Tuesday, February 15, 2011

आम्ही उपरे(च)!


लोक आम्हाला 'मुंबईकर' समजतात...
लोक म्हणजे मुंबईबाहेरचे लोक...
आम्ही राहतो मुंबईच्या उपनगरांमध्ये... म्हणजे मुंबईच्या हद्दीबाहेरच्या लोकल लायनींनी ठरवलेल्या महामुंबईच्या उपनगरांमध्ये... तसा आमचा जिल्हा कुठे ठाणे, तर कुठे रायगड... उर्वरित महाराष्ट्राच्या दृष्टीने ही सगळीच मुंबई...
त्या लोकांचं सोडा, आम्हाला स्वत:लाही आपण 'मुंबईकर' असल्यासारखंच वाटायचं... का नाही वाटणार? आमची निम्म्याहून अधिक हयात मुंबईच्या हद्दीतच जाते... भर सकाळी आम्ही आमचा गाव सोडतो... लोकलच्या गर्दीत स्वत:ला कोंबून घेऊन चिंबत चिंबत मुंबई गाठतो... पोटासाठी. इथे येण्याचा तासदीड तास, जाण्याचा तासदीड तास आणि नोकरीचे आठ तास... हिशोब करा... आम्ही एवढा वेळ मुंबईतच असतो.
पण, आम्ही 'मुंबईकर' नाही...
आम्ही उपरेच आहोत... मराठी असलो तरी परकेच आहोत...
याचा साक्षात्कार आम्हाला अगदी अलीकडेच होऊ लागला... लायटीचा लोडशेडिंगी लपंडाव सुरू झाला तेव्हा... आधी दिवसातून तासदोन तास लाइट जाऊ लागली, मग प्रमाण चारपाच तासांवर गेलं... ज्यांना जमलं त्यांनी इन्व्हर्टर आणले, सोसायटीत जनरेटर बसवले... बाकीचे अंधारातउकाडयात पिचत राहिले... हळूहळू आमचं सगळं जगणंच लायटीच्या असण्यानसण्यानं व्यापून गेलं... आयुष्याची सरळसोट विभागणी झाली... लाइट असतानाचं आयुष्य, लाइट नसतानाचं आयुष्य...
...हे सगळं घडत असताना मुंबई मात्र झगमगत राहिली... होर्डिंगांतून, मॉल्समल्टिप्लेक्सेसमधून, शोभिवंत रस्त्यांमधून उतू जात असल्यासारखी लाइट सांडत राहिली... दिवसरात्र क्रिकेट सामन्यांची चंगळ करत राहिली...
मुंबई आमची राजधानी... देशाची आर्थिक राजधानी... तिला अंधारात राहणं सोसायचं नाही, परवडायचं नाही... त्यामुळे इथे 24 तास विजेचा धो धो नळ चालू... आणि पाण्याच्या नळावर जेवढा अपव्यय होतो, तेवढाच इथेही अपव्यय चालू...
उरलेला महाराष्ट्र 1216 तास अंधारात ढकलला गेलेला असताना मुंबईच्या अंगावरचा एकही झगमगता अलंकार उतरला नाही... उपऱ्या शेठियाभाटियाभय्यांकडून तशी अपेक्षाही नाही... पण, उठसूट 'मराठी, मराठी'चा आपमतलबी आक्रोश करणाऱ्या (आणि व्यवहारात सर्वात कमी मराठी बोलणाऱ्या आणि इंग्रजी शाळांमध्ये पोरांना पाठवणाऱ्या) एकाही नेत्याअनुयायाला अजूनही खऱ्या अर्थाने 'मराठी' असलेल्या उर्वरित महाराष्ट्राचा उमाळा आला नाही... उरलेल्या महाराष्ट्रातूनच निवडून येणाऱ्या नेत्यांनाही आपल्या गावाचा विसर पडलाय... मुंबईत सत्तेच्या उबीबरोबरच रात्रंदिवस वीज भोगण्याचा चस्का लागलाय...
यांच्यातल्या एकाही हरीच्या लालाने कधी 'महाराष्ट्र अंधारात असताना आम्ही एवढी वीज वापरणार नाही. स्वयंस्फूर्तीने काही काळ वीज बंद ठेवू, वीजवापर कमी करू' एवढंही कधी बोलून दाखवलं नाही...
...मुंबईचं महत्त्व आम्हीही जाणतो... पोट भरतो आम्ही इथं... आमच्या राज्याचंच नव्हे, तर राष्ट्राचं भूषण असलेली ही नगरी लोडशेडिंगच्या विळख्यात सापडू नये, अशीच आमचीही इच्छा आहे... पण, महाराष्ट्राचा, मराठीचा जयघोष करणाऱ्यांनी कधी उर्वरित महाराष्ट्राशी सहवेदना दाखवण्यासाठी उत्स्फूर्तपणे 'आम्हीही वीज वाचवू' एवढंही सांगितलं नाही, याची खंत आहे...
पण, खंत कशाला करायची राव!
यातून एवढं ज्ञान तरी झालं की आम्ही मुंबईकर नाही, आम्ही उपरेच आहोत.


(थर्ड आय, महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment