Friday, February 11, 2011

काय राव, बास का राव!

राव ही उपाधी कोणालाही सहसा दोन प्रकारांनी मिळते.
 
एक प्रकार म्हणजे लोक मुलाचं नाव ठेवतानाच त्याला रावची जोड देतात.
 
उदाहरणार्थ खंडेराव.
अशा जन्मजात रावांची सन्मानाची विवंचना बारशालाच मिटते. (विजय कदमांनी पद्मश्री जोशीशी लग्न करून मिटवली तशी. ते कायमस्वरूपी पद्मश्री विजय कदम झाले ना!)
 
ज्यांच्या नावातच राव किंवा राजे हे संबोधन असतं, त्यांना त्यांचे आईवडील लहानपणापासूनच आदरार्थी हाक मारायला लागतात. उदाहरणार्थ: आदित्यराजांनी चड्डी पुन्हा ओली केली वाटतं. सकाळपासून ही चौथी चड्डी. किंवा यापुढे गुणपत्रिकेत भोपळा दिसला, तर ओल्या फोकाने आपला पार्श्वभाग सडकून काढला जाईल हैबतराव. असे लहानाचे मोठे झालेले घरचे राजे आणि राव आपल्या 17 वर्षापूर्वी घेतलेल्या, खुळखुळा झालेल्या सेकंडहँड एम फिफ्टीवर- जणू घोडय़ावर मांड ठोकत असल्याच्या थाटात- टांग टाकतात आणि मग ते आपली गाडी एखाद्या गडाकडे दौडवतात.. कशाला, तर तिथली फेमस खेकडा भजी (कांदाभजीचा एक प्रकार- खेकड्याशी आकारापलीकडे काहीही संबंध नाही) किंवा झुणकाभाकरीवर ताव मारायला आणि मडक्यात विरजलेलं घट्ट दही ओरपायला किंवा त्याचं रुचकर ताक प्यायला! ही राजे-राव मंडळी आईला माँसाहेब आणि वडिलांना आबासाहेब वगैरे हाका मारून आपल्याला फक्त घरातच मिळत असलेल्या सन्मानाची परतफेड करतात! मात्र, अशा जन्मजात रामराजे किंवा रामरावाला घरातल्यांव्यतिरिक्त कोणीही राजे किंवा राव म्हणत नाही. तो बाहेरच्यांसाठी नुसताच राम राहतो. दोस्त कंपनीत तर त्याचा राम्याच होऊन जातो.. राम्याचं नशीब पालटण्याची थोडीशी शक्यता संभवते ती लग्नानंतरच. लग्नानंतर बायको काहीही (म्हणजे रामू डार्लिगपासून रामा गड्यावर खेकसल्यासारख्या रामापर्यंत) हाक मारो, सासरा मात्र मारून मुटकून का होईना, सहसा जावयाला राव तरी म्हणतोच म्हणतो. त्याचाही हा परतफेडीचाच प्रकार असतो. कारण, त्यालाही त्याच्या उभ्या हयातीत सासरा सोडून इतर कोणीही राव म्हटले असल्याची शक्यता कमीच असते.
 
राव बनण्याचा दुसरा मार्ग आहे कर्तबगारीचा.
 
यात दोन उपमार्ग आहेत- एक म्हणजे खरोखरच कर्तबगार बनण्याचा.. तो खडतर आणि कष्टप्रद आहे. शिवाय त्यात मुळात अंगात काही पाणी असावे लागते. अशा कर्तबगार माणसांचे गुणच असे असतात की समाज आपसूकच त्यांना राव म्हणू लागतो. त्यासाठी वयाची अट नसते. मुळात ही माणसे आपापल्या कामांच्या अशा धुंदीत असतात की समोरचा आपल्याला राव म्हणतोय की आणखी काही, याची ना त्यांना दखल असते ना त्याने त्यांना काही फरक पडतो. हे खरे राव!
 
