Friday, February 11, 2011

मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे!

‘‘हे  काय? मुंबई महाराष्ट्रातच आहे ना!’’

  ‘‘कोण आहे तो हरामखोर, दळभद्री, पोटावळा बोरूबहाद्दर! मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी आहे, असे म्हणायला कोणाची माय व्याली आहे? जीभ छाटू, हात हिसडू! (आयचा घो! कायतरी मिष्टेक झाली काय?) अरे हां, हात छाटू, जीभ हिसडू, तोफेच्या तोंडी देऊन नंतर कडेलोट करू!’’

‘‘एक्स्क्यूज मी! इजन्ट बाँबे स्टिल द कॅपिटल ऑफ माहाराष्ट्रा! थँक गॉड, इफ इट इजन्ट! गुड रिडन्स ऑफ दोज ऑब्नॉक्शस मराठीज.’’

(आता यापुढील मजकूर आपल्या परिचयाच्या कोणत्याही ओशट, तुपकट प.पू.च्या आवाजात ऐकावा’- प.पू. म्हणजे परमपूज्य.)

मित्रहो,
आपल्यापैकी काहीजणांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे आणि काहीजणांना हर्षवायू झाला आहे, याची आम्हाला जाणीव आहे. मात्र आपल्या या अतितीव्र भावनांनी आम्ही मात्र जराही विचलित झालेलो नाही. कारण, आपला संताप आणि आपला आनंद हा नेहमीप्रमाणे अतीव अज्ञानातून आणि गैरसमजातून निर्माण झालेला आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, महाराष्ट्राला भौगोलिकदृष्टय़ा जोडलेली आहे, त्यामुळे ती महाराष्ट्रातआहे, असा भ्रम आपल्याला झाला आहे. किंबहुना, तो आपण सर्वानी जाणीवपूर्वक जोपासलेला भ्रम आहे. मुंबई मनाने महाराष्ट्रात नाही आणि तशी ती कधीच नव्हती, या कटु सत्याला आपण कधीही धैर्यपूर्वक सामोरे गेलाच नाहीत. त्यामुळे, मुंबई महाराष्ट्रातच आहे, या स्वनिर्मित गोड गैरसमजाच्या कोशात आपण वावरत आहात. त्या फुग्याला आमच्या शीर्षकाने टाचणी लावल्यामुळे संतापाचा किंवा हर्षाचा स्फोट होणे साहजिकच आहे. मात्र, यापुढील मजकुराचे खुल्या दिलाने आणि संपूर्ण अवधानाने वाचन-मनन-चिंतन केल्यास आपल्यालाही हे विनम्र निवेदन पटेल.
(प.पू. भाषा समाप्त. आता आपल्या ओरिजिनल आणि मानवी भाषेत बोलूया.)

तर मुद्दा असा आहे की मुंबईसह महाराष्ट्र झाला पाहिजे कारण आज मुंबई महाराष्ट्रात नाही.

कसे ते पाहा.

संपूर्ण महाराष्ट्रात लोडशेडिंग आहे. ग्रामीण भागांमध्ये दिवसाचे १२ तास, निमशहरीभागांमध्ये दिवसाचे सहा तास किमान. बरे, हे फार दूर नाही. मुंबईला चिकटून असलेल्या आणि बृहन्मुंबईतच गणल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात हा अंधार आहे. लोकलच्या भाषेत बोलायचे झाले, तर एका स्टेशनच्या गावात अहोरात्र उजेड आणि त्यापुढच्या पाच मिनिटांवरच्या स्टेशनच्या गावात अंधार.
आता सांगा, मुंबई महाराष्ट्रात आहे?

दुसरे उदाहरण घ्या.

महाराष्ट्रात म्हणजे उर्वरितमहाराष्ट्रात महाराष्ट्रीयांची आणि अमहाराष्ट्रीयांची बोलीभाषा मराठी किंवा मराठीची त्या त्या भागातील बोली आहे. नगरचे गांधी, जळगावचे जैन, औरंगाबादचे धूत, कोकणातले अंतुले आणि वसईचे दिब्रिटो मराठीत बोलतात.

