Sunday, February 13, 2011

भारत कधी कधी क्रिकेटप्रेमींचा देश आहे!

‘भारत ही नजीकच्या भविष्यातील महासत्ता आहे,’ या विधानाइतकंच फोकनाड आणि हास्यास्पद विधान दुसरं कुठलं असेल?
 
‘भारत हा क्रिकेटप्रेमींचा देश आहे,’ हे ते विधान.
 
कमाल झाली! भारतात क्रिकेट हा धर्म आहे. आता वर्ल्ड कप आणि नंतर आयपीएलच्या निमित्तानं देशात फक्त क्रिकेट आणि क्रिकेटचंच वारं वाहतंय. जगातल्या 193 ते 195 राष्ट्रांपैकी जेमतेम 16 (खरेतर दहाच) राष्ट्रांत जो खेळ खेळला जातो, त्यातल्या खेळाडूंना या देशात डायरेक्ट देवत्व बहाल केलं जातं. या देशाची क्रिकेट संघटना देशाच्या सरकारला जुमानत नाही. आपला संघ हा ‘देशाचा’ संघ नाही, असं प्रतिज्ञापत्रावर लिहून देते आणि तरीही इथले रसिक या खासगी संघटनेच्या खेळाडूंना देशाचे प्रतिनिधी मानते. या खेळाची अतिधनाढय़ आणि अतिबलाढय़ अशी संघटना देशातील कोणताही कर चुकवू शकते. त्याबद्दल एकाही ‘रसिका’ची तक्रार नसते. इतक्या (‘गोमय’च्या चालीवर) क्रिकेटमय झालेल्या देशाला ‘क्रिकेटप्रेमी’ म्हणायचं नाही?
 
लाहौल विला कुव्वत (किंवा ते जे काही असेल ते)!..
 
..हा क्रिकेटचा, क्रिकेट गॉड सचिनचा, सर्व क्रिकेटप्रेमी, क्रिकेटोद्योगी, क्रिकेटमंत्री काकांचा, एवढंच नव्हे तर संपूर्ण देशाचा अपमान आहे!
 
शेम शेम!
 
सबूर, सबूर!
 आपण खरोखरीच क्रिकेटप्रेमींचा देश आहोत, तर खेळ सुरू असताना मैदानात नेमकं काय चाललं आहे, यातलं या देशात कितीजणांना, किती कळतं?
फारच अवघड टेस्ट आहे ही. खरंखोटं सिद्ध करायला कठीण.
 
मग, त्यापेक्षा एक सोपं काम करूयात.
 
‘वर्ल्ड कप’च्या निमित्तानं टीव्हीवर गळक्या नळातून पाणी वाहावं तशा धो धो सुरू असलेल्या जाहिरातींवर एक नजर टाकूयात.
 
***
जाहिरात क्र. 1 :
या तीन जाहिराती आहेत. एक तरुण नटी आणि दोन तरुण नट त्यात स्वतंत्रपणे नाचताना दिसतात.
 
सो व्हॉट! ते जिथे तिथे नाचतच असतात. त्याचेच त्यांना पैसे मिळतात. यात प्रॉब्लेम काय?
 
प्रॉब्लेम इतकाच आहे की या नाचाच्या स्टेप त्यांच्या वर्ल्ड कपच्या नाचाच्या स्टेप्स आहेत. ते प्रेक्षकांना विचारतात, तुमची स्टेप काय असेल, ते कळवा आणि काय ते दगडगोटे जिंका.
 
तरीही प्रश्न तोच, प्रॉब्लेम काय?
 
प्रश्न असा आहे की मुळात एखाद्या स्टेडियममध्ये 50 हजार आसनं असतील, तर त्यातली पाचेक हजारच सामान्य क्रिकेटरसिकांच्या वाटय़ाला येतात. बाकीची स्पॉन्सर, क्रिकेट संघटना आणि फुकट पासातले व्हीआयपी-व्हीव्हीआयपी यांच्या घशात जातात. आता एखाद्या खेळाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतल्या सामन्याचं इतकं दुर्मीळ असलेलं तिकीट मिळाल्यानंतर प्रेक्षक स्टेडियममध्ये कशाला जातात?..
 
खेळ पाहायला की नाच करायला?
 
‘खेळ पाहायला’ असं उत्तर देण्याआधी एकदा कोणत्याही वन डे किंवा आयपीएल किंवा तत्सम उठवळ सामन्याचं तिकीट मिळवून स्टेडियममध्ये फेरी मारा. समोर मैदानात काय चाललंय, याकडे सलग साडे तीन सेकंद जरी लक्ष देता आलं ना, तर बोला.
 
