ्या हुरहुरी, हुळहुळय़ा, गुदगुल्या वगैरे अंमळ अ‍ॅडल्ट गंमतींचा बोनसही याच वयात लाभतो. मागच्या परीकथेतल्या दुडदुडय़ा पायवाटा दूरवर दिसताहेत, पायाखाली नुकत्याच आलेल्या पक्क्या सडकेनं आता हमरस्त्यावरच्या चौकात आणलेलं आहे, भावी आयुष्याच्या सगळय़ा शक्यतांचे महामार्ग इथूनच फुटताहेत, अशा मोक्याच्या टप्प्यावरचं धूसर धुक्यातलं हे वय.. रेंगाळावंसं वाटायला लावणारं..
पोरगावातली मंडळी भाग्यवान खरी. हे वय कुपीत बंद करून ती गावाच्या पंचक्रोशीत कुठेही भिरकावून देण्याची सोय आहे.. कोणत्याही वयात गावात परतलं की गवताखाली पहुडलेली किंवा नदीत शंखशिंपल्यांबरोबर डहुळणारी कुपी आपोआप अल्लाद उघडते आणि पोरवयाचा जादूई चिराग समोर हजर होतो..
 
****
..नदीत खरोखरच्या पोरवयाची काही पोरं डुंबत असतात. एका दांडगटानं थोडय़ाशा नाजूकसाजूक पोरावर पाणी उडवण्याचा एककलमी कार्यक्रम चालवलेला असतो. त्यातून पोरकट बाचाबाच्या, खेचाखेच्या, रुसवेफुगवे, कट्टय़ा होतात..
नदीतून बाहेर पडून अंग सुकवत घराची चढण चढताना दोघेही अबोलपणे एकमेकांपासून लांब लांब चालतात.. तोवर त्यांच्या भानगडीत न पडलेला तिसरा म्हणतो, ‘‘नदीवर यायला किती वेळा मिळतं? इथे किती वेळ मिळतो? त्यात झगडे करायचे की हसत खेळत यायचं-डुंबायचं-मजा करायची आणि जायचं?’’
 
****
एवढी साधी आणि सोपी गोष्ट मोठय़ा माणसांना कळली असती, तर ती कुपी उघडण्यासाठी पोरगावात यायची गरज पडली नसती.

(चित्र : प्रदीप म्हापसेकर)
(19/9/10)

No comments:

Post a Comment