Thursday, February 10, 2011

कांदा, रिक्षा आणि वायझेड

‘‘च्यामारी, गुरंसुद्धा तोंड लावणार नाहीत, असा कांदा खायची वेळ आलीये रे आपल्यावर,’’ डोळ्यांत (एकीकडे कांदे चिरत असल्यामुळे आणि चिरत असलेले कांदे ऑल्मोस्ट सडके असल्यामुळे) आलेलं पाणी बाहीनं टिपत मी म्हणालो.
‘‘राँग एक्स्प्रेशन,’’ सोफ्यावर आरामात रेलून पेपरात डोकं खुपसून बसलेला वायझेड खेकसला, ‘‘गुरं कांद्यांना मुळातच तोंड लावत नाहीत. तो त्यांच्यासाठी विषारी असतो. कुत्र्यांना तर कांद्यामुळे हिमोलायटिक अ‍ॅनिमिया होतो. त्यातून कुत्र्यांना थकवा येतो..’’
‘‘बास बास बास, आता मला थकवा येतोय..’’ चिरलेला कांदा बेसनात घोळवत शरणचिठ्ठी जाहीर केली. प्रचंड ज्ञानाबरोबरच फुटकळ माहितीचाही चालताबोलता कोश असलेल्या वायझेडसोबतचा सहवास सुकर करण्याचा तो एकमेव मार्ग होता. वायझेड म्हणजे यशवंत झाडबुके. उमर चालीस की, लुक पैंतालीस का. भक्कम यष्टी, खुरटी दाढी-मिशी, खर्जदार आवाज आणि अस्ताव्यस्त अवतार. एकटा जीव सदाशिव. ‘वायझेड’ हे लघुनाम सार्थ करण्याची त्याची स्वत:शीच स्पर्धा सुरू असते. त्याला कुठेशी नोकरीही आहे म्हणे! पण, हा कामावर आला तर याची बडबड ऐकून कामगार एखादी मिनी राज्यक्रांती घडवून आणतील, त्यापेक्षा त्याला मुक्तपणे गाव फिरू देण्यातच कंपनीचं हित आहे, हे मॅनेजमेंटच्या वेळीच लक्षात आल्यामुळे वायझेड देवाला सोडलेल्या वळूप्रमाणे कधीही, कुठेही टपकतो. शिंगंही मारतो.
आताही त्यानं ते मारलंच. ‘‘हे सगळे कांद्याबिंद्याचे टिपिकल मध्यमवर्गीय लाड आहेत तुमचे. सडका आहे ना कांदा, मग नका ना खाऊ! तुम्हाला काय आदेश आहे का कोणाचा की दिवसात तीन कांदे खाल्लेच पाहिजेत. नॉन्सेन्स.’’
हे सगळं शहाणपण कोण सांगत होता, तर ज्याने रविवारच्या सुटीच्या दिवशी आगाऊ काहीही न कळवता घरात थडकून ‘‘तुझ्या हातची मस्त गरमागरम कांदाभजी बनव मित्रा. गाडीवर बारा रुपये प्लेट झालीये. परवडत नाही,’’ असं फर्मान सोडल्यामुळे घरात अक्षरश: औषधापुरत्या वापरल्या जाणाऱ्या कांद्यांची बेसनपीठात घोळून तापत्या तेलात आहुती पडत होती, तो इसम! ही विसंगती वायझेडच्या लक्षात येणं शक्य नव्हतं.
‘‘अरे पण लेका, कांद्यासारखा जीवनावश्यक पदार्थ महागला, तर लोकांनी खायचं काय?’’
‘‘कांदा जीवनावश्यक नाही. जैन-मारवाडी कांदा-लसूण खात नाहीत. ते मेलेत का?’’
‘‘ओके. ओके. पण, कांदा किमान आवश्यक तर आहेच ना?’’