त्यामुळे, क्रिकेटरसिक स्टेडियममध्ये कशाला जातात, या प्रश्नाचं खरं उत्तर ‘नाच करायला’ असंच आहे.
***जाहिरात क्र. 2
हाही अनेक जाहिरातींचा बंच आहे. यात कुणी विहिरीवरचा पंप चालू करणारा इसम ज्या तऱ्हेने हात फिरवतो, ते पाहून ढोणीला हेलिकॉप्टर शॉट सुचतो. कुणीतरी एका शीतपेयाचा कॅन विशिष्ट प्रकारे धरून हरभजन सिंगला ‘दूसरा’ कसा टाकायचा, याची आयडिया देतो.
 
एखाद्या खेळाडूची सिग्नेचर अ‍ॅक्शन सुचणं, घटणं, हे इतकं फुटकळ आहे? खेळातील प्रतिभेला असा दैवी स्पर्श लाभायला अफाट गुणवत्ता लागते, खेळाचा ‘रियाझ’ लागतो आणि त्याआधी प्रचंड घाम गाळायला लागतो.
 
हे त्या सगळय़ा कष्टांचं फुटकळीकरण नाहीये?
 
यात खेळाचा, खेळाडूचा, देशाचा अपमान नाही होत?
 
***
जाहिरात क्र. 3
ही जाहिरात तर भयंकर संतापजनक आहे. कारण, इथं साक्षात क्रिकेटच्या देवानं पैशासाठी स्वत:ला पणाला लावलेलं आहे.
 
या जाहिरातीत वर्ल्ड कपची मॅच सुरू आहे, त्यात बोलरची बोलिंग अ‍ॅक्शन पूर्ण होत नाही कारण फलंदाज देव क्रीझमधून बाहेर येतात, का तर मैदानात सोफा टाकून आडव्या बसलेल्या कोणा एका पोपटरावाच्या आड कुणीतरी येतं, त्याला मॅच दिसत नाही. नंतर देव एक धाव पूर्ण करायचे थांबतात, कारण पोपटरावाला मोबाइलवर फोन आलेला आहे. त्यांचं संभाषण पूर्ण झाल्यावर धाव पूर्ण होते. ‘देवा’ला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कारही पोपटरावाशिवाय स्वीकारावासा वाटत नाही. कारण, हा जो कोण पोपटराव आहे तो कोणत्या तरी तेल कंपनीचा ‘वर्ल्ड कप का हीरो’ आहे!
 
आहे ना गंमत?
 म्हणजे आपल्या देशात जो कोटय़वधीजणांच्या आयुष्याचा हीरो आहे; ज्याच्या प्रत्येक कृतीवर, विधानावर स्तुतीसुमनांची उधळण करण्यासाठी स्वर्गात देवदेवतांची दाटीच व्हायची बाकी असते; ज्याने दारूची जाहिरात नाकारली, याबद्दल दाटून आलेल्या देशव्यापी कौतुकाच्या महापुरात- तो तेवढय़ाच घातक आणि लहान पोराबाळांनाही उपलब्ध असलेल्या शीतपेयाची जाहिरात करतो ही- गैरसोयीची वस्तुस्थिती वाहून जाते; ‘वर्ल्ड कप जिंकायचा तो देशासाठी’ असे म्हणण्याची खेळाडूंना गरजच नाही, ते मुळातच देशाचे नव्हे ‘बीसीसीआय’चे खेळाडू आहेत- पण त्यांच्यात ‘वर्ल्ड कप जिंकायचा तो सचिनसाठी’ असं सांगण्याची अहमहमिका चालली आहे, तो ‘वर्ल्ड कप का हीरो’ नाही, तर कुठलं तरी कूपन खरवडून जुगारी नशिबाचा डाव जिंकणारा कुणीएक ‘पोपटराव’ ‘वर्ल्ड कप का हीरो’ आहे?
हा क्रिकेटचा, देशाचा, (खेळातल्या) देवाचा अपमान नाही?
 हे सगळं ‘वर्ल्ड कप’च्या नावाखाली घडणार आणि तरीही तुम्ही म्हणणार की आपला देश ‘क्रिकेटप्रेमीं’चा देश आहे?(चित्र : प्रदीप म्हापसेकर)
(13/2/11)

No comments:

Post a Comment