Friday, February 11, 2011

मोरू मोरूचा बाप आणि संकल्प

नवे वर्ष- मग ते भारतीय कॅलेंडरप्रमाणे गुढीपाडव्याला येवो, दिवाळीतल्या पाडव्याला येवो की इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे १ जानेवारीला- आले की मोरूच्या बापाच्या पोटात गोळा येतो. कारण मराठी भाषेतील तमाम विनोदी लेखकांनी दर नव्या वर्षाच्या पहाटेला मोरूच्या कंबरड्यात सणसणीत लाथ घालण्याची जबाबदारी मोरूच्या बापावर सोपवलेली आहे. गेली पन्नासेक वर्षे मोरूच्या कंबरड्यात लाथ घालून घालून मोरूमध्ये काही सुधारणा झालेली नाही; उलट मोरूच्या बापाचे कंबरडे मोडले आहे. हल्ली दर नव्या वर्षाच्या पहिल्या पहाटेला मोरूच्या बापाने मोरूच्या कंबरड्यात लाथ घातल्यानंतर जो ‘ओय ओय’ असा आवाज येतो, तो मोरूच्या नव्हे, तर त्याच्या बापाच्या केकाटण्याचा असतो.
या वर्षी मात्र त्याने खूप विचार केला. त्याने म्हणजे बापाने, मोरूने नव्हे.. मोरूने विचार केला असता, तर त्याच्या बापाला दरसाल लत्ताप्रहाराची आवर्तने करावी लागली नसती. बापाने मोरूशी भल्या सकाळीच ‘वन टू वन’ आणि ‘मॅन टू मॅन’ चर्चा करण्याचा निर्णय घेतला. मोरूने २५ डिसेंबरपासून ख्रिसमसच्या मुहुर्तावरच नववर्ष-स्वागत-सप्ताहाला प्रारंभ केला होता. त्यामुळे, मोरूच्या बापाला चर्चेसाठी मोरूला लाथ घालूनच उठवावे लागले. 
‘मो-या, लेका, दरवर्षी तू मला लाथा घालायला लावतोयस. आता बाप थकला तुझा. कंबरेचे काटे ढिले झाले माझ्या. आता तरी सुटका कर माझी.’’
‘‘एक्स्क्यूज मी डॅड,’’ हा प्रभाव रात्रीच्या ‘इंग्लिश’चा, ‘‘मी तुम्हाला इन्व्हिटेशन दिलेले नाही की कम अँड किक मी एव्हरी न्यू इयर. तो तुमचा स्वत:चा प्रॉब्लेम आहे,’’ मोरूने हात झटकले. वर म्हणाला, ‘‘अँड लुक डॅड. मराठीतल्या सगळ्या ह्युमरिस्टांचा आयक्यू जोपर्यंत साडेतेराच्या वरती जात नाही, तोपर्यंत मला लाथा घालण्यापासून तुमची सुटका नाही. आय जस्ट कांट हेल्प यू, मॅन!’’
‘‘यू कॅन बाबा, ओन्ली यू कॅन,’’ मोरूच्या बापाने हातच जोडले.
‘‘हाऊ?’’
‘‘असं पाहा मोरोपंत. सगळ्या लेखकांना आपला तो ठराविक सीन का रंगवावा लागतो?’’
‘‘कारण, त्यांची बुद्धी तोकडी आहे, आय टोल्ड यू.’’
‘‘तसं नाही रे. मला सांग, तुझ्या-माझ्यातल्या प्रसंगाचं स्वरूप साधारण काय असतं?’’
‘‘मी काही तरी बिनडोकपणा करत असतो आणि तुम्ही मला शहाणपणाचे डोस पाजत असता.’’
‘‘करेक्ट. म्हणजे या सिच्युएशनमधून आपण दोघांनीही बाहेर पडायचं असेल, तर तुला काय करावं लागेल?..’’
‘‘..काय करावं लागेल?’’ मोरू बुचकळ्यात पडला.
‘‘शहाण्यासारखं वागावं लागेल!’’ बाप टाळी वाजवून म्हणाला, ‘‘जरा नीट विचार कर माझ्या सोन्या. तू जर वेडपटपणा केला नाहीस, चांगल्या आणि शहाण्या माणसासारखं वागलास, तर मी तुझ्या कंबरड्यात लाथ घालण्याचं काही कारणच उरणार नाही. विनोदी लेखकांना आपल्याबद्दल लिहायला मसालाच मिळणार नाही आणि या दरवर्षीच्या चरकातून आपली दोघांचीही सुटका होईल. व्हॉट से?’’
‘‘मेक्स सेन्स डॅड. दॅट्स अ गुड आयडिया.’’
‘‘बरं झालं तुला पटलं. आता फक्त एक कृपा कर. माझ्याशी शक्यतो मराठीत बोल. नाही तर आपण दोघे पुढे इंग्लिश लेखकांच्या तावडीत सापडायचो.’’
‘‘करेक्ट.. आय मीन बरोबर. आता मला सांगा. मी नेमकं काय करू. तुम्ही सांगाल ते मी करेन.’’
‘‘मोरू, फार काही अवघड नाही. या देशाचा, या राज्याचा, या शहराचा एक जबाबदार नागरिक म्हणून जे काही केलं पाहिजे, ते सगळं कर. लोकांना तुला नावं ठेवायची संधी देऊ नकोस.’’
