Sunday, February 13, 2011

जिस `टाइम्स स्क्वेअर' नहीं देख्या...


`जिस लहौर (`लाहोर'चा पंजाबी उच्चार) नहीं देख्या, वो जमिया ही नहीं' अशी एक म्हण आहे. ज्याने लाहोर पाहिले नाही, तो जन्मलाच नाही, असा तिचा शब्दश: अर्थ आणि ज्याने लाहोर पाहिले नाही, त्याचा जन्म फुकट, असा भावार्थ.
आपण लाहोर पाहिलेलं नाही. त्यामुळे आपला जन्म नेमका का फुकट गेलाय ते ठाऊक नाही.पण `टाइम्स स्क्वेअर' पाहिल्यानंतर आपला जन्म तितकासा फुकट गेलेला नाही, अशी खात्री पटते. किंबहुना उद्या परग्रहावरून एखाद्या यानातून काही जीव पृथ्वीला झटपट भेट द्यायला आले, तर त्यांना अखिल मानवजातीचे सॅम्पल घेण्यासाठी `टाइम्स स्क्वेअर'मध्ये दोन तास घालवले, तरी ते पुरतील. उरलेली पृथ्वी पाहण्याची गरज उरणार नाही. परतल्यानंतर तेही आपल्या भाषेत आपल्या ग्रहावर सांगतील, `जिस टाइम्स स्क्वेअर नहीं देख्या...'
टाइम्स स्क्वेअरला `क्रॉसरोड्स ऑफ द वर्ल्ड' किंवा जगाचा चौक (किंवा भावार्थाने `तिठा')म्हणतात. न्यू यॉर्क शहरातल्या मॅनहॅटन परगण्यातला हा एक चौकच आहे. जुनं नाव लाँगएकर चौक. चौकातच सुप्रसिद्ध न्यू यॉर्क टाइम्सची `टाइम्स बिल्डिंग' आहे, म्हणून त्याला `टाइम्स स्क्वेअर' म्हणतात. (त्या भागात कोणी गल्लीतील जगप्रसिद्ध समाजसेवक किंवा नगरसेवकाचे वडील, काका वगैरे जन्मले नसावेत. त्यामुळे इतकं रूक्ष नाव देण्याची पाळी आली असणार.) `न्यू यॉर्क टाइम्स'चा मोठेपणा पाहा. `टाइम्स स्क्वेअर' हे नाव जसजसं लोकप्रिय झालं आणि जगातला एक लँडमार्क ठरलं, तसं आपल्या इमारतीचं टाइम्स बिल्डिंग हे नाव बदलून त्यांनी `वन, टाइम्स स्क्वेअर' असं या स्थळाचं मोठेपण मान्य करणारं नाव दिलं. तर अशा या एका चौकाचे एवढे कौतुक काय?
उत्तर हवं असेल, तर न्यू यॉर्कच्या कोणत्याही भागातून टॅक्सी, मेट्रो (म्हणजे इकडची सबवे), लिमो (आलिशान लांबलचक मोटार) किंवा बस पकडायची आणि वेस्ट फॉर्टी सेकंड स्ट्रीट किंवा वेस्ट फॉर्टी सेव्हन्थ स्ट्रीट गाठायची. या दोहोंमधला परिसर म्हणजे टाइम्स स्क्वेअर. कंडक्टेड टूरबरोबर गेला असाल, तर ते दिवसात जेव्हा वेळ होईल, तेव्हा टुरिस्टांची बस टाइम्स स्क्वेअरमधून फिरवतात आणि टाइम्स स्क्वेअर दाखवला, असं म्हणतात. याइतका तद्दन वेडपटपणा दुसरा नाही. हिमालयात गेलात आणि बसमधून बर्फ पाहिलात, तर चालेल का? काशीला गेलात आणि पुलावरून गंगा पाहिली, तर कसं वाटेल? लखनऊला गेलात आणि चिकन-मटणाच्या कबाबांपासून बिर्याणीपर्यंत नाना स्वादांनी महकलेली खाऊ गल्ली नुसतीच पाहिली, तर त्याला काय अर्थ? हिमालयात गेलात, तर बर्फाचा गोळा करून हाणलाच पाहिजे, काशीला गेलात, तर गंगेत पावलं बुडालीच पाहिजेत आणि लखनऊला गेलात, तर खाऊगल्लीत तीन दिवस पुरेल एवढा ताव मारलाच पाहिजे तद्वत टाइम्स स्क्वेअरला गेलात, तर तिथे उतरून चाललंच पाहिजे, भरपूर फिरलंच पाहिजे.