‘‘नॉट नेसेसरी. मला सांग. बिनकांद्याचं काही बनतच नाही का? ते खायला मनाई आहे का? आँ आँ भज्याऑत्मझल्याय,’’ बकाणा भरलेल्या तोंडातून निघालेल्या शेवटच्या उद्गारांचा अर्थ ‘भजी उत्तम झाल्येत’ असा होता. ‘‘अरे, हल्ली दर वर्षी हवामानाचा काही ना काही लोच्या होतोच. त्यातून या वर्षी आंबा नाही, त्या वर्षी द्राक्षं खलास, कधी कोथिंबीर महाग, कधी डाळी कडाडल्या, असले प्रकार सुरूच असतात. कांदा आणि बटाटा हे तर दरवर्षी कधी प्रचंड महागतात, तर कधी सडून फेकले जातात. त्यांना काळं कुत्रंही विचारत नाही.’’
‘‘कसं विचारणार, त्याला हिमोलायटिक अ‍ॅनिमियाची भीती नाही का? हॉ हॉ हॉ..’’ वायझेडसमोर केलेल्या विनोदाला आपणच हसायचं असतं. दुस-यांच्या विनोदालाही हसायचं असतं, हे अजून त्याच्या वाचनात आलेलं नाहीये बहुतेक.
‘‘फालतू ज्योक मारू नकोस. पॉइंट लक्षात घे,’’ वायझेड खेकसला, ‘‘ज्या वस्तू उपलब्ध नसतील किंवा कायच्या काहीच दुर्मीळ झाल्या असतील, त्यांच्याशिवाय जगायची कलाच विसरून गेलोय आपण. अगदी आपल्या लहानपणापर्यंत ही कला जिवंत होती आपल्या समाजात. सगळ्या प्रकारच्या अभावांनी शिकवली होती ती. तांदळाच्या प्रदेशात गव्हाचा पदार्थ हे पक्वान्न होतं आणि गव्हाच्या प्रदेशात सणासुदीलाच भात शिजायचा. पण, त्यात गंमत होती. एखाद्या गोष्टीचा सीझन येण्याची वाट पाहण्यात आणि सीझन आला की तिच्यावर तुटून पडण्यात वेगळाच मजा होती. आता कलमं करून, झाडांची जीन्स बदलून बारमाही बेचव फळ द्यायला लावतात. ते जमलं नाही तर पदार्थ बर्फात साठवून बारा महिने तेरा काळ अ‍ॅव्हेलेबल करून देतात. अशा सदोदित उपलब्ध गोष्टीतली गंमत संपून जाते, हे लग्न करूनही तुम्हा लोकांच्या लक्षात येत नाही, हीच एक गंमत आहे.’’
‘‘हे तुझं सीझनल तर्कट मान्य केलं तरी ते बारा महिने लागणाऱ्या कांद्याला कसं लागू पडतं ते मला कळलं नाही. थोडक्यात तुझं म्हणणं असं आहे की कांदे मिळत नसतील, लसूण महागले असतील तरी गप्प बसावं. ते वगळून जेवण बनवून खावं आणि मुख्य म्हणजे कशाहीसाठी सरकारला धारेवर धरूच नये.’’ तो ‘लग्ना’चा घाव अंमळ वर्मीच बसल्यामुळे आवाजात धार आली होती.. ती वायझेडनं लगेच बोथट केलीच, ‘‘अरे, कमाल करतोस तू? सरकारचं काय कांद्याचं शेत आहे का की कांदे-बटाटय़ाचा गाळा? तुला कांदे न मिळण्याशी सरकारचा संबंध काय? आणि तुम्हाला कांदे-बटाटे-डाळी-साखर-गॅस पुरवणं, हे सरकारचं प्रमुख काम आहे का? दोन वेळचं साधं अन्न हेसुद्धा ज्यांच्यासाठी दुर्मीळ पक्वान्न आहे, असा केवढा मोठा वर्ग आहे, या देशात. त्याच्यासाठी काय करताय, याबद्दल सरकारला धारेवर धरता का तुम्ही? तुम्हा सगळय़ा मध्यमवर्गीयांना स्वत:पलीकडे आणि आपल्या कांदे-रिक्षांपलीकडे काही दिसत नाही. यात सरकारचा फायदाच आहे. तेही तुम्हाला या फुटकळ गोष्टींमध्ये गुंतवून ठेवतं. खरे कळीचे प्रश्न तुम्हाला कधी पडूच नयेत, याची ही व्यवस्था असते.’’
