अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश उर्फ 'डुब्या' (बुशना इतक्या प्रेमानं 'डुब्या' म्हणणाऱ्या अमेरिकनांना 'ये भिडू अपुन को ले डुब्या' हे कसं काय कळत नाही?) यांनी सोमवारी नवा पराक्रम केला. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ या अमेरिकेच्या भेटीवर आल्या असताना बुश यांनी महाराणींकडे पाहून डोळा मिचकावला... म्हणजे, शुध्द मराठीत डोळा मारला. जगातल्या एकमेव महासत्तेच्या महासत्ताधीशाच्या या मर्कटलीलांनी राणीसाहेबांचं काही मनोरंजन झालं नाही... त्यांनी अतिशय थंडगार नजरेनं बुशमहोदयांकडे पाहिलं, तेव्हा बुशमहोदय म्हणाले, ''राणीसाहेबांनी माझ्याकडे, एखाद्या मातेनं मुलाकडे पाहावं, तशा नजरेनं पाहिलं.'' यात चूक तरी काय म्हणा! जिला या डुब्यासारख्या गुणी पुत्राचा लाभ झाला असेल, त्या मातेनं या पुत्राकडे बहुतेक वेळा याच नजरेनं पाहिलं असणार... आणि वटारलेले डोळे हीच मातेची नजर अशी बुशबाबांचीही समजूत झाली असणार.
या घटनेचे पडसाद नेहमीप्रमाणे आमच्या बटाटा अपार्टमेंटमध्ये उमटलेच. सोकरजीनाना त्रिलोकेकर म्हणाले, ''साला, इडियटच दिसतो हा बुश. प्रेसिडेंट कोणी केला रे याला. साला डोळा मारायचा, आयविंकिंग करायचा तर समोर तसा अट्रॅक्टिव पीस नको. इतक्या ओल्ड लेडीकडे पाहून डोळा मारतो म्हंजे...''
नाडकर्णी म्हणाले, ''मला तरी हा सादासुदा प्रकार वाटत नाय हां. कायतरी डाव असणार त्या बुशचा. एवढया मोठया देशाचा अध्यक्ष तो, कधी कुठे काय करायचं याचा0 मिनिटामिनिटाचा हिशोब असणार त्याचा. तो काय उगाच डोळा मारील?''
कोचरेकर मास्तर म्हणाले, ''मला फार आश्चर्य वाटतं हो. आमच्याकडे असं कुणी केलं असतं, तर आतापर्यंत बोंबाबोंब झाली असती. बुशच्या प्रतिमा जाळल्या असत्या. अमेरिकेचे झेंडे पेटले असते. पण, या ब्रिटिशांना महाराणीच्या अपमानाचं काही सोयरसुतक नाही.''
''अहो कसे असेल, मी म्हणतो कसे असेल'', पावशेअण्णांनी तोंड घातलं, ''मिंधे झालेत ते अमेरिकेचे. त्या टोनी ब्लेअरनी बुशपुढे किती लोटांगणं घातलीत, ते पाहिलं नाहीत कधी?''
बाबूकाका खरे धीरगंभीर आवाजात म्हणाले, ''अहो, त्या बुशच्या अभिनंदनाचा ठराव केला पाहिजे आपल्या हिंदुस्थानच्या संसदेनं.''
''काय मॅड झाला काय रे हा खऱ्या.'' त्रिलोकेकर.
''अहो, दीडशे वर्षं गुलामगिरीत पिचलो आपण त्या राणीच्या. ब्रिटिशांनी अनन्वित अत्याचार केले या भारतवर्षावर. हालहाल केले आमच्या स्वातंत्र्यवीरांचे. त्याचा बदला आमच्या बुळचट सरकारांना कधी घेता आला नाही. जे आपल्याला जमले नाही, ते त्या बुशने करून दाखवलेच ना!''
इथे चर्चा संपली, हे काय सांगायला हवे.
(महाराष्ट्र टाइम्स)
No comments:
Post a Comment