रुचिका गिरहोत्रा आज जिवंत राहिली असती, तर ती 34 वर्षाची असती.तिच्या कुटुंबाचा सामाजिक स्तर पाहता तिची केस लढणारी तिची मैत्रीण आराधना हिच्याप्रमाणेच आज तीही परदेशात स्थायिक झालेली सुखवस्तू एनआरआय गृहिणी झाली असती. कोण जाणे, कदाचित ती भारताची- सानिया मिर्झाच्या आधीची- टेनिस स्टारही बनली असती. या आणि अशा सगळ्या सुखान्त शक्यता वयाच्या १७व्या वर्षी तिने केलेल्या आत्महत्येने कायमच्या नष्ट करून टाकल्या.
(30/5/10)
तिचे वडील, भाऊ, मैत्रीण, हितचिंतक तिच्या मृत्यूपश्चात एवढी वर्षे तिची केस लढतायत. तिचा विनयभंग करणारा आणि तिच्या कुटुंबाचा छळ करून तिला आत्महत्येला प्रवृत्त करणारा हरयाणाचा माजी पोलिस महासंचालक एसपीएस राठोड याला धडा शिकवण्याचा चंग त्यांनी बांधलाय. एवढं घृणास्पद कृत्य केल्यानंतरही राठोडच्या चेहऱ्यावर मिजासखोर आणि निर्लज्ज हसू झळकत असतं. रुचिकाचा विनयभंग केल्याच्या प्रकरणात त्याची शिक्षा वाढवून न्यायालयानं ते हास्य काहीसं फिकं केलंय. रुचिकाला आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या प्रकरणातही त्याला दोषी ठरवणारा निकाल मिळवून रुचिकाचे कुटुंबीय आणि हितचिंतक ते मग्रूर हास्य संपूर्णपणे पुसून टाकण्यात यशस्वी होतीलही.
पण, त्यानं काय होणार आहे?
त्यानं त्यांच्या चेह-यावर निखळ हास्य झळकणार आहे का?
‘रुचिका आपल्यात असती तर,’ या विचाराचा सल संपणार आहे का?
रुचिकाचं आयुष्य परत मिळणार आहे का?
खरंतर, रुचिका जिवंत राहणं फारसं अवघड नव्हतं.
किंबहुना ते अगदीच सोपं होतं.ज्यायोगे ती जिवंत राहिली असती, असे दोन प्रमुख मार्ग होते.
पहिला मार्ग होता कॉम्प्रमाइझ. तडजोड. समझोता.
राठोडशी आणि आपल्या नशिबाशी तडजोड.
नाहीतरी राठोडने फक्त विनयभंगच केलाय, असतात अशी विकृत माणसं. थोडक्यात निभावलं म्हणायचं आणि उलट देवाचे आभार मानायचे.अहो असे काही लाख विनयभंग मुंबईच्या लोकलमध्ये, प्लॅटफॉर्मवर, रस्त्यांवर रोज होत असतात. इथल्या सगळ्या बाया काय आत्महत्या करतात की काय?अगदीच राग आला तर मुंबईत खेटणाऱ्याचं बखोट धरून त्याची खेटरानं पूजा बांधता येते. कारण, सहसा तो तसा सडकछापच असतो.पण, इथे राज्याची अख्खी पोलिस यंत्रणा ज्याच्या दावणीला, असा वरिष्ठ पोलिस अधिकारीच खेटला म्हटल्यावर ‘आपल्या वडिलांच्या वयाचा आहे’ असं म्हणून माफ करायचं. आपल्यालाही क्षमाशील झाल्याचा आध्यात्मिक आनंद. किती सोपा उपाय होता.
तो केला असता तर खटलेबाजी झाली नसती.
चौकशा झाल्या नसत्या.
सरकारला राठोडवर कागदी कारवायांचे आदेश काढावे लागले नसते.
पिसाटलेल्या राठोडने आणि त्याच्या खाकी वर्दीतल्या गुंडांनी एखाद्या माफिया टोळीप्रमाणे रुचिकाच्या कुटुंबियांचा भयंकर मानसिक छळ केला नसता.आपल्यापायी आपल्या कुटुंबाला भयानक त्रास सहन करावा लागतोय, या अपराधाच्या टोचणीनं रक्तबंबाळ झालेल्या रुचिकानं अखेर विषप्राशन करून या यातना संपवण्याचा निर्णय घेतला नसता.साधंसं सिंपलसं कॉम्प्रमाइज केलं असतं, तर आज रुचिका जिवंत असली असती.
ज्यायोगे रुचिका वाचली असती, असा दुसराही मार्ग होता.
