Friday, February 11, 2011

विक्रम ‘बेताल’

हा शेवटचाच मजला..
 हट्ट न सोडलेल्या राजा विक्रमादित्याने लिफ्टच्या इंडिकेटरकडे पाहिलं.. त्यात 87 आकडा चमकला. सुळ्ळकन दार उघडलं आणि विक्रमादित्य बाहेर पडला.. अर्धवट बांधकाम झालेल्या त्या विस्तीर्ण टेरेसवर सिमेंट काँक्रीटमधून बांबूसारख्या उगवलेल्या सळ्यांचं जंगलच पसरलेलं होतं.. त्यातल्याच एखाद्या सळईला वेताळ लटकलेला असणार, हे विक्रमाला पुरेपूर ठाऊक होतं.. सराईतपणे त्याने अंधुक प्रकाशात नजर फिरवली. सळईच्या एका बनात लटकलेलं वेताळाचं बोचकं त्याला दिसलं.. चटकन पुढे जाऊन त्यानं वेताळाचं बखोट धरलं आणि त्याला आपल्या पाठीवरच्या बॅकपॅकमध्ये लॅपटॉपशेजारच्या कप्प्यात कोंबलं.. ‘‘ख्यॅ ख्यॅ ख्यॅ ख्यॅ,’’ वेताळ भेसूर हसला आणि म्हणाला, ‘‘हे राजा, रोज मला घेऊन जाण्याच्या तुझ्या हट्टाचीही मला कमाल वाटते. पण, नंतर मनात विचार येतो, तू तर राज्याचा राजा. तुझ्या २५ पिढय़ा बसून खातील एवढा माल तू जनतेच्या माना मुरगळून गोळा करून बसला आहेस. तुला पोटापाण्याची चिंता नाही. कसलीही ददात नाही. काम करण्याची गरज नाही. सगळे छंद फंद करून थकला आहेस. आता या वयात तुला दुसरा टाइमपास तरी काय असणार? बरोबर ना!’’
विक्रमादित्यानं हूं की चूं केलं नाही. तो बोलला की वेताळ परत जाणार, ही परंपरा कायम होती.
 
‘‘तू तोंडातून चकार शब्द काढणार नाहीस, हे मला ठाऊक आहे,’’ वेताळानं तोंडाचा पट्टा सोडला, ‘‘अरे, तुझ्या दरबारातही तुझी ख्याती ‘गपबशा आणि हिशोबपुशा’ हीच आहे. मी तुला कितीही घालून पाडून बोललो, कितीही डिवचलं, तरी तू उलट उत्तर देणार नाहीस. मौनभंग करणार नाहीस. कारण, मला गुप्तपणे आपल्या बंगल्यावर घेऊन जाऊन माझ्या अतींद्रिय शक्तींचा वापर करून देशात आणखी हडप करण्यालायक कोठे काही खजिना उरला आहे का, याचा तुला शोध घ्यायचा आहे. तुम्हा सगळय़ा राज्यकर्त्यांचा अशा भाकड बुवाबाजीवर भारीच विश्वास असतो बुवा! असो. बुवाबाजीवरून मला एका बंडलबुवाची गोष्ट आठवतेय. ती तुला सांगतो. माझा बोजा वाहता वाहता तुझाही छान टाइमपास होईल.’’
 
वेताळाचं कथाकथन सुरू झालं, ‘‘आटपाटनगर होतं. त्यात कल्याणपूर आणि डोंबिलवाडी अशी जुळी शहरं होती. राजधानीच्या गावकुसाबाहेर हुसकावल्या गेलेल्या सज्जन आणि त्यामुळेच की काय, निर्धन अशा माणसांची ही वस्ती. राजधानीचा विकास होऊ लागला, तसं गावकूस बाहेर सरकू लागलं. कल्याणपूर आणि डोंबिलवाडीला येऊन टेकलं. नागरी वस्ती वाढू लागली तसा तिथल्या जमिनीला सोन्याचा भाव येऊ लागला. नगररचनाकारांच्या संगनमताने सगळे नियम बाजूला सारून बहुमजली सदने उभी राहू लागली. सुनीलभट्ट नावाचा नगर अभियंता या गैरव्यवहारात इतका पारंगत झाला की सगळा विभाग त्याच्या तालावर डोलू लागला. बेकायदा धनप्राप्तीच्या चोरवाटा त्यानं खुल्या करून दिल्यानं नगराचे कारभारीही त्याचे अंकित झाले. त्याचं हे सुख नगरातील पत्रककुमाराला पाहवेना. त्याने सुनीलभट्टाच्या भ्रष्टाचाराला वाचा फोडली. त्यामुळे, सुनीलभट्टाला राजसेवेतून तात्पुरते हटविण्यात आले. त्यामुळे, इमारतकारांपासून नगराच्या कारभाऱ्यांपर्यंत सर्वाचीच पंचाईत झाली. साऱ्यांचे वरकमाईचे मार्ग आटले. अखेरीस कायद्यातील पळवाटेचा आधार घेऊन सुनीलभट्टाला पुन:श्च मूळ पदी नेमण्यासाठी नगराचे सगळे कारभारी एकत्र आले. तसा ठरावच त्यांनी राजसभेत मंजूर केला.
 ‘‘राजसभेची ही अधोगती पाहून नगरातील जुना जाणता रहिवासी सालसराज अतिशय व्यथित झाला. त्याने गावातील ख्यातनाम बंडलबुवांकडे धाव घेतली. आपण कसं जगावं, इतरांना कसं जगवावं, याचे आध्यात्मिक धडे देणाऱ्या या बुवांचं गावात मोठं प्रस्थ होतं. सालसराज त्यांच्यासमोर जाऊन उभा ठाकला आणि म्हणाला, ‘‘महाराज, हेच का ते कलियुग? अहो, अवघ्या 30-40 वर्षापूर्वीपर्यंत भ्रष्ट माणसाकडे तिरस्काराच्या नजरेनं बघितलं जायचं या समाजात! अशा माणसाची उघडपणे पाठराखण केली, तर आपलं राजकीय भवितव्य धोक्यात येईल, असा धाक होता राज्यकर्त्यांना. आणि आज हे काय चित्र दिसतंय? या भ्रष्टोत्तम सुनीलभट्टासाठी सगळे राज्यकर्ते पक्षभेद विसरून एकवटताहेत! सामान्य माणूस त्याला कर्तबगार मानतो आहे. केवढा हा -हास! हे कसलं अवलक्षण आहे महाराज?’’
‘‘शांत हो बेटा, शांत हो’’, कफनी कुरवाळत आपला भूतकाळ आठवून बंडलबुवा उद्गारले, ‘‘हे -हासाचं नव्हे, समाजाच्या आत्मिक आणि भौतिक उन्नतीचं शुभलक्षण आहे. हा देश सुपरपॉवर होणार, याचंच हे सुचिन्ह आहे.’’
 