मुंबईची बोलीभाषा कोणती?

घरात बोलतो ती नव्हे, बाहेर पडल्यावर बोलतो ती भाषा.

ती हिंदी आहे.

आपण बिहार-यूपीवाल्या भय्यांचा कितीही द्वेष केला, कितीही टॅक्स्यांच्या काचा फोडल्या, अबू आझमीला कितीही वेळा कानफटवले, तरीही हे सत्य बदलणार नाही की या महानगराची प्रमुख संपर्कभाषा हिंदी आहे.. मराठी नाही. मराठी माणसेही इथे ओळख पटण्याआधी एकमेकांशी हिंदीतच बोलतात, यात सगळे आले.

चेन्नै तामीळनाडूत आहे, तिथे कन्नडिगांचे खूप मोठे प्रमाण आहे. तरीही तिथली प्रमुख संपर्कभाषा तामीळ आहे.

कोलकाता प. बंगालमध्ये आहे, तिथेही बिहारी भय्ये प्रचंड प्रमाणात आहेत, तरीही तिथली प्रमुख संपर्कभाषा बंगाली आहे.

महाराष्ट्रात भय्याभरती तर अगदी अलीकडे सुरू झाली. आधीपासून आहेत ते गुजराती आणि दक्षिण भारतीय. तरीही आपली तेव्हापासूनची मुख्य संपर्कभाषा हिंदी हीच आहे.

आता सांगा मुंबई महाराष्ट्रात आहे का?

परप्रांतीयांचे सोडून द्या. ते काय पोटापाण्यासाठीच इथे आले आहेत. त्यांना महाराष्ट्राची आतून ओढ असण्याचे कारण नाही. त्यांचे महाराष्ट्राशी नाळेचे नातेच नाही. शिवाय, जे आज लंडन, उद्या पॅरिस, परवा न्यू यॉर्क असे फिरतात, ते आंतरराष्ट्रीय वर्तुळातले नागरिकही सोडून द्या. त्यांच्यासाठी सगळे जग हेच एखाद्या खेडय़ासारखे आहे. एका देशाशी त्यांचे पक्के नाते नाही, शहराशी कुठून असणार. पण, या मातीतले आगरी, कोळी, पाठारे प्रभू, भंडारी वगैरे खरे भूमिपुत्र आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून येथे येऊन वसलेले जे महाराष्ट्रीय आहेत, त्यांचे काय?

मुंबई हाच ज्यांचा गावत्यांनाही घटकाभर सोडून द्या. पण, उर्वरितांचे काय? उठ पळ गौरी-गणपती-होळी-लग्ने आणि मातीला (अंत्यविधीला) गावी जाणा-या या मंडळींचे त्या महाराष्ट्राशी या सणसोहळय़ांव्यतिरिक्त काही देणेघेणे आहे काय? त्या महाराष्ट्राच्या व्यथा-वेदनांशी काही एकरूपता आहे काय? सणावारांना गावी जायचे आणि आपण होतो तेव्हा गाव कसा गजबजलेला होता, आता कशी दुरवस्था झाली, याबद्दल उसासे टाकायचे की झाले भावविरेचन. पुढे तुमचे तुम्ही पाहा, आमचे आम्ही पाहतो कारण आम्हा सर्वाना फक्त आपले आणि आपल्यापुरतेच दिसते.

‘‘असे काय बोलता राव? गावाच्या जत्रांसाठी, मंदिरांसाठी, उत्सवांसाठी आम्ही इकडे वर्गण्या काढतो,

ते साजरे करायला आवर्जून जातो. केवढे हे

सांस्कृतिक कार्य?’’