इथे पाऊल ठेवताच पहिल्याछूट एकदम जत्रेत आल्यासारखं वाटतं... टोणग्या वयात पाहिलेली जत्रा नव्हे, लहानपणी भोकरडोळय़ांनी पाहिलेली, रंग-प्रकाशाचं गारूड करणारी जत्रा... जिच्यातल्या मृत्यूगोलातली फिरती मोटरसायकल आठवून कित्येक रात्री दचकून जागे झालो ती जत्रा, जिच्यातल्या आरशांमधली आपलीच विरूप सोंगं पाहताना खदाखदा हसावंसं वाटायचं आणि तसं न लाजता हसता यायचं ती जत्रा... किंवा उत्सवाचा उच्छाद झाला नव्हता त्या काळातल्या गणेशोत्सवाची विसर्जनाची मिरवणूक आठवून पाहा... अभूतपूर्व उत्साहाने हसणारी, खिदळणारी माणसे, कागदी गुंडाळय़ाच्या पीस खोचलेल्या पँ पँ वाजणाऱया पिपाण्या, भाजलेल्या मक्याच्या कणसांचा खरपूस वास आणि नेहमीच्या साध्या रस्त्याला एकदम झॅकपॅक इस्टमनकलर बनवून टाकणारा `लायटिंगवाल्या गणपतीं'चा प्रकाश... अशा जादूई वातावरणात भल्या पहाटेच्या गारव्यात फिरण्याचा अनुभव... आता तसं काही आपल्या आत कधी घडणार नाही, इतके आपण प्रौढ आणि (खरेतर) निबर झालो, अशी ठाम धारणा मोडून काढतो हा टाइम्स स्क्वेअर!
असं काय आहे या चौकात? ज्यांचं भाडं जगात सर्वाधिक आहे अशा बहुमजली निऑन साइन्सने सजलेल्या जाहिराती आहेत, टीव्हीसारखे हलत्या चित्रांचे बहुमजली इलेक्ट्रॉनिक फलक आहेत, त्यांच्या डोळे गरगरवून टाकणाऱया अखंड रोषणाईने हा चौक सतत उजळलेला असतो. इथे सुप्रसिद्ध ब्रॉडवे आहे, जिथे अमेरिकेतली सर्वात लोकप्रिय नाटके रोज सुरू असतात. (सध्या `लायन किंग' आणि `मम्मामिया'चे खेळ गर्दी खेचून आहेत.) इथल्या भव्य मंचावरची म्युझिकल्स ही नाटकांपेक्षा सर्कस, ऑपेरा, नाटक, सिनेमा आणि कार्टून यांची अद्भुत सरमिसळ म्हणूनच ओळखली जातात. जातिवंत नाटकवाले त्यांना नाटकांचा दर्जा देत नाहीत. पण, इथल्या `शो'जच प्रचंड महागडी तिकीटे महिनोनमहिने आधी ऍडव्हान्स बुक्ड असतात. इथे जगप्रसिद्ध मादाम तुसाँचं मेणपुतळय़ांचं संग्रहालय आहे. मॉर्गन फ्रीमन या सुप्रसिद्ध अभिनेत्याचा पुतळा दारात आहे. त्यासोबत फोटो काढून घेता येतो. अमेरिकेच्या लाडक्या एमजे ऊर्फ मायकल जॅक्सनचा पुतळा त्याला आदरांजली म्हणून दारातच, पण काचेआड दिसतो. तो पाहताच मायकल जॅक्सन किती हडकुळा होता, हे लक्षात येते. टाइम्स स्क्वेअरमध्ये प्लॅनेट हॉलिवुडसारख्या महागडय़ा हॉटेलांपासून पिझा-बर्गर देणाऱया `टपऱयां'पर्यंत असंख्य प्रकारचं खाणं उपलब्ध आहे. न्यू