हे उद्गार ऐकून वीज कोसळल्याप्रमाणे सालसराज जागच्या जागीच कोसळला..’’
 
आपल्या नाटय़मय कथाकथनाचा विक्रमादित्यावर योग्य प्रभाव पडला आहे, याची खात्री करून घेऊन वेताळाने विचारलं, ‘‘आता मला सांग राजन, नगराच्या कारभाऱ्यांनी सुनीलभट्टासारख्या भ्रष्ट माणसाची उघडपणे पाठराखण करणं, हे शुभलक्षण आहे, असे धक्कादायक उद्गार बंडलबुवाने का काढले असावेत? तो भोंदू बुवा आहे म्हणून की त्याला भविष्य समजले होते म्हणून? माझ्या या प्रश्नाचं खरं उत्तर ठाऊक असूनही तू दिलं नाहीस, तर तुझ्या डोक्याची शंभर शकलं होतील आणि ती तुझ्याच पायाशी लोळू लागतील.’’
 
‘‘वेताळा,’’ घसा खाकरून विक्रमादित्य उत्तरला, ‘‘आधुनिक काळातली माझ्याच राज्यातली ही गोष्ट उगाच पौराणिक करून सांगण्यातली तुझी मजबुरी मला समजते. कशावरही टीका केली की कसे फटके पडतात, हे सर्व विचारवंतांना ठाऊक असल्यानं हल्ली त्यांना ‘बालांसाठी गोड गोड गोष्टी’ लिहिण्याचाच मार्ग खुला राहिला आहे. असो. तुझ्या कथेतील बंडलबुवा हे आमचे आध्यात्मिक गुरूच आहेत, हेही मला अंतज्र्ञानानं समजलंय. त्यांनी दिलेल्या उत्तरातच मला त्यांच्या त्रिकालदर्शित्त्वाचाच पुरावा मिळाला. वेताळा, अरे, 30-40 वर्षापूर्वीचा समाज अपरिपक्व होता. सुनीलभट्टाचेच अवतार त्याही काळात होतेच आणि नगराचे कारभारी तेव्हाही गुप्तपणे त्यांचीच पाठराखण करीत असत. फक्त उघडपणे भ्रष्टाचाराला वाईट म्हटले जायचे. हा खरा दुटप्पीपणा आणि दांभिकपणा होता. यातून समाजाला भ्रष्टाचार वाईट असा चुकीचा संदेश मिळाला आणि समाजाची प्रगतीच खुंटली. कल्याणपूर आणि डोंबिलवाडीच्या कारभाऱ्यांची आताची कृती ख-या अर्थाने पारदर्शक आहे. त्यांनी आत एक आणि बाहेर एक असं धोरण ठेवलेलं नाही. आपला समाज नेत्यांचंच अनुकरण करतो, हे तुला ठाऊक आहेच. भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठिशी घालून या नेत्यांनी जो धडा घालून दिला आहे, त्यातून समाजही योग्य धडा शिकेल. भ्रष्टाचार हाच शिष्टाचार होईल. भ्रष्टांची केवढी प्रचंड भरभराट होते, हे तर तुला आमच्याकडे पाहूनच कळलं असेल. मग मला सांग, सगळा समाज जेव्हा भ्रष्ट होईल, तेव्हा या देशाची केवढी भरभराट होईल. त्यामुळे, बंडलबुवांनी दिलेलं उत्तर अतिशय योग्य आणि समर्पकच होतं.’’
 ‘‘तू बोला और मै चला,’’ असं म्हणून खदाखदा हसत वेताळ अंतर्धान पावला. विक्रमादित्यानं भ्रमणध्वनीच्या कळी दाबल्या. लाल दिव्याची गाडी रोंरावत आली. विक्रमादित्य आत शिरला आणि पोलिस बंदोबस्तात गाडी मलबार टेकडीची वळणावळणाची वाट चढू लागली..

(चित्र : प्रदीप म्हापसेकर)

(18/7/10)

No comments:

Post a Comment