कठोर कायदेशीर कारवाईचा.
रुचिकाचा विनयभंग राठोडनेच केला, हे कायद्याने सिद्ध झाल्यावर सरकारने राठोडला ताबडतोब ताब्यात घेतलं असतं. त्याचा हुद्दा, उपयुक्तता वगैरेंचा विचार न करता, त्याला पाठिशी न घालता, कोणतीही दिरंगाई न करता त्याच्यावर वेगाने कारवाई केली असती, तर राठोडला विनयभंगाची (आज उतारवयात भोगावी लागली तीच) शिक्षा झाली असती. ती त्याने कायद्याचा मान राखून निमूट भोगली असती. त्या शिक्षेचा त्याच्या सेवेवर जो दुष्परिणाम झाला असता, तो त्याने शांतपणे स्वीकारला असता, तर रुचिकाला ‘न्याय’ झाल्याचं समाधान मिळालं असतं. पुढची कोणतीच गोष्ट घडली नसती आणि आज रुचिका जिवंत असती. यातला दुसरा पर्याय रुचिकाने निवडला आणि ती फसली.तिने भारतीय समाजव्यवस्थेवर, प्रशासनव्यवस्थेवर आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवला, तिथेच ती फसली.कदाचित अत्यंत आध्यात्मिक वगैरे असल्याच्या बाता मारणाऱ्या या दांभिकांच्या देशात राठोडसारखा नराधम कर्मविपाकाच्या सिद्धांताने शिक्षा भोगायला तयार होईल, असा भाबडा भ्रमही तिला झाला असेल.‘चूक झाली, तर शिक्षा होतेच’ असा या देशातला कायदा असेल; पण रिवाज नाही, हे तिच्या लक्षात आलं नाही.सगळ्यात मोठी चूक तिने सामान्य माणसांवर विश्वास टाकून केली. एखाद्या मुलीची छेड काढणा-याला रस्त्यात बेदम चोपणारा जमाव तिने पाहिला असेल. तो तिला सामाजिक शौर्याचा संकेत वाटला असेल. प्रत्यक्षात सगळीकडे मार खाणारे नेभळट लोक कोणीही एकटा सापडला की हात साफ करून घेतात, हे झुंडीचं मानसशास्त्र तिच्या लक्षात आलं नसणार. राठोड असा कधीच एकटा असणार नव्हता.बलाढय़ प्रशासन आणि नृशंस पोलिस यंत्रणा त्याच्याबरोबर कायम असणार होती.असा माणूस दिवसाढवळ्या खून पाडून समोर आला तरी पब्लिक पिवळ्या पार्श्वभागावर एक हात ठेवून दुस-या हाताने सलाम ठोकते, हे तिच्या लक्षात कसं आलं नाही!या बावळटपणाची सजा तिनं आणि तिच्या कुटुंबानं पुरेपूर भोगली.एका साध्या सरळ मध्यमवर्गीय कुटुंबाची हळूहळू सालटी काढत राहण्याचा खेळ राठोड आणि त्याची गुंडावळ सावकाश, मजा घेत खेळत राहिली. कायद्याने बरोबर असलेली रुचिका एकटी पडत गेली.कायदा फाटय़ावर मारणारा राठोड गुन्हा करून उजळ माथ्याने यशाची एकेक पायरी चढत गेला. त्या काळात हजारो सामान्य माणसं त्याच्या संपर्कात आली असतील. त्याचे तळवे चाटून उपकृत झाली असतील. त्याला सभा-समारंभांना बोलावून धन्य झाली असतील. त्यांच्याही घरी रुचिकाच्या वयाच्या शाळकरी मुली असतील. पण, आपल्या मुलीच्या वयाच्या मुलीवर हात टाकणाऱ्या या नराधमाची सावलीही नको, असा बाणेदारपणा कोणीही दाखवला नसेल. राठोड काय एकटा आहे की काय?असे कितीतरी राठोड आपल्या आसपासच्या उच्चासनांवर बसून ते किळसवाणं विकट हास्य करीत असतात. त्यांचं आपण काय वाकडं करतो?रुचिकाच्या जागी आपली मुलगी असती, तर आपण काय केलं असतं? कोणता मार्ग सुचवला असता?
पहिला की दुसरा?
स्वत:च स्वत:ला प्रामाणिकपणे उत्तर दिलंत, तर हेही कळून चुकेल की आपल्यासारख्या भेकड, दुटप्पी आणि नादान माणसांच्या समाजात जन्मली नसती, तर रुचिका आज जिवंत असती.(30/5/10)
No comments:
Post a Comment