ग्रेट! घटकाभर ही संस्कृतीमानली, तर तिने स्मरणरंजनापलीकडे काय साधले? आपल्या गावाचे काय भले केले? ते झाले असते तर तुम्ही पोटासाठी इकडे पळत कशाला आला असतात आणि लोकलचे धक्के खात छोटय़ा खुराडय़ांमध्ये कशाला राहिले असतात पिढय़ा न् पिढय़ा. गाव सुधारण्याची संस्कृतीआपल्याला कुणी कशी शिकवली नाही कधीच? तिकडची जागृत दैवते म्हणे इकडची इडा-पिडा-अला-बला कुठच्या कुठे भिरकावून देतात, एवढी पॉवरफुल. त्यांना त्यांच्याच स्थानाची इडा-पिडा-अला-बला दिसली नाही शतकानुशतके? की तिकडचे देवचार त्यांच्यापेक्षा अधिक पॉवरफुल ठरले!
त्यांना कशाला दोष द्या. मुंबईचा रंगीत चष्मा चढला की आपल्या गावच्या इडा-पिडा-अला-बला दिसेनाशा होतात. तिकडच्या यातना जाणवत नाहीत की चटके आपल्याला बसत नाहीत. त्या सगळय़ापासून पळून, अक्षरश: सुटका करून घेऊन तर आलो आहोत आपण इकडे. म्हणून आपण सुखापुरते आणि सुतकाच्या उपचारापुरते जातो तिकडे. हे खोटे असते तर आपल्यातल्या एकाने तरी पोटतिडकीने म्हटले असते की महाराष्ट्र अंधारात लोटला जात असताना मुंबईने झगमगाटाचा थाट मिरवावा, अशी तिची काय थोरवी आहे? ती महाराष्ट्राचा भाग नाही का? लावा समान न्याय आणि करा इकडेही लोडशेडिंग. सहभागी करून घ्या आम्हालाही महाराष्ट्राच्या दु:खात. महाराष्ट्रातल्या आमच्या आयाबायांना कमरेवर डोईवर घागरी घेऊन पाण्यासाठी मैलो न् मैलांची पायपीट करावी लागते, मग आमच्या गाडय़ा धुण्यासाठी आणि कारंजी नाचवण्यासाठी, संडास-मुताऱ्यांमध्ये भसाभसा ओतण्यासाठी, गळक्या नळांसाठी आणि फुसांडत्या शॉवरांसाठी तिकडचे पाणी पळवून आणू नका. सोसू की आम्ही एखाद दिवसाच्या कपातीची झळ. त्यातून पाणीवापराची शिस्त तरी लागेल आमच्या भावी पिढय़ांना.

आपले महाराष्ट्राशी काही नाते असते, तर मराठी माणसांचा त्यांच्या राजधानीत जबरदस्त ताकदीचा दबावगट झाला असता.. याला हाणू, त्याला चोपू, याला कानफटू, त्याला लोळवूवाल्या फुकटखाऊ खंडणीखोरांची टोळी नव्हे.. खराखुरा दबावगट.. इथल्या सत्ताधीश, मत्ताधीश आणि मालमत्ताधीशांवर वचक ठेवून त्यांच्या, म्हणजेच महाराष्ट्राच्या संपदेचा योग्य हिस्सा आपल्यामहाराष्ट्राकडे वळवणारा. राज्यकर्त्यांना राज्याच्या दूरगामी हिताचे निर्णय घ्यायला लावणारा. महाराष्ट्राच्या व्यथा-वेदनांशी समरस होणारा. त्यांच्या निवारणार्थ झटणारा.

बोला, काय बोलता?

‘‘इथे आमचे आम्हाला सावरता सावरणे कठीण आहे. तिथे महाराष्ट्राची धुणी कोण धुणार?’’

‘‘इकडे टायम कुणाला हाय. खाजवायला फुरसत नाय.. डोसका हो!’’

करेक्ट! मुंबईतल्या भयंकर कडवट, कट्टर वगैरे मराठीजनांची महाराष्ट्राबद्दल हीच आस्थाअसते.
आता सांगा..

मुंबई महाराष्ट्रात आहे का?

(17/1/10)

No comments:

Post a Comment