राव बनण्याचा दुसरा प्रकार स्वत: कर्तबगार बनण्याच्या मानाने सोपा आहे- राजहंसाचे चालणे डौलदार म्हणून कावळ्याने चालूच नये का, ही उदात्त विचारसरणी या दुस-या प्रकारच्या रावबाजीत आहे. या प्रकारात आपण विलक्षण कर्तबगार आहोत, असे भासवायचे असते. उदाहरणार्थ यशस्वी कसे व्हावे याचा गुरुमंत्र देणारे कार्यक्रम करणा-यांचे वर्तमानपत्रांच्या जाहिरातींमधले फोटो पाहिलेत का कधी? फोब्र्जच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या कोणाही धनाढ्याच्या किंवा अन्य कोणत्याही क्षेत्रातील गुणाढ्याच्या चेह-यावर कधीच दिसली नसेल, एवढी आढ्यता त्या चेह-यावर असते आणि जोडीला असतो सारे जग जिंकल्याचा तुस्त आविर्भाव. तो पाहिल्यानंतर कोणीही एवढा प्रभावित होऊन जातो की बाबा रे, इतरांना शिकवता यावी एवढी यशप्राप्तीची कला तुला अवगत आहे, तर तू यशस्वीजनांच्या यादीत कसा नाहीस? सवलतीच्या दराने जाहिराती देऊन, तीन तीन तास घसा खरवडून तुला पोट का रे जाळावे लागते? असा सहजसोपा प्रश्नाच मनात येत नाही. अशा प्रकारचे लोक रंकाचे राव कधी होतात आणि रावाचे रंक कधी होतात, हे कोणालाच कळत नाही. या प्रकारातील रावांना आपल्यावर विश्वास ठेवणा-या रावांना रंक आणि रंकांना खंक करण्याचीही कला अवगत असते.
 
राव बनण्याचा तिसरा प्रकार याहून सोपा आहे.
 
तुमचं वय वाढलं, केस पिकले, दात पडले, चेहरा सुरकुतला, नजरेतली गुर्मी उतरून ती मवाळ झाली, मनात महिलावर्गाचे विचार येण्याचे प्रमाण कमी होऊन योगाभ्यासवर्गाचे विचार येऊ लागले की आपोआपच तुमच्या चेह-यावर पोक्तपणा दिसू लागतो. शि-या, मिल्या अशा नावांनी तुम्हाला हाक मारणं समोरच्याला जड जाऊ लागतं आणि तो वयाचा मान म्हणून श्रीपतराव, मिलिंदराव अशा हाका मारू लागतो. या संबोधनाच्या पुढचं वाक्य फारसं आदरयुक्त असण्याची गरज नसते. ते टेबल पुसून घ्या किंवा डोळे फुटलेत का असं कोणत्याही तीव्रतेचं असलं तरी त्याची सुरुवात किंवा शेवट मात्र रावने होतो, हे या रावांच्या आयुष्यातलं एकमेव आनंदनिधान असतं.
 
काही मंडळींची वेगळीच गोची असते. घरगुती परंपरेने, वयाने, कर्तबगारीने किंवा कर्तबगारीच्या आभासानेही त्यांना राव हे संबोधन मिळत नाही. अशी मंडळी मग स्वत:च स्वत:ला राव म्हणवून घेऊ लागतात. असे राव बनणे हे स्वत:च्या वाढदिवसाला स्वत:च्या खर्चाने काल्पनिक मित्रमंडळांकडून पेपरांमध्ये आणि पोस्टरांवर स्वत:चे अभीष्टचिंतन करवून घेण्याइतके केविलवाणे असते. असे राव बनणे हे आपल्या व्हिजिटिंग कार्डावर आपणच आपल्या नावामागे रेडिओस्टार किंवा टीव्हीस्टार अशी उपाधी लावण्याइतके खुळचट आणि प्रख्यात वृत्तपत्रलेखक किंवा लढवय्या संपादक वगैरे मथळय़ांची स्वत:ची लेटरहेड छापण्याइतके विनोदी असते.
 
(लेटरहेडातले नव्हे, खरोखरचे) प्रख्यात लेखक जी. ए. कुलकर्णी असल्या भंपक रावबाजीला गावठी असा शब्द वापरायचे. तो त्यांचा फारच लाडका शब्द होता. त्याचा संबंध ग्रामीणशी नव्हता, तर ग्राम्यशी होता.
 
बरं झालं जी. ए. आता हयात नाहीत.
 
अशाच भंपकबाजीचा सुकाळ आहे.
 
आजच्या काळात लिहिताना त्यांना दर वाक्यात तीनदा गावठी हा शब्द वापरावा लागला असता किंवा लेखनसंन्यास घ्यावा लागला असता.
 
वाचलात गुरुनाथराव, वाचलात! 

(चित्र : प्रदीप म्हापसेकर)
(10/10/10)

No comments:

Post a Comment