‘‘ओके. डन डॅड,’’ असे म्हणून मोरू लगेच कामाला लागला. उशिरा जागे होण्याची सवय सर्वात आधी सोडली. लवकर जागा होऊन तो योगसाधना-व्यायाम करू लागला. 
नियमित कामावर जाऊ लागला. 
ट्रेनमध्ये चढताना लोकांना धक्का लागणार नाही, याची काळजी घेऊ लागला. 
कामाच्या वेळेत गप्पा छाटणे, कँटिनमध्ये टाइमपास करणे, ऑफिसच्या फोनवरून मित्र-मैत्रिणींशी संवाद साधणे, ऑफिसच्या कम्प्युटरचा ‘चॅट स्टेशन’ असा वापर करणे, हे सर्व प्रिय उद्योग त्याने बंद करून टाकले. 
येण्याच्या ट्रेनमधला टाळकुट्यांचा कंपू आणि जाण्याच्या ट्रेनमधला पत्तेबाजांचा ग्रुप या दोहोंची संगत त्याने सोडली. 
घरातल्या म्युझिक सिस्टमचा बेबंद भोंगाणा वाजवणे बंद केले. ट्रेनमध्येही इयरफोनवरच गाणी ऐकण्याचे पथ्य तो पाळू लागला. 
रस्त्यातून गाडी चालवताना वाहतुकीचे नियम पाळू लागला. सिग्नल लाल झाल्यावर गाडी थांबवावी, या नियमाचे पालन केल्यामुळे त्याची गाडी चारदा ठोकली गेली. तरीही त्याने घेतला वसा टाकला नाही. वाहतूक पोलिसाने अडवल्यावर तो चिरीमिरी न देता दंड भरू लागला. 
रस्त्यात, ट्रेनमध्ये, घराबाहेर कोठेही कचरा टाकायचा नाही, पाणी जपून वापरायचे, रांगेची शिस्त पाळायची, कोठेही मोठमोठय़ाने बोलायचे नाही, आपल्या वर्तनातून इतर कोणालाही त्रास होईल, असे वागायचे नाही, सर्व कर नियमित भरायचे, सर्व कायद्यांचे पालन करायचे, कोणालाही लाच द्यायची नाही, असे सद्वर्तन मोरू करू लागला...
अशा रीतीने मोरू देशाचा आदर्श नागरिक झाल्यामुळे देशातील इतर नागरिकांची फारच पंचाईत होऊ लागली. मोरूच्या सद्वर्तनामुळे इतर व्यक्तींच्या दुर्वर्तनाच्या घटनादत्त अधिकारावर गदा येऊ लागली. संत्रस्त लोकांनी अखेर कोर्टाचा दरवाजा ठोठावला. मोरूच्या वर्तनामुळे आमच्या तहहयात बेजबाबदारीने वागण्याच्या मानवी हक्काची पायमल्ली होत आहे, हा त्यांचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला आणि मोरूला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली...
मोरूचा बाप समूळ हादरला आणि एकेदिवशी त्याने लेखकाच्या पायावर लोळण घेतली, ‘‘साहेब, वाचवा माझ्या लेकाला.’’
‘‘मला बाजूला ठेवून सगळे निर्णय तुमचे तुम्ही घेतलेत वडीलपंत. आता मोरोपंतांना मी कसा वाचवू?’’
‘‘पण, तो तर आदर्श नागरिक बनला होता, साहेब.’’
‘‘पण, कोणत्या समाजात? इथे बहुसंख्या कोणाची? अहो, हे आदर्श वर्तन वगैरे नववर्षाचे संकल्प सोडण्यापुरतं असतं. एक जानेवारीला सोडलेला संकल्प दोन जानेवारीला ‘सोडायचा’ असतो.’’
‘‘चूक झाली साहेब. हवी ती शिक्षा द्या. पण, माझ्या सोन्यासारख्या मुलाचं आयुष्य बरबाद होऊ देऊ नका.’’
‘‘असं म्हणता? ठीकाय. आता मी तुम्ही घडवलेल्या कहाणीचा शेवट बदलतो. यापुढे मात्र काळजी घ्या,’’ असं दरडावून लेखकरावांनी मोरूच्या गोष्टीचा शेवट पुन्हा लिहायला घेतला...
मोरूच्या वर्तनामुळे या लोकशाही देशातील बहुसंख्य नागरिकांच्या बेजबाबदारीने वागण्याच्या मानवी हक्काची पायमल्ली होत आहे, हा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला आणि मोरूची रवानगी काळ्या पाण्यावर तुरुंगात झाली..
..ही शिक्षा ऐकून घाबराघुबरा झालेला मोरू जिवाच्या आकांताने ओरडला आणि खाड्कन जागा झाला, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपल्याला हे भयंकर स्वप्न पडलं होतं. ती १ जानेवारीची सकाळ होती आणि मोरूच्या बापाने पिऊन टर्र्र झालेल्या मोरूच्या कंबरडय़ात लाथ घालून त्याला उठवलं होतं..

(27/12/09)

No comments:

Post a Comment