‘‘हे मात्र ‘टू मच’ झालं हां वायझेड? कांद्याचं ठीक होतं, पण, रिक्षालाही कांद्याच्या पंक्तीत बसवतोस तू? अरे, आज मुंबईच्या सगळ्या उपनगरांमधलं आयुष्य रिक्षावर अवलंबून आहे. शेअर रिक्षा असतात म्हणून लोक उपनगरांमध्ये लांबपर्यंत घरं घेतात. रिक्षाच्या शेअरिंगच्या भाडय़ामध्ये दुपटीनं वाढ व्हायला लागली, तर सामान्य माणसांनी करायचं काय?’’
‘‘बसने जायचं.’’ वायझेड थंडपणे म्हणाला.
‘‘बसच्या किंवा एसटीच्या रांगेत उभा कधी राहिलायस शेवटचा? अवस्था पाहिलीस का त्या लाल डबडय़ांची?’’
‘‘तेच म्हणतोय मीही. तुझा प्रॉब्लेम बस किंवा एसटी हा आहे. रिक्षा नव्हे.’’
‘‘म्हणजे काय?’’
‘‘म्हणजे असं आहे मित्रा की रिक्षा हे कितीही सार्वजनिक मानलंस तरी एक खासगी वाहन आहे. ती विकत घेणारा, चालवणारा माणूस हा त्याकडे व्यवसाय म्हणून पाहतो आणि कोणताही व्यवसाय नफ्यावर चालतो. तो नफा कमावण्याचाच प्राधान्यानं विचार करणार. नीट आठवून बघ. रिक्षा जेव्हा शेअरिंगची नव्हती, तेव्हा ती चैन होती. आपण अधूनमधून, तशी निकड असली, तरच रिक्षात बसायचो. असं चैनीचं वाहन तुम्ही भले शेअरिंगच्या युक्त्या लढवून तुमच्या समाजाचं प्रायमरी वाहन बनवाल, तर प्रॉब्लेम होणारच ना. तुम्हाला चोख ‘सेवा’ देण्याची खरी जबाबदारी बस आणि एसटीवाल्यांची आहे. ते ती पार पाडतात का? त्या यंत्रणा सक्षम आहेत का? याकडे कोण पाहणार? तुम्हाला सरकारला धारेवर धरायचंच असेल ना, तर यासाठी धरा, लोकप्रतिनिधींना जाब विचारा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारून घ्या. त्यासाठी सर्वात आधी एसटी-बसने प्रवास करायला सुरुवात करा. रिक्षावाल्यांच्या मागे लागून वेळ कशाला वाया घालवता. रिक्षा ही पोलिसांची, आरटीओवाल्यांची आणि पुढारी मंडळींची दुभती गाय आहे.. तुम्हा प्रवाशांचं काम फक्त तिला चारा घालायचं..’’भरतवाक्य उच्चारताना भजीचं शेवटचं पोर तोंडात टाकून वायझेड उठला आणि सॅक खांद्याला अडकवत थेट दाराकडे निघाला..
‘‘काय रे, निघालास?’’
‘‘येस बॉस, कांद्याची भजी खाऊन झालीच आहे. आता डिनरला गार्लिक चिकन चापायला अवच्याकडे जायचंय.. रिक्षा मिळायला हवी ना!!!’’

(चित्र : प्रदीप म्हापसेकर)

(12/12/10)

1 comment: