Friday, February 11, 2011

सख्खे शेजारी!

‘‘रामराम रहीमचाचा’’
रामाने पाठीवरचा भाता काढून ठेवला. धनुष्य खुंटीला टांगून ठेवले, कंदमुळांची पिशवी सीतामाईच्या हातात सोपवली आणि अंगणात हातापायावर पाणी घेता घेता शेजारच्या अंगणात जपमाळ ओढत बसलेल्या रहीमचाचांना त्याने नेहमीच्या सवयीनुसार आदाब केला.
तोंडातल्या तोंडात पुटपुटत डोळ्यांना माळ लावून ती बाजूला ठेवत रहीमचाचांनी डुगडुगत्या मानेनेच नमस्काराचा स्वीकार केला आणि ते थरथरत्या स्वरात म्हणाले, सलाम रामभाई, सब खरियत?
 ‘‘हां आता खरियतच म्हणायची, निकाल आलाय आहे म्हणे कोर्टाचा! सगळं शांत आहे, कोठे दंगाधोपा नाही, म्हणजे सगळं आलबेल आहे असं दिसतंय,’’ रामाने उपरण्याने घाम पुसला. आतून सीतामाईने आणून दिलेला पाण्याचा गडू त्याने गटागटा घशाखाली ओतला आणि म्हणाला, ‘‘आपले सिक्युरिटीवाले मघाशी एकत्र जमून वाचत होते पेपर. त्यातनं नंतर एक पान उडालं आणि माझ्या हाती लागलं. पहिलंच पान आहे. अगदी सविस्तर बातमी दिलीये.’’ हातातलं पेपरचं पान त्याने रहीमचाचांच्या हाती दिलं आणि सीतामाईला हाळी दिली, ‘‘अगं ऐकलंस का? आता आपल्या डोक्यावर हक्काचं छप्पर येण्याचा मार्ग खुला झालाय म्हणे!’’
‘‘काय सांगताय काय?’’ हरखलेली सीतामाई आतून लगबगीने बाहेर आली, ‘‘देवच पावला म्हणायचा.’’
मंद हसत राम म्हणाला, ‘‘कलियुग आलंय सीते. या युगात देवालाही देवच पावावा लागतो.’’
रहीमचाच्यांचीही मान हास्याने डुगडुगली. पेपर पुन्हा रामाच्या हाती देत ते म्हणाले, ‘‘रामभाई, मेरे लिए तो काला अक्षर भैंस बराबर है. तुम्हीच काय निकाल आहे ते सांगा.’’
‘‘हो हो, सांगा बाई पटापट,’’ सीतामाईला घाई झाली होती, ‘‘किती स्क्वेअर फुटाचं घर मंजूर झालंय? हक्क पूर्णपणे शाबित झालाय आपला की अजूनही बर्थ सर्टिफिकेट आणि इतर कसली कसली प्रमाणपत्रं द्यायला हवीयेत आणखी. साठ वर्षे हेच चाललंय. सुस्त कारभार आहे मेल्यांचा. एकतर राहायला धड जागा नाही. डोक्यावर पक्कं छप्पर नाही आणि सारखे येऊन खोदत असतात इकडेतिकडे.’’
‘‘आज काय, मंदिराचा खंभा मिळाला. आज काय घुमटाचा तुकडा मिळाला.’’ रहीमचाचांनीही नापसंतीदर्शक मान हलवली.
‘‘मला आश्चर्य याचं वाटतं चाचा, यांच्या लक्षात कसं येत नाही की इतिहासात असं खोदत जाल, तर थेट झाडांपर्यंत जाल. जंगली प्राण्यांपर्यंत जाल. सगळं त्यांचंच तर होतं माणसांनी बळकावण्याच्या आधी. तुमचं उत्खनन त्यांच्यापर्यंत पोहोचलं,
तर देणार आहात का सगळी भूमी निसर्गाची निसर्गाला जशीच्या तशी परत?’’ रामाचा चेहरा सात्त्विक संतापानं लालगोरा झाला.
‘‘तुम्ही नका इतकं मनाला लावून घेऊ.’’ सीतामाई पदरानं वारा घालत काळजीच्या सुरात म्हणाली, ‘‘हल्ली जराशानंही तुमचं बीपी वाढतं. कुंपणाबाहेरचे ते जयघोष कानी पडले की दिवस दिवस अस्वस्थ असता. रात्रीही दचकून उठता.’’
‘‘बेटी, नींद तर माझीही हराम होते, ते भयंकर नारे ऐकले की! मीही दचकून उठतो स्फोटांच्या आवाजांनी. माणसांच्या किंकाळ्यांनी. पण, काय करणार? कच्चे हैं, पर सब अपनेही बच्चे हैं. बोलो, और क्या लिखा है पेपर में?’’
पेपर वाचता वाचता रामाचा आक्रसलेला चेहरा सैलावला, त्यावर आनंद पसरू लागला.
‘‘काय झालं हो? एकदम हाय इन्कम ग्रुपचं घर लागलेल्या मुंबईकरासारखा चेहरा झालाय तो तुमचा?’’
‘‘अगं आपल्याला जरा मोठी जागा मिळालीये, ही आनंदाची गोष्ट आहेच. पण, त्यापेक्षा आनंदाची गोष्ट
म्हणजे रहीमचाचांचा शेजारही कायम राहिलाय.’’ रामाने उत्साहानं सांगितलं.
‘‘खुदा की नेमत है’’ रहीमचाच्यांनी माळ पुन्हा डोळ्यांना लावली. त्यांच्या अधू डोळ्यांमध्ये अश्रू तरळले होते. ‘‘इतक्या वर्षाचा शेजार आपला. पोरांच्या झगडय़ात तो सुटतो की काय, अशी सारखी धाकधूक वाटत होती. तसं झालं नाही. खुदा बडा दयालू है.’’
हूं हूं हूं हूं हूं हूं हूं हूं हूं हूं हूं , पलीकडून घुमण्याचे स्वर कानी पडू लागले तसा रामाचा चेहरा पुन्हा आक्रसला, कपाळांवर आठ्यांचं जाळं पसरलं.
सीतामाईने पलीकडे बोट रोखून हलक्या आवाजात विचारलं, ‘‘त्यांचं काय झालं?’’
‘‘त्यांनाही मिळालीये जागा. नसती कटकट. सगळय़ा देशाचा आखाडा करून टाकलाय. कबुतरांसारखे वेळी अवेळी घुमत असतात.’’ रामाने कपाळावर हात मारून घेतला.
‘‘नाहीतर काय? नुसते नावाचे निर्मोही. शाही स्नानाचा मान पाहिजे म्हणून एकमेकांची कत्तल करायला कमी करत नाहीत आणि म्हणे साधू.’’
‘‘शांत हो बेटी शांत हो.’’ रहीमचाचा समजावणीच्या सुरात म्हणाले, ‘‘आता एकत्र राहायचं म्हटलं की थोडं उन्नीस बीस होणारच. और मैने सुना है कि ये फैसला भी आखरी फैसला नही है.’’
‘‘अरे देवा, अजून आहेच का कटकट?’’ सीतामाई हताशेने उद्गारली.
‘‘हो ना! सुप्रीम कोर्टात गेलीयेत सगळी मंडळी. तिथे आणखी वेगळा निकाल लागू शकतो.’’
‘‘तिथे काही विपरीत घडलं आणि रहीमचाचांचा शेजार तुटला तर..’’ सीतामाईनं चिंतेच्या सुरात विचारलं.
‘‘तर काय?’’ राम उत्तरला, ‘‘आपल्या पादुका सोपवायच्या आणि निघायचं.. नाहीतरी आपल्याला वनवासाची सवयच आहे शतकानुशतकांची.’’

(चित्र : प्रदीप म्हापसेकर)

(3/10/10)

No comments:

Post a Comment