सांप्रतकाळी महाराष्ट्रात दोन नवे पॅटर्न उदयाला आले आहेत. ‘कडोंमपॅ’ अशा उच्चारता न येणा-या (आणि उच्चारायला गेलं तर लाज वाटायला लावणा-या) नावाचा पहिला पॅटर्न आहे.. त्याला ‘भाऊ, भाऊ मिळून खाऊ’ या अधिक थेट आणि अर्थवाही नावानंही ओळखलं जातं. हा पॅटर्न आत्ता दोन-पाच दिवसांपूर्वीच उदयाला आला, अशी यातील दोन भावांच्या पाठिराख्यांची भोळी समजूत आहे. ती किती खोटी आहे, हे स्पष्ट करणारं दोन भावांचं गुप्त संभाषण आमच्या हाती लागलं आहे. साधारणत: पाच वर्षापूर्वीचं हे संभाषण येणेप्रमाणे :
थोरला : ये राजा, बस.
धाकटा : नको, मी उभाच बरा आहे.
थोरला : नको, तू बसलेलाच बरा आहेस. तू उभा राहिलास की भाषणच करायला सुरुवात करशील की काय, अशी भीती वाटते. हल्ली तर तू नेहमीचं संभाषणही भाषणासारखंच करायला लागलायस.
धाकटा : दादू, तुला खरी भीती कसली वाटते, ते एकदा स्पष्टपणे सांगून टाक ना! मी भाषण करायला सुरुवात करेन आणि आपले सगळे सैनिक माझ्या पाठिशी उभे राहतील, हीच भीती वाटते ना तुला?
थोरला : अरे हट! तुला वाटतात तेवढे आपले सैनिक अडाणी नाहीत. त्यांनाही माहितीये, माझे बाबा हे माझे बाबा आहेत. मी त्यांचा मुलगा आहे. आपल्या धर्मात आणि आपल्या समाजात बापाचा वारसा मुलाकडेच जातो. पुतण्या कितीही मुलासारखा असला, तरी तो त्याला लाभत नाही. आणि तुझ्या भाषणाचीही कौतुकं माझ्यापुढे करत जाऊ नकोस. तीही माझ्या बाबांचीच सहीसही नक्कल करतोस. कॉपीमास्टर.
धाकटा : अरे पण त्यांचे तेजस्वी आणि ओजस्वी विचार माझ्याकडे असतील, तर त्यांचा खरा वारसदार कोण, हेही आपल्या सैनिकांना कळेलच ना?
थोरला : अरे गधडय़ा, त्यांना काही कळलं असतं, तर गेली 30-40 वर्ष आपण त्यांना बोलबच्चन करून उल्लू बनवतोय, हे नसतं का समजलं?
धाकटा : बरोबर आहे. अनुयायी अडाणी असण्याचे फायदे बरेच असले, तरी काही तोटेही असतात. असो. पण तू मला इथं का बोलावलं आहेस?
थोरला : हेच सांगायला की काळ मोठा कठीण आला आहे.
धाकटा : घ्या. अरे, माझी संधी चोरलीस. माझे अधिकार चोरलेस. आता माझे डायलॉगही चोरतोयस? काळ माझ्यासाठी कठीण आलाय. मला साधा शाखाप्रमुख नेमण्याचा अधिकार ठेवला नाहीस. माझा एकही उमेदवार निवडणुकीत उभा करत नाहीस. तोंड बांधून बुक्क्यांचा मार सुरू आहे आणि काळ तुझा कठीण आला? कुठे द-याखो-यांमध्ये, जंगलात फ्लॅश मारून प्राण्यापक्ष्यांना दचकवत फिरत होतास, तो थेट येऊन कार्याध्यक्ष बनून माझ्या बोडक्यावर बसलास आणि काळ तुझाच कठीण आला?
थोरला : थोरल्या भावाबद्दल किती ही कटुता, राजा? अरे, तूच ना रे माझं नाव सुचवलंस कार्याध्यक्षपदासाठी.
धाकटा : (यावर जे बोलतो ते ऐकू येण्याइतकं स्पष्ट असलं तरी न ऐकावं आणि छापू तर बिल्कुल नये, असं अशिष्ट आहे. क्षमस्व.)
थोरला : असा संतापू नकोस. जरा व्यापक विचार कर. एका दुकानाचे दोन भाऊ मालक झाले की काय करतात? एका शेतावर दोन भावांचा हक्क प्रस्थापित झाला की काय करतात?
धाकटा : वाटणी करतात.
थोरला : केलास ना अगदी टिपिकल मराठी माणसासारखा विचार. अरे, यापेक्षा वेगळा विचार करायला तू कधी शिकणार?
धाकटा : तू काय झग्यातून पडलायस का मराठी माणसापेक्षा वेगळा विचार करायला? शिकवतोय मला. तुझी अक्कल पाजळ ना मग.
थोरला : अरे, एका दुकानाचे दोन मालक झाले, तर त्यातल्या दुस-यानं दुसरं दुकान काढावं. एका शेतावर दोघांचा हक्क आला, तर दुस-यानं दुसरं शेत विकत घ्यावं.
धाकटा : अच्छा. म्हणजे आता तू मला हुसकावायला निघालायस! कानामागून आलेला तू पहिला आणि लहानपणापासून घासतोय तो मी दुसरा काय?