यॉर्कचे टी शर्ट्स, कपडे, चॉकलेट्स, सुवेनियर्स, खेळणी... नाना वस्तूंची दुकानं आहेत. फुटपाथवर दहा मिनिटांत तुमचं अप्रतिम व्यंगचित्रं काढून देणारे किंवा शाडूमातीचा चेहऱयाचा हुबेहूब पुतळा करून देणारे कलावंत आहेत. तगडय़ा बाप्यांना आणि (इथल्या तेवढय़ाच तगडय़ा) बायांना सहज खांदय़ावर उचलून घेणारा सात फुटी बॅटमॅन इथे उभा राहून शक्तीचे प्रयोग दाखवत असतो. पण अशी रोषणाई, अशी दुकानं, अशी हॉटेल्स, अशा जाहिराती, असा चौक इतरत्रही असेलच ना!
असेलच!
पण हे सगळं म्हणजे टाइम्स स्क्वेअर नव्हे... इथला सदैव सळसळत्या ऊर्जेचा इलेक्ट्रिफाइंग माहौल म्हणजे टाइम्स स्क्वेअर... इथल्या रस्त्यारस्त्यावरून सतत उसळत असलेली अखिल जगतातल्या मानवजातीची गर्दी म्हणजे टाइम्स स्क्वेअर... वर्षाच्या अखेरच्या रात्री नववर्षस्वागतासाठी जगभरातून दशलक्षांमध्ये लोटणारी गर्दी म्हणजे टाइम्स स्क्वेअर... ही जगातली सर्वात हॅपनिंग प्लेस आहे... कारण, हे हॅपनिंग माणसांच्या बाहेरचं नव्हे, तर आतलं असतं... दिवसाच्या-रात्रीच्या कोणत्याही वेळी सर्व बाजूंनी नाना देशांची, नाना रंगांची, चेहरेपट्टय़ांची, ठेवणींची माणसं येत असतात... वय, धर्म, देश, पंथ, लिंग कोणतेही असो... प्रत्येकाच्या चेहऱयावर ती हरवलेली जत्रा सापडल्याचे उत्फुल्ल भाव असतात... इथे माणसं सैलावतात, हसरी होतात, नाचरी होतात, अदृश्यपणे वाहणाऱया चैतन्याच्या लाटेवर आनंदाने उसळतात, भान हरपून सगळा परिसर डोळय़ांनी पिऊन घेतात, उन्मुक्त बागडतात... इथे किती तास गेले, हे कधीच कळत नाही... `जिंदगी लंबी नहीं, बडी होनी चाहिए, बाबूमोशाय', असे `आनंद' कशाबद्दल म्हणून गेला होता, ते इथे घालवलेला काळ आठवला की कळतं...
...टाइम्स स्क्वेअरच्या ब्रह्मानंदात टाळी लागलेली असताना चक्क हिंदीत आर्जव कानी पडतं... ``जरा एक तस्वीर खिचेंगे प्लीज''... एक कुटुंब आहे, त्यातली एक अस्सल पठाणी सुकुमार सौंदर्यवती नाजूक स्वरात विनंती करते आहे... बुरखानशीन... पण फक्त चेहऱयावरून बुरखा हटलाय... फोटो काढल्यावर आपल्याला पृच्छा केल्याशिवाय राहावत नाही... `आप हिंदुस्थान से हो कि पाकिस्तान से?'
`जी... पाकिस्तान से!' असं सांगून ती मोहक हसून `शुक्रिया!' म्हणते आणि `टाइम्स स्क्वेअर'च्या जत्रेत विरघळून जाते...
...हं.... आता ते लाहोरही एकदा पाहिलेच पाहिजे!

(प्रहार, 2009) 

1 comment:

  1. maithili panse-joshiApril 20, 2012 at 11:50 PM

    waah apratim. vearnan wachun PARAT EKDA time square pahalach navhe.. anubhawaylach hawa... kharokhar vilobhaniya ahe time square

    ReplyDelete