थोरला : हे बघ राजा, तुझा स्वभाव जरा जास्त भावनाप्रधान आहे.
धाकटा : ही कोण? सीकेपीच दिसतेय.
थोरला : हे फालतू विनोद तुझ्या कॉपीकॅट भाषणांसाठी राखून ठेव. मी काय म्हणतोय, ते लक्ष देऊन ऐक. राज्यात अडाणी माणसांची संख्या जसजशी कमी होत चाललीये, तसतशी आपल्या पक्षाची अवस्था बिकट होत चाललीये. आपल्या पक्षाच्या हाती सत्ता सोपवल्यानंतर आपण काय दिवे लावले, ते पाहिल्यावर अजूनपर्यंत आपल्याहाती सत्ता सोपवण्याची हिंमत झालेली नाही जनतेची. आपल्या व्होटबँकला गळती लागलीये. तरुण पोरं वेगळय़ा पक्षांकडे आकृष्ट होताहेत. हे सगळं तू रोखू शकतोस.
धाकटा : तू काय मला सेनाप्रमुख होण्याची ऑफर देतोयस की काय?
थोरला : घंटा! अरे मी असेपर्यंत आपल्या पक्षात तुला काहीही फ्यूचर नाही, हे स्पष्टच आहे.
धाकटा : मग मी काय हे तोंडाचं डबडं तुझ्यासाठी वाजवू?
थोरला : नाही. ते तू स्वत:साठी वाजव.
धाकटा : म्हणजे?
थोरला : म्हणजे वाघाचे पंजे, सशाचे कान आणि उंटाची मान! अरे, आपल्या सैनिकांना आपण फुल फिल्मी बनवून ठेवलंय सारखी फुसकी डायलॉगबाजी करून. आता आपण त्यांच्यापुढे ड्रामा उभा करायचा, ‘भाईभाई’, सख्खा भाऊ, पक्का वैरी!
धाकटा : तुला ‘चुलत भाऊ, पक्का वैरी’ म्हणायचंय ना?
थोरला : अरे, तेच रे. माझ्या कारभाराला विटून जे सैनिक बाहेर पडू पाहतील, ते तुझ्या जाळय़ात. जे तुझ्याकडून वैतागून बाहेर पडतील, ते पुन्हा मातृपक्षात, असं त्यांचं बॅडमिंटन करून टाकू. अरे, आपण आपलीही स्पेस व्यापायची आणि आपल्या विरोधकांचीही स्पेस व्यापायची. संकुचित मराठी बाण्याचा आपला जो काही जनाधार उरेल, तो इतर पक्षांकडे जाऊ द्यायचा नाही. एकमेकांमध्येच वाटून खायचा.
धाकटा : यासाठी मला वेगळा पक्ष काढावा लागेल.
थोरला : काढ.
धाकटा : मला सिरीयसली राजकारण करावं लागेल.
थोरला : कर.
धाकटा : मला सकाळी लवकर उठावं लागेल.
थोरला : ऊठ.
धाकटा : पण, मला रात्री लवकर झोपायला जमणार नाही.
थोरला : तो तुझा प्रश्न आहे.
धाकटा : च्यामारी, तुझ्यासारख्या मेंगळटाचा जनाधार कायम राहावा म्हणून स्वतंत्र पक्ष
काढून मी हे एवढे भयंकर कष्ट का उपसायचे?
थोरला : कारण, तसं तू केलंस की तुला मोकळेपणाने मला शिव्या घालता येतील. माझा बसता-उठता उद्धार करता येईल. माझ्याविषयीची सगळी मळमळ सकाळ संध्याकाळ बाहेर काढता येईल. माझ्याविषयी काय वाट्टेल ते बोलता येईल. अरे, या स्वातंत्र्यासाठी तू ही इतकीशी किंमत नाही मोजणार..
धाकटा : ओके, डन. मी स्वतंत्र पक्ष काढणारच!
***
नेमका याच काळात उदयाला आलेला दुसरा पॅटर्न आहे कापुपॅ अर्थात काका-पुतण्या पॅटर्न. यात एक वयोवृद्ध काकांच्या भुजा पिरगाळून त्यांतले बळ पुतण्याने काढून घेतलेले आहे आणि काका हात दुखून ‘का?का? पुतण्या’ असं विव्हळताहेत, असा सीन रचण्यात आला आहे. मात्र, अंदर की बात कुछ और है. त्या दोघांचं गुप्त संभाषणही आमच्या हाती लागलेलं असलं, तरी ते देण्याची गरज नाही. कारण, ‘का?का? पुतण्या’ हा फक्त सीन आहे, त्याच्याआड हे वारसाचं फिक्सिंग आहे, हे न कळण्याइतके या दोघांचेही पाठिराखेही भोळे नाहीत..
आणि आता प्रश्न उपमुख्यमंत्रिपदाचा आहे..
जेव्हा मुख्यमंत्रीपदाची पाळी येईल, तेव्हा ‘बामुपॅ’च वरचढ ठरणार, याची पुतण्यालाही खात्री आहेच..
(चित्र : प्रदीप म्हापसेकर)
(14/11/10)
सर हे वाचत डोळ्यांनी होतो पण मन व्हिज्युअली सर्व प्रसंग पाहत होता...
ReplyDelete